Ritbhatmarathi

Search
Close this search box.

कौन तुझे यूँ प्यार करेगा..(भाग पहिला)

–सो.गीता गजानन गरुड

“सारखी काय गं बघत राहतेस त्याच्याकडे?”

“कस्सला दिसतो यार..असं वाटतं..असं..”

“ए विदुला, आता बास कर हं. ऐला इथे इकनॉमिक्स वाचून डोकं झंझाळायची वेळ आली. फॉरिन इनव्हेस्टमेंट पॉलिशिज, इंशुरन्स इंडस्ट्री, एग्रिकल्चर प्रायसिंग, एग्रिकल्चर फायनान्स,मार्केटिंग अँड पॉलिसीज,मनी मार्केट,क्यापिटल मार्केट..अँड मेनी मोर ..डोक्याला शॉट नुसता.”

“परिमल, तू पण ना उगाच टेंशन घेतेस. दोनचारदा वाचायचं न् आपल्या शब्दांत लिहायचं, झालं.”

“हो कळलं, तुझं ज्ञान. तुला येतं ते तुझ्या शब्दांत लिहिता वगैरे..ह्युमन रिसोर्सच्या पेपरमधे इको नि इकोमधे ह्युमन रिसोर्सचं लिहून आलीस तरी खुदा मेहरबान तो गधा पेहलवान या उक्तीनुसार तुला मार्क्स मिळतात. माझं सालं नशीब म्हणजे नं..

“”चिल यार,परी तो बघ ना तोंडात पेंसिल धरुन कसा विचार करतोय. कुठे बघत असेल नं ? माझ्याकडे तर नै ना? हाय मैं मर जाँवा.”

“उठ मेले उठ इथून. एक करता दोन करुन बसशील. आधीच ती लायब्ररीयन डुख धरुन हाये आपल्यावर..पिन ड्रॉप सायलेंस म्हणे. स्वत:चा आणा पडलाय तो शोध म्हणावं.”

“अगं पण परी, डावीकडची मिशी थोडी मोठी वाटते नं..धनंजयची..”

“हद्द झाली बाई तुझ्यापुढे. चरण दाखव तुझे डोकं टेकते आता. मला पाठांतर करुदे.”

“ए तो तो धना..उठला गं..तो बघ..तो कँटीनच्या दिशेने निघाला. ए चल चल हे गुंडाळ सगळ्या नोट्सबिट्स. बघू तरी काय आवडतं माझ्या धनाला.”

“अगं ए  पोरी..थांब थांब जरा.”

परी व विदुला म्हणजे विदुला आधी आणि तिच्या पाठोपाठ पर्समधे नोट्स कोंबत चालणारी परी..कँटीनकडे वळाल्या.

“काय बरं घेतलं धनाने? हे काय..डबा खातोय हा भाजीपोळीचा..नि हा एक वडा मागवलान बघ.”

“वेटर, दोन समोसा.”

“ए नाही हं परी, आज आपणपण वडाच खायचा.”

“अगं ए  विदु,वडा आवडत नाही नं तुला.”

विदुला तळहातांत चेहरा लपवत..”आता आवडतो.”

“कठीणै”..इतका वेळ या दोघींच संभाषण ऐकणारा नेहमीचा वेटर पुटपुटला.

“काय बोललास?”

“काय नाय..दोन वडे घेऊन येतो”, वेटर हसतहसत निघून गेला.

विदुला विचार करत होती..याच्याशी मैत्री कशी करता येईल! याच्या तर तोंडावरची माशीदेखील हलत नाही. सदानकदा पुस्तकात डोकं खुपसून बसलेला.

“अगं ए विदू कुठं चाललीस?”

“परे,तू थांब गं जरा.”

विदुला धनंजयच्यासमोर जाऊन बसली.

“धना..”

धनंजय दचकला. मधेच घरच्यांसारखी हाक कुणी मारली. वरती नजर केली तर समोर आपली पांढरीशुभ्र दंतकांती दाखवत, हातात रजिस्टर घेऊन सिल्की केसांची, बोलक्या डोळ्यांची, देखणी मुलगी.

“धनंजय..हे बघ ना रे ब्यालंस शीट ट्यालीच होत नाहीए. तूच बघ जरा.”

धनंजयने एकवार सोल्युशनवर नजर फिरवली. प्रोब्लेमवर नजर फिरवली.

” एसेट साईडला प्रीपेड रेंट 3100 च्या ऐवजी 1300 लिहिलयस. ते नीट कर..”

“ओ थँक्यू धना..आय मीन धनंजय..थँक्यू वन्स अगेन.”

तिने त्याला हस्तांदोलन करण्यासाठी हात पुढे केला..पण तो माय प्लेजर म्हणत ओठांच्या कोपऱ्यातून किंचीत हसला. त्याचं तेवढंसं हसूही तिच्या मनात चांदणं फुलवून गेलं.

तिने डेरा जमवला त्याच्यासमोर. त्याला आपली फेमिली हीस्ट्री सांगितली..मावशी,आज्जी,काकू,काका,वडील..सगळी हुश्शार,बुद्धिवादी माणसं..त्या हुशारांच्या मेळ्यात हीच कशी मध्यबुद्धीची ते सांगून खळाखळा हसली.

हसताना तिच्या डोळ्यातनं पाणी आलं. धनंजयने त्याचा रुमाल नकळत पुढे केला. तिने आसवं पुसली,नाकातनं गळालेला थेंब पुसला न् रुमाल धुवून परत करते म्हणाली.

“कसली याडशाप मुलगी आहे!” धनंजय मनातच म्हणाला.

पुढचे दोनेक दिवस धना दिसला नाही. विदुलाची व्याकुळ नजर धनाला लायब्ररीत, बसस्टॉपवर,मैदानात शोधत होती पण छे! तो आलाच नव्हता. परीक्षेच्या दिवशी मात्र पेपर सुरु व्हायला व्हायला आला.

विदुलाने त्याला हाय केलं,पण त्याचं लक्षच नव्हतं.

धनाने खिशातनं पेन काढलं, पेपर घेतला नि लिखाण सुरु केलं. डोकं फक्त सरांना हजेरीच्या कागदावर सही देण्यासाठी उचललं होतं.

“काय समजतो स्वतःला. किती आखडतो! मी एवढं स्माइल दिलं..हाय केलं..याने भावच नाय दिला यार..विदे पास झालीस की असले छप्पन मिळतील. समोर पेपर पडलाय नि कसला त्या धनाचा विचार करत बसलैस.  चल हात चालव पटापट.”

“विदुला, स्टँडअप. तू कोणाशी कुजबुजतेस मघापासनं?’

“सॉरी म्याम, थोडं लो फील होत होतं म्हणून स्वतःला बकअप करत होते.”

“आता बकबक बंद..मुकाट्याने पेपर लिही. गाइज, ओनली थर्टी मिनिट्स लेफ्ट. हरी अप.,”

“ओ शट..शट..ही सुकडीपण ना. उगाच माझा वेळ घालवलान..असो..चलता है..आता फास्ट लिहिते.”

विदुला पेपर देईस्तोवर धनंजय केंव्हाचा निघून गेला होता. दुसऱ्या दिवशीच्या पेपरसंबंधी श्रावणीचं नि तिचं डिस्कशन चाललं होतं. “नेक्स्ट पेपर..एक्स्पोर्ट..क्वाइट लेंदी सिल्याबस बट समझ लिया तो हो जायेगा.”

“तुझं बरंय विदू, समझ लिया तो हो जातय. मला इकडे रट्टा मारावा लागतोय.”

“ए परी तू नं तू..तुझं लग्न होईल नं तेंव्हा हनिमुनचं पुस्तक आधी विकत घेशील न् त्याचाही रट्टा मारशील.”

“हो मग मारणारच मी रट्टा,” परी नकळत असं म्हणाली नं काही क्षणात..”तुझी तर्र ना. नुसती मस्करी सुचते तुला.” म्हणत तिने विदुलेच्या पाठीवर रट्टे दिले.

“तो धनंजय, किती लेट येतो हल्ली..आला की मुंडी पेपरात..कसं पटवायचं त्याला?”

“त्याच्यासारखे मार्क्स मिळव,तुझ्यासाठी कठीण नाही ते विदु. मग बघ आपणच तुझ्यामागून फिरेल.”

“छे! मला तशांतला वाटत नाही तो..अवलिया वाटतो..अभ्यास करताना मधेच कुठेतरी तंद्री लावून बघत रहातो न् डोळ्यात आभाळ भरुन येतं ते कुणाला दिसू नये म्हणून शर्टाच्या बाहीने पुसण्याचा प्रयत्न..”

“बाई गं! किती निरीक्षण केलयस त्याचं.”

“मग..काय तर. ते गाणं आहे ना यार..

तू आता है सीने में
जब जब सांसें भरती हूँ
तेरे दिल की गलियों से
मैं हर रोज़ गुज़रती हूँ

हवा के जैसे चलता है
तू मैं रेत जैसे उडती हूँ
कौन तुझे यूँ प्यार करेगा
जैसे मैं करती हूँ हो हो..

मेरी नज़र का सफ़र
तुझपे ही आके रुके
कहने को बाक़ी है क्या
कहना था जो कह चुके
मेरी निगाहें हैं तेरी निगाहों पे
तुझे ख़बर क्या बेखबर

मैं तुझसे ही छुप छुप कर
तेरी आँखें पढ़ती हूँ
कौन तुझे यूँ प्यार करेगा….

या गाण्याची पारायणं करते मी. अशीच माझी मनोवस्था झालीय गं परी.

“विदुला,तू तो पुरी आशिक बन गयी यार।” परी म्हणाली.

चौथ्या दिवशी एक नवीन सर सुपरविजनसाठी आले होते. मुलांना त्यांनी प्रश्नपत्रिका,उत्तरपत्रिका वाटल्या. नि सुपरविझन करु लागले. सगळीजणं पेपर सोडवण्यात मग्न होती.

शेवटची पंधरा मिनटं उरली होती.

पाठीमागच्या शौनकने एक फुल्स्केप पेपर धनंजयच्या बेंचखाली सरकवला. सर त्यांच्या रो मधनं फिरत असताना त्यांनी धनंजयच्या बेंचखाली कागद फडफडताना पाहिला. त्यांनी तो उचलला. महत्त्वाचे प्रश्न व त्यांच्या उत्तरांचे पॉइंट्स लिहिलेले होते.

“हे काय आहे?”

“सर सर,मला माहित नाही सर.”धनंजय घाबरत म्हणाला.

” बघू अक्षर बघू. हे तर तुझंच अक्षर दिसतय आणि तुला ठाऊक नाही सांगतोस. कॉपी करतोस! चल प्रिन्सिपलकडे.”

पुरा वर्ग थरथरला. धनंजय असं करणं शक्यच नाही,प्रत्येकाला ठाऊक होतं, मग ती कॉपी कोणाची? जाऊदे नं आपल्याला काय करायचय म्हणत अर्ध्यांनी मान पेपरात घातली. काहीजणं पुढे काय होणार याकडे नजर लावून बसले तर काही तोंडावर हात धरुन.. गेला बाराच्या भावात म्हणत हसत होते.

शौनक, अगदी गपगुमान पेपर लिहित असल्याची एक्टिंग करत होता. तितक्यात शौनकचा कान मागून कुणी जोरात पिरगाळला. शौनक कळवळला. ती दुसरी तिसरी कुणी नसून विदुलाच होती.

“हे काय चाललय? गो टू युवर बेंच..” सर विदुलावर ओरडले.

“सॉरी सर म्हणत तिने आपली हाय हिल शौनकच्या क्यानवास शूजवर जोरात टेकवली.”

“हा वार जबरी होता. शौनकने तोंड उघडलं. सर..सर तो नोट्सचा पेपर धनंजयचाच आहे पण त्याने तो मला दिला होता..मीच त्याला म्हणालो होतो. दोन दिवसात जमतील असे काही महत्त्वाचे प्रश्न नि पॉइंट्स दे.”

“सरांनी साटकन शौनकच्या कानाखाली खेचली.”

“गुड गर्ल. आज हिच्यामुळे वाचलास तू. नुसता अभ्यास येऊन उपयोग नाही. आपला खरेपणा सिद्ध करता आला पाहिजे.”सर धनाला म्हणाले.

“हो सर,” म्हणत डोळे पुसून धनंजय बेंचवर बसला.

क्लास सुटल्यावर आज तो बाहेरच घुटमळला. त्याला विदुलास थँक्यू म्हणायचं होतं.

विदुला परीसोबत बोलत बाहेर आली.

“थँक्यू. थँक्यू व्हेरी मच..मिस.” धनंजय चाचरत.. कसाबसा धीर एकवटून म्हणाला।

“विदुला.. माझं नाव विदुला आहे. हे असं कोरडं थँक्यू नको मला. काहीतरी खाऊ चल.”

“ते मी पैसे. उद्या आणतो. तुम्ही दोघी जाऊन खा काय ते उद्या.”

“ए ढक्कन. आता येतोयस तू माझ्यासोबत. मला लस्सी प्यायचीय.”

“इथे कुठे मिळते लस्सी..ते गोवर्धन शॉप तर पार नदीजवळ आहे.”

“हो तिथच जायचंय. चल.”

विदुला धनंजयचा हात हातात घेऊन चालू लागली. परिमलला तिने डोळ्यांनीच बाय केलं.

“चल बस बरं मागे,” विदुला असं म्हणताच धनंजय गांगरला.

“मी तुझ्यासोबत स्कुटीवरनं फिरलो तर मुलं काय म्हणतील? नको नको. आपण ट्याक्सी करु चल.”

“ए भेंडी, बस ना आता. काय भाव खातो रे.”

शेवटी हो ना करत धनंजय विदुलाच्या स्कुटीवर बसला. सुरक्षित अंतर म्हणून मधे स्याक ठेवली होती.

तिथे लस्सीवाल्याकडे भैया मोठ्या पातेल्यात दूध घेऊन हाटत होता.

“मलईवाली दो लस्सी भैयाजी.”

“अरे बिटिया. लाता हूँ लस्सी.”

लस्सी पिताना धनंजयच्या मिशीला थोडी लागलीच. विदुला त्याचं ते सोंग पाहून हसली. तिने पर्समधला छोटा आरसा काढून त्याच्यासमोर धरला तसं स्वत:चं गमतीशीर प्रतिबिंब पाहून धनाही हसला. तिने तिच्या रुमालाने त्याच्या ओठांवर लागलेली लस्सी पुसली तसा तो चक्क लाजला.

“लाजतोस कसला..ड्याशिंग रहायचं बघ. आपल्यावर अन्याय झाला तर विरोध करायची हिंमत पाहिजे आपल्यात. धना, असा बुजरा नको रे राहूस? धनंजय आता खुलू लागला. हळूहळू स्वत:भोवतालचे कोष काढून टाकून,अभ्यास थोडा बाजूला ठेवून विदुलासोबत फिरु लागला. कधीकधी तिच्यासोबत आर्ट एक्झिबिशन्स तर कधी सहज म्हणून लांबवर फिरायला जाऊ लागला.

मित्रांमधे कुजबुज वाढली. बहुतेक फायनल एक्झाम होताच लग्न उरकून घेतील..नऊ महिन्यात बारसं..

पोरं एवढा पुढचा विचार करतील..धनंजयला खरंच वाटलं नव्हतं पण या गॉसिप्सने तो भानावर आला. त्याचे वडील जाऊन नुकतेच सहा महिने झाले होते. घरी समजलं तर आई काय म्हणेल.. तो विदुलाला अक्षरश: टाळू लागला.

विदुला,परीमल कॉलेजला जायच्यायायच्या त्या गेटन जायचा बंद झाला. खरंतर धनालाही मनापासून आवडू लागली होती विदुला. विदुलाची बेधडक व्रुत्ती,तिचं दिलखुलास हसू, तिचं मैत्रत्व..सारंच भूल घालत होतं धनाला पण तो दु:खात होता..

त्याची आई अजून सावरली नव्हती..अशावेळी प्रेमात पडणं, आईसमोर प्रेमाची कबुली देणं वगैरे त्याच्या मनाला पटत नव्हतं..

मित्रांमधे आपल्या प्रेमाची अशी चर्चा होणंही त्या अभ्यासू मुलाला मान्य नव्हतं.

क्रमश:

–सो.गीता गजानन गरुड.

काय होणार धनंजय व विदुलाचं पुढे. दोघांची प्रीत बहरेल का अजून काही..नक्की भेटुया अंतिम भागात.

========================

प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून लेखकांना प्रेरणा मिळेल.

https://www.facebook.com/ritbhatmarati/

तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही.

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *