Skip to content Skip to sidebar Skip to footer

सांडू देत की थोडं खरकटं..!!

अनन्या एक सुशिक्षित आणि जबाबदारी स्वीकारणारी मुलगी लहानपणापासून स्वच्छता अतिशय आवडीचा विषय म्हणून स्वयांपाक म्हटलं की कंटाळा करणारी अनन्या !…म्हणतात ना स्वच्छता आवडणाऱ्या माणसाला पसारा केलेला आणि पसारा घातलेला आवडत नाही मग तो पसारा स्वयंपाकाचा असोत किंवा आणखी कागदांचा…पसारा आवडत नाही म्हणजे नाही…अगदी लग्न होऊन सासरी गेली तरीही स्वच्छतेच्या बाबतीत अनन्याचे गणित कधी चुकले नाही… 

पुढं मुलं-बाळं झाली तरीही मॅडम स्वच्छतेच्या बाबतीत अगदी काटेकोर…म्हणून मोठ्यांपासून ते लहानांपर्यंत सगळयांना स्वच्छतेची अगदी सवयच लागून गेलेली…म्हणूनच सासूबाईंची लाडकी सून म्हणून अनन्याचा नावलौकिक…पण नोकरी करत असताना स्वच्छता म्हटलं की अनुची थोडी चिडचिडच होई…म्हणून वैतागलेली अनु दिसे तसं सासूबाईंच्या लक्षात आली ही गोष्ट पटकन…म्हणून सासूबाईही मदतीला नेहमी येत असे…तसेच आपली नातवंडेही त्या मदतीला घेत असे म्हणून अनन्याला थोडा आधार होता…

एक दिवस रात्री मस्त जेवण करून दिवाणखान्यात सगळे बसले होते. त्या दिवशी अनन्याच्या जेवणाची फार तारीफ झाली. 

अनन्याचा नवरा मल्हार तिला चढवत,  “बायको…काय मग आज बऱ्याच फॉर्म मध्ये आहात की…डाळिंब्याची उसळ काय फँटॅस्टिक झाली होती वाह्ह!! अजून तिची चव जिभेवर रेंगाळतेय …आणि स्वीट डिश तर काही विचारूच नको….लग्न झालं तेव्हा तुला स्वयंपाकाचा कंटाळा यायचा आणि आता काय सुगरण झाली कि गं …” 

ए ऐक ना मला उद्या ऑफिससाठी गाजर हलवा दे ना…अगं किती दिवसापासून माझे मित्र मागे लागलेत कि वहिनींच्या हातचा गाजर हलवा कधी आणशील म्हणून….” 

तेवढ्यात पूर्वा,  “मम्मा …मलाही पाहिजे…उद्या स्वीट डिश…जाऊदे नाहीतर मी केकचं नेते टिफीनला स्वीट डिश म्हणून..” 

अनन्या हसून, “काहीही न्या…मी आपलं बनवायचं काम करेल..आणि तुम्ही खायचं काम करा..” 

सुनीताताई  – “अगं…अनन्या खूप थकल्यासारखी दिसतीय..” 

इतक्यात आदित्य आपल्या आईजवळ येतो आणि तिच्या कुशीत येऊन , “मम्मा…तू नको ना एवढं सगळं करुस…एवढं करतेस आणि मग तू  किती टायर्ड असतेस…” 

सुनीताताई विषय बदलतात, “अगं…अनन्या जा तू झोप आता…खूप दमलीय तू …चेहरा बघ कसा पडला आहे तुझा” 

अनन्या, “नाही हो…आई…सकाळी उठलं की फ्रेश वाटेल…काही काम राहिलंय का? “ 

सुनीताताई, “नाही गं …थोडी मटकी उपसून ठेवायची होती…तू राहू देत मी ठेवते…जा बरं…तू झोप..उद्या लवकर उठायचं आहे ना…” 

अनन्या, “ठीक आहे आई…गुड नाईट ऑल…!” 

अनन्या झोपायला जाते…. बाकी सगळेजण दिवाणखान्यात टीव्ही बघत बसतात. 

सुनीताताई लागलीच आपलं काम करायला स्वयंपाकघरात गेल्या…त्यांनी भिजत घातलेली मटकी उपसून ठेवली…आणि स्वच्छ कापडात बांधून ठेवली जेणेकरून व्यवस्थित मोड येतील… 

किचनची लाईट बंद करून त्यांनी आपला मोर्चा झोपण्यासाठी बेडरूम कडे वळवला…नातवंडेही झोपायला आली म्हणून आदित्य आणि पूर्वाला झोपेपर्यंत सुनीताताई जाग्याच होत्या..तशी अनन्या पाणी पिण्यासाठी म्हणून उठली…पाणी पिऊन झालं तशी अनन्याची नजर किचन ओट्यावर गेली…तिथे मटकीचे काही दाणे सासूबाईंच्याकडून नकळत सांडले होते…जणू काही ते दाणे अनन्याला वाकुल्या दाखवत होते….ओटा आम्ही खराब करतोय हे अनन्याला सांगतच होते जणू….

अनन्याला चार-चारदा किचन साफ ठेवायची सवय…तसं अनन्याने ओटा पाहताच पटकन आपल्या हातात कापड घेतलं आणि ओटा पुसायला घेतला.  मागून सासूबाई सगळा प्रकार पाहतच होत्या…लागलीच त्याही किचन मध्ये आल्या…. 

सुनीताताई, “अगं…बाळा…राहू देत की…लगेच साफ करायची काय गरज होती…” 

अनन्या, “आई…तुम्ही होय…अहो ते ना किचन साफसूफ असलं ना की कसं मस्त वाटत…आणि काम करायलाही प्रसन्न वाटत…म्हणून मी आत्ताच आवरून ठेवलं…” 

सुनीताताई, “अनु बाळ….अगं…स्वयंपाक घर हे ही एक घरच असतं…घर कसं आपलं नातवंडांनी भरून जातं…तसं स्वयंपाकघरही या अशा छोट्या-छोट्या गोष्टींनी भरून जातं…स्वयंपाक घर म्हटलं की भांड्याला भांड लागणं आलंच की…आता भांडी वाजणार नाहीत का ? त्या ओट्यालाही पसाऱ्याची सवय झाली पाहिजे ना…” 

अनन्या, “आई…तुमचं बरोबर आहे…पण कसं..पै -पाहुणे आले की कसा पसारा…बरोबर नाही दिसत..आणि सगळे मलाच नाव ठेवतील…म्हणून मी आपलं…टापटीप मला जमतं तसं ठेवायचा प्रयत्न करते…यात काही वावगं आहे असं मला तरी नाही वाटत..” 

सुनीताताई, “बाळा…यात काहीच वावगं नाहीय…पण तू अशी थकल्यासारखी असतेस…मला काळजी वाटली बस …आणि तू हजारदा ओटा साफ करतेस…तेलाचा ठिपका पडला तरी तू किचन धुऊन काढतेस…मला सांग…दिवाळीला अभ्यंगासाठी आई तेल लावतेच ना अंगाला…. का तर…शरीर टवटवीत दिसावं म्हणून…तजेलदार दिसावं म्हणून…तसंच अभ्यंग ओट्याला पाहिजेच ना…कर तू साफसफाई…पण आपली तब्येत सांभाळून…आणि स्वयंपाकघर कसं नांदत असावं…भांड्यांचा आवाज आला नाही तर ते कसलं ग स्वयंपाकघर…गृहिणीच्या हातून कधी मीठ कमी…तर कधी जास्त होतंच ना..लक्ष असूनही दूध उतू जातच की नकळत…आता उरलेल्या भाताला फोडणी देऊन कसं परत आपण ताजं करून खातो…अगदी तसंच बाळा…असू दे की पडलेलं खरकटं…ओट्यालाही नको काही खाद्य…ओट्याचं जाऊ देत..पण लक्ष्मीचा वावर नकळत सगळ्याच घरात असतो असं म्हणतात…तसं आपण पोळीचा तुकडा टोपल्यात ठेवतोच की..आपण काही टोपलं मोकळं करून ठेवत नाही ना…का..? तर घरात येणाऱ्या लक्ष्मीसाठी फार नाही पण थोडासा तुकडा ठेवायची आपली पद्धत आहे,अगदी तसंच किचन ओट्यालाही सवय नको का…माणसाने गजबजलेलं घर कसं…पाहण्यासारखं वाटत…तसंच किचन ओट्याचंही आहे…. भांड्यांची सवय नको का त्याला…पटतंय ना…! “ 

अनन्या, “हो…आई…खरंच किती छान बोलता तुम्ही…आणि पटतंयही तुमचं बोलणं…तुम्हाला माहितीय आई…माझ्या आईकडेही अशीच सवय…माझी आई सगळं एकदम काटेकोरपणे करायची…. आणि एवढं करूनही तिला सगळेजण घालून-पाडून बोलायचे…मला कुणी बोलू नये म्हणून मीही आधीपासूनच स्वचछतेची सवय अंगी लावून घेतली…मग इथेही तसंच राहू लागले…आणि आपोआप ते अंगवळणी पडलं..” 

सुनीताताई, “इथे नाही हो…कुणी बोलणार तुला घालून-पाडून…तू आहेस तरी का तशी..चला..उद्या ऑफिस आहे ना…काय भाजी करायचीय…सांग मला..तयारी करून ठेवते मी…म्हणजे सकाळी उठलं की फोडणी दिली म्हणजे झालं…” 

अनन्या, “आई राहू द्या मी उद्या सकाळी उठल्यावरच करेन भाजी….तसंही रोज तुम्ही माझ्या आधी उठता….आणि हो पहाटे पहाटेच तुमच्या कडून होणारे भांड्यांचे आवाज माझ्या कानी पडतात. त्यामुळे मला रोज अलार्म लावायचीही गरज भासत नाही….जणू रोज सकाळी हा किचन मला आपोहून बोलवत असतो “ 

अनन्याच्या बोलण्यावर दोघीही हसू लागल्या आणि झोपायला गेल्या….किचन ची लाईट जशी बंद केली तशी आतापर्यंत किचन मध्ये लपून बसलेले कॉकरोच बाहेर पडले आणि किचन ओट्यावर त्या एखाद दोन पडलेल्या मटकीच्या दाण्यावर मस्तपैकी ताव मारला…. 

थोडक्यात सांगायचं झालं तर राहू द्या कधी कधी तसाच तो किचन….काही जणींना सवय असते स्वच्छतेची….पण काही जण स्वच्छतेचा अतिरेक करतात…. त्याला क्लिनलीनेस ऑब्सेशन असंही म्हणतात….पण त्यामुळे आपण स्वतःला त्रास तर करून घेतोच आणि शेवटी दुसऱ्यांकडून आपण जेवढं स्वच्छता ठेवतो तेवढीच त्यानेही ठेवावी ह्याची अपेक्षा करतो…आपल्यासारखं सगळ्यांना जमेलच असं नाही….मग त्यात चीडचीड…भांडण तंटा….नात्यांतील दुरावा ह्या गोष्टींना सामोरं जावं लागतं….

थोडक्यात घराला स्वच्छ ठेवायची अपेक्षा तर आपण करतोच पण मग त्यामध्ये मनामध्ये आणि नात्यांमध्ये दुर्गंधी पसरते….त्यामुळे कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करू नका….सांडू देत कि थोडं खरकटं 😀 

==============

प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.

https://www.facebook.com/ritbhatmarati/

तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही

=============

हेही वाचा

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

Leave a Comment

error:

Warning

सध्या युट्युब वर कथा चोरी करून वाचून दाखवण्याचे धंदे चालू आहेत लोकांचे. आमच्या वेबसाईट वरची कथा कुठल्याही युट्युब चॅनेलवर बेकायदेशीररित्या आढळल्यास त्या चॅनेलला लगेच रिपोर्ट करण्यात येईल ह्याची कृपया दक्षता घ्यावी. तसेच आपल्या वाचकांपैकी कुणालाही असे बेकायदेशीर चॅनेल्स आढळल्यास आम्हाला ritbhatmarathi@gmail.com ह्या ई-मेल वर त्वरित कळवावे.