Skip to content Skip to sidebar Skip to footer

कोकणातल्या बाप्पाची मूर्ती पहा का असते इतकी सुबक आणि आकर्षक

गणपतीची माटी, गणपतीची भिंत, चिकणमातीचे गणपती नैसर्गिक सजावट, भजन,फुगड्या, कसा साजरा करतात कोकणात गणेशोत्सव ?

हल्ली इको फ्रेंडली गणपती व सजावटीसाठी जे आवाहन करावं लागतय ते पुर्वी करावं लागत नव्हतं. विशेषतः आमच्या कोकणातल्या माणसाची नाळ ही निसर्गाशी जोडली गेली आहे.

हा कोकणी माणूस तुम्हाला इथल्या जमिनीसारखाच काटक, लालसावळा दिसेल. त्याचं रुपही इथल्या मातीशी एकरूप झालंय. कोकणातला महत्त्वाचा सण म्हणजे चवथ..म्हणजेच गणेश चतुर्थी. हा गणपती बाप्पा येण्यासाठी नागपंचमीआधीच गणपतीच्या शाळेत पाट पोहोचते केले असतात.

गणपतीची मुर्ती, तिची बैठक, आसन, मुकुट या सर्वावर घरातील मंडळींची अगदी उत्साहात चर्चा होते आणि कशी मुर्ती हवी ते मुर्तीकाराला सांगितले जाते.

मुर्तीकारही नदीकाठची चिकणमाती आणून ठेवतात व तिच्या साहाय्याने कुशल हातांतून बाप्पा साकार होऊ लागतो. मुर्तीकार हे काम करताना आपली तहान, भूक विसरून जातो. साक्षात विद्येच्या देवतेची निर्मितीच त्याच्या हातून घडत असते. केवढे थोर भाग्य! गणपतीचे डोळे रेखाटण्यासाठी कसबी हातच लागतो. मुर्तीकार या डोळ्यांत अक्षरश: जीव आणतात. गणपती घरी आला की कोणत्याही कोनात उभे राहून गणपतीकडे पहा. तो बाप्पा आपल्याकडेच बघत असल्याचा भास होतो.

गणपतीसाठी पुण्या,मुंबईस रहात असलेले चाकरमानी प्रचंड गर्दीतून प्रवास करत सहकुटुंब येतात. गणपतीची मुर्ती आणण्याआधी घराला रंग काढला जातो. मातीची घरे होती तेंव्हा भिंतीना लाल कावेने रंगवले जायचे व जमीन शेणाने सारवून त्यांवर बोटांनी गंधनक्षी काढली जायची.
आता घरे चिरेबंदी, भिंती सिमेंटच्या झाली. जमिनीच्या जागी कोबा, फरश्या आल्या त्यामुळे सारवण आठवणींत गेले नि रंगकाम आले. वेगवेगळे रंग आणून भिंती रंगवल्या जातात. फरश्या धुतल्या जातात.

गणपतीची भिंत म्हणजे गणपतीच्या आसनामागची भिंत. या भिंतीला नवीन रंग दिल्यानंतर कुशल चित्रकाराकडून भिंतीवर एखादा देखावा, कमळाचे फुल काढून घेतले जाते, त्यात रंग भरले जातात. हल्ली रंगीत टाईल्स लावतात.

बांधून ठेवलेलं पुजेचं साहित्य बाहेर येतं. कोकमं, पितांबरी, रखा असं सारं वापरून समया, ताम्हण, परड्या यांवर बाईचा मायेचा हात फिरतो नि देवपुजेची भांडी लख्ख लख्ख होतात. नेहमीच्या पुजेची देवघरातली भांडीही लख्ख केली जातात.

गणपतीच्या आजुबाजूला झिरमिरीत पडदे लावतात. टिमटिमत्या दिव्यांची रोषणाई(लायटींग) करतात. पहल्ली रेडीमेड कापडी छत मिळते ते छताला लावतात किंवा लाल, हिरव्या, पिवळ्या कागदांच्या पताका लावतात. घरातली लहानथोर मंडळी मिळून हे पताका लावण्याचे काम करतात. गोंदही गव्हाच्या पिठापासनं घरीच बनवली जाते.

शक्यतोवर थर्माकोल वगैरे पर्यावरणाचा र्हास करणाऱ्या वस्तूंचा वापर सजावटीत करत नाहीत. गणपतीची मुर्ती आदल्यादिवशी आणली जाते. त्यासाठी घरातला झिलगा पाट,नारळ व बोलीचे पैसे घेऊन गणपती शाळेत जातो. त्याच्यासोबत घरातली बच्चेमंडळी असतात. गणपतीची मुर्ती पाटावर ठेवून तो पाट डोईवर घेतात व हिरव्यागार सळसळत्या शेतातनं गणपतीबाप्पा मोरया म्हणत झांजा वाजवीत ही मुर्ती आणली जाते.

ही हिरवीगार पीकं शेतकऱ्याच्या मिरगभर केलेल्या श्रमाचे प्रतिक . शेतकऱ्याचं हिरवं सोनं, त्यात आता प्रत्येक दाण्यात दूध उतरलेलं असतं. शेतकऱ्याचं हे वैभव पहाण्यासाठीच जणू बाप्पा त्याच्या आजोळी आला असतो. हो बाप्पाचं आजोळच हे. पार्वती माहेरवाशीण नाही का! आणि शंकरोबा जावईबापू या अर्थाने गणपती झाला नातू. हा नातू आपल्या आईला निरोप देऊन इकडे भुईवर येतो. आईवडीलही येतात हो मागाहून.

मुर्ती घेऊन खळ्यात आले की ज्याच्या डोईवर मुर्ती आहे त्याच्या पायांवर पाणी घातले जाते व मुर्ती एका खोलीत ठेवून देतात.

हरितालिकेच्या आदल्यादिवशी आवारणे असते. माशाचा सार, भाकरी खाऊन महिला डोकीवरनं न्हातात मग येतो पुऱ्या दिवसाचा उपवास. शंकर पती लाभावा याकरता पार्वतीने वनात जाऊन शंकराची आराधना केली होती तेंव्हा तिच्यासोबत तिची सखी होती. पार्वती व तिच्या सखीला मुर्तीरुपात आणून त्यांची पुजा करतात. दिवसभर हरितालिकेचा उपवास करतात.

दुसऱ्या दिवशी पहाटे उठून एकेकाची न्हाणी आवरतात. कोणाला फुलं, दुर्वा काढायला धाडतात. कुणी कुमारिका गणपतीच्या बैठकीपुढे रांगोळीची वेलबुट्टी रेखाटते. गणपतीला त्याच्या  आसनावर आणून अलगद बसवले जाते.

गौरी गणपती सणाविषयी संपूर्ण माहिती

जाणून घ्या हरतालिका व्रत कुणी व कसे करावे?

गणपतीच्या आसनावरती असते माटी/माटोवी. या माटीची सजावट आदल्यादिवशी करतात. गणपतीत सडे विविध रानफुलांनी बहरलेले असतात. या रानफुलांचा, फळांचा उपयोगच माटी सजविण्याकरता करतात.
माटी ही पुर्वी वेताच्या मानग्यांची बनवत. आता ती उत्तम प्रतीच्या सागाच्या फळ्या उभ्या, आडव्या रचून बनवतात. ही चौरसाकार किंवा आयताकार अशी असते. माटीला पुसून रंग दिला जातो. ती जाड दोरांनी छताला बांधली जाते.
रानफुलांचे गुच्छ व रानफळांचे घोस केणग्याच्या दोरांनी बांधून तयार ठेवतात.
माटीला प्रथम लावतात आंब्याचा टाळ
६.१ आंब्याचा टाळ: शुभकार्यात आंब्याच्या टाळाला मान असतो. आंब्याचा टाळ हा माटीच्या मधोमध बांधतात.

६.२ तेरडा: श्रावणातल्या पुष्पवैभवातील मानाचा तेरडा. चालचुटूक, गडदजांभळा, श्वेत अशा रंगांत सड्यांवर तेरडा जणू रंगांची उधळण करत असतो. याच रंगीत तेरड्यांच्या जुड्या केणग्याच्या दोरांनी करून ह्या जुड्या माटीला केणग्याच्या दोरानेच दोनचार ठिकाणी अडकवतात.

६.३ हरणाची फुलं: हरीण जसं वनात चौखूर उधळतं तसा हा हरणा श्रावणात मळ्यावर चौखूर उधळलेला असतो. हिरव्यापोपटी गालिचावर कुणी हळदीची मुठ सांडावी असं ते विलोभनीय द्रुश्य या काळात कोकणरेल्वेने प्रवास केलात तर हमखास नजरेत भरेल नि डोळ्यांचे पारणे फिटेल. या हरणांच्या जुड्या माटीला ठिकठिकाणी बांधतात.

६.४ कांगलं: कांगलाच्या वेलीला बारीकशी द्राक्षाच्या घोसांसारखी हिरवटपिवळी कांगलं धरतात. हे घोस आणून माटीच्या कडांकडच्या चौकटीला बांधतात.

६.५ शिप्टा: शिप्टा म्हणजे सुपारीची हिरवी फळं. हीदेखील माटीला बांधतात.

६.६ उतरलेला नारळ: माटीला जो नारळ बांधतात तो खास माडावर चढून उतरला जातो. तोच असोला नारळ/अडसाळ माटीला बांधला जातो.

६.७ कवंडाळं: कवंडाळाची वेल असते. याची केशरी फळे लिंबापेक्षा आकाराने जरा मोठी असतात. ती माटीला बांधतात. मधेमधे फिरणाऱ्या लहान मुलांना कौतुकाने कवंडाळं म्हणतात.

६.८ ऐन/हासन: ऐनाच्या झाडाची फळंही माटीला बांधतात.

६.९ वाघनखी: या वनस्पतीची लाल पिवळी सुरेख फुले माटीला बांधतात.

६.१० नागकुड्याची फळे: नागकुड्याची पिवळसर केशरी फुले माटीला बांधतात.

६.११ शेरवड: शेरवडाची पुढची पानं सफेद रंगाची असल्याने कुणी याला सशाचे कानही म्हणतात. या शेरवडाच्या जुड्या मातीला बांधतात.

६.१२ तसेच परसवात वेलीवर धरलेली हिरवीगार तवसी, बाजारातून आणलेली संत्री, सफरचंदही माटीस बांधतात. काही ठिकाणी सावंतवाडीतील प्रसिद्ध लाकडी फळं माटीस बांधतात. माटीच्या चारी बाजूला रंगीत ,नक्षीदार अशी महिरप लावतात.

अशाप्रकारे या चवथीच्या सणाला प्रत्येक घरातली मंडळी एकत्र येतातच शिवाय आपल्या भोवतालच्या पानाफुलाफळारुपातल्या निसर्गदेवतेलाही घरात आगत्याने घेऊन येतात.

हे खरे इको फ्रेण्डली सुशोभीकरण जे आपले पुर्वज करत आले होते आणि तो वसा आजही कोकणकर करत आहेत. अगदी गौरीही विहिरीजवळील हळद,तेरडा,आघाडा,तुळस,लालमाठ यांच्या रोपांना व सात खड्यांना कलशात घालून, हळदकुंकू वाहून, पुजा करून आणल्या जातात. गणपतीच्या बाजूस गौरी व गौरीच्या बाजूस शंकर बसवतात तोही असोल्या नारळाच्या रुपात. कोठेच कसला तामझाम नसतो.

उदाधुपाचा दरवळ, बालगोपाळांसाठी छोटेमोठे फटाके तेही पाऊस नसला तर वाजवतात. स्वैंपाकघरात घरच्या लाल तांदळाच्या पीठाची उकड काढून गप्पा मारत मोदकाच्या कळ्या काढणे चालू असते. सरावलेले हात सुबक मोदक घडवत असतात, नि छोटी मंडळी निरिक्षणातून, प्रात्यक्षिक करून शिकत असतात. या सुगरणींचा हरितालिकेचा उपवास गणपतीला फुल घातल्यानंतर सुटतो. एवढा उपवास करूनही शीण जाणवत नाही कारण लाडका बाप्पा घरी आलेला असतो.
ही चवथ म्हणजेच कोकणातली दिवाळी असते. कोकणात फटाके गणेशचतुर्थीला वाजवतात. चण्याच्या पीठाच्या करंज्या, लाडू करतात.

मोदक,न्हेवऱ्या, लाडू..असे एकूण पाच प्रकार उकडीच्या पीठात सारण घालून बनवतात नि घरामागल्या हळदीच्या बेटातली हळदीची पानं काढून मोदकपात्रात ठेवली जातात. चुलीवर हे मोदकपात्र चढवले जाते. या मोदकांच्या पीठाची चव औरच कारण ते घरचं पीठ असतं, शिवाय हळदीच्या पानांचा घमघमाट मोदकांत उतरतो.

भटजीकाका आले की गणेशाची प्राणप्रतिष्ठापना केली जाते. जल्लोषात आरती झाली की
गणपतीसाठी केळीच्या पानावर नैवेद्य वाढतात.
तुळसीचे पान, गाईचे पान, घरच्या देवाचे पान वाडी, अग्निदेवतेचे पान व पित्रुदेवतेचे पान वाढले जाते.
यादिवशी अळूच्या गाठींना मान असतो. पाच भाज्या(अळूच्या गाठी ,लाल माठाची मुळं व उकडलेले काळे वटाणे यांची एकत्र भाजी,परसवातल्या भेंडी,कारली,दोडकी यांची भाजी),हळदीच्या पानात उकडलेले मोदक,नेवऱ्या,लोणची,पापड.
काळ्या वटाण्याची आमटी, सफेद वटाण्याची उसळ,वरणभात, पापडलोणचं हा ठरलेला बेत असतो.

गणपतीसमोर घरातल्या आत्या,मावशी, काकू, लहानग्या मुली फेर धरतात. फुगड्या घालतात,गीते गातात. प्रत्येकाच्या घरी गणपतीसमोर भजने होतात. भजन झाल्यावर भजनकऱ्यांना द्रोणातून काळ्या वटाण्याची उसळ व चहा देतात. आता त्याऐवजी वडापाव, मिसळपाव, पावभाजी, फालुदा असे प्रकारही चालू झाले आहेत मग ते खात जुनी माणसं द्रोणातल्या उसळीच्या आठवणी नव्या पिढीला सांगतात. दिड,पाच,सात,अकरा,एकवीस अशी प्रत्येकाच्या सोयीनुसार गणपतीची सेवाअर्चा केली जाते.

एकुणच पहाता माटीची सजावट, चिकणमातीच्या मुर्ती..याचा अवलंब करून निसर्गाची साथ कोकणकरांनी अजूनतरी धरून ठेवली आहे.

©️®️गीता गरुड.

=========================

नमस्कार वाचकहो🙏🙏,

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आवड असूनही आपले छंद आपल्याला जोपासता येत नाही. आवड असूनही पुस्तकं वाचता येत नाही. त्यामुळे वेळेअभावी आपल्यासारखे खूप सारे वाचक वाचनापासून वंचित राहतात. आणि म्हणूनच वाचकांना कुठेही सहज वाचता येतील असा कथासंग्रह आम्ही रीतभातमराठी ह्या डिजिटल व्यासपीठावर घेऊन आलो आहोत.

उत्कृष्ट लेखकांनी लिहिलेल्या marathi katha, marathi moral story, marathi stories, marathi short stories, bodh katha marathi मध्ये आपल्याला रीतभातमराठीवर वाचायला मिळतील.

Leave a Comment

error: