Skip to content Skip to sidebar Skip to footer

झोपाळा भाग 2

एकदम सकाळीच तिला जाग आली. तिने उठताच दार उघडलं तर कालच्या रात्रीच्या भीतीचा मागमूसही तिला झाला नाही. सर्व काही शांत, प्रसन्न होतं. तिनं गरम गरम चहा केला आणि झोपाळ्यावर बसून ती चहा पिऊ लागली. बसायच्या आधी तिला थोडी भीती वाटली, पण नंतर मात्र ती आरामात बसली होती.

नंतर नंतर ती जेव्हा केव्हा संध्याकाळी झोपाळ्यावर बसायचा प्रयत्न करत असे तेव्हा काहीतरी कारणाने झोपाळ्यावर बसणेच होत नसे आणि जास्त प्रयत्न केला, तर काही तरी दुखापत होणे किंवा काहीतरी अडचण येणे असा प्रकार होत असे. शाळेतही दोघा-तिघांनी तिला विचारलं होतं, ‘‘तू त्या घरात राहतेस? तुला काही त्रास होत नाही?’’ रसिकाला त्यांच्या या विचारण्याचं आश्‍चर्यच वाटायचं.

‘‘नाही! का बरं असं का विचारता?’’ असं म्हणायची, पण त्यावर कोणीच काही बोलायचं नाही. रसिकाचं मन आता शाळेत, नव्या गावात रमलं होतं. मधूनच ती आपल्या गावीही जाऊन येत होती. राकेश मात्र तिच्या गावी यायला तयार नसे. रसिका एकदा मुलांना घेऊन ये म्हणून खूप मागे लागली होती, पण तो त्याला तयार नव्हता. त्याच्या मनात कसली भीती आहे हे रसिकाला कळत नव्हते.एकदा तिला झोपाळ्याचा आवाज ऐकू आला होता, नंतर परत तिला आवाजही ऐकू आला नव्हता. एक दिवस रसिका जरा लवकरच घरी आली होती. तिच्याकडे तिची एक मैत्रीण राहायला येणार होती. ती रसिकासारखी या गावात नवीनच आली होती. समदु:खी म्हणतात तशा त्या दोघीजणी एकमेकींच्या जिवलग झाल्या होत्या. रसिका कधीतरी तिच्याकडे राहायला जात असे, पण ती मात्र तिच्याकडे आली नव्हती आज रसिका हट्टाने तिला घेऊन आली होती.

रसिकाने एक नियम पाळला होता, ती संध्यकाळी कधी झोपाळ्यावर बसत नसे, कारण तिला अत्ता पक्की खात्री झाली होती, की संध्याकाळच्या वेळी झोपाळ्यावर बसायला गेलं तर काहीतरी अडचण येतेच येते, पण आज गप्पांच्या नादात दोघी चहा घेऊन झोपाळ्यावर बसायला जाणार तोच तिची मैत्रीण एकदम चक्कर येऊन पडली. नशीब चहामुळे तिला भाजलं नाही. रसिकाला काही समजेचना. आत्तापर्यंत हसणारी, खिदळणारी मैत्रीण एकदम चक्कर? तिने तिला सावरलं आत नेऊन कॉटवर झोपवलं.

थोड्या वेळाने ती मैत्रीण जागी झाली. आणि म्हणाली, ‘‘तुझा झोपाळा भयंकर आहे. मला घरी सोड.’’

‘‘अग इतक्या रात्री कुठे घरी सोडू? मी इथे एकटी राहते, तुला काही होणार नाही.’’ पण ती मैत्रीण जी घाबरली ती घाबरलीच. नाइलाजाने तिने ती रात्र तिथे काढली, पण दुसर्‍या दिवशी कधी सकाळी होते आणि कधी आपण घरी जातो असे तिला झाले. रसिकाने तिला झोपाळ्याविषयी खोदून खोदून विचारले, पण तिला काहीच सांगता येत नव्हतं. किंबहुना ती त्याबद्दल काही सांगायला गेली की, आपले शब्दच फुटत नाहीयेत असं तिला वाटायचं. असाच अनुभव राकेशला आला होता.

थकल्या-भागल्याने रसिकाला जरा डोळा लागला तेव्हा तिला एक स्वप्न पडलं, ‘‘तुला इथे राहायला मी नाही म्हणत नाही, पण संध्याकाळच्या वेळी माझ्या झोपाळ्याकडे फिरकायचं नाही. आणि आणखीन एक तुझ्याशिवाय दुसर्‍या कुणाला इथे आणायचं नाही. समजलं?’’ असं एक लाल साडी नेसलेली जरा वयस्कर अशी बाई तिला दरडावून सांगत होती. रसिका एकदम जागी झाली, तर बाहेर झोपाळ्याचा आवाज येत होता. गाण्याचे काही स्वर ऐकू येत होते. ती पार घाबरून गेली होती.

त्या दिवशी रात्रभर जागीच राहिली. सकाळ होताच तिची मैत्रीण तिच्या घरी गेली. रसिकानेही आपले चंबूगबाळं आवरून दुसर्‍या घरात जायचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे तिने आवराआवरी सुरू केली. आजच्या दिवशी मैत्रिणीकडे राहू आणि उद्यापासून नवीन घर बघायला सुरुवात करू असा तिने विचार केला. अजूनपर्यंत आपल्याला काही त्रास झाला नाही, पण आपली मैत्रीण, आपला नवरा यांना काहीतरी जाणवलं आहे, न जाणो आपल्याला कधी त्रास होईल सांगता येत नाही या विचाराने ती मनातल्या मनात घाबरून गेली होती. आतापर्यंत तिला इथे येऊन 4-5 महिने झाले होते. घरातल्या एकेका गोष्टीशी तिचे नाही म्हटले तरी धागे जुळले होते. तिला हे घर सोडावंसं पण वाटत नव्हतं, पण नाइलाज होता. तिची हळूहळू आवराआवरी चालली होती आणि अचानक तिला सणकून ताप भरला. इतका की ती जागची हलू शकत नव्हती. आता काय करायचं? कसंबसं तिने दोन घास घाऊन घेतले. आणि पांघरूण घेऊन ती झोपून गेली. तिला ग्लानी आली होती. रात्री तिला जाग आली तेव्हा ती क्षणभर हादरलीच. तिच्या पायाशी ती लाल साडीवाली बाई बसली होती. गोरी-गोमटी, केस सोडलेले, पण तिचा चेहरा विलक्षण प्रेमळ वाटत होता. काल तिला स्वप्नात दिसलेली ती हीच बाई. ती चक्क रसिकाचे पाय चेपत होती.

रसिका एकदम उठून बसली. तिला जाग आलेली बघताच ती बाई सावकाश बोलली, ‘‘मुली, घाबरू नको.’’ पण रसिकाचा तर थरकाप उडाला होता. पण त्या बाईचा मधुर आवाज ऐकून तिला आश्‍चर्यच वाटलं.

तिने घाबरतच त्या बाईला विचारलं, ‘‘तुम्ही कोण?’’

‘‘मी या घराची मालकीण.’’ तिने सांगितलं.

‘‘मालकीण?’’

‘‘हो, पण.. तुला वाटतं तसंच आहे, मी जिवंत नाही.’’

‘‘काय ऽऽ ऽ ?’’ म्हणून रसिका पडण्याच्या बेतात असतानाच तिने परत तिला सांभाळलं. त्या शक्तीला काही अवघड नव्हतं.

‘‘मी काय सांगते ते नीट ऐक. अजिबात घाबरू नकोस. मी तुला काही करणार नाही.’’

‘‘पण …’’

‘‘हे माझं घर होतं. मी आणि माझी मुलगी या घरात राहात होतो. मुलीचं लग्न झालं आणि मी एकटी पडले. मग माझ्या दिरांनी मला फसवून हे घर काबीज केलं आणि मला वृद्धाश्रमात नेऊन टाकलं, पण या घराची माझी आसक्ती सुटली नाही. तसंच त्यांनी फसवल्याचा राग होताच. या सार्‍या शोकातच माझा मृत्यू झाला पण मी या घरात कायमची वास्तव्याला आले. या झोपाळ्यावर मी माझी जागा ठेवली. दीर, जाऊ यांना मी सतत दिसू लागले. ते घाबरून हे घर सोडून निघून गेले. नंतर इथे फारसं कुणी राहायला आलं नाही. एक दोन कुटुंब होती, पण मला कुटुंब पाहिलं की राग यायचा. तू एकटीच इथं राहायला आलीस, मला मुलीसारखी वाटलीस म्हणून मी तुला काही त्रास दिला नाही, फक्त संध्याकाळच्या वेळी झोपाळ्यावर कुणी बसलेलं मला आवडत नाही. ती माझी वेळ असते झोपाळ्यावर बसायची.’’
‘‘हो पण मी आता इथं राहू शकत नाही.’’

‘‘तुला जायचं तर तू जाऊ शकतेस. पण तू राहिलीस तर मी तुला अजिबात त्रास देणार नाही हे माझं वचन आहे.’’ असं म्हणत ती बाई रसिकाचे पाय चेपू लागली.
त्या ग्लानीतच परत रसिकाला झोप लागली. दुसर्‍या दिवशी सकाळी उठल्यावर ती खडखडीत बरी होती. आपल्याला पडलेलं हे स्वप्नं की भास? रसिकाला काही समजेना. ती गावातल्या एका गुरुजींकडे गेली आणि तिने झाला प्रकार त्यांना सांगितला.
त्यांनी रसिकाला सांगितले, ‘‘तुम्ही तिथे राहा, तुमच्या जीवाला धोका नाही, उलट त्या शक्तीचा तुम्हाला वरदहस्तच राहील.’’

मग बदली होईपर्यंत रसिकाही तिथेच राहिली. काही दिवसांनी तर तिला संध्याकाळी झोपाळ्यावर बसायचीही परवानगी मिळाली. ती आणि ती बाई दोघी गप्पा मारू लागल्या. ती कधी रसिकाचं डोकं चेपून देई, तर कधी पाय. आईच्या मायेनं ती रसिकाशी वागू लागली. रसिकाही तिच्याशी प्रेमाने बोले. तिच्याबद्दलची भीती नाहीशी झाली. फक्त रसिका कुणालाही आपल्या घरी बोलवत नव्हती.आणि ती बाईही घराचा उंबरठा ओलंडत नव्हती. फक्त संध्याकाळच्या वेळी ती झोपाळ्यावर बसत असे. दिवस भर ती कुठे असे रसिकाला काही कळत नसे. रसिकाची बदली झाली आणि रसिकाने तिला तसे सांगताच ती म्हणाली,
‘‘रसिका, तू ज्या प्रेमाने माझ्याशी वागलीस, माझ्यावर विश्‍वास ठेवून इथेच राहिलीस त्याने माझ्यातील रागाचा अंत झाला आणि आता हे घरही मी पण सोडून जात आहे आणि मोक्षमार्गाला लागत आहे. यापुढे इथे येणार्‍या कोणालाही माझा त्रास होणार नाही.’’ आणि खरंच रसिका बदली होऊन जायच्या आधीच ती नाहीशी झाली. एका आगळ्या वेगळ्या नात्याचा तिथे शेवट झाला.
रसिकालाही धन्य वाटले. गावातील लोकांना तिने तसे सांगितले आणि तेव्हापासून ते घर आणि तो झोपाळा खरंच शापमुक्त झाला. आता त्या झोपाळ्यावर कधीही, कुणीही बसू शकत होतं. अगदी राकेश आणि मुलं सुद्धा काही दिवस रसिकाकडे येऊन सुखाने राहून गेली. रसिकाला मात्र आता त्या झोपाळ्यावर बसू नये असं वाटायचं, कारण तिच्या त्या झोपाळ्यावरच्या आठवणी वेगळ्या होत्या. आईच्या मायेला पारखं झालेल्या रसिकाने त्या बाईत आपली आई पाहिली होती. आणि झोपाळ्यावरच्या त्या मायेच्या सुखद आठवणीच तिच्या मनात झुलत राहायच्या.

– सौ. शिल्पा पराग कुलकर्णी

=========================

https://www.ritbhatmarathi.com/jhopala-part-1/

=========================

नमस्कार वाचकहो🙏🙏,

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आवड असूनही आपले छंद आपल्याला जोपासता येत नाही. आवड असूनही पुस्तकं वाचता येत नाही. त्यामुळे वेळेअभावी आपल्यासारखे खूप सारे वाचक वाचनापासून वंचित राहतात. आणि म्हणूनच वाचकांना कुठेही सहज वाचता येतील असा कथासंग्रह आम्ही रीतभातमराठी ह्या डिजिटल व्यासपीठावर घेऊन आलो आहोत.

उत्कृष्ट लेखकांनी लिहिलेल्या marathi katha, marathi moral story, marathi stories, marathi short stories, bodh katha marathi मध्ये आपल्याला रीतभातमराठीवर वाचायला मिळतील.

Leave a Comment

error: