खरी समृद्धी

©️®️ शिल्पा पराग कुलकर्णी
‘ताई, ताई….’’ किती वर्षांनी ही हाक कानावर येतेय हा भास आहे की खरंच समृद्धी मला हाक मारतेय. छे समृद्धी कुठची इथे यायला? ती गेली कधीच आपल्याला सोडून.. एका वेगळ्याच जगात… ईश्वरी असा विचार करतच होती तोच मागून तिला मिठी पडली आणि ‘‘ताई, ताई..’’ अशी हाक परत ऐकू आली त्या मिठीच्या हातांना ईश्वरीने हातात घेतले. पण मागे वळून बघायचे धाडस तिला होईना, खरंच हा भास असेल का? कितीतरी वेळा कानावर ताई म्हणून हाक ऐकू येते, तसा भास होतो, पण आज हे हात आणि होच की ही माझ्या समृद्धीचेच हात आहेत सुंदर, गोरेपान….
तेवढ्यात समृद्धीने ईश्वरीला आपल्याकडे वळवले. आता समृद्धी आणि ईश्वरी समोरासमोर उभ्या होत्या. समृद्धीकडे ईश्वरी बघतच राहिली. आधी होती त्यापेक्षा ती अधिकच सुंदर दिसत होती. श्रीमंतीचं तेज तिच्या चेहर्यावर झळकत होतं. तिची ती आधुनिक वेशभूषा तिला नक्कीच शोभून दिसत होती. दोन मिनिटं ईश्वरीला वाटलं, अरे काय हे आपण किती अवतारात आहोत, पोळ्या लाटतोय. घरातलाच गाऊन, त्यावर अॅप्रॉन, विस्कटलेले केस, सकाळची तारांबळ..
‘‘ताई, किती सुंदर दिसतेयस ग?’’ ईश्वरीच्या या वाक्याने ती परत भानावर आली. तिने गॅस बंद केला.
‘‘समृद्धी, तू? तू इथे कशी? आणि काहीही काय बरळतेयस? मी सुंदर दिसते म्हणे, अगं माझा अवतार बघ, आणि अशा अवतारात तू मला चक्क मिठी मारतेयस. तुझे हे सुंदर कपडे खराब होतील ना.
‘‘नाही होत ग इतके वर्षांनी भेटतेयस. कपड्यांचं काय? परत नवीन घेता येतील. ताई, मला बस म्हणणार नाहीस का? मला तुझ्याशी खूप बोलायचं आहे.’’
‘‘अगं बस ना. तू अशी अचानक आलीस आणि मला काही सुचलंच नाही बघ.’’ ईश्वरीने समृद्धीचा हात धरला आणि तिला सोफ्यावर बसवलं. नाहीतरी घरात कुणीच नव्हतं. तिला पाणी द्यावं हेही आपल्याला सुचलं नाही याचाच ईश्वरीला गिल्ट आला. मग तिने समृद्धीला बसायला सांगितलं. घरात केर काढणार्या सुमनला तिने सांगितले, आम्ही जरा गप्पा मारत बसतो टेरेसवर. जरा आमच्यासाठी फक्कड कॉफी कर.
दोघी बहिणी बराच वेळ एकमेकींचा हात हातात धरून बसल्या. त्यांना शब्दच सुचेनात. खरंच कधी कधी शब्द ओठातूनच बाहेरच पडत नाहीत आणि कधीतरी नको ते शब्द भराभरा ओठातून बाहेर पडतात. कधीकधी मनुष्याच्या हातात काही नसतं हेच खरं.
‘‘अजून राग गेला नाही का ग ताई माझ्यावरचा?’’ समृद्धीने रडवेल्या, काळजाला घर पडण्यासारखा प्रश्न विचारला.
‘‘नाही ग समृद्धी तुझ्यावर राग कधीच नव्हता, वाईट वाटायचं ग उलट तुझ्याबद्दल. खरंतर खूप काळजी वाटायची तुझी.’’
‘‘माझी काळजी करणारी जगात तू फक्त एकटीच असशील ना ताई?’’
‘‘असं का म्हणतेस ग? तू ज्याच्यासाठी घर, संसार सोडून गेलीस तो …’’
तेवढ्यात सुमन कॉफी घेऊन आली.
‘‘ताई, मी जाते.’’
‘‘दार ओढून घे.’’ ईश्वरीने तिला सूचना केली.
समृद्धीने मोठा उसासा टाकला.
मग समृद्धीने जे काही सांगितलं ते ऐकून ईश्वरीला मोठा धक्का बसला. समृद्धी आणि ईश्वरी दोघी सख्या बहिणी. ईश्वरी मोठी समृद्धी लहान. त्या दोघींची आई त्या लहान असतानाच गेली. वडिलांनी दोघा बहिणींना सांभाळले. ईश्वरी मोठी म्हणून साहजिकच समृद्धीची तिने आईसारखी काळजी घेतली. पण समृद्धी मुळातच थोडी हट्टी होती. तसंच ती दिसायलाही गोरीपान, शंभर जणांत उठून दिसण्यासारखी होती, म्हणून तिच्या रूपाचा तिला गर्व होता.
आधी ईश्वरीचे लग्न झाले. तिचा नवरा एका सरकारी ऑफिसात मोठ्या पदावर होता. त्यामुळे ईश्वरीने नोकरी न करण्याचा निर्णय घेतला. तसंही तिला घर-गृहस्थी यात फार आनंद मिळत होता. एक परिपूर्ण गृहिणी होणे तिला अजिबात कमीपणाचे वाटत नव्हते. आपल्याला आईचे प्रेम मिळाले नाही, पण आपण मात्र आपल्या मुलांना आईचे प्रेम देऊ आणि मातृत्व अनुभवू असे तिने प्रथमपासूनच ठरवले होते. त्याप्रमाणे तिला दोन मुले झाली होती आणि तिने त्यांचे उत्तम संगोपनही केले होते. आणि ती आपल्या संसारात खूश होती. अगदी श्रीमंत नाही, पण
समृद्धीचेही योग्य वयात लग्न लागले. पण तिला नोकरीची आवड होती. तिच्या नोकरी करण्याला तिच्या सासरच्या घरूनही काही ना नव्हती. समृद्धी नोकरी करत होती, घरचं करत होती पण तिचं मन संसारात रमत नव्हतं. तिला छानछौकीची आवड होती, घरातली कामं करणं, घरात रमणं तिच्या स्वभावात बसत नव्हतं. त्यात तिच्या नवर्याचा पगारही बेताचा असल्याने तिला कामाला बाईही ठेवता येत नव्हती. त्यातच समृद्धीला दिवस गेले. तिने एका मुलीला जन्म दिला. पण मातृत्वसुद्धा ती निभावू शकली नाही. समृद्धीचा नवरा मात्र प्रेमळ होता. तो आपल्या मुलीला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपत होता.
समृद्धीची मुलगी सुद्धा तिच्यापासून दुरावत होती हे तिच्या लक्षातच येत नव्हते. त्याच दरम्यान समृद्धीच्या ऑफिसमध्ये एका बॉसबरोबर समृद्धीचे सूत जमले. तो खूप श्रीमंत होता, पण वयस्कर होता. त्याच्या श्रीमंतीला समृद्धी भुलली आणि एक दिवस त्या वयस्कर माणसाबरोबर आपला संसार सोडून पळून गेली. समृद्धीचा नवरा, ईश्वरी, तिचा नवरा या सर्वांना या प्रकाराचा फार मोठा हादरा बसला. मुलं लहान होती त्यांना काहीच कळत नव्हतं. पण समृद्धीची मुलगी कधीतरी आईची आठवण काढत असे.
या घटनेला 10-12 वर्षं उलटून गेली होती आणि आज तीच समृद्धी आपल्यासमोर आली होती. ईश्वरीला काय बोलावं सुचतच नव्हतं.
ताई मी काय सांगतेय, तुझं लक्ष कुठाय? मी ज्या माणसाबरोबर पळून गेले, त्याने मला पैसा दिला, ऐश्वर्य दिलं, पण प्रेम मात्र नाही दिलं ग! समृद्धी रडू लागली. आणि त्याने मला तुमच्या सगळ्यांशी संबंध ठेवण्यासही बंदी घातली. कधीतरी तर तो… शी…
खूप अत्यचार करायचा ग माझ्यावर, त्याला माझं फक्त शरीर हवं होतं. फक्त एकच केलं त्याने जाता जाता सगळा पैसा माझ्या नावावर करून गेला बघ. पंधरा दिवसांपूर्वीच तो गेला.
आणि हे रूप म्हणशील तर माझं रूप जपण्यासाठी माझ्यावर तो पैसे खर्च करत होता कारण त्याला शोभेची बाहुली हवी होती.
बेल वाजली ईश्वरी दार उघडायला उठली. मुलं धावत आली. आई, भूक लागली. हो हो देते देते खायला जरा थांबा, मी काय सांगते ऐका. पण मुलं आईला दिवसभरातल्या गंमतीजमजी सांगण्यात मग्न होती आणि समृद्धी एका कोपर्यात उभं राहून तिचं ते वात्सल्य अनुभवत होती.
तिच्या डोळ्याच्या कडा ओल्या होत होत्या. इकडे यायच्या आधी ती तिच्या स्वत:च्या मुलीकडे गेली होती, पण त्या मुलीने तिला आई म्हणण्यासाठी नकार दिला होता. वडीलच तिच्यासाठी सर्वस्व होतं. आपली नोकरी सांभाळून तो मुलीचं सर्व काही करत होता.
थांबा मी तुम्हाला मावशीशी ओळख करून देते म्हणूत ईश्वरी समृद्धीला हाक मारायला गेली, तर समृद्धी दाराबाहेर पडली होती. जाता जाता ती ईश्वरीला इतकंच म्हणाली,
‘‘मी पैशाने समृद्ध आहे, पण तू सुखा-समाधानाने समृद्ध आहेस आणि तीच खरी समृद्धी आहे. मी म्हणजे नाव सोनूबाई आणि हाती कथलाचा वाळा इतकंच आहे.’’
ईश्वरी काही बोलू शकली नाही. कधीही वाटलं की, परत ये, ही ताई तुझ्यासाठी आहे… एवढंच ती बोलू शकली.
सौ. शिल्पा पराग कुलकर्णी
=====================
प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.
https://www.facebook.com/ritbhatmarati/
तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.
ritbhatmarathi@gmail.com
फोटो साभार – गूगल
आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही.
=============
1 Comment
अमृता खानोलकर
खूप छान कथा