Skip to content Skip to sidebar Skip to footer

खरवस

©️®️ सौ. शिल्पा पराग कुलकर्णी

शकू नेहमीच्या सवयीप्रमाणे पहाटे उठली आणि तिची कोकणातल्या कामाची धावपळ सुरू झाली. आधी चुलीजवळची पहिली राख भरून तिने चांगला जाळ केला आणि आंघोळीचं पाणी तापवून ती अंगण झाडायला लागली. पारिजातकाच्या फुलांचा मंद सुगंध ती मनात भरून घेत होती. सडारांगोळी झाली.
आज तिच्या अंगात खूपच उत्साह संचारला होता. कशाने काय माहीत पण आज तिची इच्छा पूर्ण होणार असं तिला वाटत होतं. कालच चंद्राने छान पाडसाला जन्म दिला होता. चंद्राला आणि त्या पाडसाला प्रेमभराने तिने कुरवाळले. चंद्रा आपल्या पाडसावर प्रेमाचा वर्षावर करत होती. शकूचे डोळे भरून आले. तेवढ्यात तिला वाटले चंद्राही आपल्याकडे डोळे भरून पाहाते आहे. तिने चंद्राला थोपटले. कोणी कोणाची समजूत काढली तेच कळलं नाही.
घट्ट चिकाचा खरवस तिने छोटी चूल पेटवून त्यावर ठेवला त्याचा खमंग, खरपूस वास पसरला होता. आज तो नक्की येईल असंच तिला वाटत होतं. रमा नी राजेशला पण तिने हाक मारली. रमा आता मोठी झाली होती आईच्या हाताखाली मदत करत होती. राजेश त्यामानाने लहान होता. प्रतापराव आपलं आवरून शेतीच्या कामाला निघून गेले होते.
तिने आज झरझर आवरलं होतं आणि ती स्वयंपाकाला लागली. आज सूरजच्या आवडीचाच स्वयंपाक करू असं तिनं मनात ठरवलं. 7-8 वर्षं झाली पोरगं कुठं असेल काय माहीत? दरवर्षी या दिवशी त्याच्या आवडीचा स्वयंपाक करून वाट बघत असे. पण आज नक्की तो येईल कारण तो गेला त्याच्या आदल्या दिवशी अशीच चंद्राने एका पाडसाला जन्म दिला होता. चुलीवर घट्ट खरवस शिजत ठेवला होता. मस्त खरवसाचा आस्वाद घेत असतानाच प्रतापराव समोरून आले आणि म्हणाले, ‘‘आता जरा कामधंद्याचं बघा, एकटा बाप कमावणारा आणि पाच तोंडं खाणारी. कसं निभावणार.’’
सूरज म्हणाला, ‘‘बाबा, मला अजून शिकायचंय….’’
‘‘तू मोठा आहेस आधी कामधंदा कर आणि मग काय शिकायचं ते शिक नाहीतर आपापलं काय ते बघ.’’
रोज असे खटके घरात होतच असत. प्रतापरावही गरीबीला कंटाळले होते त्यात आताशा त्यांना छेपत नव्हतं ते तरी काय करतील बिचारे? आजचा दिवस मात्र वेगळाच होता सूरजने तो राग डोक्यात घेतला आणि तो घरातून निघून गेला, तो अजूनही परतला नव्हता. खूप शोध घेतला पण त्याचा काही पत्ताच लागला नाही. शकूने डोळ्याला पदर लावला.
‘‘आई, किती त्रास करून घेशील, एक ना एक दिवस आपला सूरज भैय्या नक्की येईल.’’ प्रतापरावांना पण वाईट वाटत असे, पोराला उगाच बोललो, पण कधीकधी परिस्थितीपुढे माणूस हतबल होतो हेच खरे.
‘‘तुझ्या तोंडात साखर पडो ग पोरी.’’
‘‘साखर नको खरवसच खाऊ आता.’’ रमा हसत म्हणाली.
‘‘आई, मी मोठा झालो ना की सूरजभैय्याला शोधून आणतो.’’ राजेश म्हणाला.
‘‘आधी आपलं आवरायला शिका…’’ रमाने त्याची खोडी काढली आणि गढूळ वातावरणात जरा हास्याची लकेर उमटली.
शकूने आज सूरजच्या आवडीची बटाट्याची भाजी, पुर्‍या, भात, वरण आणि घट्टसर अशी खोबर्‍याची चटणी केली होती. तसं त्यांचं घर खाऊन-पिऊन सुखी होतं, पण तरीही पैसे अपुरेच पडत होते. एक वाजता प्रतापराव शेतातून आले. जेवणाची पानं घेतली गेली. शकूने नेहमीप्रमाणे एक ताट जास्त घेतलं.
प्रतापराव म्हणाले, ‘‘तुला किती वेळा सांगितलंय त्याचं ताट घेत जाऊ नकोस. माझंच चुकलं मी त्याला असं बोलायला नको होतं.’’
‘‘असुदे हो तुम्हाला त्रास होत असेल तर नाही घेणार मी उद्यापासून त्याचं पान, पण जीव राहात नाही हो. कुठे असेल माझा सूरज?’’ तेवढ्यात दाराजवळ काहीतरी हालचाल दिसली.
एक तरणाबांड, जीन्स पँट आणि टीशर्ट घातलेला तरुण दारात उभा होता. क्षणभर कोण आलं काहीच कळत नाही कुणाला! पाच मिनिटांच्या नीरव शांततेनंतर शकू एकदम ओरडली,
‘‘सूरज ऽ ऽऽ ’’
त्यानेही धावत येऊन आईला मिठी मारली, छोट्या भावंडांना जवळ घेतलं बाबांच्या पायावर डोकं ठेवलं.
‘‘किती वाट पाहायला लावलीस रे?’’ बाबांनी एवढंच म्हटलं. भावनांचा वेग ओसरल्यावर आई म्हणाली,
‘‘कुठे होतास इतके दिवस? आणि दारात गाडी कुणाची?’’
‘‘माझी म्हणजे आपलीच गाडी आहे आई… आता आपण सगळे अगदी सुखाने राहायचं.’’
‘‘पण इतका पैसा कसा कमावलास तू?’’
‘‘आई, त्यादिवशी बाबांच्या शब्दांनी मी दु:खी झालो आणि घर सोडून गेलो. मी मुंबई गाठली. आधी खूप दिवस मला त्रास झाला. मी रेल्वे स्टेशनवर दिवस काढले. छोटी मोठी कामं करत होतो. एके दिवशी मी एका आजीकडे कामाला लागलो. तिचे दुधाचे छोटे दुकान होते. माझे काम बघून तिचा माझ्यावरचा विश्‍वास वाढला. ती एकटीच असल्याने तिने मला तिच्या घरी राहायला नेले. मग तिने आणि मी मिळून दुधाचे दही, तूप असे पदार्थ करून विकायला सुरुवात केली. मग मला वाटले आपण खरवस सुद्धा विकू शकते. मी त्यावर बरेच प्रयोग करून खरवसाची पावडर तयार केली. लोकांना ती प्रचंड आवडू लागली आणि आमचा ब्रँड तयार झाला. आता मुंबईतील प्रत्येक दुकानात ‘कामधेनू खरवस’ मिळतो. मी नवीन घर घेतले. रोज तुमची सर्वांची खूप आठवण येत होती. कालच गाडी घेतली आणि आज तुम्हाला भेटायला आलो.
शकूच्या डोळ्यांतून अश्रूच्या धारा येत होत्या. तिने त्याच्यापुढे चुलीवरच्या खमंग खरवसाची वाटी ठेवली. सूरजने पोटभरून खरवस खाल्ला आणि तो म्हणाला,
‘‘आई, तुला म्हणून सांगतो हा चंद्राच्या चिकाचा आणि तुझ्या या चुलीवरच्या खरवसाची चव आमच्या पावडरच्या खरवसाला नाही ग…’’ सूरजला घेऊन आई चंद्रापाशी गेली आता चंद्रा शकूकडे हसून बघते आहे असं शकूला जाणवलं तिला तिने प्रेमान थोपटले आणि दोघींच्याही डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले.

================

हेही वाचा

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

Leave a Comment

error: