Skip to content Skip to sidebar Skip to footer

जीव लावावा लागतो!

©️®️ सौ. गीता गजानन गरुड.

माहेरी, मायाला लालबागच्या गजबजाटात रहायची सवय होती. वन रुम किचनचं माहेर तीचं पण शेजाऱ्यांचा सदा राबता असायचा.

चहाचं आधण तर दिवसभर ग्यासवर असायचं. जोडीला लाडू, चिवडा, गप्पा. दारावर सतत कुणी ना कुणी फेरीवाला येत असायचा.

सकाळीच सकाळी फुलवाला यायचा, त्याच्या टोपलीतली फुलं सुगंधाची पखरण करायची. काय नसायचं त्या टोपलीत..पांढऱ्याशुभ्र नाजूक सोनटक्क्याच्या जुड्या, गावठी गुलाबं,सुवासिक माली,सोनचाफी,कवठीचाफा,जाईजुईचे,सायलीचे,मोगऱ्याचे,अबोलीचे गजरे,शेवंतीच्या वेण्या. सगळ्याजणी काही न् काही खरेदी करायच्या. गप्पा मारत वेणीफणी करायच्या न् फुलं माळून पुढच्या कामांना लागायच्या.

जेवताना एखादं पोरगं गोडीडाळच हवी म्हणून पिरपिरायचं मग त्याची आई त्याला वाटी घेऊन शेजारणीकडे पाठवायची. “गे वहिनी, ह्या सचल्याक पाठवलय. ह्याका थोडी गोडीडाळ दी गे. त्याचो घास जाना नाय खाली गोड्या डाळीशिवाय.” मग सचिन शेजारच्या घरी जाऊन वरणाची वाटी नि जोडीला बटाट्याची भजी केली असली तर तीही घेऊन यायचा नि खुशीत जेवायचा.

दुपारचा खांद्याला लाकडी पेटी लावून कासार आला की सख्याशेजारणींचा एकच गलका होई. मंदे, रेशमी भर गं यावेळी. दुसरी..नको गं कॉफी भर तर तिसरी भाऊ, ते बेंटेक्स कं काय नवीन आलंय त्यातल्या दाखवा जरा. दिवाळी जवळ येतेय? चुड्याच्या मागे दोन,मधे दोन न् पुढे दोन भरा. हात कसा भरलेला दिसेल नाही आणि या छबीच्या नाकात खड्याची चमकी घालून द्या..दोन वर्षाच्या मुलीसाठी पैंजण आहेत का हो. गावची भावजय यायचीय. तिच्या लेकीसाठी घेईन म्हणते.. असा सगळा माहोल असायचा.

अशा चाळीच्या वातावरणात लहानाची मोठी झालेली माया. घरीही आईवडील,आजीआजोबा,भावंड असं भरलेलं कुटुंब..त्यामुळे माणसांची आवड होती मायाला. श्वास घेण्यासाठी नुसती हवाच लागत नाही तर आजुबाजूला सुखदु:खाची देवाणघेवाण करणारी मायेची माणसंही तितकीच महत्त्वाची असतात अशा विचारांची ती.

मायाच्या मामाने तिच्यासाठी विजयचं स्थळ आणलं. विजय नुकताच नवी मुंबईतील एका कंपनीत चांगल्या हुद्द्यावर नोकरीला लागला होता.  मायाच्या विनम्र स्वभावाने पहाताक्षणीच ती विजयला  पसंत पडली. दोनेक महिन्यांत विजय व मायाचं लग्न झालं.

विजयचं मायाशी लग्न झाल्यानंतर पहिले सहा महिने माया सासुसासऱ्यांसोबत गावी राहिली. मग विजयने नवी मुंबईत घर घेतलं व मायाला सोबत घेऊन आला.

त्याकाळी नवी मुंबई नव्याने विकसित होत होती. विस्तीर्ण, लांबरुंद रस्ते. दुपारचं तर रस्त्यांवरती चिटपाखरु देखील नसायचं. आईला फोन करुन आईशी,आजीशी बोलत बसेल तर आत्तासारखे मोबाईलही नव्हते तेंव्हा. मायाचा वेळच जात नसे. भली मोठी दुपार तिला खायला येई. खिडकीतून दिसणारा तो रस्त्याचा लांबलचक राखाडी पट्टा माया दीनवाणेपणे पहात बसायची. बाहेर सगळ्यांच्या घराची दारं बंद असायची. इथं नक्की माणसं रहातात का..असा मायाला प्रश्न पडे.

एकट्या मायाचा वेळ जाता जात नसे, मग ती दरवाज्याच्या लुप होलमधून बाहेर बघायची. कुणीच नसायचं बाहेर पण समोरच्या फ्लेटमधून एक आजोबा मात्र बाहेर पडायचे,चार वाजता. बिल्डींगच्याखाली छोटसं पोळीभाजी केंद्र होतं. तिथून ते प्लास्टीकच्या पिशवीतून चहा घेऊन यायचे. परत साडेसहाला जाऊन भाजीपोळी घेऊन यायचे.

मायाने पोळीभाजीवाल्या काकूंकडे त्यांच्याबद्ल चौकशी केली. त्या म्हणाल्या,”साठे आजीआजोबा रहातात तुमच्या मजल्यावर . बाकीचे दोन ब्लॉक बंद आहेत. त्या आजी जिन्यातून पडल्या. तेंव्हापासून आजोबा माझ्याकडून जेवण,चहा,नाश्ता घेऊन जातात. त्यांनाही चढउतार झेपत नाही. दुकानात मिस्टर असले की मीच वरती नेऊन देते पण रोज नाही जमत मला.”

मायाला वाटलं..जावं का त्या आजीआजोबांकडे..पण आवडेल का त्यांना? तिने मनात आलेले विचार मागे सारले नि घरात येऊन स्वैंपाकाला लागली. दोघांचा स्वैंपाक तिला भातुकलीसारखा वाटायचा. कितीही नाही म्हंटलं तरी अन्न उरायचंच.

दुसऱ्या दिवशी सकाळी आजोबांनीच मायाच्या घराची बेल दाबली. विजयही घरातच होता.
“अहो, आमची ही पडली हो बाथरूमात. जरा येता का प्लीज.”

विजय व माया लगेच आजोबांपाठोपाठ गेले. त्यांच्या प्यासेजमध्ये टॉयलेटच्या बाजूच्या कोपऱ्यात आजी पडली होती. ती थरथरत होती. बेसिनला आपटल्याने कपाळावर टेंगूळ आलं होतं.

विजय व माया दोघांनी मिळून तिला उचललं व बेडवर झोपवलं. मायाने उशाजवळची आयोडेक्सची बाटली घेतली नि आजीच्या टेंगुळावर हलक्या हाताने आयोडेक्स लावलं. मायाच्या बोटांच्या उबदार स्पर्शाने आजी बरीच सावरली.
आजोबा थँक्यू म्हणू लागले.

विजय म्हणाला,” अहो आजोबा थँक्यू कसलं. काही लागलं तर माझ्या बायकोला,मायाला हक्काने सांगा.”
तितक्यात माया चहा करुन घेऊन आली.
छान वाफाळता,आलं ठेचून घातलेला,वेलचीयुक्त चहा.
चहाच्या सुवासानेच आजोबांची कळी खुलली.
आजीच्या डोळ्यांत समाधान तरळलं.

माया म्हणाली,”आजीआजोबा, आजपासून तुमचा स्वैंपाक मी आणून देत जाईन. चहा,नाश्ता,जेवण,सारं. तुम्ही उगा धावपळ करायची नाही. मला इथे माझ्या आजीआजोबांची, आईवडलांची आठवण येत असते. घर नुसतं खायला उठतं. तेवढाच माझा वेळही जाईल व आजींकडून नवीननवीन पदार्थ शिकून घेता येतील.”
आजोबा आजीच्या तोंडाकडे बघू लागले.
मग आजीच म्हणाली,”पैशाचं काय. पैसे घेत असशील तरच दे गं. उभ्या जन्मात यांनी कधी कुणाकडून काही फुकट घेतलं नाही गं.”

“अहो,आजी द्या हो तुम्हाला द्यायचे तेवढे पैसे द्या. मी कुठे नको म्हणतेय. पण आजोबांची तंगडतोड वाचेल जराशी.” माया म्हणाली.

तेंव्हापासून रोज माया आजीआजोबांना वेळेवर नाश्ता,जेवण नेऊन देऊ लागली. दुपारची आपलं जेवणाचं ताटही त्यांच्याकडे घेऊन जाऊ लागली. मायाच्या प्रेमळ सोबतीमुळे साठे आजींच्या तब्येतीतही सुधारणा होऊ लागली.

साठे आजींची मुलगी व मुलगा दोघे साठे आजीआजोबांच्या वाढदिवसासाठी येणार होते. दोन दिवस आधी आले दोघंही. सोबत दोघांची कुटुंब.

साठे आजीने मायाशी त्यांची ओळख करुन दिली व माया त्यांना रोज कसं गरमागरम खाऊ घालते हेही सांगितलं.

आजीआजोबांच्या वाढदिवसाला बरीच नातेवाईक मंडळी जमली होती. सारं जेवण बाहेरून मागवलं होतं. विजय व मायानेही आजींना छानसा कपसेट गीफ्ट केला.

आजोबांनी त्या दोघांना त्यांच्यासोबत जेवायला बसवलं. साठे आजीच्या सुनेला यात काही काळंबेरं दिसत होतं.
मायाचं जेवण होताच तिने तिला आत बोलावलं व सरळ विचारलंच,”माया,आजकाल कोणी कोणासाठी एवढं करत नाही. खरं खरं सांग मला. आमच्या इस्टेटीवर तुझा डोळा आहे नं.”

आजी कौतुकाने मायाची ओटी भरण्यासाठी साडीचोळी,श्रीफळ सुपात घेऊन येत होती. माया म्हणजे आजीच्या नजरेत तिची माहेराला आलेली लेकच होती. काही थोडक्या दिवसांत मायाशी आजी,आजोबांचे ऋणानुबंध जोडले गेले होते.

सुनेचे जीभेच्या विस्तवावर तापलेले  शब्द आजीच्या कानी पडले. आजीला आपल्या फटकळ,गर्विष्ठ सुनेचा प्रचंड संताप आला. आजी सुनेला  म्हणाली,”सूनबाई, काय आणि कोणाला बोलत आहेस तू! भानावर आहेस का! घरी आलेल्या लक्ष्मीचा अपमान करते आहेस तू. जरा जीभेला आवर घाल सूनबाई.

सूनबाई, मान मागून मिळत नाही. तो मिळवावा लागतो. एखाद्यावर जीव लावावा लागतो. तुमच्या लग्नाला वीस वर्ष झाली. तू आम्हाला कधी आपलं मानलंच नाहीस. कधी तुमच्या घरी बोलवलं नाहीस. सहा महिन्यातून एकदा कर्तव्य म्हणून फोन करता आणि ही पोरगी, ही आमची ना नात्याची ना गोत्याची. प्रेमाची भुकेली बिचारी. तिने आम्हाला जरा प्रेम दिलं. आमच्या वाळवंटी आयुष्यात जरा प्रेमाची फुलं फुलवली तर तू तिच्याकडे संशयाने पहातेस. कावीळ झालेल्याला सगळं जगच पिवळं दिसतं म्हणतात ते खरंच. तुझी संपत्ती तुला लखलाभ.  तुमच्या संपत्तीतला मला एक छदामही नको पण माझं हे घर,दागिने,गुंतवणुकी साऱ्यावर माझा व ह्यांचा हक्क आहे. तेंव्हा याच्यापुढे बोलताना नीट विचार करुन बोल हो.”  सुनबाई तोंड फिरवून निघून गेली.

माहेराला दुरावलेल्या न् आजीच्या सावलीखाली माहेरमाया शोधू पहाणाऱ्या मायाला आजीच्या सुनेने क्षणात तोडलं होतं. तिला व्यावहारिक दुनियेची ओळख करुन दिली होती. प्रत्येक गोष्ट करण्यात स्वार्थच असतो या आजीच्या सुनेच्या मोजपट्टीने तिने मायाचा सेवाभाव मोजला होता. क्षणात मायाला ती परकी असल्याचं आणि रक्ताची नातीच खरी असल्याचं दाखवून दिलं होतं.

आजीच्या सूनबाईच्या तोडून बोलण्याने मायाचं ह्रदय विद्ध झालं. मायाच्या डोळ्यातल्या आसवांनी पापणकाठ कधीचे ओलांडले होते.

आजीने मात्र मायाला कुशीत घेतलं व तिची आसवं पुसली. आजी म्हणाली, “माया,देवानेच पाठवलेय गं तुला आमच्यासाठी. बाकीच्यांची बोलणी नको मनाला लावून घेऊस. हस बघू आत्ता तुझ्या आजीसाठी.”

समाप्त

===============

प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.

https://www.facebook.com/ritbhatmarati/

तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही

=============

हेही वाचा

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

Leave a Comment

error: