Skip to content Skip to sidebar Skip to footer

बंधू येई ग माहेरी न्यायला….’ गौरी-गणपतीच्या सणाला ‘ …महालक्ष्मी (mahalakshmi) पूजन | mahalakshmi pujan in Marathi

श्रीगणेश ही हिंदू धर्मियांची आराध्य देवता. कुठल्याही शुभकार्याची सुरुवात ही गणपतीच्या म्हणजेच श्रींच्या आशीर्वादाने होत असते म्हणूनच शुभकार्याप्रसंगी सर्वात आधी पूजेचा मान गणरायाला दिला जातो. श्री गणेश चतुर्थी हे भाद्रपद शुक्ल चतुर्थीला केले जाणारे एक धार्मिक व्रत आहे. काही ठिकाणी फार पूर्वी पासून चालत आलेल्या प्रथेनुसार गणेश चतुर्थीच्या तिसऱ्या दिवशी गौरी आवाहन म्हणजेच गौरी स्थापना करण्यात येते. काही ठिकाणी गौरायांना महालक्ष्मी (mahalakshmi) असेही म्हणतात.

पुराण कथेनुसार श्रीगणेशाचा जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थीला झाला असे मानले जाते. याच चतुर्थीला महासिध्दीविनायकी चतुर्थी किंवा ” शिवा ” असेही म्हंटले जाते.श्रीगणेशाला प्रसन्न केल्याने घरात सुख शांती आणि समृद्धी प्रस्थापित होते….                            

Table Of Contents
1. श्री गणेश चतुर्थी व्रत

हे व्रत श्रावण शुक्ल चतुर्थी ते भाद्रपद शुक्ल चतुर्थी या दरम्यान महिनाभर केले जाते. या व्रतामध्ये नदीकिनारी जाऊन स्नान करून हातावरच अंगठ्याएवढी श्री गणेशाची मूर्ती बनवावी. त्या मूर्तीचे सोळा उपचारांनी पूजन करावं आणि ती मूर्ती एका नदीतच विसर्जित करावी अशी धारणा आहे. या व्रतालाच पार्थिव गणेश व्रत असेही संबोधतात

2. श्रींची मूर्ती कशी असावी
Marathi Goshta, Marathi Story, Marathi Moral Story, Marathi Love Story, Marathi Motivational Story, मराठी प्रेमकथा, लहान मुलांच्या गोष्टी

गणरायाची मूर्ती ही मातीचीच असावी असा नियम आहे. म्हणून ठिकठिकाणी शाडूच्या मूर्तीला मागणी असते कारण पर्यावरणपूरक अशी शाडू समजली जाते. या मातीमुळे पर्यावरणाला हानी पोचत नाही..पण तरीही आखीव-रेखीव समजल्या जाणाऱ्या प्लास्टर ऑफ पॅरिस च्या मुर्त्या ही बाजारात असतात…या मूर्ती दिसायला सुबक असतात पण पाण्यात विरघळू न शकल्याने पर्यावरणाला हानी पोचते…म्हणून शाडूच्या गणेशमूर्ती शक्यतो वापराव्यात.

गणरायाच्या मूर्तीचे चार हात असावेत. गणराया आशीर्वाद उजव्या हातानेच देतो आहे हे एकदा नक्की पडताळून पाहावे. उभा किंबहुना नाचणारा गणपती शक्यतो नसावा. तसेच उजव्या सोंडीचा गणपती फार जिद्दी असतो अशी एक आख्यायिका आहे त्या कारणाने शक्यतो डाव्या सोंडीचा गणपती असावा. 

3. श्री गणेशाची प्रतिष्ठापना आणि पूजा

गणपती बसणार…विराजमान होणार या अगोदरच गणपतीबाप्पांच्या आगमनापूर्वी घरोघरी तयारी केली जाते. प्रत्येकजण आपापल्या परंपरेप्रमाणे पूजा अर्चना केली जाते. कुठे गणपती बाप्पा दहा दिवस, पाच दिवस तर कुठे फक्त दीड दिवस असतात…श्रींची प्रतिष्ठापना करताना श्री गणेशाचे आवाहन,पूजन,अभिषेक,अत्तर-फुले आणि दुर्वापात्री वाहून नैवेद्य अर्पण करून आरती करावी अशी प्रथा आहे. भाद्रपद महिन्यात पावसाचे दिवस असल्याने ठिकठिकाणी हिरवळ असते आणि विविध वनस्पती उगवलेल्या असतात म्हणून सोळा पत्री श्रीगणेशाना अर्पण करतात. या पत्रींमध्ये कितीतरी वनस्पती औषधी समजल्या जातात.

4. बाप्पांसाठी खास नैवेद्य

गणेश चतुर्थी पासून ते अनंत चतुर्थी पर्यंत बाप्पांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य बनवले जातात. जसं की मोदक,लाडू,करंज्या दहा दिवस नैवेद्य आणि प्रसाद याची चंगळ असते. म्हणून रोज श्रींची मनोभावे पूजा…त्यानंतर आरती आणि मग प्रसाद असा दिनक्रम दहाही दिवस सर्व घराघरात असतोच असतो.

5. गणेशोत्सव साजरा करण्याचा सामाजिक हेतु

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सर्व भारतीयांना एकत्र आणून सर्वांमध्ये एकोपा निर्माण व्हावा यासाठी गणेशोत्सवाची स्थापना केली. यामुळे आपोआपच सामाजिक बांधिलकी जोपासली जाऊ लागली. त्याने विचारांची देवाणघेवाणही उत्तमप्रकारे होऊ लागली. काळानुरूप गणेशोत्सवामध्ये विविध प्रकारची पद्धत जोपासली जाऊ लागली. जसं की विविध सांस्कृतिक कार्यक्रम, विविध कला गुण याना प्रोत्साहन देतात. याने नवी पिढी समजली जाणारी लहान मुलं सहभागी होऊन आपलं नाव कमावतात. याने काय होतं..? तर कलागुणांना वाव मिळून पुढे त्यातच आपलं नाव मुलं कमवू शकतात…गणपती ही कलेचीही देवता आहे…

6. श्रींच्या जन्माची पुराणकथा

पुराणकथा सांगायची झाल्यास श्रींची माता असलेल्या माता पार्वती ज्यावेळी स्नानासाठी जाणार होत्या. त्याच वेळी नेमके पहारेकरी नसल्याने माता पार्वतीने मातीच्या मूर्तीची प्रतिमा बनवून त्यात प्राण फुंकून आणि त्या बालकाला पहारेकरी नेमवून ठेवले. आणि माता पार्वती स्नानासाठी गेल्या. त्यानंतर घटकाभराने भगवान शंकर माता पार्वतीच्या कक्षात आले. पण सांगितल्याप्रमाणे त्या बालकाने अथवा त्या पहारेकऱ्याने भगवान शंकरास जाण्यापासून अडवले. हे पाहून भगवान शंकर अतिक्रोधीत झाले. संतापाच्या भरात महादेवाने त्या बालकाचा शिरच्छेद केला. हे सर्व पाहून माता पार्वती क्रोधीत झाल्या. आपल्या बायकोचा राग शांत करण्यासाठी भगवान शंकराने सेवकांना सांगून ‘ पृथ्वीतलावर जे कुणी दिसेल त्याचे शिर आणून या बालकास बसवण्यात येईल’. महादेवाची आज्ञा शिरसावंद्य म्हणून सेवकांनी हत्तीचे शिर आणून दिले. महादेवांनी ते शिर त्या धडास बसवले. ब्रह्मदेवांनी त्यात प्राण फुंकले. आणि त्या बालकाचे नामकरण ‘ श्रीगणेश ‘ असे करण्यात आले. तोच दिवस हा भाद्रपद शुद्ध चतुर्थीचा दिवस समजला जातो…

7. श्रींचे विसर्जन

सर्वांच्या डोळ्यात या वेळी पाणी आलेलं असते कारण आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देणं खूप अवघड असत…’ गणपती बाप्पा मोरया…पुढच्या वर्षी लवकर या ‘ असा जयघोष करत बच्चेकंपनी लाडक्या बाप्पाला निरोप देते… .. जो उत्साह गणपती आगमनाचा असतो त्या उत्साहाचा लवलेशही गणपती विसर्जनाच्या दिवशी दिसत नाही…कारण या वेळी प्रत्येक जण भावूक झालेला असतो…गणपती विसर्जनालाच अनंत चतुर्दशी असेही म्हणतात. 

Marathi Goshta, Marathi Story, Marathi Moral Story, Marathi Love Story, Marathi Motivational Story, मराठी प्रेमकथा, लहान मुलांच्या गोष्टी
mahalakshmi Sthapana:

गौरीपूजन किंवा महालक्ष्मी पूजन हे भाद्रपद महिन्यातील महिलांनी करायचे व्रत आहे…हा महाराष्ट्रातील महत्वाचा समजला जाणारा एक सणही आहे यास महालक्ष्मी पूजन असेही म्हणतात…गणपती देवाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर दोन दिवसांनी गौरी बसवल्या जातात यालाच ज्येष्ठ गौरी असेही म्हणतात कारण जेष्ठ नक्षत्रावर गौराईची पूजा केली जाते…संस्कृत शब्दकोशानुसार गौरी म्हणजे आठ वर्षाची पवित्र कुमारिका…गौरी म्हणजे तुळशी,पृथ्वी,पार्वती असेही संबोधले जाते…

8. गौरीपूजन (mahalakshmi) आख्यायिका आणि इतिहास | gauri pujan legend and history

देवशास्त्रात गौरी म्हणजे शिवाची पत्नी आणि देवा गणेशाची आई असं मानलं जात…एकदा असुराच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया महालक्ष्मी गौरी कडे गेल्या आपले सौभाग्य अक्षय्यय करण्यासाठी त्यांनी प्रार्थना केली त्या स्त्रियांना अनुसरून गौरीने असुरांचा संहार केला आणि शरण आलेल्या स्त्रियांना आणि त्यांच्या पतींना आणि पृथ्वीवरील प्राण्यांना सुखी केले महालक्ष्मीच्या कृपाप्रसादाने सर्व स्त्रियांनी त्यादिवसापासून गौरीपूजन आरंभले.

9. गौरी स्थापन करण्याच्या पद्धती | different methods of gauri pujan

आपल्या भारतीय संस्कृतीत वेगवेगळ्या प्रथेने गौरींची स्थापना केली जाते…जसे की शेतकरी असतील तर स्त्रिया धान्यांच्या राशी मांडून गौरी पूजन करतात…काही ठिकाणी पाणवठ्याच्या ठिकाणावरून सात किंवा अकरा खडे आणतात आणि त्यांची पूजा करतात…काही ठिकाणी पाच मडक्याच्या उतरंडी करून त्यावर गौरीचे मुखवटे चढवतात आणि त्या उतरंडीनाच साडी नेसवतात आणि त्यांची पूजा करतात…काही ठिकाणी धान्याची रास ठेऊन त्यावर मुखवटे ठेवतात आणि त्यांची पूजा करतात…त्याचप्रमाणे तेरड्याचीही गौर असते…तेरड्याची रोपे मुळासकट आणतात…हे रोपाचे मूळ म्हणजेच गौरीची पाऊले समजली जातात….आत्ताच्या काळात अगदी वेळात वेळ काढूनही विविध पद्धतीने गौरीची स्थापना केली जाते.

10. गौरी आवाहन

आपल्या प्रथेप्रमाणे कुमारिकेच्या हातून गौरी आणली जाते…ज्या बाईच्या हातात गौरी आहेत त्या बाईचे किंवा मुलीचे पाय दुधाने अथवा पाण्याने धुवून वाजत गाजत गौरी आणली जाते…गौरी ज्या उंबरठ्यावरून आणली जाते तिथपासून ते जिथे गौर बसवतात त्या जागेपर्यंत लक्ष्मीच्या पायाचे ठसे उमटवत गौरीचे मुखवटे आणतात…आणि त्यावेळी घंटानाद केला जातो…पहिल्याच दिवशी गौराईला भाजी आणि भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो.

11. गौरीपूजन | How to do gauri (mahalakshmi) pujan

जेष्ठ नक्षत्रावर गौरीची पूजा केली जाते म्हणूनच जेष्ठागौरी असे संबोधतात…याच दिवशी गौरीला रव्याचे लाडू,करंजी,चकली,चिवडा,शंकरपाळे,गुळपापडीचा लाडू असे नैवेद्य दाखवले जातात…संध्याकाळी आरती करून पुरणपोळी,ज्वारीच्या पिठाचे आंबील,अंबाड्याची भाजी असा नैवेद्य दाखवला जातो…याच दिवशी सुवासिनींना हळदी-कुंकू लावण्याचीही आपल्याकडे प्रथा आहे.

12. गौरी विसर्जन | gauri (mahalakshmi) visarjan

तिसऱ्या दिवशी म्हणजे मूळ नक्षत्रावर गौराईचे विसर्जन करतात…त्या दिवशी सुताच्या गाठी पडतात त्यात हळदी कुंकू,सुकामेवा,बेलफळ,फुले,झेंडूची फुले,रेशीम धागा असे जिन्नस घालून गाठी पडतात.त्यानंतर गौराईची पूजा आणि आरती करतात…नैवेद्यासाठी गोड शेवयाची खीर,उडीद डाळीचा भाजलेला पापड याचा नैवेद्य दाखवतात…तिसऱ्या दिवशी गौराईच्या मुखवट्यावर एक प्रकारची उदासीनता दिसून येते…आरती करून पुढील वर्षी लवकर परत येण्याचा आग्रह केला जातो आणि मग विसर्जन केले जाते…गौरीचे पाण्यात विसर्जन केल्यावर परत येताना थोडी वाळू घरी आणली जाते आणि ती वाळू घरातल्या किंवा बागेतल्या झाडांवर पसरवली जाते…असे केल्याने घरात सुख समृद्धी आणि ऐश्वर्य नांदते…

माहेरवाशिणीला माहेरची ओढ लावणारा आणि सासुरवाशिणीची लगबग वाढविणारा गौराईच्या सण सर्वदूर अति भक्तिभावात आणि आनंदात साजरा होतो.म्हणूनच अजूनही मराठी गाणी ओठांवर आपसूकच येतात…’ रुणुझुणुत्या पाखरा….जा रे माझ्या माहेरा…आली गौराई अंगणी तीच लिंबलोन करा…’

Leave a Comment

error:

Warning

सध्या युट्युब वर कथा चोरी करून वाचून दाखवण्याचे धंदे चालू आहेत लोकांचे. आमच्या वेबसाईट वरची कथा कुठल्याही युट्युब चॅनेलवर बेकायदेशीररित्या आढळल्यास त्या चॅनेलला लगेच रिपोर्ट करण्यात येईल ह्याची कृपया दक्षता घ्यावी. तसेच आपल्या वाचकांपैकी कुणालाही असे बेकायदेशीर चॅनेल्स आढळल्यास आम्हाला ritbhatmarathi@gmail.com ह्या ई-मेल वर त्वरित कळवावे.