पंचमहाभुतांचा तेजःपुंज अवतार असलेला कोल्हापूरचा ज्योतिबा माहिती आणि कथा

jyotiba information in marathi:
अनेक शहरांची विशिष्ठ अशी वेगळी ओळख असते. मग ती ओळख काही खाण्याच्या पदार्थांमुळे असेल,किंवा काही कपड्यांमुळे असेल किंवा मग अजून कशामुळे. पण त्या गोष्टीचे नाव समोर आले की ती ती शहरे, गावे डोळ्यांसमोर येतात. जसे की, रत्नागिरीचा हापूस, सोलापूरच्या चादरी, साताऱ्याचे कंदी पेढे, महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी असे अनेक उदाहरणे देता येतील. अशीच ओळख काही मंदिरे आणि देवस्थान यावरून पण त्या शहरांना असते.
किंवा एखाद्या शहराचे नाव घेतले की तेथील प्रसिद्ध असलेले मंदिर आठवतात. जसे की, पंढरपूर म्हटलं की आठवते ते विठ्ठल रखुमाईचे मंदिर, गाणगापूर म्हटले की दत्त मंदिर, नरसोबाच्या वाडीमधील नरसोबाचे मंदिर, बार्शी म्हटले की भगवंत मंदिर. अशी अनेक ठिकाणे आहेत. असेच एक नावलौकिक प्राप्त झालेल्या मंदिरातील देवाची माहिती करून घेऊया, ज्याच्या नावामुळे कोल्हापूरला लौकिक आणि महत्त्व प्राप्त झाले. तसेच त्याच्या भौतिक आणि ऐहिक ऐश्वर्यात भर पडली. ते दैवत म्हणजे दख्खनचा राजा म्हणून ख्याती असेलेले कोल्हापूरचे जोतिबा मंदिर.
दख्खनचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री जोतिबामुळे कोल्हापूरला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. वाडी रत्नागिरी येथील श्री जोतिबा महाराष्ट्राचे लोकदैवत असून निसर्ग सौंदर्याने नटलेले आहे. डोंगरावरील उंच सखल भागात हे गावठाण वसलेले असून पाच हजार लोकवस्तीच्या गावात ९९ टक्के लोक गुरव समाजाचे आहेत. यातील बहुतांश लोकांचा उदरनिर्वाह देवराकृत्य, तसेच नारळ, गुलाल, मेवा मिठाई या दुकानावरच चालते.
हे स्थान समुद्र सपाटीपासून ३१०० फूट उंचीवर आहे. जोतिबाच्या डोंगर भोवतालचा परिसर निसर्ग सौंदर्याने भरून गेलेला आहे. रत्नागिरीची वाडी म्हणून ओळखले जाणारे हे मंदिर कोल्हापूरच्या वायव्येस साडेसतरा किमी अंतरावर आहे. पन्हाळगढ, पावनगढ पुढे सोंडेसारखा शंखाकृती जो भाग वर गेलेला दिसतो तो जोतिबाचा डोंगर. या डोंगरावर प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेले जुने मंदिर आहे.
१. जोतिबा म्हणजे नक्की कोण आहे ??
तर अगस्ती मुनींनी रत्नागिरी डोंगरावर अनेक वर्षे तपश्चर्या केली होती. त्यावेळी त्यांनी बारा जोतर्लिंग स्थापन केले होते. त्यापैकी केदारनाथचे मंदिर हे मुख्य मंदिर. जोतिबा हे बद्रिकेदनाथचे रुप आहे. ब्रह्मा, विष्णू आणि महेश तसेच जमदग्नी यांचा मिळून तेजपुंज अवतार म्हणजे जोतिबा किंवा केदारनाथ. जोतिबा या नावाची उत्पत्ती जोत या शब्दापासून झाली. जोत म्हणजे तेज, प्रकाश. म्हणूनच पंचमहाभूतेपैकी वायू, तेज, आप ( पाणी ), आकाश आणि पृथ्वी यांचे शक्ती दैवत म्हणजे जोतिबा.
२. जोतिबाची कथा
जोतिबाच्या प्रकट रुपाची एक कथा आपल्याला पुराणात पाहायला मिळते, ती म्हणजे पौगंड ऋषींच्या वंशाला दिवा नव्हता. त्यामुळे त्यांनी तपश्चर्या करून ब्रदिनाथांना संतुष्ट केले. ब्रदिनाथांनी पौगंड ऋषी व त्यांची पत्नी विमलांबुजा यांच्या पोटी जन्माला येण्याचे वचन दिले . त्याप्रमाणे चैत्र शुद्ध पष्ठीच्या मुहूर्तावर ऋषी स्वतः आठ वर्षांची बालमुर्ती होऊन जन्माला आले. ब्रदिनाथ हे ऋषी आणि त्यांच्या पत्नी समोर अवतरले. ही जन्मास आलेली मूर्ती म्हणजेचब्रदिनाथांची प्राणज्योती.
म्हणून त्यांचे नाव जोतिबा असे ठेवले. ऋषींना वाटत होते आपला पुत्र हा जगाचा तारणकर्ता व गरिबांचा कैवारी असावा. अशीच इच्छा त्यांची पत्नी विमलांबुजाची यांचीही होती. त्याप्रमाणे त्यांच्या ओंजळीत केदारनाथांची प्राणज्योत प्रकट झाली आणि हेच जोतिबाचे रूप. जोतीर्लींग या शब्दाचा अपभ्रंश गावठी भाषेत जोतिबा असा झाला आणि पुढे हेच नाव प्रसिद्ध झाले. श्री जोतिबा यांना केदारलिंग, रवळनाथ, सौदागर या नावांनी ओळखले जाते.
हेही वाचा
जाणून घ्या साई बाबा नेहमी पांढरेच कपडे का घालत?
श्रावणी शुक्रवारचे महत्व, जिवतीचा कागद म्हणजे काय? जिवतीची कथा आणि पूजा विधी
जाणून घ्या श्रावणात सोमवारच्या दिवशी शंकराच्या पूजेला एवढं महत्व का आहे?
३. जोतिबाची मूर्ती
श्री जोतिबाची मूर्ती बटू भैरवनाथाच्या अवतारातील असून चतुर्भुज आहे. जोतिबाचे वाहन घोडा आहे. मूर्ती स्वयंभू असून साडेचार फूट उंच आहे.
श्री जोतिबाची मूर्ती ही काळ्या घोटीव पाषाणात कोरलेली आहे. ही मूर्ती चतुर्भुज म्हणजेच चार हातांची आहे. त्यांच्या हातात खड्ग, पान पात्र, डमरू आणि त्रिशूल आहे. श्री जोतिबाचे उपवाहन शेष नाग आहे. तर श्री जोतिबाचे शरीर रक्षक काळभैरव हे आहेत. यांच्या मूर्ती मंदिराच्या बाहेरच्या बाजूला असून तेथेच मूळ जोत् तेवत असते.
शेष नाग आणि शरीर रक्षक काळभैरव यांना खूप महत्त्व असल्याने जोतिबाचे दर्शन घेण्याअगोदर काळभैरव आणि जोतीचे दर्शन घेण्याची परंपरा आहे. याच मंदिरात जोतिबाची बहिण यमाई देवी यांचीही दगडाची मूर्ती असून मूर्तीला शेंदूर लावलेला आहे. श्री जोतिबाला गुलाल,दवणा,खोबरे व खारका खूप प्रिय आहे.
श्री जोतिबाची रोज तीन वेळा पूजा बांधण्यात म्हणजे करण्यात येते. साधी पूजा सकाळच्या महाअभिषेक अगोदर, दुसरी खडी पूजा दुपारच्या वेळी आणि तिसरी पूजा बैठ्या स्वरूपात असते. ही पूजा दुपार नंतर करण्यात येते. दर शनिवारी बारा ते तीनच्या दरम्यान घोड्यावर बसलेली पूजा बांधली जाते.
४. जोतिबाचा सण उत्सव कसा साजरा केला जातो ?
हे दैवत महत्त्वपूर्ण असल्याने अनेक सण उत्सव येथे साजरे करण्यात येतात. जोतिबा वर सरता रविवार, लळित सोहळा, नगरप्रदक्षिणा, अकरा मारुती दिंडी, नवरात्रोत्सव, पालखी सोहळे, श्रावण षष्ठी यात्रा असे अनेक सण-उत्सव साजरे केले जातात. जोतिबाचे दर्शन आपल्याला नेहमीच घेता येऊ शकते. पण ठराविक दिवशीच हे मंदिर रात्रंदिवस उघडे असते.
चैत्र यात्राकाळात तीन दिवस, श्रावण षष्ठी यात्रेत, चैत्र षष्ठीस, लळित सोहळ्यास, विजयादशमीचा जागर या दिवशी ते रात्रंदिवस खुले असते. इतर दिवशी मात्र काही वेळ मंदिर बंद देवण्यात येते. म्हणजेच दर्शनाची ठराविक सकाळची आणि संध्याकाळची वेळ ठरलेली असते.
श्री जोतिबाची आरती १
भगीरथी मुळ शितल हिमाचल वासी । नलगत पल खलदुर्जन संहारी त्यासी ।
तो हा हिम केदार करवीरा पाशी । रत्नागिरीवर शोभे कैवल्य राशी ।
जयदेव जयदेव जय जय श्री केदारा । दासा संकटवारा भव भय निवारा ।।१।।
उत्तरेचा देव दक्षिणी आला । दक्षिण केदार नाम पावला ।
रत्नासूर मर्दूनी भक्ता पावला । दास म्हणे थोर भाग्या लाभला ।
जयदेव जयदेव जय जय श्री केदारा । दासा संकटवारा भव भय निवारा ।।२।।
श्री जोतिबाची आरती २
चांगभलं रं देवा चांगभलं रं
जोतिबाच्या नावानं चांगभलं रं
नाव तुझं मोठ्ठं देवा कीर्ती तुझी भारी
डंका तुझा ऐकुनी गा आलो तुझ्या दारी
किरपा करी माझ्यावरी हाकेला तू धाव रं
चांगभलं रं..
भल्या उंच डोंगरात देवा तुझा वास रं
मर्जी तुझ्या भक्तावरी देवा तुझी खास रं
चुकलीया वाट ज्याची त्याला तुझं दार रं
ज्याला नाही जगी कोणी त्याचा तू आधार रं
आलो देवा घेउनी मनी भोळा भाव रं
देवा गोड माझी ही मानुनिया घे
नाही मोठं मागणं नाही खुळी हाव रं
बापावाणी माया तू लेकराला दे
डोई तुझ्या पायावर, मुखी तुझं नाव रं
चांगभलं रं
==========