Skip to content Skip to sidebar Skip to footer

झोपाळा (भाग 1)

रसिकाची त्या खेडेगावात बदली झाली आणि रसिकाच्या आनंदाला पारावार उरला नाही. तिला जरा घरापासून दूर कुठेतरी जायचंच होतं. घरातल्या कटकटींना ती वैतागली होती. रसिकाचं एकत्र कुटुंब होतं. तिच्या सासूचं आणि तिचं अजिबात पटत नसे. रसिकाने कितीही काम केलं तरी त्या बाईचं समाधान म्हणून होत नसे. त्यामुळे ही बदली म्हणजे रसिकाच्या पथ्यावरच पडली असं म्हणायला हरकत नव्हतं.

होता प्रश्‍न तो नवरा आणि मुलांना सोडून राहण्याचा. पण मुलंही तशी मोठी होती. त्यांची शाळा असल्याने ती काही रसिकाबरोबर येऊ शकत नव्हती. एक होतं घरात मोठी माणसं असल्याने तशी त्यांची काळजीही नव्हती. एकत्र कुटुंब म्हणजे असंच असतं. काही फायदे तर काही तोटे. पण या सार्‍यापासून थोडंसं दूर राहायला मिळणार म्हणून रसिका मात्र मनातल्या मनात जाम खूश होती. मनातल्या मनात मांडेच खात होती म्हणा ना! मी असं करीन तसं करीन तिचं आपलं सुरू होतं. पण प्रत्यक्ष जायचा दिवस आल्यावर मात्र तिला थोडंसं चलबिचल होऊ लागलं.

कधीही न पाहिलेल्या गावी एकटीनंच जाऊन राहायचं! कसं व्हायचं आपलं तिला प्रश्‍न मनात सतावत होता. ती आणि तिचा नवरा सकाळी थोडंफार सामान घेऊन स्वत:च्या कारने निघाला. तो दोन-तीन दिवस राहाणार होता. तिथं तिची राहायची सोय करायची होती. आज शाळेला सुट्टी होती, पण उद्या निदान हजर तरी व्हायचं होतं.

आज जाऊन जागा बघायच्या होत्या. रसिकाने शाळेतल्या एका शिक्षिकेशी ओळख काढली होती. तिचं आणि त्यांचं फोनवर जुजबी बोलणं झालं होतं. सुट्टीचा दिवस असल्याने मनावर ओझं दिल्याप्रमाणे त्यांनी रसिकाचं स्वागत केलं आणि एका छोट्याशा घरात तात्पुरती राहायची सोय केली. तिथं दोन-तीन दिवस राहून ती जागा शोधणार होती.

एकंदर ते गाव आणि गावातील लोकं पाहून रसिकाचा बदलीचा आंनदी मूड फारच बदलून गेला. पण आता काय इलाज नव्हता. तिला काही दिवस तरी त्या गावात नोकरी करावीच लागणार होती. ‘आलीया भोगासी असावे सादर’ या उक्तीप्रमाणे तिला आता वागावं लागणार होतं. तिच्या नवर्‍याला राजेशला मात्र तिची कीवही येत होती आणि हसूही येत होतं. तो तिला चिडवायची एकही संधी सोडत नव्हता.

‘‘मग काय मॅडम? आता राहाणार ना एकटं सुखात?’’ राजेश हसत हसत तिला विचारत होता.

‘‘हो राहणारच आहे..’’ तीही दाबात सांगत होती. दिवसभर भटकल्यावर एक छानसं बैठं घर रसिकाला पसंत पडलं. तसं शाळेपासून थोडं लांब होतं, पण त्या निमित्तानं माझं चालणं होईल. व्यायाम होईल, नाहीतरी घरी येऊन काय करायचं आहे? असा विचार तिनं केलं. तसं घर जरा बाजूलाच होतं, पण त्या घरात झोपाळा होता.

रसिकाला लहानपणापासूनच झोपळ्याची फार आवड होती म्हणून तिने खुशीने ते घर पसंत केलं होतं. घरात येऊन मस्तपैकी झोपाळ्यावर बसायचं, या विचारांच्या झुल्यावरच ती तरंगत होती.

दुसर्‍या दिवशी शाळेत हजेरी लावून रसिका आणि राजेश आपल्या नवीन घराकडे निघाले. घरमालक परगावी राहात असत. त्यांनी तिथं जवळच असणार्‍या एका घरात किल्ली देऊन ठेवली होती. सर्वप्रथम त्यांनी घर स्वच्छ केलं. तिला लागणारं सामान आणलं. आजचा दिवस राहून राजेशला त्याच्या घरी परत जायचं होतं. खरंतर राजेशला आता रसिकाची काळजी वाटू लागली होती. तिलाही जरा विचित्रच वाटत होतं, पण पर्याय नव्हता, नोकरी करणं गरजेचं होतं. आणि मनात कुठेतरी एकटं राहण्याची हौसही होती.

या सगळ्या आवराआवरीत संध्याकाळ केव्हा झाली कळलंच नाही. अगदी करकरीत तिन्ही सांज झाली होती. एवढं झोपाळ्याचं घर घेतलं, पण दोन मिनिटं काही झोपाळ्यावर विसावता आलं नाही, तिला मनात वाटून गेलं, पण आता उद्यापासून काय काम आहे? शाळेतून आलं की, आधी 10 मिनिटं झोपाळ्यावर बसायचं, मग स्वयंपाक केला की, झोपाळ्यावर बसायचं असा तिचा विचार चालू होता, तेवढ्यात राजेशचा ओरडण्याचा आवाज आला. तो पाच मिनिटं झोपाळ्यावर बसायला म्हणून गेला होता पण जायच्या आधीच पाय घसरून पडला होता.

नशीब जास्त लागलं नव्हतं, ‘‘असा कसा रे वेंधळा तू?’’ रसिका त्याच्यावरच डाफरली.

‘‘अगं खरं तर पडायचं काही कारणच नव्हतं पण… पण मला कोणीतरी..’’

पण त्याला औषध लावायच्या नादात रसिका काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. मग त्याचं औषधपाणी, जेवणंखाणं झाली आणि दुसर्‍या दिवशी सकाळी राकेश जायला निघाला. त्याला खरंतर खूप काळजी वाटत होती, तो म्हणालाही रसिका, आपण दुसरी जागा शोधुया का? पण रसिका या घरातून जायलाच तयार नव्हती, त्याला काय वाटत होतं, ते सांगायची त्याची हिंम्मत होत नव्हती, किंवा तो ते सांगायचा प्रयत्न करायला गेला की, शब्दच फुटत नव्हते. त्याला जाणं तर गरजेचं होतं, शेवटी तो कसाबसा नाइलाजाने तिथून बाहेर पडला.

इकडे रसिकाचे शाळेत जाणे सुरू झाले. पहिले दोन दिवस शाळा, तिथले नियम, तिथल्या जबाबदार्‍या हे समजून घेण्यातच गेले. घरी यायलाच तिला फार उशीर होत असे. संध्याकाळी उशिरा घरी आली की, आपलं आपल्याच काहीतरी करून घ्यावं लागत असे. निदान घरात गेल्यावर आयता चहा तरी मिळे अशी भावना तिला होऊ लागली. पहिले दोन दिवस ती कामाने हैराण होती.

तिला झोपाळ्यावर बसायला काय त्याच्याकडे पाहायलाही वेळ मिळाला नाही. आज काही झालं तरी वेळ काढून झोपाळ्यावर बसायचंच असं तिनं ठरवलं होतं. तिला घरी याला नेहमीप्रमाणे उशीरच झाला होता. ती शाळेत नवीन असल्याने जुने शिक्षक तिच्यावर कामाचा भार टाकत, नवी जागा म्हणून तिला काहीच बोलता येत नव्हते. त्यात तिचा स्वभाव थोडा संकोची होता. ती मनातल्या मनात जळफळत असे, पण त्याचा काय उपयोग. ती घरी आली. पोटात आग पडली होती. तिने भराभरा कुकर लावला.

ती एकटीच घरात असल्याने खोलीचा दरवाजा तिनं घट्ट लावला होता. बाहेर पडवीत झोपाळा होता. आता जेवायचं आणि मग झोपाळ्यावर बसायचं दहा मिनिटं तरी. तेवढ्यात राकेशचा फोन तिला आला. तशी तो तिची चौकशी करायचा नेहमीच. त्याला सतत एक काळजी लागून राहिली होती, पण तसं तो तिला सांगूही शकत नव्हता, पण रसिका मात्र एकदम व्यवस्थित होती, कामाचा व्याप सोडल्यास तिला कसलीही काळजी दिसत नव्हती. राकेशच्या दृष्टीनं हेच महत्त्वाचं होतं. ‘‘मग झोपाळ्यावर बसलीस का?’’ त्यानं हळूच तिला विचारलं.

‘‘नाही नाही. मला वेळच मिळाला नाहीये. अत्ता जेवण झाल्यावर वाट्टेल ते झालं तरी मी झोपाळ्यावर बसणारे.’’ तिनं अगदी ठामपणे सांगितलं.

‘‘अजून बसली नाहीस? अत्ता बसणारेस?’’ राकेशने घाबरून विचारलं. मग त्याने तिला सांगितलं,

‘‘आता रात्रीची वेळ आहे, अजिबात खोलीचं दार उघडू नकोस. सकाळी तुला हवं तितका वेळ बस झोपाळ्यावर फारतर स्वयंपाक वगैरे करू नकोस. पण अत्ता अजिबात बाहेर जायचं नाही.’’ तिला काही कळेचना. त्यात काय होतंय? असं तिचं चालू होतं, पण त्याने तिला शपथ घातली. मग तिचंही धाडस होईना. ती वैतागली, ‘‘आपल्या नशिबातच नाही मेलं ते झोपाळ्यावर बसणं.’’

ती कॉटवर आडवी झाली. त्या कॉटवरून खिडकीतून बरोबर झोपाळा दिसत होता. तिनं जरा खिडकी उघडली. तर तिला झोपाळा हलत असल्याचा भास झाला. भास असेल म्हणून ती खिडकी बंद करून परत कॉटवर आडवी झाली. आता झोपाळ्याच्या कड्यांचा जोरजोरात आवाज येऊ लागला. तिला उठून खिडकी उघडून बघायचं धाडस होईना. मनात जरा भीती दाटली. मग हळूहळू गाणं म्हटल्याचा आवाज येऊ लागला.

दूर काणीतरी गाणं म्हणत असेल, वार्‍याने झोपाळ्याचा आवाज होत असेल असा मनाचा समज करून रसिका तोंडावर पांघरूण घेऊन झोपण्याचा प्रयत्न करत होती. पण आपलाच झोपाळा वाजतोय हे तिला समजलं होतं. आपण एकटेच कुठे येऊन पडलोय असं तिला वाटत होतं. बाहेर जोरात वारं सुटलं होतं, त्या वार्‍याचा घू घू आवाज आणि झोपाळ्याच्या कडांचा आवाज. रसिकाची झोप पार उडाली होती. पण हळूहळू विचाराच्या गराड्यात, तिने मनातल्या मनात रामरक्षेचा आधार घेतला आणि तिला केव्हा झोप लागली तेच समजलं नाही.

क्रमश:

– सौ. शिल्पा पराग कुलकर्णी

=========================

नमस्कार वाचकहो🙏🙏,

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आवड असूनही आपले छंद आपल्याला जोपासता येत नाही. आवड असूनही पुस्तकं वाचता येत नाही. त्यामुळे वेळेअभावी आपल्यासारखे खूप सारे वाचक वाचनापासून वंचित राहतात. आणि म्हणूनच वाचकांना कुठेही सहज वाचता येतील असा कथासंग्रह आम्ही रीतभातमराठी ह्या डिजिटल व्यासपीठावर घेऊन आलो आहोत.

उत्कृष्ट लेखकांनी लिहिलेल्या marathi katha, marathi moral story, marathi stories, marathi short stories, bodh katha marathi मध्ये आपल्याला रीतभातमराठीवर वाचायला मिळतील.

1 Comment

  • Lalita Gaikwad
    Posted Aug 29, 2022 at 5:15 pm

    Khup interesting aahe part 2 lvkr Pathava

    Reply

Leave a Comment

error: