
“बाई गं….कधी मला सुटका मिळणार ह्या सगळ्यातून….सकाळी उठल्यापासून जे काम सुरु होतं….रात्री झोपेपर्यंत चालतात….कुणाची काही काडीची मदत नसते…” सकाळी सकाळी मनस्वीचा तोंडाचा पट्टा चालू झाला होता आणि सोबतच अश्रुधारा हि वाहत होत्या.
मनस्वीच्या सासूबाई गोदा अक्का देवघरात पूजा करत होत्या तर नवरा मनोजची ऑफिसला जायची तयारी चालू होती.
शर्टाची बटणं लावता लावता मनोज ,”काय झालं मनस्वी सकाळी सकाळी ओरडायला….अगं तुला कितीदा सांगितलं आहे मी कि स्वयंपाक बाईच्या हातचा नसेल आवडत तर नुसत्या चपात्यांना तर लाव बाई….पण ऐकायचं काही नाही..बस्स सकाळ झाली कि आपल्या तोंडाचा पट्टा चालू करायचा… ”
मनस्वी तावातावतच आतमध्ये मनोज जवळ जाते, “बाई लावून काय होणार हो…४ दिवस कुठं जाऊ म्हटलं कि तुम्ही नेत नाही कुठे फिरायला….मानसिक त्रास होतो हो खूप सारखं सारखं एका जागी राहून….”
आईची आठवण काढून मनस्वीच्या अश्रूंचा बांध कोसळला होता, “वर्ष झालं आईला जाऊन….बाबा लग्नाआधीच गेले आणि आता आई पण गेली….आई गेल्या पासून माहेरही बंद झालं…नाहीतर ४-८ दिवस माहेरी जाऊन आलं कि बरं वाटायचं”
मनोज – “अगं मग जा ना …तुला कुणी अडवलंय का… इथली काळजी करू नको तू काही….मी आणि आई बघून घेतो….ह्या वर्षी दिवाळी नंतर जाऊन ये…तशीही तुझ्या भावाला दिवाळी करायची नाहीये ह्या वर्षी….फराळ घेऊन जा”
मनस्वी – “तुम्हाला काय वाटतं हो.. मला माहेरी जाऊशी नाही वाटत का?…. आई बाबा तिथे राहिले नाही आता…भाऊ भावजयीच्या राज्यात माहेर असतं का हो? आठवड्याभरावर येऊन ठेपलीये दिवाळी….पण भावाचा अजून फोन नाही आला विचारपूस करायला कि कधी येते म्हणून….आई होती तेव्हा महिनाभर आधीच माझ्या येण्याची तयारी करून ठेवायची. ” असं म्हणून मनस्वी ढसाढसा रडू लागली.
मनोज मनस्वीला जवळ घेतो , “अगं असेल काहीतरी अडचण तुझ्या भावाची म्हणून फोन नसेल केला….आणि त्याने नाही केला तर तू कर ना”
मनस्वी – “काही अडचण बीडचन नाही….मला वंस असत्या तर मी त्यांना डोक्यावर घेऊन मिरवलं असतं हो….कुणी आलं कि खूप आनंद होतो मला..पण सगळ्यांचं तसं नसतं नाहो….भावजय आहे माझी तशी चांगली पण तिचाही माहेरचा गौताळा खूप आहे….तिचा माहेरी जायचा प्लॅन असेल म्हणून भावाने नसेल केला फोन….बरं जाऊ द्या कुठे मी सकाळी सकाळी हा विषय घेऊन बसले…. तुमचा डब्बा पॅक करायचाय तुम्हाला उशीर होईल परत आणि आईचीही चहाची वेळ झालीये” डोळे टिपत मनस्वी किचन मध्ये गेली आणि आपल्या कामाला लागली.
मनस्वी, आई, बाबा आणि एक मोठा भाऊ असं चौकोनी कुटुंब होतं तिचं…वडील लहान असतानाच काही आजाराचं निमित्त करून सोडून गेले….आईने कसबसं नोकरी करून मनस्वीला आणि भावाला मोठं केलं….३ वर्षे झाली होती मनस्वीच्या लग्नाला…मनस्वीच्या लग्नानंतर १ वर्षाने भावाचं लग्न झालं….त्यामुळे भावजयीसोबत मनस्वीच नातं थोडं कमीच खुललं होतं….वर्षातून २ दाच मनस्वीला माहेरी जायला मिळायचं आणि त्यातहि आई होती म्हणून निभावून आणायची ती….कारण आईचा दबदबा असायचा….पण मागच्या वर्षी आईच्या जाण्याने सगळ्यांनाच धक्का बसला होता….मनस्वीवर तर फार मोठा आघात झाला होता..दिवस रात्र फक्त एवढाच विचार करायची कि आई बाबासोबतच माहेर पण संपलं का?
मनस्विनी सकाळची सगळी कामं आवरली होती…सासूबाईंना खाऊ पिऊ घालून ती वामकुक्षीसाठी म्हणून आपल्या रूम मध्ये गेली….डोळे मिटून झोपायचा प्रयत्न करत होती पण झोप काही लागेना….सारखा आईचा चेहराच दिसत होता..तेवढ्यात फोनची घंटी वाजली….मनस्वीच्या भावाचा फोन होता…. जाड हाताने मनस्वीने भावाचा फोन उचलला
मनस्वीचा भाऊ जय , “कशी आहे मनू तू ? सगळं व्यवस्थित आहे नं ? “
मनस्वी , “हो दादा मी बरी आहे..तू सांग कसा आहेस आणि वहिनी कश्या आहेत….आजच आईची आठवण आली होती रे दादा….”
जय, “माहित आहे मनू मला…आईशिवाय घर फार सुन्न वाटतं गं…बरं ह्या वर्षी भाऊबीजेला येणार आहेस ना….तू दिवस सांग मी घायला येतो तुला….”
मनस्वी, “नको दादा राहू दे ह्या वर्षी ….तूच ये वहिनींना घेऊन इकडे “
जय, “असं कसं नाही….आई असताना एकदाही असं झालं नाही कि तू आली नाही….तू नाही आली कि परत आईला वाईट वाटेनं कि माझ्याविना माझ्या लेकीची तारांबळ होतेय..बरं तू तुझ्या वाहिनीशीच बोल…थांब तिच्याकडे देतो फोन “
माही, “प्रणाम ताई….ह्या वर्षी भाऊबीजेला यायचं बरं का नक्की….आई तुमचा जसा थाटपण करायच्या तसं जमेल कि नाही माहित नाही ताई पण तुम्हाला काही कमी पडू देणार नाही हे नक्की….तुम्ही आल्या कि आम्हालाही तेवढंच चांगलं वाटेल….वर्ष झालं घरात आम्ही दोघेच…तुम्हाला काय सांगू ताई..मागच्या २ महिन्यांत हॉस्पिटलच्या धावपळी चालू आहेत..माझं मिसकॅरेज झालं….त्यामुळेच ह्या गोंधळात ह्यांनी तुम्हाला फोन नाही केला..हे म्हणे कि मनस्वीला फ केला कि तिला उगाच त्रास होईल..”
मनस्वी गोंधळून , “काय!!!! अगं वाहिनी तुम्ही दोघे एवढ्या प्रॉब्लेम मधून जात होतात आणि मला एका शब्दानेही नाही बोललं कुणी…केलं ना तुम्ही मला परकं? आई असती तर तिने मला हक्काने मदतीसाठी बोलावून घेतलं असतं “
माही, “खरंय ताई तुमचं….मीही म्हटलं होतं ह्यांना कि मनस्विताईंना बोलावून घ्या म्हणून पण हे नको म्हटले..म्हणे कि आधीच आईच्या जाण्याने तुम्ही दुःखात आहेत आणि एक अजून टेन्शन नको तुम्हाला….फक्त एक माहिती म्हणून मनोज दाजींना सांगितलं होतं आम्ही”
मनस्वी, “काय!! ह्यांना माहित आहे आणि हे एका शब्दाने मला काही बोलले नाही….बघतेच आता त्यांना आल्यावर “
माही, “नको नको ताई….दाजींना नका काही बोलू त्यात त्यांची काही चूक नाही..बरं कधी येतंय सांगा मी सगळी तयारी करून ठेवते… “
मनस्वी, “वाहिनी तू काही करू नकोस..आराम कर मी भाऊबीजेच्या दिवशी ह्यांना घेऊनच येते आणि त्या दिवशी परत निघू मग आम्ही” असं म्हणून मनस्वीने फोन ठेवून दिला.
पण आता तिच्या मनात एक वेगळंच समाधान होतं आणि ती स्वतःला दोष देत होती कि नुसत्या भाव वाहिनीच्या फोनने तिला किती हायसं वाटत होतं….आणि सकाळपासून ती उगाच सगळ्यांना दोष देत बसली होती.
भाऊबीजेच्या दिवशी मनस्वी आपल्या माहेरी गेली….भावा विहिणीने यथासांग तिचं आणि मनोजचा पाहुणचार केला होता. अगदी दरवर्षी आई करते तसाच. वाहिनीने मनस्वीचे आवडीचे सगळे पदार्थ तयार करून ठेवले होते. भावाने भाऊबीजेला भेट म्हणून पैठणी दिली….माहीने मनस्वीची रूमही तयार करून ठेवली होती.
माही, “ताई इथेच राहायचं आता….बस्स मी अजून काही ऐकून घेणार नाही”
मनस्वी, “अगं पण तुझी पण तर भाऊबीज आहे नं…तुलाही माहेरी जायचं असेलच कि आणि मी ह्यांना घेऊन आलीये सोबत..मला नाही जमणार राहायला”
माही, “ताई दरवर्षी प्रमाणे तुम्ही गेल्यावर माझी भाऊबीज….आणि दाजी जातील कि त्यांचे ते….आणि ताई आई नाही म्हणून आम्हाला तुम्ही तरी पोरकं करू नका…. आई नाही म्हणून तुमचं माहेरपण संपत नाही ना….तुमचा अधिकार अजूनही तसाच आहे ह्या घरावर आणि पुढेही तसाच राहील “
माहीचं बोलणं ऐकून मनस्वीला रडू कोसळलं आणि माहीच्या गळ्यात पडून ती ढसाढसा रडू लागली.
मनोज, “बघितलं मनस्वी आईच्या जाण्याने तुझं माहेरपण संपलं नाही ते अजूनही जिवंत आहे”
मनस्वी पुढचे ८ दिवस माहेरी राहिली ….माहीने तिला कसलीही कमी पडू दिली नाही….जाता जाता सवाष्णींची खणा नारळाने ओटी भरली.
मनस्वी घरी परत आली ती माहेरच्या आठवणींचा , भाऊ भावजयच्या प्रेमाचा खजिना घेऊनच….माहेर अजूनही आहे ह्या कल्पनेनेच ती पुरती रिचार्ज झाली होती आणि परत आपल्या घरी जोमाने आणि उस्फुरतेने कामाला लागली होती.
समाप्त