झाले मोकळे आकाश

© माधुरी अरुण वरुडकर
वैष्णवीने खिडकी बाहेर बघितलं. आभाळ भरून आलं होतं. तीन-चार दिवसात पहिल्यांदाच त्याने थोडी विश्रांती घेतली होती. पण त्याला अजूनही थांबायचं नव्हतं. गडगडाट करत पुन्हा तो अवतरला. तिला या पावसाचा क्षणभर हेवा वाटला. खरंच त्याला जसं वाटेल तसं वागतो. अगदी स्वतंत्र आणि मुक्त असल्यागत! वाट पाहायला लावायची त्याची सवय तर फारच जुनी! डोळे शिणून जातात. शेवटी नवससायस सारे सारे सोपस्कार पार पडतात, आणि हा येतो शिणलेल्या डोळ्यांमध्ये आशेचा किरण घेऊन! हसतं हसतं! कधी आवाज न करता हळूवारपणे! कधी नाचत सरींच्या रुपात! कधी रिमझिमतं गमतरमतं! मनाला वाटलं तर तो कोसळणारं! धसमुसळे करतं! तेव्हा तो कोणाची पर्वा करत नाही. त्याला मनातला राग आवरता येत नाही. मनातला सल बोलल्याशिवाय त्याला चैन पडत नाही. वैष्णवीला वाटलं, आपलं का तसं नाही? सतत आपला कोंडमारा होतं असतो. नुसती मनाची उलघाल होते. एकीकडे आजी आणि एकीकडे कबीर!
आजीकडील आपलं जीवन किती समृद्ध आणि मोकळेपणाचं होतं. कबीरला माहीत होतं आजी शिवाय आपल्याला कोणी नाही. आपलं सगळं विश्व आजीत सामावलेला आहे.
तेव्हा तो म्हणाला होता,” ती माझी पण आजी आहे. लग्नानंतर ती आपल्याबरोबर राहील. काही काळजी करू नकोस.” आणि आता तो असा वागतो आहे. मान्य आहे मला, घरात छोटे-मोठे वाद होत असतात. म्हातारी माणसं घरात असण्याची कबीरला सवय नव्हती.
‘ पण… पण… कबीर चुकतोय. फार मोठी चूक करतो आहे. कालच त्याचं उद्धट बोलणं आपण आपल्या कानांनी ऐकलं म्हणून बरे झाले. नाहीतर आजी कधीच काही बोलली नसती. पण आता सहन करायचे नाही. तिने डोळ्यातील अश्रू निर्धाराने पुसले. आज तिला शांत रहायचं होतं. मनात उठलेलं वादळ शमवण्याचा ती प्रयत्न करु लागली.
मागचं सर्व काम आटपून, तिने आजीला औषध दिलं. आजीला कवटाळून जोरदार रडावं असं तिला वाटलं. पण तिने स्वतःला सावरलं. काम नसताना उगाचच वेळकाढूपणा करायला वैष्णवी ने लॅपटॉप उघडला.
ती उशिरा बेडरूम मध्ये येऊन बिछान्यावर झोपली. पण आता झोप लांब पळून गेली होती. पावसाचा बरसण्याचा वेग वाढला होता. बाहेर आणि मनात वादळ घोंगावत होतं. तशी तशी ती तिच्या डोक्यातील विचारांच्या चक्रीवादळात
अडकत चालली होती. कबीर गाढ झोपला होता. तो एका लयीत घोरत होता. त्याला वैष्णवीच्या नाराजीची कसलेही सोयरेसूतुक नव्हतं. वैष्णवीला मनात गहिवर दाटला. तिचं शरीर गदगदलं आणि डोळ्यातून आपोआप अश्रू वाहू लागले. कबीरशी भांडभांड भांडावं असं तिला वाटलं. पण हातात काही नसल्यागत ती हतबल झाली.
आठवणीची पान तिच्या डोळ्यासमोर फडफडलीत. आजीचा ‘वैष्णुऽऽ वैष्णुऽऽ’ असा कानात गुंजारव सुरू झाला. आजीनेच आपलं नाव वैष्णवी ठेवलं. आपल्यासाठी तिने नवस केला होता. आपल्या आयुष्यात फक्त आणि फक्त आजीच होती. वैष्णवीच्या मनात अस्वस्थता दाटून आली. जीवाची काहीली होऊ लागली. तिची तगमग वाढली.
वैष्णवीने कबीराच्या प्रेमात आकंठ बुडल्याची कबुली आजी जवळ दिली, तेव्हा आजीने तिला गच्च मिठी मारली. नंतर आजीने वैष्णवीच्या गालावर फुललेले गुलाब बघण्यासाठी तिचा चेहरा वर केला व बघता बघता हुंदक्यावर हुंदके देत ती रडू लागली.
“मला या प्रेमाची फार भीती वाटते ग वैष्णु!” आजी रडत म्हणाली.
“की.. मी सोडून जाणार म्हणून रडतेस आजी?” वैष्णवी मिश्किलपणे म्हणाली. “नाही.. नाही…” आजीच्या डोळ्यातून घळघळा अश्रू वाहू लागले. वैष्णवीला एकदम रडू आले. तिने आजीला कवटाळले.
” मला डोळ्यासमोर तुझी आई मंदाच दिसते ग !” ती म्हणाली. वैष्णवीला अनेकदा तिने तिच्या आईच्या फसलेल्या प्रेमाची कथा सांगितली होती. अवघा दोन वर्षाचा संसार पण आई फक्त सोसत होती. पहिल्या बाळंतपणात ती गेली. आणि मागे उरली ती वैष्णवी! तिचा बाबा तिला कधी बघायला आला नाही. की, त्याने तिची कधी विचारपूस केली नाही. तिला जीवापाड जपलं ते आजीआबांनी! आबा गेल्यावर तर वैष्णवी हेच आजीचा विश्व होतं. तिने तळहातावरील फोडाप्रमाणे तिला जपलं. वाढवलं. तिच्यावर संस्कार केले. श्लोक, गाणी, कविता, गोष्टी सांगून स्वतः जवळचा खजिना तिच्याजवळ रिता केला. गौर वर्ण, पांढर लुगडं, पांढऱ्या केसांचा अंबाडा, हातात दोन दोन सोन्याच्या बांगड्या व गोऱ्या कपाळावर असणारा हिरवं गोंदणं अशी आजी वैष्णवीचा आराध्य दैवत होती. आजीच्या डोळ्यातील अश्रू पाहून तिचा जीव कासाविस झाला. तिने आजीचे डोळे पुसले.
” मी तुला सोडून कुठे कुठे जाणार नाही. तुला घेऊनच जाईल. ही माझी अट आहे.आणि ती कबीर ने मान्य केली आहे.” वैष्णवी हसत म्हणाली.
त्यानंतर आजीने कबीर व वैष्णवी चे थाटामाटात लग्न लावून दिले. वैष्णवी जायला निघाली तेव्हा आजीला रडू आवरेना. तिने डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंना कसाबसा बांध घातला. गहिवरलेल्या आवाजात ती म्हणाली,” माझी काळजी करू नकोस .मी काय पिकलं पान. आज आहे उद्या नाही. कबीर तुझं भविष्य आहे. त्याची काळजी घे !” वैष्णवीला बोलता आलं नाही. ती नुसती व्याकुळ होत रडत राहिली.
काही दिवसांनी पुढाकार घेऊन कबीरने आजीला घरी आणले. आजी घरी आली. आणि घर आनंदाने भरून गेलं. गप्पागोष्टींना ऊत आला. आजीने किचनचा ताबा घेतला.
ती चांगलचुगलं , गरमचिरम पदार्थ करु लागली. खाऊ घालू लागली. आजीच्या येण्याने घराला घरपण आलं. पण हे फार काळ टिकलं नाही. काही दिवसातच तिची तब्येत ढासळली. तिला उठण्या बसण्याचा त्रास होऊ लागला. हातपाय थरथरू लागले. हातातल्या वस्तू पडू लागल्या. आजीला काम थांबावावं लागलं. आजी घरी जायचं म्हणून मागे लागली.
वैष्णवी गळ्यात पडत म्हणाली ,”वाईट वाटून घेऊ नकोस. तू इतके दिवस आमचं केलसं, आता आम्ही तुझे सेवा करू.” कबीरने मान डोलावली. पण तेथूनच कबीरचं काहीतरी बिनसलं. पण तरीही सगळं ठीक चालू होतं. दिवस जात होते.
आजकाल कबीर वारंवार आजीचे घर विकण्याचा विषय काढू लागला वैष्णवीला त्याचं वागणं फारसं आवडलं नाही.ती तो विषय मोडून काढू लागली.
एक दिवस कबीर ने आजीला काय समजावले हरी जाणे! आजी घर विकायला तयार झाली. वैष्णवीचा विरोध तोकडा पडला. आजीचं घर पुढाकार घेऊन कबीरने विकले व पैशाचा चेक त्याने आजीच्या हातात दिला. तेव्हाही त्याच्या बोलण्यातील मानभावीपणा वैष्णवीला आवडला नाही. आजीने चेक हातात घेतला नाही.
” काय करू मी हे पैसे घेऊन? तुम्ही दोघं म्हणजे माझी अस्सल खणखणीत नाणे आहात. हे तुमच्याजवळ राहू द्या.”
” अग आजी, हे तुला माहित आहे ना…
समोरच्याला जेवायचं ताट द्यावं पण बसायला पाट देऊ नये.” वातावरणातील ताण मोकळा करत वैष्णवी म्हणाली.
“वैष्णु तू माझं सर्वस्व आहे ग !”तिने वैष्णवीला जवळ घेतले.
वैष्णवीने मग सगळी सूत्रे स्वतःच्या हातात घेतली. नोकरी, घरकाम, आजीची सेवा ती मनापासून करू लागली.
” आजी चहा….” असं म्हटलं की आजी हळूहळू डायनिंग टेबलवर येऊन बसायची. एक दिवस चहा पिता पिता तिच्याने चहा डायनिंग टेबलवर सांडला.
” काय आहे ?”खेकसत कबीर आजीवर ओरडला. व तिथून निघून गेला. वैष्णवीच्या काळजाचं पाणी पाणी झालं. आजी कानकोंडी झाली. त्या दिवसापासून आजी रूममध्ये चहा घेऊ लागली. तिचं हसणं, बोलणं कमी झालं. ती कबीर समोर येणं टाळू लागली. त्या दिवसापासून वैष्णवी आणि कबीर यांच्यात वाद होऊ लागले. कबीरला आजीची कोणतीच गोष्ट पटायची नाही. त्याची चिडचिड वाढली. त्याच्या वागण्यातील फरक वैष्णवीला जाणवला. ती धावत पळत आधीच सर्व करायचा प्रयत्न करायची. पण कुठेतरी काहीतरी खुट व्हायचं आणि कबीर नाराज व्हायचा.
आणि काल रात्रीचा त्या प्रसंगाची आठवण होऊन वैष्णवी रडू लागली. ऑफिसमधून निघायला वेळ झाला म्हणून ती घाईघाईने घरी आली. जवळच्या किल्लीने तिने लॅच उघडले. व ती आत शिरली. तेव्हा कबीर आजीच्या रूममध्ये, आजीशी ओरडून जोरजोरात बोलत होता. ” म्हातारे तू मरत का नाहीस? आमचा संसार का खराब करायला आलीस? वरून अजून गिळायला हवं.” वैष्णवी त्याचे वाक्य ऐकून जागच्या जागी थिजून गेली. तिच्या अंगाला थरकाप सुटला. तिच्या कानातून गरम वारे वाहू लागले. ओठ थरथरू लागले. काळजाच्या चिंधड्या चिंधड्या झाल्या.
डोळे भरून आले. तिने हुंदके दाबले. आपल्या माघारी हा असा वागतो? तिचा तिच्या कानावर विश्वास बसेना. आजीने दबलेले हुंदके तिला स्पष्टपणे जाणवले. ती धपकन तिच्याही नकळत सोप्यात बसली. त्या आवाजाने कबीर बाहेर आला. तिला पाहून चपापला.
” तू कधी आलीस?” त्याने विचारले
“आत्ताच !”तिने स्वतःला सावरले व शांतपणे म्हणाली. तिला आत्ता काही बोलायचं नव्हतं. ती आजीच्या रूममध्ये गेली.आजीचे डोळे रडून लाल झाले होते. “काय झालं तुला? डोळे का असे दिसताहेत? अंदाज घेण्यासाठी तिने आजीला विचारले.
” डोकं दुखतंय ग ! म्हातारपण मोठं वाईट! एकटं वाटतं ! कबीर मला समजवत होता.” आजी भरल्या आवाजात म्हणाली. तिने आजीला घट्ट मिठी मारली. रात्रभर मनात विचारांच्या पावसानं थैमान घातलं होतं. तिने कोसळलेल्या पावसासाठी स्वतःचे बाहू कणखरपणे पसरले. कोसळलेल्या पावसाला न डगमगता स्वतःमध्ये सामावून घ्यायचं ठरवलं. एक पक्का निर्धार केला. बाहेरही रात्रभर पावसाचा थैमान सुरू होतं. विजेचा कडकडाट अंगावर भीतीचा शहारा आणणारा होता. पण तिला आज वादळाची, पावसाची, विजांची कसलीच भीती वाटली नाही. घेतलेल्या निर्णयाने तिचे मन शांत झाले. सकाळी उठल्याबरोबर तिने बॅगा भरायला सुरुवात केली. हॉलमध्ये टीव्हीवर महा प्रलयाच्या बातम्या सुरू होत्या. पावसाने , वादळाने सर्वांना उध्वस्त केले होते. सगळीकडे पाणीच पाणी झाले होते. पण अजूनही माणुसकी जागी होती. सगळेजण सगळ्यांना मदत करत होते. ते ही धर्म जात पंथ विसरून! वैष्णवीने आजीला साद घातली. व ती बॅग घेऊन बाहेर आले.
बाहेर कबीर चहा पिता पिता बातम्या पहात होता.
” कुठे चाललीस?” कबीर ने नवलाने विचारले.
” कुठेही जेथे मला व आजीला आत्मसन्मानाची वागणूक मिळेल तेथे!” “वाटलंच मला, आजीने माझ्या चुगल्या केल्या असतील म्हणून ! तो उपहासाने म्हणाला.
” चूऽऽप…” वैष्णवी पहिल्यांदाच जोरात ओरडली.
” आजीला तू अजून ओळखले नाही कबीर! मी स्वतःच्या कानाने ऐकले, डोळ्याने बघितले नसते तर काय झालं असतं? कोण जाणे! ” तिच्या शब्दात गहिवर दाटून आला. डोळ्यातील अश्रू तिने निर्धाराने पुसले. बाहेर पावसानं थोडी उसंत घेतली होती. आकाश निरभ्र होण्याच्या वाटेवर होते. आज वैष्णवीला मोकळ व मुक्त वाटत होतं. तिने न बोलता आजीचा हात धरला व ती आजीचा हात धरून मार्ग काढत घराबाहेर पडली.
© माधुरी अरुण वरुडकर
नाशिक
===============
प्रिय वाचकहो, उत्तम बोधकथा/moral stories in marathi, प्रेम कथा, रहस्य कथा, कथामालिका, भारतातील संस्कृतीचे विविध पैलू, पर्यटन, खाद्यसंस्कृती, फॅशन, पॅरेंटिंग, लाईफस्टाईल ब्लॉग्स वाचायचे असतील तर रीतभातमराठीला नक्की भेट द्या.