Skip to content Skip to sidebar Skip to footer

लेक भेटीला आली!

©® गीता गरुड.

गाडीची एकसुरी घणघण कानात लय धरत होती. शाल्मली खिडकीकडच्या पत्र्याला डोकं टेकून बसली होती.

गाडीत निरनिराळे आवाज कुणी मराठी,कुणी हिंदी कुणी इंग्लिश..शब्द वेगळे पण चिंता,विवंचना,.. सारख्याच.

एकाच चाकात घुसळणाऱ्या या ऊसाच्या कांड्या.. श्रीमंत,गरीब,मध्धमवर्गीय..घुसळणं थोड्याबहुत फरकाने सारखंच. कुणाचं शारिरीक तर कुणाचं मानसिक.

बाहेरचं भकभकतं ऊन गाडीत आपली पावलं पसरत होतं. वरच्या पंख्यांचा एकसुरी आवाज वाऱ्यासोबत सूर धरत होता.

शाल्मली एकटक खिडकीतून बाहेर पहात होती पण तिच्या नजरेसमोर तिचे विचारच असावेत. बाहेरल्या ताटकळत असलेल्या वनस्पती,निरभ्र आकाश, दुरवर विसावलेले कापसासारखे रुपेरी ढग तिच्या ध्यानी नव्हते.

शाल्मलीचा जीवनसाथी, त्यांची मुलगी सारा झाल्यानंतर तीनेक वर्षांत निवर्तला. त्यानंतर आईबाप या दोन्ही भूमिका बजावत ती साराला लहानाचं मोठं करतं होती.

साराचे वडील निवर्तले तेंव्हा नकळत्या वयाची सारा  सारखी पप्पा हवा,पप्पा हवा म्हणून रडायची. साराचं रडणं कमी करण्यासाठी तिच्या आज्जीने तिला पप्पाच्या फोटोशी बोलायची सवय लावली. लहान मुल लवकर आत्मसात करतं.

सारानंही तेच केलं. ती फोटोतल्या पप्पाला सजीव समजून शाळेतनं आली की सगळ्या सगळ्या गोष्टी त्या फोटोला सांगू लागली. अगदी जेवणही फोटोतल्या पप्पासोबत.

शाल्मलीला साराचं मन कळत होतं पण तिचा हा वाढत चाललेला अतिरेक पाहून वाईट वाटायचं तिला.

एकदा तिने कंटाळून तो फोटोच कपाटात ठेवला व कपाटाला कुलुप लावलं. सारा पप्पांचा फोटो नाही हे बघून धिंगाणा करेल असं तिला वाटलं होतं पण ती गप्पच राहिली.

दुसऱ्या दिवशी साराला उठवायला गेली तर तिचं अंग कढत लागलं. सणकावून ताप भरला होता पोरीच्या अंगात. एंटीबायोटीक्स, ब्लड टेस्ट्स..ससेमिरा पाठी लागला. इतकं होऊनही महिना झाला तरी ताप जाईना तेंव्हा शाल्मलीने साराच्या पप्पाचा फोटो होता तिथे ठेवला टेबलवर न् काही तासांत साराचा ताप झरझर उतरला.

सारा जसजशी मोठी होऊ लागली,तशी एकेकटी राहू लागली. शाल्मलीसोबत साराचं विशेष जमत नसे. आजी सत्तरी पार केलेली तरी सारा घरी आली की तिच्यासोबत सावलीसारखी असायची. साराला सांगायची,”सारे, हातपाय धू नि पप्पांजवळ बस चल. मग साराही तसंच करायची. पप्पाच्या फोटोजवळ बसून दिवसभरात काय काय केलं ते पप्पाला सांगायची नं आजीही जीवंत माणसाशी बोलतात तसं लेकाच्या फोटोशी बोलायची पण हे संवाद शाल्मलीच्या अपरोक्ष चालायचे कारण तिला सासूचं नं लेकीचं हे असं वागणं वेडेपणाचं वाटायचं.
सारा दिसायला पप्पांसारखीच उंचीपुरी होती. धारदार नाक,रेखीव ओठ,बदामी डोळे यांमुळे ती चारचौघांत अधिकच उठून दिसायची. कॉलेज संपल्यासंपल्या साराला नोकरीही लागली.

घरापासनं लांब रहावं लागणार होतं. शाल्मली तिला म्हणाली,”सारा,तुझ्यासाठी पी. जी. रुम पाहुया. ” साराने आई तुही चल माझ्यासोबत असं म्हणायचा अवकाश, शाल्मलीने तिची नोकरी सोडली असती नि सारासोबत गेली असती रहायला. शाल्मलीने साराचं अभिनंदन करत तिला मिठी मारली , जी साराने गुदमरायला होतयसा बहाणा करत सोडवली.

साराच्या हातांचा,नजरेतला परकेपणा शाल्मलीला जाणवत होता  तरी ती साराला काही बोलली नव्हती. साराला तिनं गीफ्ट म्हणून स्कुटी घेऊन दिली जी साराने ढुंकुनही बघितली नव्हती.
आज्जीच्या मात्र गळ्यात हात घालत तिला लाडेलाडे बोलली होती,”माझी आज्जीच पाहिजे माझ्यासोबत यायला.”

आज्जीला साराच्या या तिच्यावर हक्क दाखविण्याचा आनंद झाला होता  पण तसं न दाखवता ती म्हणाली होती,”मी चार दिवस पुरेन तुला. माझं काय पिकलं पान..कधी गळून पडेन..” यावर सारा कानाचे दडे बसतील एवढ्या आवाजात स्टॉssप म्हणाली होती.

सारा नि आज्जी तिकडे रहायला गेल्या नं शाल्मली इकडे एकटी पडली. एकटीचं खाणं ते किती! तिने डबा लावला. ऑफिसवरुन आलं की वेळच वेळ असायचा तिच्याकडे.

सारा फोन करत नव्हती म्हणून तिनेच मग लेकीचा आवाज ऐकण्यासाठी फोन केला होता. “सुट्टी काढून ये चार दिवस,” आर्जव केलं तिने लेकीजवळ पण साराने बरंच काम पेंडींग असल्याची बतावणी केली.

शाल्मलीची सासू न लेक दोघी त्यांच्या जगात खूष होत्या. शाल्मलीने ठरवलं, आपणही खूष रहायचं. मैत्रिणीच्या मुलीचं लग्न होतं. सगळ्या मैत्रिणी मिळून जाणार होत्या. शाल्मलीही गेली त्यांच्यासोबत. मैत्रिणीच्या मुलीसाठी तिने खास क्रोशाचे रुमाल,तोरण,बाहुली असं स्वतः हौसेने विणलेलं सारं रुखवतात मांडायला न्हेलं होतं, जे मैत्रिणीच्या मुलीला फारच आवडलं.

नवरा गेल्यानंतर प्रथमच शाल्मलीनेने दोन्ही हातांवर मेहंदी रचून घेतली, तेही मैत्रिणीच्या आग्रहाखातर पण तिचं तिलाच किती छान वाटलं ते, गोऱ्या तळहातांवरची ती अलवार मेहंदी,मेहंदीचा चिरपरिचित सुगंध तिने भरभरुन घेतला. काही दिवसांकरता का होईना शाल्मली तिचा एकटेपणा, कोरडेपणा विसरली.

नवऱ्यामुलीच्या मैत्रिणींसोबत हसलीखिदळली, रांगोळी काढू लागली, फुलांच्या माळा गुंफू लागली. त्या कोवळ्या पोरींची ती लाडकी सखी झाली होती.

शाल्मलीने लग्नाच्या दिवशी मैत्रिणीची बरीचशी जबाबदारी स्वत:कडे घेतली. पाहुण्यांचं स्वागत, त्यांना नाश्ता, जेवण केलं का विचारणं, ब्यागा सांभाळणं सारं काही शाल्मली आनंदाने,आपलेपणाने करत होती.

मैत्रिणीची मुलगी, पाठवणीच्या वेळी खूप खूप रडली तेंव्हा शाल्मलीच्याही डोळ्यांतून पाणी आलं पण त्याक्षणी तिला आपल्या मैत्रिणीची ईर्षाही वाटली.

साधा फोन करायलाही वैतागणारी सारा या मुलीप्रमाणे पाठवणीच्यावेळी रडेल का? हे सगळं करण्याचा मान मला देईल की तेही आज्जीकडून करुन घेईल!

लग्नातल्या धावपळीने थकलेल्या शाल्मलीने गादीवर अंग टाकलं. तिच्या डोळ्यासमोर तिचं लग्न आलं. कॉलेज संपतं न संपतं तोच आईवडिलांनी तिचं लग्न लावून दिलं होतं. नवऱ्यामुलाची नीट चौकशीही केली नव्हती. नोकरी बरी होती त्याला हाच एक प्लस पॉइंट होता त्याच्यात.

रंग,रुप जाऊदे पण आरोग्य महत्त्वाचं तेच नव्हतं त्याच्याकडे. सदा आजारी पडायचा. शेजाऱ्यांकडून शाल्मलीला कळलं की याची तब्येत पहिल्यापासनंच रोगट. त्यात आईने अगदीच बावळट बनवून ठेवलं होतं. अगदी शिंक आली तरी गोळी,औषध घ्यायला लावायची. शाल्मलीची किती स्वप्नं होती,नवीन संसाराबद्दल..पण नवऱ्याची कशातच साथ मिळेलशी अपेक्षा करणंही चुकीचं वाटू लागलं होतं तिला.

शाल्मलीला नोकरी नव्हती करायची. तिला संसारात मन रमवायचं होतं,आपल्या अपत्याचं मोठं होणं डोळे भरुन पहायचं होतं पण नवरा चार दिवस कामावर तर दोन दिवस रजेवर.

घरात पैशाची चणचण जाणवू लागली तशी दोन महिन्याची गर्भार असल्यापासनंच तिने नोकरी करायला सुरुवात केली. घरातलं बरंचसं सासूच करायची पण ते करण्यात शाल्मलीची काळजी वाटणं नव्हतं तर मीपणाच अधिक असायचा. मी आहे म्हणून यांचा संसार नीट चाललाय..असं शेजारणींना सांगायची.

सारा झाल्यानंतर तीन महिन्यांतच शाल्मली पुन्हा ऑफिसला जाऊ लागली. नवऱ्याची आर्थिक,मानसिक कोणत्याही पद्धतीची मदत नव्हती. मुळात त्याला नक्की काय होतय तेच तिला कळत नव्हतं. तो दिवसेंदिवस खंगत चालला होता. डॉक्टरकडे जाऊ म्हंटलं तरी ऐकत नव्हता. साराचं पानही हलत नव्हतं आज्जीशिवाय.

शाल्मली एकेक दिवस रेटत होती. माहेरी एकदोनदा सांगून पाहिलं तिने पण त्यांनी विशेष लक्ष दिलं नाही तिच्या बोलण्याकडे नि एकेदिवशी तिला घरी बोलावून घेतलं गेलं..बघते तर घरासमोर ही गर्दी..बारीक आवाजात बोलणं,चुटपूट.. ती सरळ आत गेली..बघते तर नवऱ्याने झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या केली होती..माझ्या म्रुत्यूस कोणाला जबाबदार धरु नये, मानसिक ताणामुळे मी हे जग सोडून जात आहे अशी चिठ्ठी सापडली होती त्याच्या उशीजवळ.

सासूने मात्र शाल्मलीलाच जबाबदार धरलं मुलाच्या आत्महत्येबद्दल नि तिच्याशी बोलणं टाळू लागली. सारालाही तिने स्वतःच्या कक्षेत ओढून घेतलं. आज्जीनातीचं वर्तुळ बनलं आणि त्या वर्तुळाला पोसायची जबाबदारी उचलणारी शाल्मली मात्र एकाकी,दीनवाणी राहिली.

मैत्रिणीच्या मुलीचं लग्न यथासांग पार पडलं.मैत्रिणीने आणिक चारेक दिवस रहाण्याचा आग्रह केला शाल्मलीला. शाल्मलीनेही कांकू केलं नाही. मैत्रिणीचं हळवं झालेलं मन तोडायचं नव्हतं तिला आणि असं परक्या का होईना माणसांत वावरता येतय याचंही सुख मिळत होतं तिला. त्यादिवशी तिने स्वतः व्हेज पुलाव, मटरची रस्साभाजी केली. दुपारी पंगतीला बसलेल्या मंडळींनी तिच्या हातच्या चवीचं कौतुक केलं. ती नि मैत्रीण दोघीच राहिलेल्या जेवायच्या. मैत्रीणीने दोघींच वाढून घेतलं. शाल्मली पहिला घास घेणार तोच कधी नव्हे तो साराचा कॉल..”आई, आज्जी इज नो मोर.”
शाल्मलीच्या हातातला घास गळून पडला नि तोंडातनं शब्द निघाले.”कधी, कसं..”

“झाले चार दिवस.” पलिकडून साराचा आवाज.

“आणि तू मला आता कळवतेस..”

“आज्जीचीच इच्छा होती तशी. तू नको होतीस तिला शेवटीही.” शाल्मलीला फारच अपमानास्पद वाटलं. भरून आलेले डोळे तिने बोटांनीच पुसले नि मैत्रिणीची कशीबशी बोळवण करून निघाली. गाडीत हे सारं मागलं तिला आठवत होतं. आताही साराने एक औपचारिकता म्हणून तिला फोन केला होता पण शाल्मलीची मायाच वेडी होती. स्टेशनला उतरल्यावर तिने साराला कळवलं, तिथे तिला घ्यायला एक उमदा तरुण आला होता. त्याने स्वत:ची ओळख करून दिली.

साराचं घर लोकवस्तीपासून थोडं दूरच होतं. गाडीत शाल्मलीला साराच्या मित्राशी बोलावसं वाटत होतं पण काय बोलावं ते सुचेना. ती डोळे मिटून राहिली.

घरी पोहोचली. दिवाणखाना बऱ्यापैकी सजवला होता. तो तरुण शाल्मलीला आतल्या खोलीत घेऊन गेला. समोरचं द्रुश्य पाहून शाल्मली अवाक झाली. टेबलवर शाल्मलीच्या सासूचा व नवऱ्याचा फोटो ठेवला होता नि सारा दोघांशी चक्क गप्पा मारत होती.

शाल्मलीने त्या तरुणाकडे पाहिलं. त्याने खांदे उडवले.म्हणाला,” प्रेम करुन बसलोय या वेडीवर. हिचं हे वेड ठाऊक नव्हतं मला. बाकी नॉर्मलच असते. नुकतच प्रमोशनही मिळालय हिला पण हे एक वेगळं जग आहे तिचं तिचं त्यात मला प्रवेश नाही. गेलोच जवळ तर हाताला सापडेल ते फेकून मारते. तुम्हीही नका भेटू तिला इतक्यात.”

शाल्मली बाहेरच्या कोचावर जाऊन बसली. सगळं तिच्या आकलनापलिकडचं होतं. त्या तरुणाने आपलं नाव सागर सांगितलं . शाल्मलीला पाणी, चहा दिला. तासाभराने सारा बाहेर आली. “तू यायची गरज नव्हती खरी. मी तुला कळवायचं म्हणून कळवलं होतं. आलीच आहेस तर रहा आज. उद्याची तिकीट काढ सागर.”

शाल्मली काहीतरी बोलणार इतक्यात सागरने तिला खुणेने थांबवलं.  निदान साराची आज्जी गेल्यावर तरी सारा आपल्याशी चांगल वागेल, तिला समजून घेईल ही शाल्मलीची खुळी समजूत साराने साफ चुकीची ठरवली होती.

शाल्मली घरी जायला निघाली तेंव्हा सागर सोडायला आला होता. सागर तिला म्हणाला,”मला तुमचा थोडा वेळ हवाय. तुमच्याकडून नक्की सारा अशी का वागते हे जाणून घ्यायचय. मी खूप प्रेम करतो तिच्यावर म्हणूनच तिला लाडीगोडी लावून मानसोपचारतज्ञांकडे घेऊन गेलो होतो. आज आपण त्या डॉक्टरांकडे जाऊ. त्यांनी बोलावलय तुम्हाला.” मग आम्ही डॉ. सोहोनींकडे गेलो. त्यांनी अगदी अगत्याने चौकशी केली. शाल्मलीने तिच्या लग्नानंतरच्या
सगळ्या घटना क्रमाने सांगितल्या. त्या सांगताना ती हळवी होत होती. डॉ. तिचं म्हणणं नीट ऐकून घेत होते.

“डॉ. माझी सारा कधी माझी होईल का हो? कधी  हक्काने माझ्याजवळ येईल का हो?” रडत रडत शाल्मलीने विचारलं.

“मिसेस शाल्मली, यु आर ए ब्रेव्ह लेडी. डोन्ट वरी. युवर गर्ल वील सुन एम्ब्रेस यू?” डॉक्टरांच्या या म्हणण्याने शाल्मलीला धीर आला. सागरचा निरोप घेऊन ती घरी परतली.

मधे चारेक महिने गेली असतील नं शाल्मलीला पोटदुखीचा त्रास होऊ लागला. चाचण्या झाल्या त्यात कर्करोगाचंं निदान झालं. तिच्या वाचण्याचे चान्सेस फारच कमी होते. शाल्मलीच्या मैत्रिणीने साराला फोन करून सगळी परिस्थिती कळवली.

डॉक्टरांच्या ट्रीटमेंटमुळे सारा आता कुठे बरी होत आली होती, जे या विश्वातच नाहीत त्या पप्पा, आज्जीशी बोलत बसण्यात आपण आपल्या आईशी दुष्ट वागलो, तिला कायमच अंतर दिलं, तिने आपल्यासाठी केलेल्या त्यागाचं आपल्याला काहीच कसं वाटलं नाही ही भावना साराला सतावू लागली.

सागरला सोबत घेऊन ती आईकडे निघाली. हॉस्पिटलमध्ये गेली. शाल्मली तिच्या बेडवरनं दिसतच नव्हती, हाडामासाचा पिंजराच होता बेडवर, डोळे काळवंडलेले, अगदी निस्तेज. साराने तिचा हात हातात घेतला. “आssई..आई चुकले मी तुला ओळखू नाही शकले. मला माफ कर ना गं आई. मला सोडून नको जाऊस प्लीज” सारा रडत होती आणि तिच्या बोटांच्या उबेने शाल्मलीला क्रुतार्थ वाटत होतं.

आज तिच्या साराने तिला स्पर्श केला होता, त्या स्पर्शासाठी ती इतकी वर्ष आसुसली होती. सागरने साराच्या खांद्यावर हात ठेवला. “सारा सांभाळ स्वतःला,” तो हलकेच बोलला. शाल्मली तिला सोडून गेली होती पण आता त्या निस्तेज चेहऱ्यावरही समाधान पसरलं होतं, लेक भेटीला आल्याचं.

समाप्त

=====================

नमस्कार वाचकहो🙏🙏,

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आवड असूनही आपले छंद आपल्याला जोपासता येत नाही. आवड असूनही पुस्तकं वाचता येत नाही. त्यामुळे वेळेअभावी आपल्यासारखे खूप सारे वाचक वाचनापासून वंचित राहतात. आणि म्हणूनच वाचकांना कुठेही सहज वाचता येतील असा कथासंग्रह आम्ही रीतभातमराठी ह्या डिजिटल व्यासपीठावर घेऊन आलो आहोत.

उत्कृष्ट लेखकांनी लिहिलेल्या marathi katha, marathi moral story, marathi stories, marathi short stories, bodh katha marathi मध्ये आपल्याला रीतभातमराठीवर वाचायला मिळतील.

Leave a Comment

error:

Warning

सध्या युट्युब वर कथा चोरी करून वाचून दाखवण्याचे धंदे चालू आहेत लोकांचे. आमच्या वेबसाईट वरची कथा कुठल्याही युट्युब चॅनेलवर बेकायदेशीररित्या आढळल्यास त्या चॅनेलला लगेच रिपोर्ट करण्यात येईल ह्याची कृपया दक्षता घ्यावी. तसेच आपल्या वाचकांपैकी कुणालाही असे बेकायदेशीर चॅनेल्स आढळल्यास आम्हाला ritbhatmarathi@gmail.com ह्या ई-मेल वर त्वरित कळवावे.