Ritbhatmarathi

Search
Close this search box.

बिना सहस्रबुद्धे कडक शिस्तीची मुख्याध्यापिका. संपूर्ण शाळेत तिचाच दरारा. पण आज रसिका आणि वेदिकाच्या घरातून बाहेर पडल्यानंतर त्या खूप अस्वस्थ झाल्या. प्रत्येकाचं दुःख ज्याच्यात्याच्या पाशी हे जरी खरं असलं तरीही ज्याचं त्याला दुःख खूपच जास्त असतं. अशा वेळेस कोणी कोणाला कितीही आधार दिला तरी तो उपराच वाटतो असा विचार करत त्यांनी स्कुटी सुरू केली.
माणसाला मागितलेलं मिळालं की त्यातला आनंद खूप काही वेगळा असतो आणि न मागितलेलं मिळाल्यावर जवाबदारीची जाणीव सतत मनामध्ये राहते आणि आयुष्य त्या जवाबदारीच्या जाणीवे भवती सजगपणे फिरत राहतं.
बिना मॅडम घरी पोचल्या, सोफ्यावर शांत बसल्या बसल्या त्यांना कालची घटना आठवली.
सकाळची प्रसन्न वेळ होती. शाळा भरल्याची घंटा झाली. शाळेसाठी जमा झालेल्या मुलांचा कालकलाट कमी होत होता. शिस्तीच्या बाबतीत कठोर असलेलल्या बिना मॅडम आपल्या मानाच्या खुर्चीत अभिमानाने बसल्या होत्या. बाकीच्या शिक्षकांची तासावर जायची लगबग आणि प्रार्थनेसाठी आपापल्या वर्गात उपस्थित राहण्याची मुलांची धडपड, सगळं पाहत होत्या. तिची शिस्तच तशी कडक. प्रार्थनेच्या आधी सर्व शिक्षकांनी वर्गात हजर पाहिजे हा तिचा शिरस्ता. आजही केबिनच्या खिडकीतून त्या सारं बघत होत्या. सहजच त्यांचं लक्ष समोरच्या ग्राऊंडवर गेलं. तिथं दोन मुली बोलत उभ्या असलेल्या दिसल्या. बिनाच्या भुवया ताणल्या गेल्या. आपली खुर्ची सोडून त्या बाहेर आल्या. मुलीं आपल्यातच गुंग होत्या, आजूबाजूला काय चाललंय याची त्यांना जराही कल्पना नव्हती. मुख्यध्यापिका आपल्या जवळ येत आहेत याची त्यांना जराही जाण नव्हती. बिना त्यांच्या जवळ आली अन तिने त्या मुलींना हटकलं. मॅडम आपल्याला जवळ येत आहेत म्हटल्यावर दोघी जरा चपापल्या. काय करावं त्यांना सुचेना. त्या तिथंच उभ्या राहिल्या.
या मुलींना नक्कीच काहीतरी समस्या असावी असं त्यांना वाटलं. नाहीतर आपल्या शाळेच्या शिस्तीत, प्रार्थनेच्या वेळी हे असं मैदानात बोलत उभं राहण्याचं धाडस कोणीच करणार नाहीत असं वागणं योग्य नाही याची जाणीव सर्वच विद्यार्थ्यांना आहे. सर्व विद्यार्थी ते नियम काटेकोरपणे पाळतात. असा विचार करत बिना त्या मुलींजवळ पोहोचल्या. त्या मुली भेदरलेल्या होत्या. आपल्याच शाळेतल्या त्या दोन हुशार बहिणी आहेत हे बिनाच्या लक्षात आलं.
‘‘काय ग मुलींनो? अशा इथे उभ्या का? आता प्रार्थना सुरू होईल कळत नाही का तुम्हाला?’’ बिनाने करड्या आवाजात विचारलंह
‘‘बाई ते..’’ असं म्हणेपर्यंत प्रार्थना सुरू झाली. त्यांच्याबरोबर बिना पण सावधानमध्ये उभी राहिल्या. पण ती दोन मिनिटंही त्या मुलींना जणू दोन तासाइतके वाटत असावेत असं एकंदर त्यांच्या हावभावावरून वाटत होतं. प्रार्थना संपली. बिनाने त्या दोन मुलींना आपल्या केबिनमध्ये येण्यास सांगितलं आणि त्या पुढे चालू लागल्या. रसिका आठवीत तर वेदिका दहावीत होती. या मुलींना काय प्रॉब्लेम असेल? बिनाच्या मनाची चलबिचल झाली. कारण दोन्ही मुली शाळेच्या हुशार मुलींच्या यादीत होत्या. कधीही वावगं वागणार्‍या नव्हत्या, मग आजच असं का बरं झालं? असा विचार करता करता त्या केबिनमध्ये आल्या. रसिका आणि वेदिका दारात उभ्या राहिल्या,
‘‘आत येऊ का?’’ वेदिकाने विचारलं.
‘‘हो ये ना.’’ त्यांने मुलींना आत घेतलं आणि पाणी प्यायला दिलं.
‘‘बोला काय झालं?’’ शांतपणे त्यांनी विचारलं
‘‘बाई, बाबांची तब्येत बरी नाही.’’ असं म्हणून दोघीही रडू लागल्या.
बिनाला काय करावं समजेचना. तिने त्यांच्या खांद्यावर थोपटलं.
‘‘काय झालंय? होईल बरं. नका काळजी करू..’’ असं म्हणताना बिनाचा स्वरही कातर झाला.
‘‘कॅन्सर रसिका म्हणाली
मॅम, घरी आईच्या देखत आम्हाला काही बोलता येत नाही म्हणून शाळेत येऊन बाबांबद्दल बोलतो. घरच्यांनी आम्हाला काहीच सांगितलं नाहीये. आईच्या चेहर्‍यावरची काळजी, घरातल्यांची चर्चा आणि एकंदर गोष्टींवरून वडिलांना घशाच्या कॅन्सरचा आजार झाला आहे हे आमच्या लक्षात आलंय. वेदिका म्हणाली लहान वयातच त्यांच्या मनावर मोठा आघात झाला आहे हे बिनाच्या लक्षात आलं.
त्या दोघींच्या खांद्यावर हात ठेवत बिनाने त्यांना जवळ घेतलं. आता ती खुर्चीच्या समोर उभी राहिली होती. जी खुर्ची मला मिळावी अशी ज्याची इच्छा होती, पण ती खुर्ची मला मिळायच्या आधीच त्याला परमेश्‍वराचे बोलावणे आले. तो तर गेला. पण आज या मुलींना मदत करून आपण ती सल भरून काढून शकतो. असं त्यांच्या मनाने ठरवलं. त्यांनी मुलींची समजूत काढली आणि त्यांना गोड बोलून वर्गात पाठवलं. बिना मुलींच्या घरी जाऊन त्यांच्या आईला भेटून त्याचं समाधान करून आली होती. वेदिकाच्या वडिलांचे रीपोर्ट पाहिल्यावर कॅन्सर पहिल्या स्टेजला आहे हे त्यांना कळलं आणि थोडं हायंस वाटलं. वेदिकाच्या आईला त्या बाजूला घेऊन गेल्या. ताई, काळजी करू नकात. सगळे कॅन्सर हे जीवघेणे नसतात. पहिल्या स्टेजलाच निदान झालंय तुमच्या मिस्टरांचं. ते बरे होतील याची खात्री आहे मला. फक्त सकारात्मक राहा. तेच विचार तुम्हाला अन तुमच्या कुटुंबाला तारून नेतील. तुमच्या मुलींची मुळीच काळजी करू नका. अभ्यासात त्यांना जी काही मदत लागेल ती मी त्यांना करेन. तुम्ही फक्त सरांची काळजी घ्या. ते बरे होणारच हा विश्‍वास कायम मनात राहूद्या असं त्यांना आश्‍वस्त करून त्या परतल्या होत्या.
आज हे सगळं आठवत असताना आणखीन बरंच काही त्यांना अस्वस्थ करत होतं. त्यानां चार वर्षांपूर्वींचे दिवस आठवले. डॉक्टरांनी आकाशला म्हणजेच त्यांच्या नवर्‍याला झालेला आजार सांगितला आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली होती. एवढ्या धट्ट्याकट्ट्या माणसाला कॅन्सर झालाच कसा? बरं आकाश काही ते मान्यही करायला तयार होईना. कॅन्सर झालाय असा रिपोर्ट आला आणि पुढच्या दोनच महिन्यात सगळा खेळ संपला होता त्यांचे डोळे पाणावले. (केवळ त्याची इच्छा म्हणून तिने हे जबाबदारीचे पद स्वीकारलं.)
रसिका अन् वेदिकाच्या घरी जाऊन आल्यापासून बिना त्यांच्याबद्दलच विचार करत होत्या. आकाश गेल्यानंतर आपल्या पदरी नोकरी तरी होती. रसिका आणि वेदिकाच्या आईने काय करायचं? त्या नोकरी करत नाहीत. त्यांच्यासाठी कसं आणि काय करावे? वेदिकाचे वडील बरे होतील हा विश्‍वास आहे आपल्याला तरीही असे अनेक कुटुंब आहेत ज्यांना काहीच अशा उरली नाहीये अशा कॅन्सरच्या कुटुंबाला कसा आधार द्यावा? हाच विचार त्या करत राहिल्या. तसं पाहायला गेलं तर त्या आता जबाबदारीतून मोकळ्या झाल्या होत्या. मुलगा नोकरीला लागला होता. काही महिन्यातच त्याचं लग्न होईल. मग काय अजून 2-3 वर्षं आहे ती नोकरी केली काय आणि नाही केली काय? त्यांच्या मनात विचार चालू होते.
वेदिकाच्या कुटुंबाला त्यांनी नुसता धीरच दिला नाही तर दिलेल्या शब्दाला त्या जागल्या. शाळेची-घरची जबाबदारी सांभाळून वेळ मिळाला की त्या वेदिकाच्या घरी जात असत. कधी मुलींच्या वडिलांच्या उपचारासाठी त्यांना पैसे देत असत. मुलींना आपल्या घरी बोलावुन त्यांना हवं ते खाऊ घालत असत. त्यांच्या वडिलांना चार धीराच्या गोष्टी सांगत असत. आईला घरातील वातावरण आनंदी कसं ठेवायचं याबाबत सुचना करत असत. जणू आता बिना या मुलींची शिक्षिका न राहता त्यांची – दुसरी आईच झाल्या होत्या. रसिका-वेदिकाच्या आईची चांगली मैत्रीण झाल्या होत्या.
अशा अथक प्रयत्नानी एका वर्षांतच रसिका-वेदिकाच्या बाबांच्या तब्येतीत फरक पडला आणि त्या आई-बाबांना घेऊन बिना मॅमना भेटायला गेल्या.

‘‘तुम्ही त्या दिवशी आणि नंतरही आम्हाला जो आधार दिलात त्या आधारामुळे आमचं कुटुंब परत वर आलं.’’ रसिका-वेदिकाची आई भरल्या डोळ्यांनी हात जोडत म्हणाली. बिनाचे डोळे पण आनंदानी भरून आले ती लोकं गेल्यावर बिना आकाशच्या फोटोजवळ बसून हुंदका दाबायचा प्रयत्न करू लागल्या,
आकाशच्या आजाराचं निदानही लवकर झालं असतं तर आपण त्याला वाचवू शकलो असतो. असा विचार त्यांच्या मनात आला. आपलं जे व्हायचं ते झालं. पण आता अशा परिस्थितीत अडकलेल्या कुटुंबाना होता होईल तेवढी मदत करायची. असं तिने ठरवलं डोळे पुसून बिना आपल्या कामाला लागल्या. त्यांना अजून दोन ठिकाणी जायचं होतं. ‘‘परमेश्‍वरा, मी तुझ्याकडे एकच मागणे मागते की, भविष्यात मला अशा एकाही कुटुंबाची सेवा करायची संधी न मिळो.’’ तिने देवाकडे मनोमन प्रार्थना केली.

सौ. शिल्पा पराग कुलकर्णी

=======================

नमस्कार वाचकहो🙏🙏,

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आवड असूनही आपले छंद आपल्याला जोपासता येत नाही. आवड असूनही पुस्तकं वाचता येत नाही. त्यामुळे वेळेअभावी आपल्यासारखे खूप सारे वाचक वाचनापासून वंचित राहतात. आणि म्हणूनच वाचकांना कुठेही सहज वाचता येतील असा कथासंग्रह आम्ही रीतभातमराठी ह्या डिजिटल व्यासपीठावर घेऊन आलो आहोत.

उत्कृष्ट लेखकांनी लिहिलेल्या marathi katha, marathi moral story, marathi stories, marathi short stories, bodh katha marathi मध्ये आपल्याला रीतभातमराठीवर वाचायला मिळतील.

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *