Skip to content Skip to sidebar Skip to footer

कुटुंब

आज नानांच्या घरात अगदी सणासुदीलासुद्धा नसेल, इतकी लगबग सुरू होती. कारण तसंच होतं ना, नानांची पंच्याहत्तरी होती आज. दोन मुली आणि मुलगे आणि त्यांचा परिवार अगदी झटून तयारीला लागले होते. नोटांचे हार, पुष्पगुच्छ, तुला करण्यासाठी तराजू आणि गुळाच्या ढेपी. मोठ्या कॅटरर्सला ऑर्डर दिल्याने मुलं-सुना, लेक-जावई स्वत:ची तयारी करण्यासाठी अगदी मोकळी होती. आणि सुमतीताई त्यांची बडदास्त तर विचारू नका. त्यांच्यासाठी स्पेशल ब्युटी पार्लरवालीच बोलावली होती.

त्या नको नको म्हणत असताना त्यांना भरजरी शालू, आणि सोन्याचा नाजूकसा नेकलेस मुलांनी कौतुकाने केला होता. नानांना सफारी आणि छानशी आंगठी. त्यांच्या सेवेसाठी पण त्यांचाच एक मित्र जातीने हजर होता. प्रत्येकाने प्रसंगाला साजेसे कपडे आणि मेकअप केला होता. नानांना दोन मुलं आणि एक मुलगी. आता सर्वांचेच परिवार पण विस्तारले होते. मोठ्या मुलाला एक मुलगी. लहान मुलाचं नुकतंच लग्न झालं होतं. मुलीला दोन मुलं एक मुलगा एक मुलगी.

नाना आणि सुमती यांचा स्वभाव मनमिळाऊ असल्याने त्यांनी जोडलेली भरपूर माणसं होती. त्यांच्या या सगळ्या मित्रपरिवाला आणि जी त्यांना जवळची आहेत त्या सगळ्यांना बोलवायचा मुलांचा अट्टाहास. खरंतर असा कार्यक्रम करून आपल्यासाठी पैसे खर्च करावेत असं नानांना अजिबात वाटत नसे. ते म्हणाले देखील, ‘‘कशाला उगाच हा पैशाचा अपव्यय… त्यापेक्षा आपण मस्तपैकी फॅमिली टूर करू.’’

पण मुलांनी त्यांचं म्हणणं खोडून काढलं आणि सांगितलं, ‘‘ती तर करूच.. पण हा कार्यक्रम झालाच पाहिजे.’’ नानांनी जेव्हा मुलांच्या समोर नाइलाजाने का होईना मान तुकवली तेव्हा मुलांनी अक्षरश: आनंदाचा जल्लोष केला आणि महिनाभर तयारी केली. आज तो सुदीन उजाडला आणि सर्वजण आनंदात न्हाऊन निघाले.

एकेक एकेक नानांचे मित्र येत राहिले. सुमतीच्या मैत्रिणी, बहिणी, मुला-मुलींच्या-सुनांच्या मित्र-मैत्रिणी, जवळचे नातेवाईक सर्व जमले. घराजवळचंच सभागृह घेतलं होतं. सभागृह गच्च भरलं. आलेल्यांना वेलकम ड्रींक, हलकासा नाश्ता देऊन कार्यक्रमाला सुरुवात झाली. नानांची तुला करण्यात आली. सर्व कार्यक्रम अगदी हसत-खेळत पार पडला. कुणी नानांवर कविता, तर कुणी भाषण करत होतं, मुला-मुलींनी, सून-जावयांनी नानांप्रती कृतज्ञता आणि आपुलकीचे भाषण केलं आणि आता सुमतीताई उभ्या राहिल्या.

सुमतीताईंनी नानांविषयी जे सांगितलं ते ऐकून तिथं नव्याने परिचय झालेल्या लोकांना फारच आश्‍चर्य वाटलं त्यांनी तर तोंडात बोटंच घातली. या आगळ्या वेगळ्या नात्याविषयी आणि तरीही या सुखी परिवाराविषयी सर्वांनाच फार कौतुक वाटलं काहींना थोड्या फार प्रमाणात नानांचा हेवाही वाटला पण तरीही सर्वत्र आनंदाचं वातावरण होतं, सुमतीताईंना फार काही बोलवत नव्हतं, पण त्या एवढंच म्हणाल्या की, ‘‘नानांनी मला आणि माझ्या मुलांना जो आधार दिला त्यामुळे आमचं जीवन सुखकर झालं.

आमच्या घरात सर्वकाही होतं, पण कुटुंबाला आधार देणारा पुरुष नव्हता. नानांची आणि माझी भेट झाली आणि आमचा भाग्योदय झाला. नानांच्या रूपात घराला घरपण देणारा आधार मला गवसला. या सगळ्यांत मला माझ्या मुलांचंही खूप कौतुक करावंसं वाटतं की, त्यांनी नानांना स्वीकारलं. खरंतर त्यांचं वय अर्धवट होतं, बरं-वाईट समजण्याच्या पलीकडं होतं, पण एकंदर नानांच्या स्वभावामुळे म्हणा किंवा एकंदर परिस्थितीमुळे नानांचं आमच्या घरी येणं आणि मुलांना वडिलांचा आधार मिळणं, हे आम्हा सर्वांसाठी खूप हितकारक झालं.

आज मुलांनी नानांचा वाढदिवस अगदी उत्साहाने साजरा केला हे बघून नानांना आणि मला आम्हा दोघांनाही अतीव समाधान झाले आहे. मुलांची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो आणि आमचं, आमच्या आप्तस्वकीयांचं किंबहुना सर्वांचंच घर प्रेमाने भरून जावं हीच माझ्या रामरायाला प्रार्थना.’’ असं म्हणून त्या डोळे पुसत खाली बसल्या.

आता नाना उभे राहिले. त्यांनी सर्वांना नमस्कार केला. मी काय बोलणार? एका दगडाला तुम्ही माणसाचं रूप दिलं आहेत. मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एका शहरात एक मुलगा होता त्याला ना आई ना वडील. तो मुलगा लहान असतानाच त्याचे आई-वडील वारले. त्या मुलाच्या आजीने म्हणजे त्याच्या आईच्या आईने त्याचा सांभाळ केला. चांगलं शिकवलं, पालनपोषण केलं.

तो मुलगा हुशार होता, पण शिक्षणासाठी फार पैसा नव्हता. तरी लोकांच्या मदतीच्या जिवावर त्याने शिक्षकाची नोकरी मिळवली. त्याला नोकरी लागेपर्यंत त्याची आजी तग धरून होती. आधी तिने या मुलाला सांभाळलं मग या मुलाने तिला सांभाळलं अगदी तिला जेवू, खाऊ घालणं, आंघोळ घालणं इथपर्यंत सर्व या मुलाने केलं. जरी आजी जागेवर होती, तरी या मुलाला बरं वाटत होतं कारण मायेचं कुणीतरी होतं. आपलं बरं-वाईट बघणारं कोणीतरी होतं.

पण एक दिवस ती आजी पण या मुलाला सोडून गेली आणि हा मुलगा या भल्या मोठ्या जगतात एकाकी पडला. दिसायला ठीकठाक, घरचं काही उत्पन्न नाही, स्वत:चं घर नाही, कुटुंब नाही, ना आगा ना पिछा. याच्या लग्नाचं तरी कोण बघणार? बरं आपण लग्न करावं हे या मुलाच्या गावीही नव्हतं. एकटा जीव आपलं शाळा आणि घर असं सुरू होतं.

नोकरीच्या ठिकाणचे काही मित्र होते, ते आपले कधीतरी म्हणत, लग्न कर रे. पण ते तितपतच. एक दिवस हा मुलगा म्हणजे आता तोमोठा पुरुषच झाला होता. साधारण 40 ला आलेला, सणकून आजारी पडला. इतका की त्याला दवाखान्यात अ‍ॅडमिट करावं लागलं. कावीळ झाली होती त्याला. जवळपास 15 दिवस तो आजारी होता. त्याची सेवा करण्यासाठी सुमती नावाची एक पस्तिशीची नर्स होती. तिला आश्‍चर्य वाटे, की या माणसाला भेटण्याला घरचं कुणीच कसं येत नाही? अगदी एक-दोन वेळा जवळचा मित्र येऊन गेला, पण तेवढ्यापुरतंच. शेजार्‍या-पाजार्‍यांनी दोन चार वेळा डबा दिला, पण घरच्या माणसासारखी कोण काळजी करणार?

दवाखान्यातून घरी सोडायची वेळ आली, प्रचंड अशक्तपणा होता, आता काय करायचं? असा मोठा प्रश्‍न त्याच्यासमोर होता. तो बॅग घेऊन बाहेर तर पडला आणि दवाखान्याच्या बाहेरच्या मोठ्या वृक्षाखाली बसून राहिला. कोणाकडे जावे बरं? अशा परिस्थितीत घरी जाऊन उपयोग? का डॉक्टरनांच विनंती करावी की काही दिवस आपल्याला इथेच राहुदे असं द्वंद्व त्याच्या मनात चालू होतं. सुमतीने त्याला तिथं बसलेलं पाहिलं आणि ती लगबगीने तिकडे आली.

तिलाही या सद्गृहस्थाबद्दल आपुलकी निर्माण झाली होती, कारण बाकीच्या पेशंटचं वागणं आणि या माणसाचं वागणं अगदी वेगळं होतं. त्याने मुद्दाम कधीही सुमतीला बोलावलं नाही, तिला कमीत कमी त्रास होईल अशी त्याची वर्तणूक होती. आपल्या गोळ्या आपल्या आपण तो घेत असे. शक्यतो तो कुणालाही त्रास देत नसे.

जेव्हा सुमतीला त्याची परिस्थिती कळली तेव्हा तिने एक निर्णय घेतला आणि ती त्या माणसाला म्हणजेच मला घरी घेऊन आली. आणि तेव्हापासून त्या माणसाचं म्हणजे माझं आयुष्यच पालटलं. मला कौटुंबिक सुख म्हणजे काय असतं ते कळलं. सुमती दवाखान्यात गेली तरी मुलं माझी काळजी घेत. मला हवं नको ते बघत. सुमतीचा नवरा अचानक आजारी पडून देवाघरी गेला होता. कुटुंबाचा आधारच हरपला होता. अशा कुटुंबाने मला आधार दिला आणि मी खडखडीत बरा झालो. मी माझ्या घरी जायला निघालो तेव्हा मुलं माझ्या पायाशी बसली, ‘‘जाऊ नका, तुम्ही घरात आहात तर आम्हाला छान वाटतंय असं म्हणू लागली.’’

पण खरं तर मी तिथे राहाणं हे समाजाच्या नजरेतून पाहिलं तर खूप चुकीचं दिसत होतं. खरंतर मला, सुमतीला आणि मुलांना मी त्या घरात राहाणं हे खूपच छान वाटत होतं. काय करावं मला प्रश्‍न पडला होता, मग मी ‘‘कामासाठी जाऊन येतो.’’ असं म्हणून मुलांना जरासं दुखवूनच बाहेर पडलो.


दोन-तीन दिवस घरी माझ्या घरी राहिलो, पण ते घर मला खायला उठत होतं. माझं मन सुमतीकडे त्या घराकडे ओढ घेत होतं. एक दिवस मी सुमतीला भेटायला गेलो, तिला खूप आनंद झाला. खरंतर तिलाही वाटत असेल की परत यावं, पण स्त्री स्वभावानुसार आणि समाजाच्या भीतीने ती काही बोलत नव्हती. मी तिला विचारलं, ‘‘आपण लग्न करुया का?’’ तिच्या आनंदाला पारावार राहिला नव्हता, पण तरीही समाजाची भीती मनात होतीच. मग मीच तिला समजावलं, ‘‘हे बघ तुमच्या कुटंबाला एका कर्त्या पुरुषाची जरुरी आहे आणि मला कुटुंबाची आवश्यकता आहे? लोाकांचं काय? ना ते तुला मदत करणार आहेत,

ना मला!’’ तिलाही ते पटलं आणि मी तिच्याच घरात राहायला गेलो. तिचंही घर भाड्याचंच होतं, पण जरा मोठं होतं. मग आम्ही दोघांनी छानसा संसार थाटला. स्वकतृत्वावर मोठं घर घेतलं आणि आज आमचं आनंदी कुटुंब तुमच्यासमोर आहेच. तेव्हा काही लोकांनी त्रास दिला, हसली, कुचेष्टा केली, पण आम्ही लक्ष दिलं नाही. कारण आम्हा पाच जणांना हा निर्णय मान्य होता. आणि मग लोकांनीही आम्या नात्याला मान्यता दिली आणि आज आमचं कुटुंब अगदी सुखी कुटुंब आहे. नानांना बोलताना धाप लागली होती. मुलांनी त्यांना पाणी आणून दिले. नाना समाधानाने पाणी प्यायले. वातावरणात थोडासा भावूकपणा आला होता, तेवढ्यात नानांची नात त्यांच्या मांडीवर बसत म्हणाली,

‘‘नाना, जेवायचं कधी? मला खूप भूक लागलीय. कधी एकदा रसगुल्ले खातेय असं झालंय मला…’’

तिच्या या वाक्याने सर्वांनाच खूप हसू आलं आणि भाषणं आटोपती घेत फोटो सेशन करून सर्व मंडळी जेवायला रवाना झाली. नानांनी सुमतीला एक स्पेशल गिफ्ट दिलं. बकुळीच्या फुलाचा गजरा आणि ते म्हणाले,

‘‘माझ्या जीवनात तू आलीस आणि माझं जीवन अगदी कृतार्थ करून टाकलंस.’’ फोटोग्राफर हा फोटो कॅमेरात कैद करायला विसरला नाही.

===================

नमस्कार वाचकहो🙏🙏,

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आवड असूनही आपले छंद आपल्याला जोपासता येत नाही. आवड असूनही पुस्तकं वाचता येत नाही. त्यामुळे वेळेअभावी आपल्यासारखे खूप सारे वाचक वाचनापासून वंचित राहतात. आणि म्हणूनच वाचकांना कुठेही सहज वाचता येतील असा कथासंग्रह आम्ही रीतभातमराठी ह्या डिजिटल व्यासपीठावर घेऊन आलो आहोत.

उत्कृष्ट लेखकांनी लिहिलेल्या marathi katha, marathi moral story, marathi stories, marathi short stories, bodh katha marathi मध्ये आपल्याला रीतभातमराठीवर वाचायला मिळतील.

Leave a Comment

error: