लोकाची पोर

–गीता गजानन गरुड
कावेरीबाईंनी खिडकीचा पडदा बाजूला केला. सुर्याची रेशमकोवळी किरणं त्यांच्या चेहऱ्यावर विखुरली. साताठ दिवस झाले, या इस्पितळाच्या खोलीत त्यांना छातीत दुखायला लागलं म्हणून आणलं होतं.
मायनर क काय तो ह्रदय विकाराचा झटका आला होता म्हणे आणि मग देखरेखीखाली ठेवलं होतं त्यांना आणखी काही दिवस.
कावेरीबाईंनी आपले कापसासारखे पांढरेशुभ्र केस सोडले. त्यांना विंचरून नाजुकशी वेणी घालून टोकाला रबरबँड लावला. मावशींना पाणी काढायला सांगितलं नि न्हाऊन आल्या.
न्हाणं झालं तसं अंग पुसताना, त्यांच्या लक्षात आलं..’सुनबाई, त्रिवेणी किती विचार करते माझ्या मनाचा. मला हे इस्पितळातले गाऊन,पंचे आवडणार नाहीत म्हणून माझा संसारच आणून ठेवलाय त्रिवेणीने. अगदी माझ्या आवडीचा मेडीमिक्स साबणसुद्धा.’
साबणाच्या वडीने वॉशरुमला घरगुती सुगंध आला होता.
आकाशी रंगाची सुती साडी त्या नेसल्या. बाहेर सुनेचं परिचारिकेशी बोलणं चाललेलं.
थोड्या वेळाने त्रिवेणी आत आली. डब्यातला साजूक तुपातला ऊन ऊन शिरा तिने कावेरीबाईंच्या पुढ्यात ठेवला.
“अगं इतका कशाला?”
“खा ओ. काल नीट जेवलादेखील नाहीत. तिकडे पप्पाही काळजीत आहेत. चालतेफिरते असते तर इथे उशाला येऊन बसले असते.”त्रिवेणी थर्मासातलं ऊन पाणी फुलपात्रात ओतत म्हणाली.
कावेरीबाईंनी चवीचवीने शिरा खाल्ला. खरंच छान झाला होता. त्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्नतेचे भाव उमटले. शिऱ्यातल्या वेलचीने तोंडाला चव आली.
फुलपात्रातलं पाणी पिताना त्यांना यजमानांची आठव आली. कावेरीबाईंच्या यजमानांना, मनोहररावांना लकवा आला आणि तेंव्हापासून घराचा नूरच बदलून गेला.
कधीही परावलंबी नसलेले मनोहरराव अचानक परावलंबी झाल्याने चिडचिड करु लागले. मुलाला,विजयला घालूनपाडून बोलू लागले. कावेरीबाई,त्रिवेणीच काय..नातू आर्यन यालाही टोमणे मारल्याशिवाय सोडत नव्हते. घरात नुसता वैताग.. वैताग.
आर्यनची,बिचाऱ्याची बारावीची परीक्षा,सीइटीचा अभ्यास नि घरात हा गोंधळ. पाहुणेरावळे येऊन भेटून जायचे. मग परत परत तीच क्यासेट उगाळली जायची. सासुरवाशीण लेक येऊन ख्यालीखुशाली घेऊन जायची. पाहुण्यांशी,लेकीशी संथ स्वरात बोलायचे. पाहुणे गेले की यांची कटकट सुरु. डाळीच्या फोडणीत हिंग अंमळ जास्तच घातलास,भात कच्चाच राहिला,भाजीला चवच नसते, कोशिंबीरीत दही कमी होतं..एक का दोन तक्रारी!
कावेरीबाईंनाही सून मुद्दामहून असा ढिसाळपणा करते असं वाटू लागलं, जणू नवऱ्यानेच त्यांच्या डोक्यावर हात फिरवला. आपण आपल्याच घरात पराधीन आहोत, असं त्यांना वाटू लागलं.
एकदा तर कहरच झाला. मनोहररावांनी त्रिवेणीच्या हातातलं ताट भिरकावून दिलं. वरणभाताची शितं, पोळ्या,भाजी खोलीभर अन्न विखुरलं.
आर्यनची परीक्षेला जाण्याची वेळ होती. त्रिवेणीने भरभर सगळं आवरलं. उष्ट उचलून ओल्या फडक्याने फरशी पुसून काढली. आर्यच्या पाठीवर सायीचा हात फिरवून त्याला बेस्ट लक म्हंटलं.. आणि ..आणि मग मात्र सासूसासऱ्यांवर बरसली..
“समजता कोण तुम्ही स्वतःला?”
“गडीमाणसं वाटलो आम्ही?”
“माझंही वय झालंय आता. कमीजास्त झालं तर सावकाश सांगा..हा असा त्रागा का? पुर्वीची ताकद नाही राहिली माझ्यात. पन्नाशीच्या जवळ आले मी. नाही झेपत तुमच्या तालावर नाचायला. आजारी का तुम्हीच पडलाय? जगात कोण आजारी पडत नाहीत?..का जगात कोणाची वयं होत नाहीत? खेळवताय तुम्ही मला कठपुतळीसारखे. दिवसभर तुमचं औषधपाणी, नाश्ता,पथ्याचा स्वैंपाक,सारं सारं करते आणि या बदल्यात दोन प्रेमाचे शब्द तर सोडाच पण असं ताट भिरकावून देणं,कुजकं बोलणं..”
तितक्यात कुठुनशी नणंद आली. आपली वहिनी आपल्या आईवडिलांना बोलते हे तिला सहन होईना. मागचापुढचा विचार न करता ती त्रिवेणीवर बरसली. कावेरीबाईंनाही हुरुप आला. त्याही लेकीच्या जोडीने सुनेला बरंच बोलल्या. अगदी बासनातली मढी वर काढली गेली. नणंद तर निघून गेली आपल्या घरी पण..त्रिवेणीत व सासूसाऱ्यांत अबोल्याची भिंत उभी राहिली.
मनोहरराव ताटात येईल ते गप्प गिळू लागले.
त्रिवेणीने बनवून ठेवलेल्या स्वैंपाकाचं ताट कावेरीबाई स्वतःच्या हाताने दोघांसाठी वाढून घेऊ लागल्या.
आपल्या खोलीत न्हेऊन जेवू लागल्या.
मनोहरराव खोलीतनं बाहेर पडेनात. खोलीत एटेच्ड टॉयलेट,बाथरुम,वाचायला हाताशी पुस्तकं होती.
काही औषधं,गोळ्या संपल्या तर मुलाला,विजयला सांगत. मुलगा बायकोला म्हणजे त्रिवेणीला सांगून जाई.
त्रिवेणीने आणलेल्या वस्तू कावेरीबाईंना न्हेऊन देई.
एकाच घरात राहून मनातल्या अढीमुळे दोन वेगळी जगं,दोन वेगळे संसार निर्माण झाले होते.
लेक घरी आली की मात्र दोघेही लेकीशी भरभरून बोलायचे. लेकही डोळ्यात पाणी आणून ऐकत असे. “आमच्याच घरात आम्ही उपरे झालो आहोत. कुणाला आमच्याशी बोलायला फुरसत नाही. यापरीस व्रुद्धाश्रम परवडला.” कावेरीबाई सुनेला ऐकू जाईल अशा पट्टीत बडबडत.
त्रिवेणीला वाईट वाटे पण ती दुर्लक्ष करायला लागली होती. मुलाच्या परीक्षा, स्पर्धांचं जग,त्यात टिकण्यासाठी,त्याची चाललेली धावपळ,नवऱ्याचे ऑफिसातले टेंशन्स ..हेच तिच्या डोक्याला खूप खाद्य होतं. त्यात कंबरदुखी सुरु झाली होती. जराशा कष्टाने कंबर भरुन येई.. मणक्यातून.. अगदी पायापर्यंत कळ जाई.
कावेरीबाईंना ती दुपार लख्ख आठवली. मनोहररावांना भरवून त्या स्वत:साठी वाढून घ्यायला म्हणून गेल्या. आज त्रिवेणीने केळफुलाची सुकी भाजी बनवली होती,चणाडाळ टाकून..त्यांची प्रिय भाजी. त्यांनी अंमळ जास्तच वाढून घेतली,सोबत ताकाची कढी होती..लसणाची फोडणी दिलेली.
कावेरीबाई यथेच्छ जेवल्या. सुनेचं कौतुक करावंस वाटलं त्यांना पण मेला इगो क काय तो आड आला.
ताट धुवून ,पुसून त्या खोलीत जायला गेल्या..
अचानक त्यांना घर फिरल्यासारखं वाटू लागलं. पाठीतनं कळ येऊ लागली. अगदी घामाघूम झाल्या.
आर्यन पाणी प्यायला आत आला. त्याने आजीची अवस्था पहाताच आईला हाक मारली.
पुढ्यातलं जेवणाचं ताट बाजूला सारुन त्रिवेणी धावत आली.
“आई..आई..काय होतंय तुम्हाला..बरं वाटत नाहीए का?”
कावेरीबाईंना बोलता येईना. त्रिवेणीने त्यांचा गाऊन काढला. आर्यनच्या मदतीने त्यांना कशीबशी साडी गुंडाळली. मनोहरराव ही सारी धावपळ पहात होते..स्वतःला अगतिक,असह्य वाटून घेत होते. त्यांनीच मुलीला फोन लावून कळवलं.
आर्यनच्या मित्रांच्या मदतीने कावेरीबाईंना इस्पितळात भरती केलं. आर्यन मग त्याच्या परीक्षेला गेला. त्रिवेणीने एकहाती सारं सांभाळलं. नणंदेला मनोहररावांकडे जायला सांगितलं.
अँजिओग्राफीसाठी सही करणं,पैसे जमा करणं,,रक्तपेढीशी संपर्क साधून तिथून रक्त आणणं सारं काही पायाला भिंगरी लावल्यासारखी ही ‘लोकाची पोर’ करत होती. कोणासाठी..सासूसाठी..का? तिच्या मनात सासूविषयी जिव्हाळा,ओलावा असल्याशिवाय करत होती का? मधेच फोन करुन मनोहररावांना धीर देत होती.
“पोरी, किती करत्येस गं..मी करंटा..तुला ओळखू शकलो नाही..माझा त्रागा तुझ्यावर काढला..” मनोहरराव त्रिवेणी घरी आल्यावर बोलते झाले.
“आपल्या माणसांवरच आपण रागावतो नं पप्पा. झालं गेलं गंगेला मिळालं। आई, सुखरुप घरी येऊदेत आता.”त्रिवेणी म्हणाली.
अबोल्याच्या भिंतीचे चिरे कोसळू लागले होतै. वाईट इतकंच की ते कोसळण्यासाठी या अप्रिय घटनेचा डाव नियतीला मांडावा लागला होता. त्रिवेणीनै खरं तर स्वतःहून सासूशी बोलणं सुरु करायला हरकत नव्हती पण तो तिचा स्वभाव नव्हता..थांबलेलं संभाषण, आपणहून सुरु करण्याचा स्वभाव नव्हता तिचा याचा अर्थ तिच्या मनात सासूसासऱ्यांविषयी पापग्रह होते असा मुळीच नव्हता.
आर्यनच्या बारावीच्या परीक्षा सुरु होत्या.
“आजी होईल ना गं आई बरी?”आर्यनने विचारताच तिने त्याच्या केसांत हात फिरवून “नक्की बरी होईल राजा तुझी आजी. तू फक्त अभ्यासावर लक्ष दे.” म्हणून समजावलं होतं.
विजय टूर अर्धवट टाकून आल्याने, शिवाय नणंदही हाताशी असल्याने त्रिवेणीचं काम बरंचसं सोप्पं झालं. नणंद अगदी आपुलकीने बोलू लागली. घर पुन्हा हसूखेळू लागलं नि कावेरीबाईंच्या येण्याकडे घराचे डोळे लागले.
कावेरीबाई, त्रिवेणीची गेला आठवडाभर चाललेली धावपळ पहात होत्या. सोबत असणाऱ्या परिचारिकाही म्हणाल्या,”नशीबवान आहात आजी तुम्ही. इतकी जीवाला जीव लावणारी सूनबाई बरी शोधलात.” कावेरीबाईंना परिचारिकेचं बोलणं आठवून हसू आलं.
त्रिवेणी डबा आवरुन ठेवून त्यांना गोळ्या देत होती.
कावेरीबाई विचार करत होत्या..:हिला येत नसेल का ताण? किती धावपळ चाललेय हिची..अरे हो,हल्ली हिची पाळीही अनियमित येते. वय वाढू लागलंय तसं केसांची एक बट रुपेरी झालेय..थोडी स्थूलही वाटू लागलेय. सारखी कंबरेला हात लावते..दुखत असावी. छे! लेकीला काय दुखतय खुपतय त्याची चौकशी करते तशी हिची करावीशी वाटलंच नाही. ‘लोकाची पोर’ आपली मानलीच नाही..न् आता या लोकाच्या पोरीनच जीवनदान दिलं.’
त्रिवेणी सासूकडे पहात होती..विचार करत होती..’या आठ दिवसांत किती वाळल्यात आई! आई घरात नाहीत तर पप्पांची चीडचीड बंद झालेय अगदी. त्यांच्यातलं व्रात्य पोर निमूट बसलंय. जणू बायको नाही तर आईच दूर कुठेतरी गेलेय सोडून असं वागताहेत. फार हळवे झालेत. चार दिवस नीट जेवलेही नाहीत.
आई, माझ्याशी अबोला धरला होता तुम्ही पण माझ्या खाण्यापिण्यावर जातीने लक्ष असायचं तुमचं.
टोपात भाजी कमी दिसली तर भाजी माझ्यासाठी ठेवायचा नि मुरांबा,चटणीसोबत पोळी खायचा.
वरणात,आमटीत कधी मीठ चढ झालं तर काहीतरी शक्कल लावून तिला ब्यालन्स करायचा. होता होई तो मला बोल लावणार नाही याची काळजी घ्यायचा.
अगदी विजयही माझ्यावर कावला तर खोलीत आला की त्याची तासनपट्टी करायचा., नातवालाही सोडत नव्हता. आई,तुम्ही मला बोलायचा पण दुसऱ्या कोणी मला बोललं तर ते मात्र तुम्हाला खपायचं नाही.
त्यादिवशीचं ते भांडण सोडलं तर कधी मला किंवा माझ्या माहेरच्या माणसांना बोल लावला नाहीत. लवकर बऱ्या व्हा, आई. तुमच्याशिवाय त्या घरात खूप एकटं वाटतय मला.’ त्रिवेणीचे भरुन आलेले डोळे कावेरीबाईंच्या नजरेतून सुटले नाहीत.
एवढ्यात नणंदबाई,जावईबापू आले. त्रिवेणीने त्यांना थर्मासातला चहा थोडा थोडा दिला.
लेक उशाला बसून म्हणाली,” आई गं, कसं वाटतय आता. . आज डिस्चार्ज देतील तुला. माझ्याकडे येतेस का आरामासाठी?”
नणंदबाई बोलली तशी त्रिवेणीने लहान बाळासारखं सासूकडे पाहिलं.
“मी बरी येईन, माझ्या सुनेला सोडून. मला नवा जन्म दिला आहे हिने. माझं एवढं मोठं आजारपण काढलंन, मनात कोणतीही अढी न ठेवता. तुझ्याकडे नक्की येईन पण सवडीने. आता मात्र माझ्या घरी माझ्या सुनबाईसोबत रहाणार. मध्यंतरी, माझ्या,ह्यांच्या हेकटपणामुळे बरंच काही तुटलय. होता होईल तो हे मायेचे बंध जोडणार.त्रिवेणी,ब्याग भर गं माझी.”
त्रिवेणीने लगबगीने येऊन कावेरीबाईंचे हात हातात घेतले. तिच्या डोळ्यांतून अविरत अश्रुधारा वहात होत्या.. ज्या कावेरीबाईंनी त्यांच्या पदराने टिपल्या. सासूच्या चार आपुलकीच्या शब्दांनी तिच्या मनावरलं ओझं गळून पडलं होतं.
नणंदबाईने पुढे येत त्रिवेणीचा हात हातात घेतला व म्हणाली,”वहिनी,खूप दमलैस या वर्षभरात आईपप्पांच करुन. आता आर्यनची परीक्षा झाली की माहेरी जा तू..किंवा तू आणि विजय दोघंच जा टूरला. तुलाही थोडा बदल मिळेल. मी सुट्टी घेतली आहे पंधरा दिवसांची,आईपप्पांसोबत थांबते. मलाही करुदेत थोडी सेवा, मुलगी या नात्याने न् अर्णवच्या सीइटीची मुळीच काळजी करु नकोस. मी लक्ष ठेवेन त्याच्यावर.”
तीन विचारांच्या तिघी समान धाग्याने एकत्र आल्या होत्या. आईला घरी न्यायला आलेला विजय त्या तिघींची एकी डोळे भरुन पहात होता. त्रिवेणी आता ‘लोकाची पोर’ नव्हती..उशिरा का होईना कावेरीबाईंना ती आपलीशी वाटू लागली.
खिडकीबाहेरच्या चाफ्यावर कोकीळ मधुर स्वरात गात होता.
समाप्त
–गीता गजानन गरुड.