Skip to content Skip to sidebar Skip to footer

कुछ तो लोग कहेंगे….

केतकीचे सासरे म्हणजे गणू आप्पा सरोदे काकांना सांगत होते…

आप्पा – सून मोठी हुशार आणि चंट आहे माझी…माझ्या मुलाएवढंच कमावते आणि घरांमध्येही हिच्याकडून म्हणजे लावण्याकडून तर्हेतर्हेचा स्वयंपाक शिकून घेते…खरंच भाग्य लागत अशी सून मिळायला…

सरोदे काका – आमच्या विनोदसाठीही स्थळ पाहतोय आम्ही…त्यालाही अशीच बायको बघायला सांगशील का केतकीला…

आप्पा – ह्म्म्म…कानावर घालून ठेवतो केतकीच्या…नाही म्हणणार नाही हा ती…तिला तर सांगतोच तसेच कुमारलाही सांगून ठेवतो मी…मग तर झालं…

सरोदे काका – विश्वास आहे रे तुझ्यावर…म्हणून तर कामगिरी सोपवली तुमच्यावर…

आप्पा – चला येईल माझी पोरगी…

सरोदे काका – कोण…लीना …आज येणार कि काय…

आप्पा – लीना….छे…ती कशाला येतीय…माझी सून हो…केतकी…लगेच चहा मिळणार मला आज …

असं म्हणून आप्पा आपल्या मित्राचा निरोप घेतात…आणि घरात पोचतात…कुमारही घरी ऑफिसवरून आलेलाच असतो…आणि आपल्या आईला म्हणजेच लावण्याताईंना एका वक्त्यांची काही मत पटवून सांगत होता…

कुमार – अगं…आई तुला माहिती आहे का..एक वक्त्याचे आज भाषण ऐकायला म्हणून आम्ही गेलो होतो….

आई – अरे ऑफिसची कामं सोडून बरं तुला जमत असं जायला…

कुमार – आई…कामं सोडून नव्हतो गेलो…असंच कामातून थोडं इंटरटेन करायला नेतात आम्हाला…

आई – बरं…मग काय झालं काय म्हणत होता वक्ता…? नाही म्हणजे भाषणाचा विषय काय होता…?

कुमार – ‘ सुखी संसाराची सूत्र ‘ असं नाव होत भाषणाचे…सांगत होते…सुख ही काय अशी साधी सुधी गोष्ट नाहीय…आपण कितीतरी इमानेइतबारे कामं करत असलो ना तरीही त्यात काटे पसरवणारे येतातच…आपण मात्र त्यातून असा मार्ग काढत जायचा असतो…मार्ग काढतच राहायचं असत अगदी शेवटपर्यंत…त्यालाच आपण कष्ट असे म्हणतो…आणि तेच तर सुखी संसार करण्यास मदत करत असतं….

आई – अरे वाह…मस्त की…एरवीचा धांगडधिंगा पाहण्यापेक्षा असं काहीतरी पाहत जावं माणसाने…

कुमार – मला त्या बाळबोध कल्पना वाटल्या…

आई – काय..? बाळबोधपणा काय त्यात…आम्ही असंच संसार केलाय…विचार आप्पाना…

कुमार – आई….केतकी आली नाही अजून…?

आई – येईल की सावकाश…कुठं जायचंय कुणाला…?

कुमार – काय गरज आहे हिला नोकरीची…मला घरात असणारी गृहिणी म्हणून बायको हवी होती…आल्याबरोबर मला पाणी देणारी…तुमची काळजी घेणारी अशी बायको मला हवी होती…आप्पा…काय गरज होती केतकीला पद्युत्तर कोर्सेस साठी सपोर्ट करायची…केवढा महागडा कोर्स होता तो…

आप्पा – पण त्या कोर्स ला पैसे दिले त्याच सोनं केलं पोरीने…केवढी चांगली संधी चालून आली केतकीला नोकरीची…पगारही तुझ्याच बरोबरीने कमावते…एक मिनिट…आत्ता समजलं…तुझ्या अस्वस्थतेचं कारण…बायको बरोबरीला कमावतीय म्हणून…कर्तेपणा विभागला जातोय…

कुमार – आप्पा…तसं काहीच नाहीय…कुठलीही स्त्री कमावती असू देत…तिला औदार्याने वागवलाच पाहिजे या मताचा आहे मी…पण कर्तेपणा माझ्याचकडे असायला पाहिजे…

तिघांची बोलणी चालूं असतानाच केतकी आली…आप्पानी विषय लागलीच बदलला…

आप्पा – काय मग केतकी…परवाचे उंदियो मस्त झाले होते…आज करशील परत…

केतकी – अय्या…त्यात काय एवढं…करेल की…खाणारे हौशी असतील तर करणारी आणि वाढणारी अगदी न दमता करून वाढते…

आई – केतकी…पहिलं फ्रेश होऊन ये…

केतकी फ्रेश होऊन स्वयंपाकाच्या तयारीला लागते…अगदी फर्माइशींप्रमाणे जेवण सगळ्यांचं होत….शतपावली झाल्यानंतर कुमार रात्री पुस्तक वाचत बिछान्यावर पडला होता…केतकी तोपर्यंत मगच सगळं आवरून झोपण्यासाठी म्हणून आपल्या रूममध्ये आली…कपडे बदलून कोल्ड क्रिम लावत ड्रेससिंग टेबल च्या जवळ बसलेली होती…तेवढ्यात कुमार पुस्तक बाजूला ठेऊन केतकीला म्हणाला…

कुमार – केतकी किती दमलेली दिसतेस…! हि नोकरी एवढी अट्टहासाने करायलाच हवीय का…आपल्याला पैशांची तशी गरज नाहीय…एन्जॉय करण्याच्या या वयात कशाला तरी उगाच कष्ट ओढवून घेतीयस…

केतकी – [ कोल्ड क्रिम लावता लावता आश्चर्याने कुमारकडे पाहत म्हणाली ] कुमार…मला अजिबात दमल्यासारखं वाटत नाहीय…मी जे काम करतीय त्यात एवढा चॅलेंज आहे की ते करत असताना एक वेगळाच आनंद मला मिळतो रे…!  शिवाय आप्पांनी एवढं शिकवलं ते…मग घरी बसून तरी काय करायचं…आणि या सगळ्या विचारांत पगारच विषय येतोच कुठे…माझी बुद्धी,कुवत आहे ती फक्त मला वापरता यावी…असं मला आणि एकेकाळी तुलाही वाटतच होत ना…

कुमार – अगं असं मला अजूनही वाटतंय…पण परवाच आई म्हणत होती…लग्नाला अडीच वर्ष झालीत…कुटुंबनियोजन जरा बाजूला ठेवा…केतकीने चान्स घेतला पाहिजे माझ्या हातापायात बळ आहे तोवर बाळंतपण करेल केतकीच…असं आई म्हणत होती…

केतकीने स्थिर नजरेनं कुमारकडे पाहिलं..केतकीच्या अगदी ओठांवर आलं…’ कशाला खोटं बोलतो ..काय म्हणायचं आहे ते स्पष्ट सांग…परवाच आई म्हणाल्या मला की नोकरी सोडू नकोस उगाच चान्स घेऊन संसारात अडकून पडशील…आधीच चांगलं चाललंय…एकदा का अडकलं की अडकलं…’ पण हे सर्व केतकीच्या मनात होतं…ती काहीच बोलली नाही…समंजसपणे हसली…कुमारलाही असंच वाटलं की आता आपण उघडे पडतो की काय…त्याच तिरमिरीत कुमारने केतकीला आपल्या जवळ ओढली…मग झपाटल्यासारखा कुमार केतकीच्या अंगावर पडला…आश्चर्याने गोठलेलं आणि ताठरलेलं तीच शरीर…हळू हळू सैलावलं तो विषयही तिथेच संपला….खरंच एवढा गंभीर विषय एका स्पर्शाने संपून जातो का…? तरीही कुमाच्या मनात एक बारीकशी सल राहिलीच…एकवेळ बायकांचं मन एका स्पर्शाने गोठून जात…पण पुरुषांचं तसं नसत…एका स्पर्शाने बाईला घायाळ करून टाकतात…जेणेकरून ती बाई किंवा आपली बायको सगळा राग विसरून परत मोहात अडकेल…ती सल केतकीच्या मनात किंचितही नव्हती…पण कुमारच्या मनात ती सल कायम राहिली…केतकीच कौतुक कुमारला ऐकवतही नव्हतं…आप्पा आणि आपली आईच केतकीला सपोर्ट करत आहेत ही गोष्टही कुमारला सहन होतं नव्हती म्हणून आप्पांवर कुमारचा सूक्ष्म असा राग होता…म्हणून कुमार खूपच तुटकपणे आप्पांबरोबर बोलत होता…

एक दिवस कुमार आपल्या बायकोला म्हणजेच केतकीला म्हणाला…

कुमार – केतकी…घरी एक कॉम्पुटर घे…आणि एक छोटा उद्योग चालू कर…वाटल्यास DTP च काम वैगेरे…

आप्पा – [ कुमारचा म्हणणं खोदून काढत ] कुमार….अरे ज्या तऱ्हेचं काम केतकी करतीय…ते बसवायला चार कोटी लागतील….मोठ्या कंपन्या सॉफ्टवेअर डेव्हलप करून घेतात…आणि DTP काय १० वी पास मुलं सुद्धा ऑपरेट करतात की…

केतकीने कुमारकडे पाहिलं…कुमारने थोड्या रागानेच पेपर उचलला…आणि आपल्या खोलीत जाऊन बसला…काही महिने असेच गेले कुमार काहीतरी सूचना करणार आणि ती सूचना आप्पा आणि केतकी मोडीत काढणार….यामुळेच कुमारची अस्वस्थता वाढत गेली…आणि एक दिवस केतकी कुमारला शांतपणे म्हणाली…

केतकी – कुमार…..मी नोकरी करू नको असं तुला वाटतंय का…?

कुमार – [ एकदम चमकून कुमार पाहतो ] मी कधी असं म्हणालो…?

केतकी – तू कधी स्वतःशी सुद्धा हे कबूल केलं नसशील…पण मला हे जाणवतंय

कुमार – काहीतरी तर्क लढवतेस…! तुम्ही बायका पण ना नसते तर्क काढण्यात पटाईत असतात

केतकी – तसंही असेल कदाचित पण मला बहुदा सहा-सात महिन्यांनी राजीनामा द्यावाच लागेल…

कुमार – का…?

केतकी – कारण….मला दिवस गेलेत…कालच समजलं मला…डॉक्टारांकडून कन्फर्म करून आलीय मी…आता मी प्रेग्नन्ट आहे…तर एक तर नवीन रुजू झालीय…मग एवढ्या रजा सुरुवातीलाच मिळणं कठीण आहे…विशेष म्हणजे विदाउट पे सुद्धा एवढ्या रजा मला मिळणार नाही…आता तू म्हणशील ऍबॉर्शन केलं तर चालेन का…?

कुमार – ए….मी नाही म्हणत आहे एबॉर्शन वैगेरे….आणि भलतं डोक्यात आणू नको आता या वयात नाही मग कधी प्लॅनिंग करायचं….योग्य वयात योग्य गोष्टी व्हायला पाहिजे….पुढे मग ते नीट मार्गी लागतील…आणि या आधी तूच तर पिल्स वर होतीस…आता चुकून राहिलंय तर राहू देत की ….राहता राहिला प्रश्न नोकरीचा….तर एक काय अशा छप्पन नोकऱ्या ओवाळून टाकेल माझ्या बाळावरून…. ….मी आहे ना….! [ असं म्हणून कुमारने केतकीला परत आपल्या जवळ घेतलं ]

कुमारच्या ‘ मी आहे ना… ‘ या शब्दावरून केतकीला खूप असा एक आधार वाटू लागला…कुमारलाही आपण एक करता पुरुष आहोत याची नव्याने जाणीव होऊ लागली…खऱ्या अर्थाने आपण कुटुंबप्रमुख झालोत या कल्पनेने कुमार सुखावत होता…कुमार परत केतकीच्या कपाळावर किस करून म्हणाला…

कुमार – ए….ते बायकांना डोहाळे बिहाळे लागतात ना…ते आंबट आणि चमचमीत खावंसं वाटत…तुला तसं काही खावंसं वाटतंय का…मला सांगत जा मी आणून देत जाईन…

केतकी – सांगेन रे….तुला नाही तर कुणाला सांगणार…[असं म्हणून शरमेनं आपला चेहरा कुमारच्या कुशीत नेला ]

आपण आई होणार ही कल्पनाच किती बदलवून टाकते ना सगळं जग…ते म्हणतात ना परिस्थितीशी मिळत घेण्याचा सोशिकपणा ‘ बाई ‘तच असतो तसंच काहीस केतकीने ठरवलं…अजून जमेल तितके दिवस नोकरी करण्याचं केतकीने ठरवलं होतं…आठ महिने व्यवस्थित असं ऑफिस ते घर हे रुटीन चालू होतं…त्यानंतर नऊ महिने भरत आले नोकरी सोडायची वेळ आली तरी केतकीला वाईट वाटलं नाही…एक तर येणाऱ्या बाळाच्या सुखद कल्पनेत ती गर्क होती आणि दुसरं म्हणजे आपल्याला याहूनही चांगली नोकरी मिळू शकते हा आत्मविश्वास केतकीला होता.नंतर एका गोंडस बाळाला केतकीने जन्म दिला…आपली बायको एक मुलं जन्माला घालतेय….तिला काय त्रास होतोय…तिच्या दुखऱ्या कंबरेवरून हात फिरवला तर बरं वाटेल…असं किंचितसा विचारसुद्धा कुमारच्या मनात आला नाही…आपल्या बायकोच्या वेदनांमध्येही सहभागी व्हावं असं कुमारला कधीच वाटलं नाही…सगळी जबाबदारी आईचीच असं समजून कुमार चहा पिण्यासाठी आणि सिगरेट ओढण्यासाठी बाहेर जात असे…

हळू-हळू सिद्धार्थ म्हणजे केतकीचा मुलगा चार महिन्यांचा झाला…त्या दिवसांमध्येही केतकी एका क्लास मध्ये जाऊन एका ऍडव्हान्स कोर्स करून आली होती…हिला हे सगळं जमत कसं या गोष्टीचाही कुमारला मत्सर वाटायचा…काही दिवसातच केतकीला एका चांगल्या पगाराचा जॉबही लागला…पगार कुमारपेक्षा थोडा जास्तच होता….विशेष म्हणजे सिद्दार्थच सगळं करायचं हे आईने म्हणजेच लावण्यताईंनी ठरवलं….या गोष्टीचा कुमारला प्रचंड राग येऊ लागला…कुमारची अस्वस्थता….चिडचिड वाढतच होती….आपल्या बायकोच वर्चस्व सिद्ध होतंय म्हणून कुमारचा तिळपापड होऊ लागला…कुमारच्या संतापात आणखीनच भर पडली कारण वर्षभरातच केतकीच प्रमोशनही झालं…म्हणून केतकीने हौसेनं बोलेनो गाडी घेतली…आणि ही गोष्ट कुमारला माहितीही नव्हती म्हणून मंदिरात नेऊन गाडीची पूजा करून आई…आप्पा आणि कुमार असं तिघांना गाडीत नेणार होती…पण ज्या वेळी कुमारला कळलं की गाडी केतकीने घेतलीय….हे समजल्यावर कुमारच्या रागाचा पारा चढला…

कुमार – त्या तसल्या गाडीची ऐट कुणाला दाखवतेस…? चार दमड्या काय घरात जास्तीच्या आणल्यास तर मिजास दाखवायला लागली की काय आमच्यावर…अन काय ग लगेच करती सवरती झालीस की काय…या चार दमड्यांसाठी बायका ऑफिसर्स बरोबर काय काय करतात हे काय मला माहिती नाही काय…! या हरामाचा पैशात आई-अप्पाना घेऊन जायचं का तुला…?

केतकी – कुमार….तुझ्या डोक्यात एवढी घाण भरलेली असेल असं वाटलंही नव्हतं मला…नीट शुद्धीत राहून बोल जरा…देवाच्या दारात तमाशा करतोय याच तरी भान ठेव…

केतकी देवळाच्या पायरीवर अगदी निश्चल अशी बसून राहिली…डोळ्यात पाणी…अंगात कणकण अशी अवस्था केतकीचे झाली…त्याच क्षणी दोघांमध्येही प्रचंड असा दुरावा निर्माण झाला….कितीही जवळ आलं तरी केतकीच्या मनातला जिव्हाळा आटत गेला….यातच केतकीला परत दिवस गेले आणि जुई नावाची गोड मुलगी झाली…तरीही त्याच्या मनातला गोडवा काही केल्या परतत नव्हता…कुमार आता घरात कमी आणि बँकेमधल्या मित्रांबरोबर जास्त राहू लागला….तरीही केतकीने कुमारला एका शब्दाने जाब विचारला नाही…सिद्धार्थही शाळेत जाऊ लागला होता…आप्पा सिद्धार्थचा अभ्यास घ्यायचे…आई तर जुईमध्ये गुंतून गेल्या होत्या…कुमारला वाटायचं की, ‘ मी अनाथ आणि बेवारशी झालोय ‘ या ताण तणावामध्ये कुमार ड्रिंकही घ्यायला लागला…कुमारने जर वासनेपोटी केतकीला जवळ घेतलं तरी केतकीचा चेहरा कसंनुसा व्हायचा…केतकी कुमारच्या जवळ कमी आणि लांब जास्त राहत होती याचा रागही कुमार केतकीवर काढायचा…’ काय लाईफ आहे…बायको पन जवळ येत नाहीय…हे सुखही मला उपभोगायचं नाही का…स्वतःला काय अप्सरा समजतीय…’ असं म्हणून केतकीला मारझोड होतं होती…यावर केतकीने रागाने कुमारला ‘ घटस्फोट हवाय का…. ‘ असं विचारलं…तेव्हापासूनच आगीची ठिणगी दोघांमध्ये पडली…याच परिस्थितीमध्ये आप्पाना ‘ मॅसिव्ह हर्ट अटॅक ‘ आला डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले पण आप्पा वाचू नाही शकले…काही दिवसातच आप्पा तडकाफडकी गेले…काही वर्षभरातच लावान्याताईही गेल्या….कुमार एकदम खचून गेला होता…त्याही परिस्थितीत केतकी कुमारच्या मागे अगदी खमकेपणाने उभी राहिली…त्याला सावरत होती…आजी-आजोबांवर पोर ठेऊन केतकी बिनघोर राहून ऑफिस करत होती पण आता मुलांना कोण सांभाळणार म्हणून कुमारच्या बँकेमधल्या बाईने एक आया म्हणून संगीता नावाच्या बाईला कामावर मुलं सांभाळण्यासाठी ठेवून घेतलं…

संगीता स्वयंपाक छान करायची पण तेल तूप जास्त लागू लागलं आणि खर्चही वाढला…आपल्या लेकरांपुढे पैशाचं मोल काहीच नाही म्हणून केतकी सगळं घर संगीतावर टाकून निर्धास्तपणे ऑफिस ला जायची…पण काही महिन्यातच जुई खूप अशक्त दिसू लागली…म्हणून केतकीला काळजी वाटू लागली…काही दिवसांनी सिद्धार्थच्या पायावर एक डाग दिसला…शाळेत पडला असेल म्हणून केतकीने दुर्लक्ष केलं पण संगीताचं चित्र काही बरं वाटत नव्हतं…कारण घरात दारू आणि सिगारेटचा वास केतकीला जाणवू लागला याचा छडा केतकीला लावायचाच होता….म्हणून एक दिवस केतकीने सुट्टी घेतली आणि संगीता बद्दल माहिती काढली…शेजारी सरोदे काका होते त्याच्या घरात खास चहा साठी म्हणून केतकी जाऊन बसली…

सरोदे काका – केतकी बाळा…खूप दिवसांपासून बोलायचं होतं म्हणून आज मीच तुझ्या काकूला सांगितलं केतकीला बोलावून घे म्हणून…

केतकी – हो काका…मलाही बोलायचं होतं तुमच्याशी…आप्पा गेले…घर कसं खायला उठलंय…

सरोदे काका – ती बाई ना…चांगली नाहीय…ती आया ठेवलीय ना तुम्ही…ती…

केतकी – कोण…? संगीता….

सरोदे काका – होय…तीच…अगं कुणा बाप्याला घरात घेऊन बसते…तेही तुमच्या बेडरूम मध्ये थेट….

इतक्यात सिद्दार्थ आपल्या आईला शोधात सरोदे काकांच्या घरात जातो…आईला पाहून सिद्धार्थ हसतो…आणि सरोदे काका विचारतात…

सरोदे काका – बाळ…सिद्धू….तुझी ही संगीता काकू तुला काय खायला देते सांग बरं…

सिद्धार्थ – काका….ती काकू खूपदा मला सामोसे…वडापाव असं खायला देते…आणि आई काल तर कुणी तरी महेश काका येतात त्यांच्याबरोबर सिनेमाला गेली होती…मी बोलायला गेलो तर मला मारलं तिने…जुईच्या दुधात पाणी घालते….आपला बॉर्न विटा घरी चोरून घेऊन जाते…अर्ध दूध तर संगीता काकूच पिऊन टाकते…हे बघ माझ्या पायावर डाग आहे ना तर मला तिनेच चटका दिला होता…

हे सगळं ऐकून संतापाने केतकीच्या डोळ्यात पाणी आलं…..अजूनही जुईच्या झोपेचं कारण केतकीला उमगलं नव्हतं…म्हणून डॉक्टरांकडे केतकी जुईला घेऊन गेली…डॉक्टरांनी जे काही सांगितलं त्यावर केतकीचा विश्वासच बसत नव्हता….कारण जुईला रोज दुधामधून अफू दिली जात होती…नंतर दोन दिवसांनी डॉक्टरांनी तपासणीसाठी हॉस्पिटल मध्ये बोलावलं…केतकीने कुमारला फोन लावला आणि हॉस्पिटलमध्ये बोलावून घेतलं… हॉस्पिटलमध्ये कुमार आला त्यावेळी रडत-रडत सगळी हकीकत केतकीने कुमारच्या कानावर घातली…हे सगळं ऐकून कुमारच्या जीवाचा संताप वाढत चालला संगीता आल्यावर मात्र त्या रागाचा स्फोट झाला….संगीतही कुमारचा रुद्रावतार पाहून घाबरली…ती गेल्यावर केतकी दोन्ही मुलांना जवळ घेऊन बसली…देवाला दिवा लावून स्वयंपाक केला…सगळं कसं शांत वाटत होतं…त्याच रात्री केतकीने कुमारला विचारलं…

केतकी – आता काय करायचं रे…

कुमार – मुलांच्या जीवावर बेतलं तरी नोकरी करण्याचं भूत काही तुझ्या मानगुटीवरून उतरत नाही….कसलाही विचार करू नको सरळ राजीनामा देऊन टाक…

यावर केतकी काहीच न बोलता गप्प बसली आणि १५ दिवसांची रजा टाकली…कारण राजीनामा देणं खरंच गरजेचं नव्हतं…कारण मुलांचं भविष्य तिला खुणावत होतं…त्याच दिवसात कुमार काहीसा अस्वस्थ वाटत होता…काळजीने केतकीने कुमारला विचारले…

केतकी – कुमार काय झाली…दहा दिवस झाले मी ऑफिस सोडलंय…तू काहीसा अस्वस्थ दिसतोय…

कुमार – काय करावं काळात नाहीय…बँक बहुदा बंद होतीय की काय….कारण खूप घोटाळे उजेडात येताहेत….आता पस्तिसाव्या वर्षी दुसरी नोकरी….शक्य नाही…

केतकी – तू यात कुठे गुंतलेला नाहीस ना…

कुमार – नाही ग…पण नोकरी गेल्यावर दोन तीन महिने भागेल इतकेच शिल्लक आहे ना…तरी बरं आप्पांची गुंतवणूक आहे म्हणून त्याच व्याज येतंय…त्यांची गुंतवणूक माझ्या बँकेत नाहीय हे नशीब…हा बंगला विकून लहान फ्लॅट घेऊन पैसे गुंतवले तरच शक्य होईल…[ कुमार कष्टाने म्हणाला ]

केतकी – कुमार…[ त्याचा हात हातात घेऊन म्हणाली ] मी जॉब सोडलेला नाहीय…फक्त १५ दिवसांची रजा घेतली होती…

कुमारने नवलाने तिच्याकडे पाहिलं…केतकीमध्ये एक उपजतच शहाणपण आणि संकटात टांगून राहण्याचा चिवटपणा आहे याच भान कुमारला पहिल्यांदाच झालं…कुमारने केतकीला जवळ घेतल आणि म्हणाला..

कुमार – मी आपले रोल चेंज करायला तयार आहे…मुलांची आई होणं जमतंय का ते पाहतो आता मी घरात राहून..

त्यादिवशी अनेक वर्षांनी दोघांनी एका उमाळ्याने एकमेकांना मिठी मारली….केतकीच्या नोकरी करण्यावर आणि कुमारने घरी मुलांबरोबर राहणं एक्सेप्ट केलं या गोष्टीवरून आजूबाजूला,नातेवाईकांत कुचकी बोलणी,ताशेरे ऐकू येत होते….म्हणून गाणी ऐकून ती बोलणी इग्नोर करायचं कुमारने ठरवलं….’ कुछ तो लोग कहेंगे….लोगो का काम है केहेना….’

1 Comment

  • सौ. उषा शिरीष कुलकर्णी.
    Posted Sep 4, 2021 at 11:31 pm

    खुपच छान आणि हृदयस्पर्शी. वाचताना डोळ्यासमोर चित्र उभे राहिले.

    Reply

Leave a Comment

error:

Warning

सध्या युट्युब वर कथा चोरी करून वाचून दाखवण्याचे धंदे चालू आहेत लोकांचे. आमच्या वेबसाईट वरची कथा कुठल्याही युट्युब चॅनेलवर बेकायदेशीररित्या आढळल्यास त्या चॅनेलला लगेच रिपोर्ट करण्यात येईल ह्याची कृपया दक्षता घ्यावी. तसेच आपल्या वाचकांपैकी कुणालाही असे बेकायदेशीर चॅनेल्स आढळल्यास आम्हाला ritbhatmarathi@gmail.com ह्या ई-मेल वर त्वरित कळवावे.