Skip to content Skip to sidebar Skip to footer

माझ्या आठवणीतली ‘ती’…भाग ७

अजय ने दिलेली भेट पाहून अंजली सगळीकडे ते फुल दाखवू लागली आणि सगळ्यांना इतकं सुंदर फुल पाहून अजय आणि अंजलीच्या मैत्रीचा हेवा वाटू लागला कि,’एवढी घट्ट मैत्री आणि साधं लग्नाला येऊ शकला नाही’ अशी टोमणीवजा बोलणीही तिला मिळू लागली पण अंजलीला समाधानही वाटलं की अजयने न येऊन सुद्धा आपल्याला भेट दिली….आभार कसे मानायचे म्हणून तिने संजय ला अजयचा खरा पत्ता खूपदा विचारला पण संजयने अंजलीला सांगितला नाही कारण संजयला अजयने मैत्रीची शप्पथ घातली होती…अजयचे आभार मानणं राहूनच गेलं….दुसरीकडे अभय आणि अंजलीच्या संसाराची सुरुवात झाली…सत्यनारायण पूजा,जागरण गोंधळ असा लग्नानंतरचा सोहळा पार पडला…आणि हनिमून ही झाला,पाहुणेरावळे यात वर्ष कसं गेलं हे अंजलीला कळलंच नाही.अंजलीचे सासू-सासरेही देव माणसं होती म्हणून अंजलीला आधार होता…एकीकडे अंजली नेटाने सगळा संसाराचा डोलारा सांभाळत होती आणि दुसरीकडे कवी ‘अनुराग’ चे सगळे प्रकाशित झालेले काव्यसंग्रह अगदी न चुकता वाचत होती, ‘अनुराग’ चे भरभरून कौतुक अभयला सांगत असे…

अंजली – काय कवी आहे रे… अभय…प्रत्येक ओळ न ओळ मला वाचाविशी वाटतीय खूप जवळून ओळखतो हा कवी मला..!

अभय – हो का…! नवऱ्याला ओळखा की जरा…त्याला काय हवं नको ते कोण पाहणार…?

अंजली – हे रे काय… अभय ?…तू असं का बोलतोयंस…मी किती सकाळपासून उभी असते तुझ्यासाठी पण तुला काय त्याच…! [अभयच्या गळ्यात हात टाकून]

अभय – हो ना….आपल्या दोघांच्या मध्ये हा कवी नक्कीच येतोय …कवितांपेक्षा दुसरा काही सुचत नाही का ग तुला…?

अंजली – काय करणार…तू ऑफिसला गेल्यावर दुसरं काय करणार…!

अभय – करण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत घरात…बाहेर पड थोडंसं एखादा डान्स क्लास जॉईन कर…हव तर पुढे MA कर…पण कवीच्या प्रेमात वैगेरे पडू नकोस हा…

अंजली – लग्न झाल्यापासून खूप पझेसिव्ह झालायस तू फार…एनी वे..चल जेवायला..आणि कवीच्या प्रेमात वैगेरे काय हे…कितीतरी मुलीसुद्धा फॅन असतील या कवीच्या…त्यांचे नवरे नसतील म्हणत असं..

अभय – बरं…बाई सॉरी…आता वाढ ना जेवायला मला…आणि तू ना असं काकूबाईसारखा राहू नकोस हा..काय हा अवतार तुझा…कधीतरी असं मस्त तयार राहत जा…माझ्यासाठी..

अंजली – अभय…मी तुझ्यासाठीच इथे एवढा नाचत असते..आणि सगळयांची काळजी घ्यावी लागते मला…थोडंसं दुर्लक्ष होणारच आणि तू कुठे बाहेर फिरायलाही घेऊन जात नाहीस मला म्हणजे मी मस्त तयार होईल…

अभय – हम्म…बाहेर गेल्यावरच तयार राहायचं आणि घरात…आम्ही काय तुझे दुश्मन आहोत का..[हसून]

अंजली – [विषय बदलते] अरे ही भाजी बघ खूप छान झालीय…आज आईनी शिकवली मला इकडच्या पद्धतीने बाबांनी खूप खाल्ली…!

अभय – हम्म…त्यांना बाकी मुठीत ठेवलंयस हा तू…

अंजली – म्हणजे..असं का म्हणतोस…खरं तर तुला ठेवलं पाहिजे होत मी मुठीत….!

अभय – मला मुठीत ठेवणार….खरं तर तू मला तुझ्या मिठीत ठेवलं पाहिजे….[असं म्हणून अंजलीचा हातआपल्या हातात घट्ट पकडून ठेवतो]

अंजली – अय्या…काय हे…सोड की…बाप रे…मनीषा आली वाटतं…

मनीषाचं नाव ऐकताच अभयच्या हाताची पकड ढिली होते…आणि अंजली तिथून पळ काढते…असाच दोघांचाही संसार आनंदात चाललेला असतो पण… पुढे मात्र दुसरच काहीतरी वाढवून ठेवलेलं असतं…
परपुरुषाचं नावही काढलेलं अभयला आवडत नसे…अभय ऑफिसच्या निमित्ताने बाहेर जात असे आणि अंजलीवर मात्र पाळत ठेवण्यासाठी माणसाला नेमलेलं असतं…अंजलीलाही याची काही कल्पना नव्हती ..हे अंजलीला सासूबाईंकडून माहिती झालेलं असतं,

अंजलीही एक दिवस वेष बदलून अभयला भेटायला म्हणून ऑफिस ला जाते…ऑफिसला जाता-जाता मधेच एक रेस्टॉरंट नेहमी लागत असे,अंजली तिथे तिच्या आवडीच्या पार्सल ची ऑर्डर द्यायला जाते आणि होमेडिलीव्हरी करायला सांगते बाहेर येताच अभय तिला दिसतो तसं अंजलीला आनंद होतो पण शेजारीच एक मॉडर्न मुलगी बसलेली दिसते पण,…..अंजलीच्या रंगाचा अगदी बेरंग होतो का? तर…तिथले दृश्य पाहून अंजलीचा अभयवरचा विश्वासच उडतो कारण,दोघेही एकमेकांच्या गळ्यात गळे घालून बसलेले असतात….अंजलीला तिथे एक मिनिटही थांबणं शक्य नव्हतं…तिच्या मनात एकच विचार..

‘अभय एकेकाळी आपल्यावर जीवापाड प्रेम करायचा..मी परपुरुषाबरोबर बोललं तरीही याला खपत नसे…हा मात्र बायको असताना परस्त्रीबरोबर अगदी निर्लज्जपणे फिरतोय हे मी बायको म्हणून कसं सहन करू…’ तसा अंजलीने घडलेला सगळा प्रकार आपल्या सासू-सासऱ्यांच्या कानावर घातला मग अभयची कानउघडणी केली गेली.. आई-वडिलांना सांगितल्याने अभयने अंजलीला खूप त्रास द्यायला सुरुवात केली…रोज रात्री दारू पिऊन अभय तिला मारहाण करायचा…अशातच काही दिवसांनी अंजली गरोदर राहिली तरीही अभयला तिची दया येऊ नये…पोटात असलेली मुलं आपली नाहीच आहे असं त्याच म्हणणं होत…पण सासू-सासऱ्यांमुळेअंजलीला खूप आधार वाटत होता…त्यामुळे आला दिवस ती ढकलत असे….मग अंजलीला एक मुलगा झाला त्याच्याकडे पाहता-पाहता तिचा दिवस कसा जाई हे अंजलीला कळतच नसे..अशातच अंजलीचे सासू-सासरे एका अपघातात मरण पावले…

मग मात्र अंजली अभयच्या कचाट्यात एकटी सापडली…अभय रोज दारू पिऊन येत असे.. आणि स्वयंपाकात काही चुकल की अभय अंजलीला बेदम मारत असे…. छोटा आरव आपल्या आईकडे पाहून केविलवाणे रडत असे… अंजलीनेही मग धीराने सगळ्या परिस्थितीला सामोरं जाण्याचं ठरवलं,अंजली आपल्या छोट्या आरवला घेऊन आई-वडिलांकडे म्हणजेच आपल्या माहेरी राहू लागली…आपल्या बाबांच्या ओळखीने एक नोकरी पकडली…आणि आपली गुजराण करू लागली…

अंजलीच्या आयुष्यात एवढे चढ-उतार झाले पण एक गोष्ट पक्की होती…अंजली अजूनही कवी ‘अनुराग’ च्या कविता न चुकता वाचत असे…’खरा छंद कसा जोपासावा याच उदाहरण म्हणजे अंजली’…असं तिच्या मैत्रीणी नेहमी म्हणत असत.. तिच्या आयुष्यात एवढ्या हालअपेष्टा झाल्या ..पण अजयने लग्नात भेट म्हणून दिलेलं गुलाबाचं फुल अजूनही जसंच्या तसं होतं इतक्या कसोशीने ते जपून ठेवलं होतं…अगदी मारहाण करणाऱ्या अभयपासूनही ते जपलं होतं अंजलीने…अभय ने तर कहरच केला रोज एक बाई त्याच्या घरातून निघताना अंजलीला कळले त्यानंतर अंजलीने एक ठाम निर्णय घेतला तो म्हणजे अभय बरोबर घटस्फोट घेण्याचा…साधारण वर्षभराने दोघांचा घटस्फोटही झाला.

असेच दिवसामागून दिवस जात होते तरी तितक्याच नेटाने आपल्या मुलाचं पालनपोषण ती करत होती दोघांच्याही घटस्फोटाला १० वर्ष होऊन गेली…तेवढ्या दिवसात तिचे सोबती म्हणजे आई-वडील आपला मुलगा आणि कवी ‘अनुराग’ ज्या कवीच्या कविता अंजली वाचत असे आणि त्या कवितांच्याच नव्याने प्रेमात पडत असे…

मग अंजलीच्या मनात पुढे याच कविता बदल घडवून आणतात का हे पाहूया पुढच्या भागात…

Leave a Comment

error:

Warning

सध्या युट्युब वर कथा चोरी करून वाचून दाखवण्याचे धंदे चालू आहेत लोकांचे. आमच्या वेबसाईट वरची कथा कुठल्याही युट्युब चॅनेलवर बेकायदेशीररित्या आढळल्यास त्या चॅनेलला लगेच रिपोर्ट करण्यात येईल ह्याची कृपया दक्षता घ्यावी. तसेच आपल्या वाचकांपैकी कुणालाही असे बेकायदेशीर चॅनेल्स आढळल्यास आम्हाला ritbhatmarathi@gmail.com ह्या ई-मेल वर त्वरित कळवावे.