कृष्णा

लक्ष्मीपूजनाची साखर देऊन कृष्णाने सगळ्या मोठ्या व्यक्तींना वाकून मनोभावे नमस्कार केला.दिवसभर त्या भरजरी साड्या, एवढे दागिने घालून कृष्णाला आता जड व्हायला लागलं.हेवी मेकअप मुळे घाम यायला लागला होता.कधी एकदा साडी बदलते असं तिला झालं.तिची ती अस्वस्थता सविताला जाणवली.तिने हळूच कृष्णाला बाजूला घेतलं आणि म्हणाली, “कृष्णा,अग एखादी हलकी साडी घाल हवं तर आणि थोडे दागिने आता काढून ठेवलेस तरी चालतील.तुम्हा मुलींना हल्ली कुठे सवय असते ग साडीची?”
“अहो आई,पण चालेल का बाबांना आणि आजींना?” कृष्णाने हळूच विचारलं.
“चालतं ग,फक्त शालू बदलून दुसरी घाल इतकंच.जा,बदलून ये.”
कृष्णाला अगदी हुश्श झालं.ती पडत्या फळाची आज्ञा घेऊन तिच्या आणि मल्हारच्या खोलीकडे जायला निघाली. इतक्यात आजींच्या खोलीतून तिला बोलणं ऐकू आलं
“मल्हार पुढे अगदीच सामान्य वाटतेय.मल्हार केवढा गोरापान,देखणा. ही सावळीच आहे.”
कृष्णाने ते ऐकलं आणि तिला एकदम रडावं असंच वाटलं.ती सटकन तिथून बाजूला झाली.
खोलीत आल्यावर तिचे डोळे भरलेच.आज माहेर सोडून आलोय आणि आल्या आल्या हे ऐकावं लागलं.तिने डोळे पुसले,चेहरा स्वच्छ धुतला आणि थोडी पावडर,आणि कपाळावर चंद्रकोरीची टिकली लावली.इतक्यात मल्हार खोलीत आला.
“सुंदर,धिस इज माय कृष्णा.किती मेकअप करता तुम्ही मुली लग्नात.खरं रूप झाकल्या जातं सगळं.आता किती गोड दिसतेय.” मल्हार तिच्याकडे बघत म्हणाला.
“मल्हार,तु मला कसं काय पसंत केलंस?मी इतकी सावळी, तु इतका गोरा.”
“आता हे काय नवीन डोक्यात आलं तुझ्या?लग्न ठरल्यावर इतक्या वेळा भेटलो तेव्हा नाही विचारलं?”
“आत्ता सहज मनात आलं. “
“एक राज की बात बताऊ? नवऱ्यापेक्षा बायको नेहमी डावीच असावी म्हणजे संशयाचे भूत डोक्यात शिरत नाही.”मल्हार तिला चिडवत म्हणाला.
“मल्हार” कृष्णाने त्याच्याकडे लटक्या रागाने बघितलं.
“चेष्टा ग.तुझ्या ह्या सावळ्या तजेलदार रंगापुढे गोऱ्या मुली झक मारतील.आणि तुझं नाव किती शोभतं तुला.कृष्णा;सच अ स्वीट नेम.”मल्हार तिच्या जवळ येत म्हणाला.
कृष्णा लाजुन लगेच बाजूला झाली.”बाहेर ये.अजून पाहुणे आहेत घरात.”ती हसत खोलीच्या बाहेर पळाली.मल्हारशी बोलल्यावर तिची कळी परत खुलली.
नव्या संसाराची गोडी दिवसेंदिवस वाढत होती.कृष्णा मल्हारच्या सहवासात खुश होती.मल्हार उत्तम गात होता.त्याचे वडील शास्त्रीय संगीताचे क्लासेस घेत असत.एक शास्त्रीय संगीतातील राग म्हणून त्यांनीच मल्हारचं नाव ठेवलं होतं.वेळ असेल तेव्हा मल्हार देखील त्यांना बैठकीत साथ देत असे.
लग्न ठरल्यावर मल्हारने कृष्णाला एकदा गाणं ऐकवलं आणि ती त्याच्या अजूनच प्रेमात पडली.त्याचा शाळेतल्या मित्रांचा पण एक गृप होता.काही जण तबला वाजवायचे,कोणी गिटार,कुणी बासरी.एक छान संगीत गृप जमला होता.त्यांच्या आनंदासाठी ते अधूनमधून भेटत आणि मैफिल करत असत.
ऑफिसला निघतानाच मल्हारला फोन आला.नंबर सेव्ह केलेला नव्हता.त्याने फोन रिसिव्ह केला.”हॅलो,मल्हार जोशी हिअर.”
“मला माहितीय रे,मी कोण ते ओळख.”पलीकडून एका स्त्रीचा आवाज आला.
मल्हारला आवाज ओळखता येईना.
“कसला तु मित्र रे आणि काय तुझी मैत्री.निकी बोलतेय.”
“माय गॉड, निकी तु? आणि कुठून बोलते आहेस?”
मल्हार इतक्या जोरात ओरडला की कृष्णा त्याच्याकडे बघतच राहिली.
“भारतात आलेय परत परवाच. तुझा नंबर सुवर्णाकडून घेतला.कधी भेटतोस? मला खूप घाई झालीय तुम्हा सर्वांना भेटायची.”
“तु माझ्या घरी ये आधी,मग ठरवू.”मल्हार म्हणाला.
मल्हारच्या चेहऱ्यावरचा आनंद लपत नव्हता.कृष्णाने विचारायच्या आधीच त्याने सांगितलं.
“कृष्णा,निकी; निकिता माझी स्कुलमेटअमेरिकेहून भारतात परत आलीय.
.अतिशय सुंदर गाते.शाळेत गॅदरिंग मधे आमचं दोघांचं डुऐट असायचेच. किती वन्स मोर अग. नाऊ शी विल जॉईन अवर मुजिकल गृप.मजा येईल.मी तिला घरी बोलावलं आहे.तुला कळवतो कधी ते.निघतो मी.” मल्हारने बॅग घेतली आणि ऑफिसला गेला.
कृष्णाच्या डोक्यात विचार सुरू झाले.कोण असेल ही निकिता?तिचा आवाज ऐकून मल्हार इतका उल्हसित झाला.तिने सविताला विचारलंच,
“आई,ही निकिता कोण हो?मल्हारला तिचा फोन आला होता.”
“निकिताचा फोन? यु एस वरून आला होता का?”
सविताने विचारलं.
“नाही,ती भारतात आलीय.”
“ती पहिलीपासून बारावीपर्यंत मल्हारच्याच क्लास मधे होती.अतिशय सुंदर आवाज.मल्हार आणि ती,दोघेही शाळेच गॅदरिंग गाजवायचे.मला तर वाटायचं दोघे लग्न करतात का,इतके सतत एकत्र असायचे.पण तसं काही झालं नाही.बारावीनंतर ती इंजिनीरिंगला गेली,मग अमेरिकेत एम एस आणि मग तिथल्याच तिच्या कलीगशी लग्न केलं.तो मुंबईचा आहे.”
“मल्हारने तिला घरी बोलावलं आहे आई.”
“कधी येतेय?ती म्हणजे एक वादळ आहे.कधीही येऊन धडकेल.”सविता हसत म्हणाली.
दोन दिवसांनी एका रविवारी निकिता घरी आली. तिला बघुन कृष्णाचे डोळे विस्फारले.अतिशय देखणी.गोरापान केतकी वर्ण,उंच बांधा, सरळ मऊ लांब केस.ती कितीतरी वेळ तिच्याकडे बघतच बसली.
“हाय कृष्णा,मी निकिता.मी मल्हारची खूप जवळची मैत्रीण.मल्हार बोललाच असेल न ग तुला.”निकिता म्हणाली.
कृष्णाच्या मनात आलं,हे मल्हारने कधीच मला सांगितलं नाही.”हो हो,सांगितलं की” तिने वेळ मारून नेली.
“निकिता, तुझ्यात काही फरक नाही बघ.आता जेवूनच जा.आज काकांच्या पण क्लासला सुट्टी आहे.
सविता म्हणाली.
“येस निकी,आता जेवूनच जा.”मल्हारने लगेच री ओढली.
टेबलवर जेवताना निकिताने कृष्णाला विचारलं,
“तु काय करतेस?कुठे जॉब करतेस?”
कृष्णा काही बोलायच्या आतच सविता म्हणाली,
“प्रत्येकीने नोकरी केलीच पाहिजे असं आहे का?ती छान घर सांभाळतेय.माझी जबाबदारी कमी झाली.”
“आणि गाते का ग?तुझा नवरा,तुझे सासरे इतके सुंदर गाणारे आहेत.”निकिताने विचारलं.
“ती गात नाही निकिता,पण तिने मल्हारचं आयुष्य सुरेल केलंय.”अश्विनने कृष्णाची बाजू घेतली.
सासू, सासरे दोघांनीही कृष्णाला जे सांभाळून घेतलं त्यामुळे कृष्णाचं मन कृतज्ञतेने भरून आलं.
“तु सांग निकिता,भारतात कायमची परत आलीस का?का परत जाणार आहेस?”अश्विनने विचारलं.
“नाही काका,आता इथेच पुण्यात सेटल होणार.माझ्या नवऱ्याला इथली एक चांगली ऑफर आलीय.शिवाय सासू,सासरे इथेच.आमचा प्रभात रोडला बंगला आहे.मी जॉब बघतेय.”
“गुड,मेरा भारत महान.यु कॅरी ऑन. मला जरा एक फोन येणार आहे.”अश्विन टेबलवरून उठले.
मल्हार तर जुन्या आठवणीत इतका रमला होता की त्याला कसलेच भान नव्हते.
“निकी,तु आमचा मुजिकल गृप जॉईन कर.मजा येईल परत डुएट गायला.”
“मी उद्याच येते.सध्या जॉब मिळेपर्यंत मी मोकळीच आहे.लेट अस प्लॅन अ मैफिल.”निकिता म्हणाली.
निकिता आणि मल्हार आता गाण्याच्या निमित्ताने रोजच भेटू लागले.त्यांच्या गृपने एका इव्हेंटसाठी कार्यक्रम करायचं ठरवलं होतं.त्यामुळे त्याची प्रॅक्टिस रात्रीच होत असे.दिवसभर कुणाला वेळ मिळत नव्हता.
मल्हारचं कृष्णाशी वागणं अगदी नॉर्मल,नेहमीसारखं होतं पण निकिताला बघितल्यापासून कृष्णाला न्यूनगंडाने पछाडलं.मल्हारला निकिताशी लग्न करायचं होतं का?आपल्याशी केलेलं लग्न ही तडजोड तर नाही ना,असे विचार डोक्यात यायला लागले.
मैफिलीचा दिवस उजाडला.कृष्णाला जायची इच्छाच होत नव्हती पण सविता,अश्विन देखील कार्यक्रमाला जाणार होते त्यामुळे तिलाही जाणं भाग पडलं.
मैफिलीची सुरवातच निकिताच्या गाण्याने झाली.’तुज मागतो मी आता,मज द्यावे एकदंता’ ह्या गाण्याने सुरवात करून तिच्या आवाजाने तिने सगळ्यांना मंत्रमुग्ध केले.
निकिता आणि मल्हार स्टेजवर डुएट गायला आले आणि कृष्णाला उगाचच धडधडायला लागलं.
” तेरे हुस्न की क्या तारीफ करू…”
हे द्वंद्वगीत दोघांनी गायलं आणि टाळ्यांचा कडकडाट झाला.कृष्णाला आता दाटून आल्यासारखं झालं.ती ह्या सगळ्यात उपरी आहे असं वाटायला लागलं.
इतक्यात मल्हारने अनाउन्स केलं “आता मी जे गाणं म्हणणार आहे ते माझी प्रिय पत्नी कृष्णा हिच्यासाठी.कृष्णा,हे गाणं खास तुझ्यासाठी.”
कृष्णाने चमकून मल्हारकडे बघितलं.तिला हे सगळं अनपेक्षित होतं. मल्हारने रफीचे गाणे गायला सुरवात केली..
‘कही एक मासुम,नाजूकसी लडकी..
बहोत खूबसुरत मगर सावली सी..’
कृष्णाचे डोळे आता भरून यायला लागले.तिने मल्हारकडे बघितलं.त्याच्या डोळ्यातली प्रीत तिला बरंच काही सांगून गेली,आणि ती तशीच लाजली..जशी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लाजली होती….
©️®️सौ मधुर कुलकर्णी, पुणे
==============
प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.
https://www.facebook.com/ritbhatmarati/
तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.
ritbhatmarathi@gmail.com
फोटो साभार – गूगल
आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही
=============