Skip to content Skip to sidebar Skip to footer

कर्तव्य

#रीतभातमराठी_लघुकथा_स्पर्धा_ऑगस्ट_22

‘‘विद्या, ए विद्या, अग काय सकाळी सकाळी फोनवर बोलत असतेस? माझा डबा भरून दे.’’
‘‘हो आले आले… आई, मी ठेवते ग फोन. जरा वेळाने करते तुला.’’ विद्या रडवेल्या
आवाजात म्हणाली.
डबा भरायच्या आधी विद्याच्या सासूबाईंची हाक आली, ‘‘विद्या, मला कॉफी दे ग.
आणि यांना चहा.’’
‘‘हो हो… ’’
‘‘जा आधी आई काय म्हणतेय ते बघ. मला अजून दहा मिनिटं आहेत.’’ विकास
म्हणाला.
त्याचं हे उत्तर ऐकून विद्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. तिने न बोलता
विकासचा डबा आधी भरला आणि मग ती आपल्या चहा, कॉफी करायला गेली.
विद्याच्या मनात विचारांचं भयंकर युद्ध सुरू झालं. खरंतर ती सुखी होती. तसा
तिला सासरीही काही त्रास नव्हता, पण तरीही… तरीही काही काही गोष्टी तिला
खटकत होत्या. मुळात तिच्या नवर्‍याचं वागणं तिला खटकत होतं. त्याचं त्याच्या
आई-वडिलांविषयी काळजी करणे आणि विद्याला मात्र आईचा फोन जरी आला

तरी त्याला राग येत असे. एरव्हीचं ठीक आहे, पण आज आईची मन:स्थिती काही
वेगळीच वाटत होती, म्हणून विद्या इतका वेळ फोनवर बोलत होती. नाहीतर तिने
आईला कडक सूचना दिली होती की, विकास ऑफिसला गेले की मीच तुला फोन
करेन. त्याप्रमाणे आईही नियमाने वागत होती, पण आज आईचा नाइलाज झाला
होता आणि प्रसंगाचं गांभीर्य न ओळखताच विकासने विद्याला झापायला सुरुवात
केली होती. विद्या काहीच बोलली नाही. तिने आपलं सर्व आवरलं. सासू-सासर्‍यांचं
जेवण करून ठेवलं तशी तिच्या सासूबाईंची तब्येत चांगली होती. आपलं जेवण-खाण
करण्याइतपत त्या धडधाकट होत्या.
विकास बाहेर पडल्यावर तासा-दोन तासातच ती आवरून बाहेर पडली. जाताना
तिने सासू-सासर्‍यांना सांगितलं की, आईची तब्येत बरी नाही. म्हणून मी आईकडे
जात आहे.
‘‘एकटी कशी जाशील? विकासलाही घेऊन जायचं.’’ सासू-सासर्‍यांनी तिला विचारलं.
‘‘त्यांना कुठे काय किंमत आहे.’’ असं विद्या म्हणाली आणि घरातून बाहेर पडली.
विद्याचं माहेर जवळच होतं तळेगावला. ती राहायची धायरीत. तिने सरळ कॅब बुक
केली आणि ती आईकडे निघाली. विद्या ही तिच्या आईची एकुलती मुलगी होती.
जवळचं सासर मिळावं म्हणजे कधीही हक्काने बोलावता येईल म्हणून विद्याच्या
आईने तिला पुण्यातलंच सासर बघून दिलं होतं. दोन वर्षं झाली होती विद्याचं
लग्न होऊन. बाकी विद्याला काही कमी नव्हतं. विकास तिच्या सगळ्या हौशी-मौजी
पुरवायच्या, पण तिच्या आईविषयी विकासला अजिबात प्रेम नव्हतं असं तिला
जाणवायचं. तिच्या आईचा आलेला फोन किंवा तिचं आईकडे जाणं, आईने तिला
बोलावणं हे त्याला आवडत नसावं. एकदोन वेळा विद्याने त्याच्याशी या विषयावर
बोलण्याचा प्रयत्न केला. विकास, जसे तुझे आई-वडिल आहेत तशीच माझीही आई
आहे. तुझ्या आई-वडिलांकडे लक्ष द्यायला तू, तुझी बहीण आणि मी आहोत. तसंच
आईंची तब्येतही चांगली आहे, पण माझ्या आईकडे बघायला कोण आहे? विकास
तेव्हा हो हो करत असे. ‘‘तू आईचं कर, मी कुठे नको म्हणतोय?’’ असे म्हणत
असे, पण ते तितपतच. नुसती बोलाची कडी बोलाचाच भात!

दोन वर्षांत विकास फक्त दोनदा आईला भेटायला गेला असेल. एरवी विद्या
एकटीच जायची.
‘‘मॅडम, आलं तुमचं डेस्टिनेशन.’’ कॅब चालकाने सांगितल्यावर विद्या एकदम
विचारातून भानावर आली.
‘‘ओहो धन्यवाद! मी गुगल पे करते.’’ म्हणत तिने आपला फोन बाहेर काढला.
आईचा परत मिसकॉल येऊन गेलेला दिसला. ती गडबडीने उतरली. घराच्या दारातच
कॅब आलेली पाहून शेजारच्या काकू तिच्याच आईच्या घरातून बाहेर आल्या.
‘‘विद्या आली. (आईला ऐकू जाईल अशा आवाजात त्या म्हणाल्या.) ये ये मला
वाटलंच तू असशील.’’
‘‘कशी आहे आई?’’ विद्याने धावत आत येत विचारलं.
‘‘बर्‍या आहेत आता, पण रात्रभर नुसतं तुझ्या नावाचा जप चाललाय. ताप
चांगलाच आला होता. बस मी चहा करते.’’
‘‘काकू, नको. आधीच तुम्ही इतकं केलंय हेच खूप आहे.’’
‘‘अग बस. मी चहा करते.’’ म्हणत काकू आत गेल्या.
विद्या पाय धुऊन आली आणि आईजवळ बसली. आईचा हात हातात घेतला.
‘‘कशी आहे तब्येत आता?’’ विद्यानं विचारलं. आईचा सुकलेला चेहरा बघून तिला
कसंतरीच झालं.
‘‘बरी आहे ग, पण तू सकाळी माझा फोन का ठेवलास? तुझ्याशी खूप बोलावंसं
वाटत होतं.’’ आई कळवळून म्हणाली.
‘‘अगं आई, आता आले ना मी, आता बोलू आपण.’’ विद्या आईच्या डोक्यावरून
हात फिरवत म्हणाली. तेवढ्यात काकू चहा घेऊन आल्या. काकूंना बघून विद्याला
भरून आले.
‘‘काकू, तुम्ही होतात म्हणून…’’
‘‘अगं असं काय करतेस? आपण आज का ओळखतो एकमेकांना. अशा वेळी
शेजारीपाजारीच उपयोगी पडतात.’’ काकूंनी तिला समजावले.
‘‘बरं विद्या, आता मात्र मी जाते हो. काही लागलं तर सांग.’’ म्हणत काकू निघून
गेल्या. विद्या थोडा वेळ आईजवळ बसली मग आईसाठी गरमागरम मऊसर

डाळतांदळाची खिचडी तिने केली. विद्याला बघितल्यावरच आईला निम्मं बरं वाटलं
होतं. खिचडी खाऊन थोड्या गोळ्या घेऊन आई झोपली. मग विद्याने तिच्या
माहेरच्या फॅमिली डॉक्टरना फोन केला. डॉक्टर म्हणाले,
‘‘विद्याताई, मी तुला फोन करणारच होतो. काकूंचा आजार मानसिक आहे. त्यांना
अलीकडे एकटेपणाची भीती वाटू लागली आहे.’’
‘‘हो डॉक्टर. मलाही ते जाणवलं. मी बघते काहीतरी…’’ असं विद्या म्हणाली खरं,
पण जो नवरा आईशी फोनवर बोलल्यावरून चिडतो तो आईला आपल्याकडे
न्यायला तयार होईल का? या विचाराने विद्याच्या डोळ्यांत पाणी आलं. आपण
खरंच लग्नच करायला नको होतं. आईने आपल्यासाठी इतक्या खस्ता खाल्ल्या,
पण आपण मात्र. पण तेव्हाही आईचाच हट्ट. ‘लग्न कर लग्न कर. मी काय आज
आहे उद्या नाही.’
विचाराच्या थकव्याने विद्याला ग्लानी आली. ती जरा झोपली. इकडे तिच्या फोनवर
विकासचे 10-12 वेळा फोन येऊन गेले होते. पण तिला फोन उचलावा वाटत
नव्हते. मध्येच तिच्या सासूबाईंनी केलेला फोन मात्र तिने उचलला. त्यांनी आईची
प्रेमाने चौकशी केली. आईशीही दोन शब्द बोलल्या. विद्याला काळजी करू नकोस
म्हणाल्या. विकासला पाठवू का? असंही त्यांनी विचारलं, पण नको काही गरज
नाही असं सांगून विद्याने फोन ठेवून दिला.
दुसर्‍या दिवशी विद्याने मनात काही आराखडे बांधले होते. आपल्या आसपास कुठे
रिकामा ब्लॉक आहे का याची चौकशी करायची असं तिनं ठरवलं होतं. आई आणि
ती मस्तपैकी बसून उपीट-चहा असा नाश्ता करत असताना घराजवळ गाडी
थांबल्याचा आवाज आला. विद्याला आश्‍चर्य वाटले. अत्ता कोण आले म्हणून तिने
खिडकीतून पाहिले तर विकास आणि त्याचे आई-बाबा आले होते. खरंतर तिला
आनंद झाला होता. पण कालचा थोडासा राग होता विकासवर म्हणून तिने
चेहर्‍यावर तसे दर्शविले नाही.
विद्याच्या सासू-सासर्‍यांनी विकासने आईची चौकशी केली. सासूबाईंनी विद्याला
आईला घेऊन आपण आपल्या घरी जाऊया असं सांगितलं. तिने विकासकडे
बघितलं.

‘‘आई, तुम्ही खरंच आमच्याकडे चला. इकडे एकटे राहण्यापेक्षा तिथे तुम्हाला बरं
वाटेल.’’ विकास पण अगदी मनापासून म्हणाला.
‘‘मला तर वाटतं कायमचंच तुम्ही तिकडे चला.’’ विद्याच्या सासूबाई म्हणाल्या.
त्यावर विद्या म्हणाली,
‘‘हो मलाही तसंच वाटतं. पण आई तशी यायची नाही. आपण तिच्यासाठी आपल्या
घराजवळ एक फ्लॅट बघुया.’’
‘‘तू त्याची अजिबात काळजी करू नकोस. सासूबाईंचा स्वाभिमानी स्वभाव मला
माहीत आहे, त्या आपल्याकडे कायमचं यायला तयार होणार नाहीत म्हणून मी
आपल्या समोरच्या बिल्डींगमध्ये एक रिकामा फ्लॅट आहे त्याच्या मालकाशी आजच
संपर्क साधला आहे. त्यांनी तो फ्लॅट बघायला आपल्याला बोलावलं आहे तेव्हा
तुम्ही लवकर आवरा. दुपारचं जेवण करून आपण सगळे आपल्या घरी जाऊ. काय
आई? येणार ना आमच्या जवळ राहायला?’’ विकासने विद्याच्या आईला विचारलं.
‘‘आता तुम्ही काय ठरवाल ते!’’ असं म्हणत विद्याच्या आईचे डोळे भरून आले
होते.
विद्या आत स्वयंपाक घरात आवरायला गेल्यावर हळूच विकास आत गेला आणि
विद्यासमोर कान धरून म्हणाला,
‘‘मला माफ कर. तुझ्या आईबद्दलचं तुझं प्रेम, कर्तव्य मी पार विसरून गेलो होतो.
पण आता मात्र तसं होणार नाही.’’ त्याच्या या बोलण्याने कालचं त्याच्या वर्तनाला
माफ करून विद्या त्याच्या मिठीत विसावली.
सौ. शिल्पा पराग कुलकर्णी

====================

तुम्हालाही स्पर्धेसाठी लिहायचं असल्यास आम्हाला ritbhatmarathi@gmail.com ह्या ई-मेल आयडी वर नक्की संपर्क साधा.

Leave a Comment

error: