
संपतरावांची परिस्थिती फार हालाखीची होती. चहाच्या टपरीवर चहा विकून रोजचा गुजर होयचा त्यांचा. कधी कधी चिनु म्हणजे त्यांची मुलगीही यायची त्यांना मदत करायला. नाव तिचं मंदाकिनी होतं पण संपत रावांसाठी लाडाची एकुलती एक लेक होती ती. लाडाने तिला ते चिनुच म्हणत.
मंदाकिनी नावाप्रमाणेच अतिशय देखणी होती. अगदी स्वर्गातल्या अप्सरेलाही लाजवेल एवढी सुंदर. गोरा रंग, तिच्या गोऱ्यापान रंगावर अजूनच शोभून दिसतील असे तिचे निळे डोळे आणि लांबसडक सोनेरी केस. दिसायलाही सुंदर होतीच पण अभ्यासात आणि घरकामात देखील खूप हुशार. चिनु ४ वर्षांची होती तेव्हाच देवाने आईला हिरावून घेतलं होतं. तिच्या आईला कॅन्सर झाला होता. पुरेस्या इलाजाअभावी गेली ती चिनुची जबाबदारी संपतरावांवर टाकून.
पण संपतराव खचून गेले नाही. पोरीची जबाबदारी एकट्यावर असताना बायकोच्या जाण्याचं दुःख किती दिवस घेऊन बसायचं म्हणून थोड्याच दिवसात कामावर लागले ते. घरात स्वयपांक, धुनी भांडी, केर कचरा करण्यापासून चिनुला अंघोळ घालून शाळेसाठी तयार करण्यापर्यंत सगळी कामं संपतरावांनी आपल्या खांद्यावर घेतली आणि ती चोखपणे निभावलीही. चिनुला सकाळी ७ वाजताच शाळेत सोडून संपतराव आपली चहाची टपरी उघडत. सकाळी सुरु होणारा तो खळखळता चहा रात्री टपरी बंद झाल्यावरच शांत होत. संपतरावांची टपरी एका आयटी पार्क मधेच होती. त्यामुळे खूप जण सकाळ संध्याकाळ त्याच्या हातचा चहाचा आस्वाद घ्यायला यायचे.
चिनुही शाळेतून आल्यावर संपतरावांना मदत करायची. रोजच्या मिळालेल्या पैशातून काही पैसे साठवून ठेवायचे आणि उरलेल्या थोड्या फार पैशातून चिनुचे हट्ट पुरवायचे. एक दिवस संपतरावांनी घर साफ करायला काढलं. त्यात चिनुच्या आईचं सामान निघालं. त्यात एक हिरव्या रंगाची जरीची हलक्या प्रतीची साडी निघाली.
चिनू – “बाबा किती सुंदर साडी आहे हो ही…आईची साडी आहे ना. “
संपतराव – “हो पोरी तुझ्या आईचीच आहे. तू तिच्या पोटात होतीस तेव्हा डोहाळे जेवणात घालायला आणली होती मी….तुला माहित आहे चिनू ….तिची फार ईच्छा होती कि फुलांचे दागिने घालून फुलांनी सजवलेल्या झोपाळ्यावर बसून तिचे डोहाळे पुरवायचे….पण परिस्थिती हलाकीची….३-४ दिवस जमेल तिथे आणि जमेल ते काम करून हि साडी आणली होती मी तिच्यासाठी….पण बघ ना देवाचं काळीज …तिला तुझेच लाड पुरवता नाही आले….फार लवकर गेली ती आपल्याला सोडून “
संपतरावांचा अश्रूंचा बांध कोसळला होता.
चिनू – “बाबा रडू नका ना हो….माझं लग्न झालं ना कि मी हि साडी नेसेन माझ्या डोहाळे जेवणात….बघा कशी सुंदर दिसते कि नाही मी”
चिनूने संपतरावांना एक जोरदार मिठी मारली.
हळू हळू चिनू मोठी झाली आणि बघता बघताच तिचं शिक्षणही पूर्ण झालं. पण संपतरावांची परिस्थिती काही सुधारली नाही. चिनूचं शिक्षण पूर्ण झाल्यावर संपतरावांना तिच्या लग्नाची चिंता खाऊ लागली.
एक दिवस संपतरावांच्या घरी मोठी चार चाकी गाडी घेऊन मोठ्या रुबाबात कुणीतरी आलं. त्यांना पाहताच संपतराव अवाक झाले.
संपतराव – “साहेब तुम्ही इथे!!!! सॉरी साहेब आज मी तब्येत बरी नाही म्हणून चहाची टपरी बंदच ठेवली…पण तुम्ही फोन करून सांगायचं होतं मी तुमच्या ऑफिस मध्ये आलो असतो चहा द्यायला.”
संपतरावांकडे आलेला माणूस म्हणजे कांडेकर साहेब त्यांची स्वतःची कंपनी तिथेच होती जिथे संपतरावांची चहाची टपरी होती. रोज सकाळ संध्याकाळ ते संपतरावांच्या टपरीवर चहा प्यायला यायचे. चिनुलाही त्यांनी बऱ्याचदा पाहिले होते.
कांडेकर साहेब – “संपतराव चहा नको मला….मी तुमच्या मुलीचा माझ्या मुलासाठी हात मागायला आलो आहे….चिनुला मी लहान होती तेव्हापासून बघत आलो आहे….संपतराव पैशांची कमी नाही बघ आमच्याकडे पण सून मला संस्कारीच हवी ….चिनुला जेव्हा पण बघतो मला तिच्यात ते सगळे गुण आढळतात जे मला माझ्या सुनेत हवे होते….आणि मुख्य म्हणजे माझा मुलगाही भाळला आहे तिच्यावर “
संपतरावांना काय बोलावं कळेनासं झालं ….मनातून जेवढा आनंद झाला होता तेवढीच काळजी वाटली त्यांना कि एवढ्या मोठ्या घरातून मागणी आली तर त्यांच्या अपेक्षाही तेवढ्याच असतील….चिनूचं लग्न करायला एवढे पैसे कुठून आणायचे….
संपतराव – “साहेब खूप मोठी गोष्ट बोललात तुम्ही….एका गरीबाची पोरगी एवढ्या मोठ्या घराण्यात सून म्हणून जाईन ह्यापेक्षा सुख काय असेल हो एका गरीब बापासाठी….पण साहेब तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्याइतपत पैसे नाही माझ्याकडे….हे म्हणजे असं झालं कि ईच्छा असूनही तोंडात घास घालता येईना..माफ करा साहेब मला “
कांडेकर साहेब – “संपतराव आम्हाला काही नको..एक पैसा नको आम्हाला….शिवाय मुलीचे लग्नाचे कपडे, दागिने, लग्न सगळं आम्ही करू….तू फक्त मंदाकिनीचा हाथ दे….तुला काही ईच्छा असेल तेवढं तू तिला दे पण आम्हाला काहीही नको”
संपतराव – “साहेब फार कृपा झाली हो तुमची….मागच्या जन्मात नक्कीच काहीतरी पुण्य केलं असेल म्हणून चिनुसाठी एवढं चांगलं स्थळ चालून आलं “
चिनू आतून सगळं ऐकतच होती. तिलाही फार आनंद झाला होता.
कांडेकर साहेब हसत हसत – “चला संपतराव तुम्ही समधी झाले आता आमचे….तुमच्या हातच्या चहाने तोंड गोड नाही का करणार?”
चहा पिऊन त्यांनी संपतरावांचा निरोप घेतला.
पण संपतरावांच्या नातेवाईकांनी त्याला खूप समजावलं कि एवढ्या मोठ्या घरात देऊ नकोस म्हणून चिनुला. थोड्याच दिवसात लग्नाचा बार उडणार होता म्हणून संपतरावांची बहीणही आली होती.
अक्का – “संपत, अरे एवढ्या मोठ्या घरात देतोय खरं चिनुला, पण स्वतःचा विचार केला का कधी….तुला काय रे इज्जत मिळणार तिथे….मोठी लोकं आपल्याला दारातही उभी नाही करत….चिनुही दूर जाईल तुझ्यापासून….राहशील तू एकटा….पटतंय का तुला “
संपतराव – “अक्का, अगं माझे राहिलेच दिवस किती….माझी काळजी नको करू तू….चिनू सुखात राहिली पाहिजे”
थोड्याच दिवसात चिनुच्या लग्नाचा भव्य सोहळा पार पडला. बापाच्या गळ्यात पडून खूप रडली चिनू आणि तिच्याही पेक्षा जास्त संपतराव. चिनू गेल्यावर त्यांना काही महिने लागले सावरायला. फार एकटे पडले होते संपतराव.
पण एकटेपणा जास्त दिवस राहिला नाही कारण लग्नानंतर ६ महिन्यातच चिनुची गोड बातमी आली. संपतरावांना खूप आनंद झाला होता. लेकीचे डोहाळे पुरवायची इच्छा होती त्यांची. बायकोचे डोहाळे पुरवता नाही आले. त्यावेळी परिस्थिती फारच हलाखीची होती. पण परिस्थिती आता थोडीफार सुधारली होती.
चिनुच्या सासरच्यांनी तीच नवव्या महिन्यात थाटामाटात डोहाळे जेवण करायचं ठरवलं. संपतरावांनीही आपल्या बहिणीला विचारून थोडीफार तयारी केली होती. डोहाळे जेवणाच्या दिवशी चिनूसाठी तिच्या आईची हिरवी साडी घेऊन गेले. ती साडी बघताच चिनुच्या सासूबाईंनी संपतरावांना टोकलं….
सासूबाई – “अहो ऐका….द्या इकडे ती साडी..सगळ्यांसमोर नको देऊ चिनुला ती साडी….सगळे लोकं काय म्हणतील कि कांडेकरांच्या सुनेच्या माहेरच्यांनी काय फटीचर साडी आणली होती…तुम्ही बघताय इथे सगळे तिला सोन्याचे दागिने, जिरीच्या साड्या भेट म्हणून आणलं आहे.”
संपतरावांनाही विहीणबाईंचं बोलणं पटलं म्हणून त्यांनी ती साडी पिशवीत झाकून ठेवली.
थोड्याच वेळात चिनू समारंभ हॉल मध्ये आली. तिने गडद हिरव्या रंगाची पैठणी साडी घातली होती….त्यावर सोन्याच्या दागिन्यांचा आणि फुलांच्या दागिन्यांचा साज….चिनू हॉल मध्ये येताच तिला गुलाबाच्या फुलांनी सजवलेल्या झोपाळ्यावर बसली. सगळ्यांनी एक एक करून चिनुला आशीर्वाद आणि महागड्या भेटवस्तू दिल्या. संपतरावांना काय देऊ म्हणून काही कळेना. खिसा चाचपत असताना त्याच्या लक्षात आलं कि बोटात एक सोन्याची लग्नातली अंगठी होती. पण ती ३० वर्षांपासून बोटातून कधी बाहेर काढली नव्हती कधी म्हणून संपतरावांच्या बोटात रुतून बसली होती. अवघ्या १५ मिनिटांच्या प्रयत्नानंतर त्यांना ती अंगठी बोटातून काढण्यात यश आलं.
सगळ्यांचं आटोपल्यानंतर संपतराव गुपचूप लेकीजवळ गेले आणि त्यांनी तिला ती अंगठी भेट म्हणून दिली. पण सोबतच साडीची ती पिशवी त्यांनी शर्टाच्या आत लपवून ठेवली होती. अंगठी दिल्यावर संपत्रवाणी चिनुचा निरोप घेतला,
तेवढ्यात चिनू त्यांना थांबवते, “थांबा बाबा….डोहाळेजेवणानंतर मुलीला माहेरपणाला न्यायची पद्धत आहे….तुम्ही मला तुमच्यासोबत बाळंतपणासाठी नाही का घेऊन जाणार? “
चिनूचं बोलणं ऐकून संपतराव आणि सासरचे लोकं अवाक झाली.
संपतराव – “पोरी….इथे तू एवढी सुखात आहेस….सुकामेवा, डाग दागीने, तुझी काळजी घायला तुझ्या घरचे लोकं आणि नोकर चाकर हि आहेत ….माझ्याकडे काहीच नाही….माझ्यात तुझं बाळंतपण करायची धमक आहे? असं वाटतं का तुला? “
चिनू – “का नाही बाबा….गरिबांच्या घरी पोरं होतं नाही का आणि बाळंतपण सुकामेवा, काजू बदाम खाऊनच होतं का ? ४ वर्षांची असल्यापासून तुम्ही माझी आई आणि वडील म्हणून सांभाळ केला….माझे हट्ट पुरवले….मला पहिल्यांदा पिरेड्स आले तेव्हा स्वतः सॅनिटरी नॅपकिन्स आणून दिले….जे आई करते ते सगळं तुम्ही केलं मग आई बनून माझं बाळंतपण नाही करणार? “
ऐकून संपतरावांना आपले अश्रू रोखता नाही आले आणि ते ओक्शाबक्षी होऊन तिथेच रडायला लागले. त्यांना पाहून चिनूच्याही अश्रूंचा बांध कोसळला आणि तिच्या सासरच्याही लोकांना आपले अश्रू रोखता नाही आले.
सगळे पाहुणे राहूळे गेल्यावर चिनुलाही निघायचं होतं संपतरावासोबत.
चिनू – “बाबा द्या ती साडी इकडे….अजून किती वेळ लपून ठेवणार….मी तुम्हाला म्हटलं होतं ना कि माझ्या डोहाळे जेवणाच्या दिवशी मी हीच साडी नसणार म्हणून….मला सासूबाईंचाही मान ठेवायचा होता म्हणून मी दिलेली सांगितलेली साडी घातली पण बाळंतपणात माहेरी जाताना मला आईचीच साडी घालायची आहे…द्या ती साडी मी तयार होऊन येते”
थोड्या वेळात चिनू आईची साडी घालून साज शृंगार करून आली. संपतराव आपल्या चिनुला न्याहाळातच राहिले.
चिनू – “बाबा…इकडे या…. मी झोपाळ्यावर बसते तुम्ही मला झोपाळा द्या”
चिनू आईच्या साडीत झोपाळ्यावर बसली आणि संपतरावांना एक क्षण वाटलं कि वर्षांपूर्वी त्यांच्या बायकोने केलेली ईच्छा आज पूर्ण झाली…. एक एक झोपाळ्यासोबत संपतरावांचा एक एक अश्रू चिनुच्या माथ्यावर आशीर्वादाच्या रूपाने टिपकत होता.
पुढे जाऊन संपतरावांनी अक्काला बोलावून घेतलं आणि चिनूचं बाळंतपण उत्तमरीत्या पार पाडलं.
===============
प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.
https://www.facebook.com/ritbhatmarati/
तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.
ritbhatmarathi@gmail.com
फोटो साभार – गूगल
आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही
=============
हेही वाचा