खणाची साडी आणि गंमतघोटाळा

©️®️ सौ. गीता गजानन गरुड
गायत्रीसदन या इमारतीत पहिल्या मजल्यावरचं एकशे चार नंबरचं घर तांबे काकुंचं. अंगापिंडाने भरभक्कम,गोबऱ्या गालाच्या थुलथुलीतपणाकडे नुकत्याच झुकलेल्या तांबेकाकू कपाळावर लांबटगोल लाल टिकली लावायच्या, त्याखाली गोंदण नि हळदकुंकवाची बोटं उमटलेली असायची..अगदी सात्विक चेहरा आणि मुख्य म्हणजे कोणी आलं गेलं की ओळखीचं असो,नसो तोंडभरुन हसायच्या.
खिडकीतून त्यांची टेहाळणी चालू असायची.
इकडे पूजा करतेवेळी ..ज्या ज्या ठायी मन जाय माझे
त्या त्या ठायी निजरुप तुझे..तोंडाने चालू असायचे पण डोळे मात्र समोरच्या इमारतीतल्या तळमजल्याच्या उजवीकडच्या ग्यालरीतल्या कुंडीत फुललेल्या जास्वंदीच्या फुलाकडे असायचं.
“शी बाई, पाठकीणीने नि मी एकाचवेळी एकाच कुंडीवाल्याकडनं जास्वंदाची रोपं घेतली, त्याच्याकडच्याच कुंड्यांत,त्याच्याकडचीच माती घालून रोपं लावून घेतली तरी पाठकीणीच्या रोपाला तरतरीत फांद्या फुटल्या नि दोन दिवसाआड तरी दोन लालभडक फुलं मिळतातच न् माझं मेलं नुसतच पसरतय..एक म्हणून फुल आलं नाही. कसली जादू आहे तिच्याकडे देव जाणे.’ तांबे काकू पुटपुटल्या.
तितक्यात तिथून जाणाऱ्या बर्मन भाभीने ते ग्रीलमधून डोकावणारं फुल तोडलच नि तांबे काकूंनी त्यांची पुजा गुंडाळून ठेवली न् बेडरुमच्या खिडकीजवळ धावल्याच..
“ओ भाभी, क्यों तोडा फुल आमचं?”पाठकीण हातातलं लाटणं हलवत पदर कमरेला खोचून आली.
“ओ पॉठकभॉभी, अच्छा दिख रॉहॉ थॉ. हमारे भॉगवॉन के लिए तोडा. ऑपको भी पुन्य मिलेगा.”
“पण तोडलसंच का? आमी येतो काय तुमच्या घरातली वस्तू मागायला. नि इतनाच गरज तो मांगने का.”
“क्या भॉभी इकही बॉर तोडा ना. इतनॉ क्या सोना लगॉ है क्या तोमार फुल को?”
“एक बार नहीं रोज रोज तोडती हो!”
“ऐ झुठ मोत बोलो हा. आज ही तोडा. ले ले तेरा फुल. हमको नै चाहिए. पापड डालते समय मेरी खटिया लेने को ऑ फिर देखती हुँ.”
“अरे गुस्सा कशाला होतीस. परत विचारुन तोडीत जा. आता हे घेऊनच जा. देवाला घाल तुझ्या.” खटियाचा विषय काढल्याबरोबर पाठकीण मवाळ झाली. तिला बंगाली भाभीची खटिया दरवर्षी नाचणी,साबुचे पापड वाळत घालायला लागायचीच.
तांबे काकूंचा मात्र मुड ऑफ झाला. निदान अर्धा तास तरी मनोरंजन होईलसं त्यांना वाटलेलं. ते दिवाळीत एटमबॉम्ब लावायला जावा नि तो फुसका निघावा तसं त्या भांडणाचं झालं.
तांबेकाकू मालिका लावून भाजी निवडत बसल्या. त्या मालिकेतल्या नायिकेला साडी नेसून सगळी कामं कशी काय जमतात याचं तांबे काकूंना मोठं कोडं. आज त्यांच्या लाडक्या नायिकेने खणाची साडी नेसली होती..जांभळ्या रंगाची,गडद हिरव्या काठाची,टोपपदराची..हीच सेम हीच साडी हवी झाली तांबे काकूंना. तिने पटकन मोबाईलच्या क्यामेऱ्याने फोटू टिपला न् फेसबुक ग्रुपवर शेअर केला.
वर क्याप्शन दिलं. अगदी अश्शीच साडी पाहिजे. हाच रंग,अस्साच हिरवा काठ. रेट वगैरे कमेंटमधे कळवा नि फोटू पाठवा. सांगायची खोटी. एकापाठोपाठ एक जांभळ्या खणाच्या साड्यांचे फोटो.. स्क्रीनवर साड्यांची रिमझिम नुसती. किमतीतही चढाओढ शिवाय काहींनी तर ऑक्सिडाइजची आकर्षक अशी ज्वेलरीही मोफत ठेवलेली. तांबे काकूंनी ती विथ ज्वेलरीवाली साडी फिक्स केली न् ऑर्डर देऊन टाकली. चारेक दिवसांत साडी येईल म्हणताच त्या खूष झाल्या.
संध्याकाळी तांबे आले ते हातात ऑफिस ब्यागसोबत शॉपिंग ब्याग घेऊनच.
“अय्या, काय आणलंत हो?”
“ओळख बघू.”
“माझ्या दादूसाठी शर्टपँटपीस..”
“छे गं राणी. साडी आणली तुझ्यासाठी.”
“खऱंच. बघू बघू.”
“हे काय जांभळी खणाची साडी, हिरवा काठ आणि ऑक्सिडाइजची ज्वेलरी..”
“अगं केवढा आ केलास तोंडाचा..हातात कोणी जीवंत बॉम्ब दिल्यासारखा. हास की जरा. नवरा न सांगता साडी घेऊन आलाय म्हंटलं! आम्हालापण पाहिजे गोड गीफ्ट.”
“जळलं तुमचं लक्षण ते. इतकी वर्ष..मोजून दहा वर्ष झाली लग्नाला..चुकून साडी आणली नाहीत की कधी माझ्यासोबत साडी खरेदी करायला आला नाहीत आणि आजच काय हुक्की आली तुम्हाला!”
“अगं चिमे, किती चिडशील..”
“चिडू नाही तर काय करु. थांबा जरा. ह्यालो ह्यालो उकिडवे ताई..अहो ती सकाळची खणाच्या साडीची ऑर्डर प्लीज कँसल करता का..त्याचं कायय आमच्या ह्यांनी डिट्टो तशीच साडी आणली हो माझ्यासाठी. आता दोन एकाच रंगाच्या साड्या कशा नेसणार नं मी! प्लीज जरा.”
“हे पहा तांबे काकू, तुमची ऑर्डर डिस्प्याच केली मी, सकाळीच. आता रिटर्न शक्य नाही. आम्ही फक्त पीस डिफेक्टिव्ह असला तर परत घेतो, काकू. तुमच्या नेबरला हवी असल्यास द्या की काकू..”
“ए भवाने, उकिडवे..आता एक शब्द बोललीस तर बघ पुढे. अगं चार शिव्या हासडल्या असत्यास तर पचवल्या असत्या मी पण तीनदा चक्क काकू म्हणालीस. इतकी का मी थेरडी वाटली तुला. तूच असशील काकू.” तांबे काकूंनी जोरात फोन खाली आपटला. तांबे काकांच्या छातीत धस्स झालं. फोन बिघडला तर पुन्हा चौदापंधरा हजाराला फटका. प्रकरण जास्तीच चिघळलय याचं आकलन होऊन ते शॉवर घ्यायला सुमडीत पळाले.
कंबरेला टॉवेल लावून केसांची झालर पुसत बाहेर येतात तोच तांबे काकूंनी तोफ डागली,”खरं खरं सांगा. का आणलात साडी?”
“अगं ती आमची स्टेनो, मिस रंजना साड्यांच्या बिझनेसमधे उतरलीय. मला म्हणाली,”साहेब तुमच्या हाताने बोहनी होऊदेत.” इथेच तांबेनी तोफेच्या तोंडात आत्मसमर्पण केले.
“काय म्हणालात! मी साधं कुळथाच्या पीठाचा बिजनेस करते, पाकिटं ऑफिसात नेऊन विका म्हणून अजिजी केली तर मान फिरवत, नाही म्हणालात आणि आता त्या रंजना का फंजनाची बोहनी व्हावी म्ह णू न.”
तांबेकाकूंनी डोळ्यांना पदर लावत..’आ..ई” चा मोठा सूर लावला.
आवाज ऐकून बाजूच्या तायशेट्ये वहिनी काविलता हातात घेऊन धावतच आल्या.
तांबे काकूंना गप्प करत म्हणाल्या,”उगी उगी, आवरा स्वतःला. जाणारा जातोच. नका एवढा त्रास करुन घेऊ. आधीच बीपी हाय तुमचा.” तांबे, तायशेट्ये वहिनींचे सांत्वनपर संवाद ऐकून सैरभैर झाले. दिगुअण्णाही पटेऱ्या चड्डीवर आले. त्यांनी तांबेंच्या खांद्यावर थोपटलं.”कुणाला फोन लावायचेत का विचारलं.”
हे ऐकून तांबे काकू किंचाळल्याच,”काहीही काय बोलताय. तुम्ही समजता तस्सं काही नाही घडलय.”
“अगं मग तांबेंनी हात उगारला क काय? तांबे या वयात शोभतं असं वागणं तुम्हाला? महिला समितीत तक्रार करु तुमची. अन्याय सहन करणार नाही. महिला एकता जिंदाबाद.” हातातलं लाटणं वर करत बोंबले वहिनींनी आरोळी ठोकली.
तांबे काकूंनी त्यांना खुणेनेच थांबवलं व घडला प्रकार कथन केला. तांबेंनी कसा बावळटपणा केला ते सांगितलं.
“अय्या, बावळटपणा काय त्यात. एवढ्या प्रेमाने आणलेय. मी घेते ती साडी. पैसे घ्या हं तांबे भाओजी. जीपे करते.” तायशेट्ये वहिनी म्हणाली. असं ते प्रकरण निवलं खरं.
तांबे काकूंनी व तायशेट्ये वहिनीने जोडीनेच ब्लाऊज शिवायला दिले. अगदी बाह्यांना गोंडे,खोल गळा वगैरे..दोघींनी बाजूच्या स्नेहाच्या साखरपुड्याला सेम साडी नेसायचं ठरवलं. दोघी भलत्याच खूष होत्या. असं काही फंक्शन सोसायटीत असलं की सोसायटीतला सगळा महिलावर्ग अगदी नटूनथटून,साजश्रुंगार करुन हजेरी लावायचा मग तो सोहळा सोसायटीच्या मधल्या चौकात असो वा नजिकच्या सभाग्रुहात. स्नेहाचा साखरपुडा तर खाली चौकातच होता.
साखरपुड्याच्या दिवशी तांबेकाकू व तायशेट्ये वहिनी दोघी सख्ख्या शेजारणी सारखी साडी नेसून तयार झाल्या. तांबे काकूंचा फोन वाजला म्हणून त्या तायशेट्ये वहिनीला म्हणाल्या,”तू होच पुढे. मी आले मागाहून.
तायशेट्ये वहिनी खाली जाताना दिघे वहिनींना आवाज द्यायला थांबल्या. खालून येणाऱ्या तांबेंना त्या मागून डिट्टो तांबे काकूच वाटल्या. खुशीत येऊन त्यांनी शीळ वाजवली..अगदी पुर्वी नवीन लग्न झालं तेव्हा तांबे काकूंना पाहून वाजवायचे तश्शी आणि ब्यागेतली गजऱ्याची पुडी बाहेर काढून ‘घे गं’ अगदी स्नेहार्दतेने म्हणू लागले इतक्यात बेलवरचं तायशेट्ये वहिनींच लक्ष तांबेंवर गेलं. दिघेंनीही दार उघडलं.
तांबे काकू तिथे अगदी चार पायऱ्या वर..त्यांना पाहून तांबेंना भर सांजेला घाम फुटला. तांबेंच्या हातातली गजऱ्याची पुडी पाहून तांबे काकू लालेलाल झाल्या.. जागच्या जागी थरथरु लागल्या. तांबेंना कुठे तोंड लपवावं, कळेना झालं.
(समाप्त)
–सौ. गीता गजानन गरुड.
===============
फोटो साभार – गूगल
तुमच्याकडेही अशाच लघुकथा असतील तर आम्हाला नक्की कळवा.
कथा आवडल्यास आमच्या फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा.