किमतीचं लेबल

सौ. गीता गजानन गरुड.
हेमंताचे आईवडील, कष्टकरी समाजातले. गावाकडे एक छोटसं वडिलोपार्जित घर होतं, त्यांचं.
घरच्या गरीब परिस्थितीमुळे, हिंडण्याबागडण्याच्या वयात हेमंताला अभ्यास सांभाळून नोकरी करावी लागली होती.
हेमंताला शहरात नोकरी लागली तसं त्याने तिथे लहानसं का होईना घर घेतलं नि भावंडांना पुढच्या शिक्षणासाठी मुंबईत घेऊन आला होता. थोडंबहुत कर्ज होतं वडलांच्या नावावर तेही दर महिन्याला फेडणं सुरू केलं.
या रहाटगाडग्यात हेमंताने स्वतःच्या लग्नाबाबतचा विचार मात्र बासनात बांधून ठेवला होता. हेमंताच्या लाघवी स्वभावामुळे स्वतः गावच्या सरपंचांनी पुढाकार घेऊन त्याच्याकरिता नेमाडेंच्या इंद्रारायणीचं स्थळ सुचवलं. स्वतः पाहुण्यांशी रुजवात घालून दिली.
पन्नासेक माणसांच्या उपस्थितीत हेमंताचं व इंद्रायणीचं लग्न लागलं. इंद्रायणी गावचा चिरेबंदी वाडा सोडून, हेमंताचा हात धरुन शहरातल्या वन रुम किचनमधे रहायला आली.
सासरी, नणंद आणि दिराचं सगळं टापटीप करण्यात इंद्रायणीचा बराच वेळ जायचा. नणंद उज्वला हुशार होती. एम. ए च्या परीक्षेचा अभ्यास करत होती. तिची कामात काहीच मदत नसायची,उलट घरात थोडा कचरा,फर्निचरवर धुळ दिसली तर ती इंद्रायणीलाच रागे भरायची. “काय गं वहिनी, किती धुळ..स्वच्छ ठेवत जा नं घर..असं.सुनवायची. दिर तर तासनतास आरशासमोर केसांचे कोंबडे काढणे, व्हिको टरमरिक गालांना लावणे..असले उद्योग करत बसायचा.
दिर व नणंदेचं लग्न करुन दिल्यानंतर हेमंता व इंद्रायणी थोडे मोकळे झाले खरे पण ते सुख काही फार दिवस उपभोगता आले नाही. गावाहून वडील आजारी असल्याचं पत्र आलं. आई बिचारी एकटी कुठे त्यांना सांभाळणार म्हणून हेमंता त्या दोघांना गाडीने घरी घेऊन आला.
तेंव्हापासनं इंद्रायणीचा सगळा वेळ हा सासूसासऱ्यांच्या उठबसमधे जाऊ लागला. आपल्या माणसांची उठबस करणं इंद्रायणीला आवडायचंच पण तोंडभरले कौतुकाचे शब्द मात्र तिच्या नशिबात नव्हते.
इंद्रायणीची सासू तशी कडकच होती. तिने तिच्या तरुणपणी जे कष्ट काढले त्यामुळेच इंद्रायणी आता सुखाने बसून खातेय असं ती सतरांदा इंद्रायणीला सुनवायची.
सासूच्या माहेरच्या गोतावळ्याला या ना त्या निमित्ताने साड्या घ्याव्या लागत. कोणाचं लग्न तर कोणाचं बारसं..प्रत्येकवेळी सासू सांगे..तेंव्हा गरीबीमुळे मला माझ्या माणसांचा मानपान करता नाही आला. आता माझा लेक कमवतो. मी माझ्या इच्छेप्रमाणे आहेर करणार साड्याचोळ्यांचा. मग सासरेही त्यांच्याकडच्या नातलगांसाठीही घ्या म्हणून सांगत.
यात व्हायचं काय, इंद्रायणीला स्वत:ची हौसमौज कधी करताच आली नाही. दुकानात गेलं की एखाद्या तलम,रेशमी पैठणीवर, गुलाबी चिकनकारी साडीवर, तिची नजर भिरभिरे, मऊसूत, नयनवेधक रंगांच्या शिफॉन साड्या तिला हाकारत मग हळूच ती बोटांनी उलगडून किमतीचं लेबल पाही. आपल्या आवाक्यातल्या या साड्या नाहीत याची जाणीव होऊन तिथून बाजूला सटके.
साध्या, परवडणाऱ्या किमतींच्या साड्यांकडे जाई. हेमंताला इंद्रायणीचं मन कळत असे पण प्रत्येकवेळी काही न् काही खर्च आड येऊन त्याला इंद्रायणीसाठी कधी मनाजोगती साडी खरेदी करताच आली नाही.
हेमंता व इंद्रायणीच्या सोबत खरेदीला जाणाऱ्या त्यांच्या लेकीला..इराला आईबाबांच्या मनातली सल लहानपणापासनंच कळत आली होती.
सणाच्या वेळी इतर सख्या शेजारणी छान नटूनधटून तयार व्हायच्या. नवीकोरी साडी नेसायच्या..हळदीकुंकवाला गेलं की त्यांची आपापसात चर्चा व्हायची..किती छानै साडी..कितीला घेतली..अडीच हजार..यांनी दिली पाडव्याला..काय म्हणतेस..ही बघ कांजिवरम माझ्या भावाच्या लग्नात मिळाली..अय्या..पोत किती छानय गं साडीचा..असणारंच..ओरिजनलै. एक कुठली राणीकलरची चंदेरी नेसून पदर हातावर मिरवत येई..या साऱ्यांना पाहून इराला वाटे..आपल्या आईनेही अशा भारीतल्या साड्या नेसाव्यात.
आई जसं एखादी बाहुली मागितली की बाबांना आणायला सांगते म्हणून तिची समजूत घालायची तशीच ती आईला सांगायची,”मी बाबांना सांगते,तुझ्यासाठी खूप साऱ्या सुंदर सुंदर साड्या आणायला.”
मग इंद्रायणी मोठे डोळे करत म्हणायची,”नको हं इरे. तुझे बाबा ज्या साड्या मला घेतात त्यांत मी खूष आहे. उगा बाबांच्या मागे भुणभुण नको लावूस. तू खूप शीक. खूप मोठी हो. पैसे कमव नि मग घे मला साडी..जरतारीची..नक्षीदार .”
आईचं हे बोलणं ऐकलं की इरा आईच्या कुशीत शिरे न् म्हणे,”नक्की आई,मी खूप शिकणार. पैसे कमवणार न् तुझ्या सगळ्या इच्छा पुर्ण करणार.”
“नं सासूच्या गं..”
“अगं आईटले,तिच्याही करणार. तू नाही का करत तुझ्या सासूच्या इच्छा पुर्ण..मी तर तुझीच लेक ना. तुझ्याच पावलांवर पाऊल ठेवून चालणार.”
इरा असं बोलली की इंद्रायणी लेकीला जवळ घेई व तिच्या केसांवर हात फिरवून तिच्या कपाळाचा मुका घेई.
इरा शिकूनसवरुन मोठी झाली. तिला मनाजोगती नोकरीही मिळाली. इराला पहिल्या पगार मिळाला.
ती आईवडलांना.. मोठ्या दुकानात घेऊन गेली, साड्यांच्या. तिथे प्रत्येक साडीच्या प्रकाराचे वेगवेगळे दालन होते. बसायला पांढऱ्याशुभ्र गाद्या होत्या. इतक्या शुभ्र की आपलं पाऊल गादीवर ठेवावं की नाही हा प्रश्न.
इंद्रायणी आजुबाजूच्या मांडणीत मांडून ठेवलेला साड्यांचा नजारा पाहून हरखून गेली..पण परत तिचं मन चाचरलं.
हळूच इराजवळ येत म्हणाली,”इरा, तुला माझ्यासाठीच साडी घ्यायचीय ना..मग एवढ्या मोठ्या शोरुममधे कशाला आलो आपण..चल ना आधी बाहेर..माझी साडी कसली गं..हजाराच्या आतली..इथे कसली मिळायला.”
इरा आईचे खांदे धरत तिच्या डोळ्यात पहात म्हणाली,”नाही हं आई..आज तुझ्या लेकीचा पहिला पगार झालाय. अगं लहानपणापासनं बघतेय मी. तू तुझी आवड मारुन पाहुण्यांनाच जेंव्हा तेंव्हा साड्या घेत बसलीस. आता मात्र जेंव्हा जेंव्हा तुला साडी घ्यावीशी वाटेल तेंव्हा आपण अशाच छानशा दुकानात जायचं नं किमतीचं लेबल न बघता तुझ्या आवडीची साडी खरेदी करायची. आणि बाबा तुम्हीसुद्धा तुमच्या आवडीच्या ताग्यातलं कापड घ्यायचं किमतीचं लेबल न बघता.”
लेकीचं बोलणं ऐकून इंद्रायणी व हेमंताच्या डोळ्यांत आनंदाचं तळं साचलं..मग खरंच तिने आणि हेमंताने हळदुव्या रंगाची,कंच हिरव्या काठाची, पदरावरती नाचणाऱ्या मोराच्या नक्षीची पैठणी खरेदी केली, जांभळी इरकल घेतली,
चंदन कलरची कलकत्ता सिल्क हेमंताच्या आवडीची खास हेमंताच्या पैशातून हेमंताने इंद्रायणीसाठी घेतली..इंद्रायणी या सुखाच्या सोहळ्यात न्हाऊन निघाली तरी सासूसाठी चौकडची काठापदराची नववारी लुगडी आणि नणंदेसाठीही एक छानसी नवीन ट्रेंडची साडी तिने घेतलीच.
आईचा हा देण्याचा स्वभाव पाहून इरा नेहमीसारखीच खुदकन हसली नि तिथेच तिने इंद्रायणीला जादुची झप्पी दिली.
—–सौ. गीता गजानन गरुड.