लव्ह यु डिअर

©®सौ मधुर कुलकर्णी
पृथाने मनीषचा टिफिन त्याच्या ऑफिस बॅगमधे टाकला आणि ती बॅग मनीषला द्यायला आली.
“टिफिन ठेवलाय ह्यात.आज तुझ्या आवडीची फ्लॉवरची भाजी दिलीय.” ती किचनमधे जायला वळणार इतक्यात मनीषने तिचा हात धरला.
“नवरा ऑफिसमधे निघालाय,जरा हसून बाय कर.साडीचा पदर कमरेला खोचलेला,केस विस्कटलेले,काय हे?कुठे ती कॉलेजची निळ्या डोळ्यांची,बॉबकट असणारी पृथा आणि कुठे ही रुक्ष पृथा.” मनीष तिची चेष्टा करत म्हणाला.
“तुमचं बरंय रे.एखाद्या नाजूक साजूक मुलीला आपल्या मर्दानी रूपाने घायाळ करायचं, तिच्याशी लग्न करायचं आणि वर्षभरात तिच्या हाती संसाराचा गाडा देऊन मोकळं व्हायचं. ती ओढत बसते मग तो संसाराचा गाडा.”पृथा फणकाऱ्याने बोलली.
“किती हा नाकावर राग.लव्ह यु डिअर.”मनीष तिचं नाक चिमटीत धरत म्हणाला.
“तुझ्या ह्या ‘लव्ह यु डिअर’ लाच मी फसले.” पृथा हसत म्हणाली.
“पृथा, अग माझा वॉकर दे ग जरा.” जयश्रीताईंनी आतून आवाज दिला.
“आलेच आई.” पृथाने मनीषला बाय केलं आणि ती आत गेली.
ऑफिसमधे आल्यावर आज मनीषला कॉलेजमधली पृथा सारखी डोळ्यापुढे येत होती.बॉबकट असलेली,निळ्या डोळ्यांची, गोड,बडबडी पृथा.
———————————————–
एकाच दिवशी एकाच कॉलेजमधे एकाच वर्षाला मनीष आणि पृथाने बी एस सी ला ऍडमिशन घेतली.काही दिवसांनी एकमेकांना नीट ओळखू लागल्यावर मनीषला पृथा आवडायला लागली.तिचे निळे बोलके डोळे,तिची गोड खळी,मनमोकळा स्वभाव त्याला खूप आवडला.एकदा प्रॅक्टिकलच्या वेळेस लॅबमध्ये त्याने त्याच्या भावना तिच्याजवळ व्यक्त केल्या.पृथालाही मनीष आवडत होता पण तिला पुढाकार घ्यायची भीती वाटत होती.मनीष नाही म्हणाला तर…
पृथाचा होकार ऐकताच मनीषला आसमान ठेंगण झालं.दोघांच्या घरुनही सहज परवानगी मिळाली. दोघांचेही एम एस सी झाल्यावर आणि मनीषला नोकरी लागल्यावर दोघेही लग्नाच्या बंधनात अडकले.लग्नांनतर सहा महिन्यांनी पृथाला ज्युनिअर कॉलेजमधे लेक्चररचा जॉब मिळाला.मजेत,आनंदात दिवस जात होते पण अचानक एक प्रसंग असा घडला की पृथाला नोकरी सोडावी लागली.सासूबाईंना साध्या तापाचे निमित्त झाले आणि त्याच्या पायातली शक्तीच गेली.घराची सगळी जबाबदारी सांभाळून नोकरी करणं पृथाला अशक्य झालं. सासरेही नोकरीतून रिटायर व्हायचे होते.तिने नोकरी सोडली आणि मनोभावे सासूची सेवा केली.सहा महिन्यानंतर त्या वॉकर घेऊन चालायला लागल्या.
पृथाला मातृत्वाची चाहूल लागली आणि तिने नोकरीचा विचारच सोडून दिला.गोजिरवाण्या, गोंडस जय आणि सुजय ह्या जुळ्या मुलांची पृथा आई झाली. मुलांचा बाबा म्हणून मनीषची तिला बाळांच्या संगोपनात समंजस साथ होतीच. आता तर पृथाला दिवस कसा जायचा कळायचं पण नाही.
सासरे रिटायर झाले.बघता बघता मुलं मोठी झाली.आता दोघेही आठव्या इयत्तेत शिकत होते.कॉलेजमधली अल्लड पृथा कधी इतकी समंजस,जबाबदार गृहिणी झाली हे मनीषला देखील कळले नाही.
————————
“मनीष,अरे उद्या ‘वॅलेन्टाईन डे’ आहे पण आपल्याला सुट्टी नाही म्हणून मी आज रात्री माझ्या घरी पार्टी करतोय.तुला आणि वहिनींना यायचं आहे.सगळ्यांच्याच अर्धांगिनी येणार आहेत.” दिलीपच्या बोलण्याने मनीष आठवणीतून एकदम भानावर आला.
“अरे पण..”
“नो अरे,नो पण.तू आणि पृथावहिनी आज रात्री माझ्याकडे येताय. दॅटस् इट.”दिलीपने त्याला पुढे बोलूच दिले नाही.
मनीषने पृथाला फोन लावला.”पृथा,आज रात्री आपल्या दोघांना दिलीपकडे पार्टीला जायचं आहे.तयार रहा.”
—————————————————————
पृथाने तिची आवडती फिकट पिवळाआणि हिरव्या कलरचं कॉम्बिनेशन असलेली प्युअर सिल्कची साडी घातली.लग्नाच्या पाचव्या वाढदिवसाला मनीषने तिला गिफ्ट दिली होती.केसांच्या भांगात किंचित रुपेरी छटा डोकावत होती पण आजच्या पार्टीचं अचानक कळल्यामुळे तिला डाय करायला वेळच मिळाला नाही.इतर अनेक बायकांसारखी ती सतत पार्लरमधे जाणारी नव्हती. तिने केस तसेच मोकळे सोडले.हलकीशी लिपस्टिक लावली आणि कपाळावर मोठी टिकली.
मनीष तिला बघून खूप खुश झाला.तिच्या कपाळावर ओठ टेकत म्हणाला, “लव्ह यु डिअर.”
पार्टीत गेल्यावर पृथाला जाणवलं,ती तिथल्या सगळ्या बायकांमधे अगदीच साधी दिसत होती.प्रत्येकीची हेअर स्टाईल,हेवी मेकअप,ज्वेलरी बघून तिला आपण फारच गावंढळ दिसतोय का असं वाटायला लागलं.इतक्यात दिलीपची बायको सानिका तिला बोलवायला आली’ “पृथा,चल की,सगळ्यांमध्ये मिक्सअप हो.थोडी वाईन घे.”
“नको ग सानिका,मी कधी घेतली नाही,मला सवय नाही.” पृथा संकोचून म्हणाली.
“अग वाईन म्हणजे दारू थोडीच आहे.बरं ठीक आहे,कोल्ड ड्रिंक तर घेशील न?”
पृथा सानिकाबरोबर कोल्ड ड्रिंक घ्यायला गेली.तिथे बायकांच्या गप्पांना अगदी ऊत आला होता.सतत इंग्लिश बोलणं,दुसऱ्यांवर टीका,साड्या,दागिने ह्या पलीकडे कुणी काही बोलतच नव्हतं.पृथाला तिथे गुदमरायला लागलं.ती गॅलरीत आली.तिथे एक छोटी मुलगी आणि तिला सांभाळणारी एक बाई तिला दिसली.आपल्याच नादात ती छोटी मुलगी त्या खेळण्याशी काहीतरी करत बसली होती.पृथा तिच्याजवळ गेली आणि तो गेम तिच्याशी खेळायला लागली.सानिका पृथाला बोलवायला आली तर दोघीही खेळात रमल्या होत्या.
“पृथा” सानिकाने हाक दिली.
“ही मुलगी?…” सानिकाने विचारलं.
“दिलीपचं आणि माझं अभागी बाळ अनन्या.ती स्वमग्न मूल आहे.ट्रीटमेंट सुरू आहे पण अजून तरी सुधारणा नाहीय.”,बोलताना सानिकाच्या डोळ्यात एकदम पाणी तरळलं.
“ओह!आय एम सॉरी सानिका.मला हे माहित नव्हतं.फक्त तुम्हाला एक मुलगी आहे हे मनीष बोलला होता.पण तू काळजी करू नकोस.होईल सगळं
नीट.कधीही,केव्हाही काही मदत हवी असेल तर मला फोन कर.”पृथा सानिकाच्या हातावर थोपटत म्हणाली.
—————–
पार्टी संपून घरी परतायला मनीष,पृथाला बारा वाजले.गाडीत मनीष म्हणाला,”पृथा, संदेशची बायको बघितलीस न?काय चारमिंग आहे ग,वाटतच नाही,चाळीशी ओलांडली आहे आणि दिलीपची बायको पण,व्हेरी गुड लुकिंग.”
पृथाने काही न बोलता कारच्या सीटवर मान टेकवून डोळे मिटले.तिला मनीषला सांगावंसं वाटलं की दिलीपची बायको खूप सुंदर आहे पण ते दोघे कुठलं दुःख सहन करताहेत हे मी बघितलं. तिला काही बोलावसं वाटेना.उगाचच डोळे भरून यायला लागले.
“पृथा,काय झालं?अग मी सहज बोललो.तुझ्या सौंदर्याची सर कुणालाच नाहीय वेडाबाई.”
“नाही रे,डोळ्यात काहीतरी गेलंय. मी ठीक आहे.”
———————————————–
दुसऱ्या दिवशी ऑफिसमधे दिलीप मनीषजवळ आला, ” मनीष,किती भाग्यवान आहेस तू.पृथावहिनींसारखी समंजस,साधी, हळवी बायको तुला लाभलीय.काल माझ्या मुलीशी वहिनी न कंटाळता तासभर खेळत होती.कुठल्याही गॉसिपमधे ती रमली नाही.माझा वहिनीबद्दलचा आदर वाढलाय.”
“थँक्स दिलीप.मी तिला अनन्याबद्दल काही सांगितलं नव्हतं.” मनीष म्हणाला.
——————————————————————
रात्री किचनमधलं आवरून पृथा झोपायला आली.मनीष डोळ्यावर हात ठेवून पडला होता.टेबललॅम्प बंद करण्यासाठी पृथा गेली तर तिथे एक काहीतरी लिहिलेला कागद आणि त्यावर टपोरं लाल गुलाबाचं फुल दिसलं.तिने तो कागद बघितला.
तूच माझी निळ्या डोळ्यांची ऐश्वर्या
तुझ्या गोऱ्या रंगापुढे फिकी करिना
तुझ्या गोड खळीत लपली दीपिका
तुझ्या केसांना लाजली कतरिना
तुझं साधं रुपडं,भावतं ग मनाला
मासिकात बघण्यापूरती मधुबाला
तुझ्या मायेत दिसतात सिंधुताई
तुझ्या डोळ्यात बघतो मदर तेरेसाला
गोजिरवाणी दोन पिल्लं आपली
संसारसुख दिले मज आजवर
कर्तव्याला ना चुकली तू कुठेही
तूच माझी प्रिया,’लव्ह यु डिअर’.
पृथा,आय लव्ह यु…
मनीष
ते वाचून पृथाच्या डोळ्यातून आसवं गळायला लागली आणि हसू पण आलं.ती मनीष जवळ आली.
“मनीष,तू जागा आहेस,मला माहितीय.आणि काय हो कविराज,बायकोसाठी सुंदर कविता केलीय.”ती त्याचे डोळ्यावरचे हात काढत हसत म्हणाली.
“ती कविता करायला मला केवढं कौशल्य पणाला लावावं लागलं,यमक जुळवायला.”मनीषने उठून पृथाचा हात हातात घेतला. “पृथा, आय एम प्राऊड ऑफ यु.मला आज दिलीपने सांगितलं,तू अनन्याशी खूप वेळ खेळत होतीस.”
“हो,वाईट वाटलं रे,इतकी गोड मुलगी.सानिकाला मी सांगितलं आहे,काही मदत लागली तर केव्हाही फोन कर.”
मनीषने पृथाच्या हातावर ओठ टेकले आणि म्हणाला,
” ‘हॅपी व्हॅलेंटाइन डे’, लव्ह यु डिअर.”………
–समाप्त–
©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे
========================
प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.
https://www.facebook.com/ritbhatmarati/
तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.
ritbhatmarathi@gmail.com
फोटो साभार – गूगल
आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही
=============