Ritbhatmarathi

Search
Close this search box.

पूजा एक अतिशय सुंदर आणि सुस्वभावी मुलगी एका चांगल्या कंपनीत रुजू असलेली पदवीधर पूजा अग्निहोत्री असं तीच नाव…घरात वडील…दोन बहिणी,एक भाऊ आणि पूजा स्वतः असं पाच जणांचं कुटुंब भाऊ नुकताच बारावी पास होऊन एम पी एस सी साठीची तयारी करत होता…दोन बहिणी लहान असल्याने त्यांचं शिक्षण,वडीलही आजारी असल्याने त्यांची औषध घरातले किरकोळ खर्च असं सगळं पूजा एकटी मॅनेज करत होती त्याचबरोबर घरातली आवराआवर करून ऑफिसामध्ये वेळेवर पोचणं फार गरजेचं यात पूजा एक प्रकारची कसोटीच करत होती. खूप कमी वयात पूजावर घराची जबाबदारी आलेली असल्याने पूजेसाठी एक प्रकारची कसोटीच होती ती….देव अशा माणसांना नेहमी कठोर,निष्ठुर स्वभावाची माणसं का देतो कोण जाणे…कितीही प्रयत्न केला तरी पूजाला नेहमी ऑफिसला यायला खूप उशीर व्हायचा म्हणून रोज कठोर आणि निष्ठुर बॉसची बोलणी खावी लागत….हर्षवर्धन जोशी त्या निष्ठुर आणि कठोर बॉसचं नाव…वागणं,बोलणं जरी कठोर असलं तरी नावात हर्ष होताच…असोत…एक दिवस नेहमीप्रमाणे पूजा ऑफिसला जायला निघाली होती पण वाटेतच एका चारचाकीची धडक लागण्यापासून पूजा थोडक्यात बचावली…पण त्याचवेळी गाडी ज्या बाईंची आहे त्याच बाईला चक्कर आली ….पूजाला त्या बाईची अवस्था पाहवली नाही म्हणून त्या बाईला हॉस्पिटलमध्ये पोचवून ऑफिसात जाईपर्यंत फार उशीर झाला…आणि काय ऑफिसामध्ये पूजा पोचताच हर्षवर्धन सरांनी तिला धारेवरच धरलं…..

पूजा – मे आय कम इन सर….

हर्षवर्धन सर – हि काय वेळ आहे का यायची…आज काय नवीन कारण…ऑफिस आहे हे धर्मशाळा नाही…वाट्टेल तेव्हा यायचं वाट्टेल तेव्हा जायचं…हि तुमची पहिलीच वेळ नाहीय तर तुम्ही नेहमी उशिरा येत असता ऑफिसला…ते काही नाही यावर एच आर डिपार्टमेंट मध्ये जाऊन तक्रार केलीच पाहिजे…जाऊ देत त्यापेक्षा मीच तुमची बदली करतो…काहीतरी ऍक्शन घ्यावीच लागेन…

पूजा – सर…पण माझं ऐकून तरी घ्या ना…असं काही ऐकून न घेताच माझी बदली करणार…सर प्लिस…ऐकून तरी घ्या माझं…

हर्षवर्धन सर – काय ऐकून घ्यायचं…काम काय तुम्हालाच असतं कि काय घरचं…ते काही नाही भावनिक होऊन निर्णय घेणारा मी नाहीय….हे तुम्हाला चांगलंच माहिती असावं…तुम्ही तुमच्या कामाला जाऊ शकता…!

पूजा – सर एकदा ऐकून तरी घ्या माझं…!

हर्षवर्धन सर – मिस पूजा आधीच उशीर झालाय…कव्हरेज डेटा फिल्ड वर पाठवायचाय मला दहा मिनिटात डेटा पाहिजेय….आणि हा डेटा तुम्हीच पाठवता…तेव्हा वेळ न घालवता मला डेटा पाठवून द्या…

पूजा – माझी बदली सर…ऐकून तरी घ्या ना…! [ रडवेली होऊन पूजा सांगत असते ]

हर्षवर्धन सर – मिस पूजा नो एक्सप्लेनेशन….गेट गो अँड डू इट…

हर्षवर्धन सर तितक्याच संतापाने म्हणतात….पूजा काहीही न बोलता हिरमुसल्या चेहऱ्याने आपल्या डेस्कच्या इथे जाऊन बसते आणि लवकर डेटा सबमिट करून हर्षवर्धन सरांना रिप्लाय करते…तो ऑफिसमधला पूर्ण दिवस पूजा हिरमुसली होऊनच घालवते हर्षवर्धन सर तसे खूप कडक शिस्तीचे आणि मनाने दगड असलेले असतात त्यामुळे समोरचा कामात परफेक्टच असला पाहिजे असं त्यांना नेहमी वाटायचं…साधारण महिन्याभराने पूजाची बदली होणार असल्याने पूजा आणखीनच त्रस्त होऊ लागली…त्यानंतर लंच ब्रेक झाल्यानंतर पूजाला तिच्या डेस्कवर बदलीचे पत्र मिळाले ते पत्र घेऊन पूजा काम संपवू लागली पण डोक्यातून विचार काही केल्या जाईना…त्याच संभ्रमात पूजा ऑफिसातून निघाली भाजी घेण्यासाठी मार्केटमध्ये गेली भाजी घेऊन परतत असताना तिला त्याच बाई भेटल्या ज्यांना पूजाने हॉस्पिटलमध्ये दाखल करून जणू नवीन जीवनच दिलं होतं त्या बाईंनी पूजाला ओळखलं आणि त्यांनी बळेबळेच पूजाला आपल्या घरी नेलं….पूजा त्यांचं घर पाहून थक्कच झाली….बंगालच्या समोर मस्त लॉन त्यावर रिमझिमणारं कारंज चहूकडे घराच्या दिमतीला नोकर-चाकर….पूजाला सगळं अगदी जणू स्वर्गच वाटत होतं….पूजा अगदी भेदरलेल्या सशासारखी  तिथेच उभी होती त्या बाईंनी पूजाला हाताला  पकडून सोफ्यावर बसायला लावले ….तेव्हा कुठे पूजाला रिलॅक्स वाटलं …पण पुढची कसोटी पूजाला काय  ठाऊक  होती….

पूजा हातात मासिक घेऊन चाळत बसली होती…पूजाने सहज मान वर करून पाहिलं अन ती ताडकन उठून उभी राहिली पूजाच्या शरीराचा कंप सुटला व हातातलं मासिक गाळून पडलं….कारण तिच्या पुढ्यात उभी असलेली व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून हर्षवर्धन होते…आणि नुकतीच अंघोळ आटोपून ते दिवाणखान्यात आले होते तेही पूजाला तिथे पाहून अचंबित झाले…तोच आतून शारदादेवी आल्या त्यांनी हर्षवर्धनशी संवाद साधला…

शारदादेवी –  पिल्ला….अरे काही झालं नाही मला….

हर्षवर्धन – आई….अगं मला समजल्या समजल्या मी लगेच येणारच होतो पण काही बेजबाबदार माणसं वेळेचं महत्वच नाही कळत त्यांना म्हणून मला उशीर झाला यायला….[ पूजाकडे रागीट कटाक्ष टाकत म्हणाले ]

शारदादेवी – अरे तुला सांगायचंच राहिलं ही पूजा….

हर्षवर्धन – हो पूजा अग्निहोत्री….ठाऊक आहे मला…

शारदादेवी – अरे वाह….कधी नव्हे ते नाव अचूक ओळखलस तू….पण तुला हीच नाव कसं माहिती…म्हणजे तुम्ही एकमेकांना ओळखता तर…

हर्षवर्धन – हो आपल्याच ऑफिसात काम करतात या…

शारदादेवी – हो ती झाली औपचारिक ओळख पण औपचारिकतेच्या पलीकडेही पूजाला खूप माणुसकी आहे…कारण आज मी जे काही तुझ्यासमोर उभी आहे ना धडधाकट ती ह्या पूजामूळेच…काल आपल्याच गाडीची धडक पूजाला लागणार होती पण तिने प्रसंगावधान राखलं आणि पटकन बाजूला झाली…पण ते पाहून मला चक्कर आली मी खूप घाबरून गेले…तेव्हा पुजानेच मला हॉस्पिटलाइझ केलं आणि तिथून पुढचं मला काहीच आठवत नाही…

हे सर्व ऐकताच हर्षवर्धन अवाक होऊन पूजाकडे पाहत राहिले…त्यांच्या तोंडून शब्दच फुटत नव्हते…पूजाचीही काही वेगळी अवस्था नव्हती…आपले बॉसच शारदादेवींचे सुपुत्र हे कळल्यावर तर पूजा अस्वस्थ झाली म्हणून वारंवार घरी जाण्याची मागणी करू लागली पण शारदादेवी पूजाकडून एक शब्दही ऐकून घेत नव्हत्या…तिला बळेबळेच बसवले…आणि म्हणाल्या…

शारदादेवी – आता तुला मी जेवल्याशिवाय जाऊ देणार नाही हा…काहीही झालं तरी इथला पाहुणचार तू घेतलाच पाहिजे…

पूजा – नाही तसं नाही घरी सगळे वाट बघत असतील…घरी मी गेल्याशिवाय कुणाचं पानही हालत नाही…म्हणजे स्वयंपाक माझ्याच हातचा आवडतो बाबांना…

शारदादेवी – अरे वाह…अन्नपूर्णा प्रसन्न म्हणायची तुझ्यावर….थोडासा चहा घे…[ चहाचा कप पूजाच्या हातावर ठेवतात ]  बरं तू राहतेस कुठं…?

पूजा – नेहरू कॉलनीत…

शारदादेवी – घरी कोण कोण असतं तुमच्या…?

पूजा – वडील…दोन बहिणी आणि एक भाऊ…

शारदादेवी – आणि….आई…?

पूजा – ती आता या जगात नाहीय…! [ हे सांगताना पूजाला गहिवरून आलं ]

शारदादेवींनी हे ओळखल आणि विषय तिथल्या तिथे बदलला… ..काही वेळ झाल्यानंतर पूजाने परत घरी जाण्याची मागणी केली…तेव्हा मात्र शारदादेवींनी आपला हट्ट सोडला आणि पूजाला घरी जाण्याची परवानगी दिली….आपल्या मुलाला पूजाला सोडण्यासाठी सांगितलं…

शारदादेवी – हर्ष….अरे हर्ष….लवकर बाहेर ये….पूजाला घरी सोडून ये तिच्या…दिवेलागण आहे तोपर्यंत जाईल घरी…नाहीतर रात्र होईल खुप…

पूजा – [ आपली पिशवी लगबगीने घेते आणि उठून शारदादेवींना म्हणते ] परत तुम्हीच या माझ्या घरी….पत्ता मी या डायरीत लिहून ठेवते…परत कधीतरी जेवायला नक्की येईल….काळजी घ्या…[ शारदादेवींच्या पाया पडते ]

पूजा लगबगीने हर्षवर्धनच्या आधी बाहेर जाऊन उभी राहते….हर्षवर्धनही पाठोपाठ बाहेर जातो…पूजाची जायची घाई पाहून आपल्या ड्रायव्हर ला हर्षवर्धन गाडी काढण्यासाठी सांगतो….ड्रायवर गाडी काढून गेटबाहेर आणतो आणि गाडीमधून उतरतो….हर्षवर्धन गाडी घेऊन एकदम पूजाच्या समोर जाऊन थांबतो आणि पूजाला म्हणतो….

हर्षवर्धन – मिस पूजा गाडीत बसा…!

पूजा – नो थँक्स….माझी मी जाईल…

हर्षवर्धन – मिस पूजा तुम्हाला माहिती आहे किती रात्र झालीय आणि या वेळी असं एकटीने फिरणं बरं दिसत नाही…

पूजा – तुम्ही….नको ना मी जाईल…मला या उपकाराची गरज नाहीय…

हर्षवर्धन – तुम्ही पहिले गाडीत बसा…मग आपण बोलूयात सविस्तरपणे…

शेवटी कशीबशी पूजा गाडीत बसते आणि हर्षवर्धन आपलं मन पूजापाशी मोकळं करू लागतात…

हर्षवर्धन – सगळ्यात आधी…धन्यवाद माझ्या आईला सुखरूप ठेवल्याबद्दल…

पूजा – मी एवढी कठोर आणि निष्ठुर नाहीय…मलाही भावना आहेत…मॅडमच्या जागी दुसरं कुणीही असतं तरी मी हेच केलं असतं…

पूजाच्या अशा उत्तरावरून हर्षवर्धन समजून जातो की आपण घेतलेल्या बदलीच्या तडकाफडकी निर्णयावरून पूजा नाराज आहे…म्हणून काहीही न बोलता हर्षवर्धन पूजाला तिच्या घरी सोडतो…आपलं घर साधं आणि लहान असल्यामुळे पूजा घरापर्यंत न सोडता जवळच्या रस्त्यापर्यंत सोडण्याची मागणी करते….तिथूनपुढे ऑफिसात पूजा नेहमी हर्षवर्धनसमोर अतिशय गंभीर व्हायची आणि त्यांच्या प्रश्नावर अगदी गंभीर आणि त्रोटक व्हायची…पूजा आपला तिरस्कार करतीय याची जाणीव हर्षवर्धनला हळू हळू होऊ लागते….दुसरीकडे मात्र शारदादेवींच्या मनात पूजा अगदी ठासून बसते….कारण पूजाला पाहताचक्षणी मनोमनी शारदादेवींनी आपला मुलगा हर्षवर्धनसाठी पूजाची निवड केलेली असते…म्हणून पूजा आणि हर्षवर्धनच्या लग्नाची स्वप्न शारदादेवी पाहत असतात…पूजा आपला तिरस्कार करतीय ही गोष्ट हर्षवर्धनच्या लक्षात आली म्हणून तात्काळ हर्षवर्धनने पूजाची बदली तात्काळ रद्द केली हे पाहून पूजाला हायसं वाटलं पण प्रत्यक्षात मात्र पूजाने यावर काहीच प्रतिक्रिया दाखवली नाही विशेष म्हणजे हर्षवर्धनचे आभारही तिने मानले नाही…

एक दिवस काही कामासाठी हर्षवर्धनने पूजाला काही कामासाठी केबिनमधे बोलावले…पूजा आली आणि हर्षवर्धनने हसत पूजाला बसण्यासाठी सांगितले….

हर्षवर्धन – या बसा…

पूजा – थँक्स…पण सर तुम्हालाही हसता येतं…[ अचंबित होऊन पूजा सरांकडे पाहून म्हणाली ]

हर्षवर्धन – म्हणजे काय मी माणूस नाहीय का…? आई तुमची आठवण काढतेय…तिला तुम्हाला भेटायचंय…

पूजा – तुम्ही काही महत्वाच्या फाईल्स शोधायला बोलावलं होतं सर मला…मग तुम्ही कामाचं बोलला तर फार बरं होईल…

हर्षवर्धन – मिस पूजा…तुम्हाला माझा राग आहे…माहित आहे पण माझा राग तुम्ही आईवर कशासाठी काढता…? तुम्हा मायलेकीत बहुदा मी भिंतच झालोय असं वाटतंय…

पूजा – यात रागावण्यासारखं काहीच नाहीय सर…रोज रस्त्यात असंख्य माणसं आपल्या डोळ्यांसमोर येत असतात…. आपण एखाद्या स्वप्नांप्रमाणे त्यांना विसरून जातो…मलाही असंच विसरून जा असं आईंना सांगा…

पूजा गंभीरपणे नजर खाली झुकवून म्हणाली…केबिनमध्ये एकदम शांतता पसरली…हर्षवर्धन एकटक पूजाला न्याहाळू लागले…साधेपणा आणि सौन्दर्याचा मिलाप झालेलं पूजाच व्यक्तिमत्व तिच्या स्वाभिमानाने अधिकच खुललं होतं…त्या व्यक्तिमत्वापुढे आपला गर्व,अहंकार सगळं जळून खाक झाल्याची जाणीव प्रथमच हर्षवर्धनला झाली…आपल्यालाही मन,हृदय आहे जे इतकी वर्ष वाळवंटाप्रमाणे रखरखीत होतं…आणि आज अचानक प्रेमाच्या प्रवाहात बुडू लागलंय असं हर्षवर्धनला जाणवलं पुरुष हृदय जे इतकं कठीण होतं ते पूजेमुळे परत सैल झालं याची प्रचिती हर्षवर्धनाला आली…खरंच शारदादेवींसारखं मनाने कठोर असलेला हर्षवर्धन पूजासाठी मृदू स्वभावाचा किंवा कोमल मनाचा होईल…पाहुयात पुढच्या भागात…