जाऊ माझी लाडाची लाडाची गं


©️®️सौ. गीता गजानन गरुड.
समिधा..मालन वडनेरेंची थोरली सूनबाई.. सून म्हणजे नावाला सून हो. समिधा लग्न होऊन आल्यादिवसापासनं मालनताईंनी तिला अगदी मायेच्या पंखाखाली घेतलं. एवढ्या लांबवर दिल्लीस मुलीला दिली म्हणून काळजी करणारे तिचे साताऱ्यातले माईअण्णाही मालनताईंच्या आदरातिथ्याने प्रसन्न झाले. आपली लेक सासरी अगदी सुखासमाधानाने नांदणार याची त्यांना खात्री पटली.
जावईबापू सर्वेश हासुद्धा दरवर्षी माईअण्णांना आगत्याने घरी बोलवायचा. ते मग महिनाभर तरी लेकीच्या घरचा यथेच्छ पाहुणचार घ्यायचे. सतत कष्टाची कामं करणाऱ्या माईंना हे मोजके सुखाचे दिवस हवेहवेसे वाटायचे. त्याही जावईबापूंच्या व लेकीच्या बोलावण्याची वाट पहात असायच्या.
खरंतर लेक आपलीच म्हणजे कधी हवं..मनात यावं तेंव्हा लेकीकडे उठून जावं पण अण्णांच्या तत्वात ते बसत नव्हतं. आयुष्यभर अण्णांची सावली बनून वावरलेल्या माईंचं पाऊल कधी अण्णांपुढे पडत नसे.
अण्णामाई दिल्लीला आले की समिधा,मालनताई..दोघी त्यांच्यासाठी त्यांच्या मनाजोगते बेत रचत. लाल किल्ला, कुतुबमिनार,राजघाट,जामामस्जिद, लोटस टेम्पल..अशी प्रेक्षणीय स्थळं त्यांना फिरवून आणत.
अण्णांच्या बालपणी, त्यांचे वडील,चुलते(काका)..एकत्र रहायचे. शेतीचं उत्पन्न फारच तुटपुंज येत असे. त्यात अण्णांच्या वडिलांना व चुलत्यांना पिढीजात दमा. चार दिवस कामं केली की आठ दिवस अंधरुण धरीत, अशी गत. अण्णांच्या मातोश्रींची व चुलतीची..दोघींची मिळून अर्धाडझन लेकरं..त्यांच्या मुखात घास घालण्यासाठी कधीही बाहेरचं जग न पाहिलेल्या या माऊल्या घराबाहेर पडू लागल्या.
कुणाचं दळणकांडण कर,कुणाचं पाणी शेंदून दे,कुणी अडलं असेल ,कुणाकडे अतिथी आले असतील तर तिथल्या स्वैंपाकाचं काम हाती घे..अशी लहानसहान कामं करुन अर्थार्जन करीत असत. मुलांसाठी पहाटे उठून भाजीभाकरी करुन ठेवीत.
जे काही अन्न घरात शिजवलं असेल ते मिळूनमिसळून खावं ही व्रुत्ती, हे संस्कार बालपणीच अंगात भिनले होते. मुलं वाढीस लागली. शिकूनसवरुन कामाधंद्यास लागली. पोटासाठी दाही दिशा आम्हा फिरवीसी जगदिशा..या उक्तीस अनुसरुन प्रत्येकाने आपापल्या नोकरीच्या गावी आपापले संसार थाटले. मुली लग्न होऊन सासरी नांदावयास गेल्या.
अण्णाही पोस्टात कामाला लागले. एकत्र कुटुंबाचं बाळकडू अण्णांनी आपल्या लेकीसही दिलं. त्यामुळेच समिधा..नवरा,सासू,दिर अरविंद यांच्याशी मिळूनमिसळून वागे..
समिधा आई होणार ,घरात नवीन पाहुणा येणार हे कळताच तिच्या सासूबाई, मालनताई आनंदल्या. त्यांनी स्वामींकडे सारं निर्विघ्न पार पडुदे म्हणून प्रार्थना केली. मालनताईंनी समिधाच्या गर्भारपणात तिचे डोहाळे हौसेने पुरवले..तिची योग्य ती काळजी घेतली.
सातव्या महिन्यात समिधा माहेरी गेली..तिथे ओटीभरणाच्या कार्यक्रमाच्यावेळी तिच्या चुलतभावाने,चंदरने आपल्या मेहुणीसाठी एखादा मुलगा बघ म्हणून तिला विनंती केली.
“फोटो तरी दाखव तुझ्या मेहुणीबाईचा,” समिधा थट्टेत म्हणाली.
चंदरने लागलीच व्हॉट्सअपवरील फोटो तिला शेअर केला.
अटकर बांध्याची श्रावणी, समिधाला आवडली. तिने तिचं शिक्षण,आईवडिलांविषयी माहिती विचारुन घेतली. समिधाला स्थळ आवडलं. तिथे अनायासे मालनताई आल्या होत्या. समिधाने ही सगळी माहिती मालनताईंना पुरवली.
“तुमचं काय म्हणणं?” मालनताईंनी अण्णामाईंना विचारलं.
“मुलगी,मुलास पसंत असेल,मुलगा मुलीस पसंत असेल तर पुढची बोलणी करण्यास काहीच हरकत नाही..” अशी अण्णांनी खात्री दिली.
समिधाने अरविंदला श्रावणीचा फोटो दाखवला. अरविंदला श्रावणीचे बोलके डोळे,हसरा चेहरा आवडला.
“मग सरायचं का पुढे!”माईंच्या प्रश्नावर अरविंद चक्क लाजला..तशी जमलेली मंडळी हसू लागली..कुणीएक म्हणाला..आता मुलं लाजू लागलीत..जुन्या काळात मुली लाजायच्या..कालाय तस्मै नम:.
मुलीच्या आईवडिलांना अरविंदचा फोटो पाठवला.नोकरी,गोत्र,शिक्षण..सारी इत्थंभूत माहिती कळवली. श्रावणीने होकार देताच, तिच्या आईवडिलांनी बैठकीसाठी मुलाकडच्यांना बोलावणं धाडलं.
बैठकीत दोन्ही बाजूच्या मंडळींनी आपापले मुद्दे मांडले. बस्ता बांधणी, दागिने खरेदी, साखरपुडा,लग्नाच्या तारखा ठरल्या.
इकडे नऊ महिने न् अवघा एक दिवस घेऊन समिधाने एका गुटगुटीत छकुलीला जन्म दिला. प्रसुती नैसर्गिक झाल्याने माईअण्णा सुखावले.
अरविंद आता वीकएंडला, मुंबईस श्रावणीच्या घरी चकरा मारु लागला..जोडीने सिनेमे बघणं,बागेत फिरणं,लाँग ड्राइव्ह,वाळूत भटकणं..सारं सुरु झालं.
एका सुमुहुर्तावर अरविंद, श्रावणीचा विवाहसोहळा थाटामाटात पार पडला.
मालनताईंच्या घरात दोन सुना वावरु लागल्या. धाकटी सून, श्रावणी..मुंबईतल्या विभक्त कुटुंबातली. ती, तिची मम्मा नि पप्पा..एवढं छोटसं जग होतं तिचं..न् आता सासरी आल्यावर..भाऊजी,थोरली जाऊ,पुतणी..सासू..एवढ्यांसाठी नाश्ता करायचा म्हंटलं तरी पोहे कितीक घ्यायचे..मिरच्या किती घालायच्या..एक का दोन प्रश्न. घरच्या रीतीनुसार, ओली बाळंतीण असल्याकारणाने, समिधाला किचनमधे काही महिने जाता येत नव्हतं. श्रावणीचा सगळा सावळा गोंधळ पाहून मालनताईंचं डोकं उठलं..बरं समजावून सांगितलं तर ऐकेल तर शपथ.
कधी भातात पाणी जास्त तर कधी कुकरच्या आत पाणी टाकायला विसरायची..तसाच चढवायची ग्यासवर नं मग बसायची.. गाणी ऐकत.
रात्री, छोटी सूर लावायची. हुंदके देऊन रडायची अगदी. श्रावणी मिठीत असली तरी अरविंदकाकाचं सगळं लक्ष पुतणीकडे..का गं एवढी रडत असेल..पोटात दुखत असेल का तिच्या..थांब मी जाऊन बघून येतो..
असं दोनतीनदा झाल्यावर श्रावणी वैतागली..चिडली..मायफुट..घर आहे का धर्मशाळा..आय कान्ट टॉलरेट नाऊ. इनफ इज इनफ. आय एम गोईंग टू माय ड्याडीस होम. तू रहा तुझ्या पुतणीला कडेवर घेऊन नाचत..तिच्या पाठीवर थोपटून ढेकरा काढत..चिऊकाऊची गाणी गात.
खरंच श्रावणी चालती झाली भरल्या घरातून..मालनताई,समिधा..कुणाकुणाचं ऐकलं नाही तिने.
“भाऊजी,मी काय म्हणते..तुम्ही काही वर्ष वेगळं रहा. एकदा तुमचं बस्तान बसलं की या परत.” समिधाने दिराला समजावून सांगितलं.
“अगं पण का? माझं ऑफिस आपल्या घराजवळून हाकेच्या अंतरावर..बस्तान बसलं की परतेल ती..असं वाटतं तुला? पक्की माणूसघाणी आहे ती. एवढ्याशा बाळाचा तिरस्कार करते. काय म्हणाली..माय फुट..माझापण फुट..गेली उडत..जाणारच नै. बघु काय करते ते.” अरविंदने त्याच्या मनातलं ओकलं.
“भाऊजी, ताणलं की तुटतच. दोघांनी असा पवित्रा घेतला तर कसं चालेल? कुणीतरी दोन पावलं मागे आलं पाहिजे.”समिधा म्हणाली.
“आणि माझीच दोन पावलं दिसतील तुम्हाला मागे खेचायला..” समिधाला हसू आवरेना.
“हसतेस काय वहिनी..तिचा फुट ओढा ना.”
“भाऊजी, अहो किती वेळ तो फुट धरुन बसणार अहात. अवघडेल तो. सोडा त्याला.”
“विनोद सुचताहेत विनोद..चल छकुली आपण गाई करु..यायचं तेव्हा येईल काकी..मी नाही जाणार कोणाला आणायला..सांगून ठेवतो..आणि कुणी मला फोर्स केला ना..तर..”
“अहो भाऊजी..पण कोणी फोर्स करत नाहीए तुम्हाला. ते छकुलीने पाणी घातलं बघा शर्टाला..बदलून या. शुभशकुन दिसतोय.”
“कसला आलाय शकुन..प्युअर नैसर्गिक विधी असतो तो..हो ना छकु. सोड तू नळ काकाच्या अंगावर.”
छकुली खुदकन हसली.
माहेरी आल्यापासनं दोन दिवस श्रावणी गप्पगप्प होती.
“काहीतरी बिनसलय खरं,श्रावणीचं,”श्रावणीची आई तिच्या पप्पांना म्हणाली.
“तिला स्वत:हून व्यक्त होऊदेत. तेवढा वेळ देऊ आपण,”पप्पा म्हणाले.
रविवारी पप्पा घरी होते. त्यांनी स्वतःच्या हाताने श्रावणीची फेवरेट पावभाजी केली होती. श्रावणीने चवीपुरतीच खाल्ली नि उठली. श्रावणीच्या खोलीत जाऊन पप्पांनी फक्त तिच्या डोक्यावर हात ठेवला. पप्पांना बिलगून ती रडू लागली. मम्मीपप्पा दोघंही बावरले.
रडण्याचा आवेग शांत झाल्यावर श्रावणीने मुसमुसत सगळी दर्दभरी कहाणी मम्मीपप्पांना सांगितली. श्रावणीची बालिश तक्रार ऐकून मम्मीपप्पांच्या जीवात जीव आला. मामला आपल्या अखत्यारितला आहे..त्यांना कळून चुकलं.
“श्रावू, अगं लहान बाळ ते. रडणारच.”पप्पा म्हणाले
“दिवसभर झोपवून ठेवतात..मग रात्री रहाते रडत..तो आवाज..असह्य होतो मम्मी.”
“श्रावू..ही रेकॉर्डिंग ऐक बरं.” श्रावणीच्या पप्पांनी तिच्या कानाला टेप रेकॉर्डर लावला.
“अरे कर्मा..हाच तो इरीटेटींग आवाज..तुमच्याकडे कसा आला पप्पा..”
“अगं वेडे..तुझं रडणं..जपून ठेवलय मी. रात्र रात्र रडायचीस. तुझा बँगलोरवाला पतुकाका, तुला घेऊन फिरायचा..तुझ्यासारखीच त्याच्या बायकोची चिडचिड व्हायची..अशी बरीच लहानमोठी कारणं उगाळून तीही माहेरी निघून गेली..”
“मग..”
“मग काय.. दोघातल्या एकानेही माघार घेतली नाही. शाब्दिक लढाया होत राहिल्या नंतर अबोला तोही कायमचा. ते नातं उमलण्याआधीच तुटलं. दोघं वेगळी झाली..तुला ठाऊक आहेच.
श्रावू..अगं ठिणगी विझवता येते पण ती विझवली नाही नं तर ती पेट घेते..न् संसाराची राखरांगोळी होते.”
“म्हणजे मी परत जायचं असंच ना.”
आता श्रावणीची आईही बापलेकीच्या या संभाषणात सहभागी झाली.
“हे बघ श्रावू, एकुलती एक लेक तू आमची. तू काही जड नाही आम्हाला. स्वार्थी विचाराने आम्ही तुला इथेच ठेवून घेऊ शकतो पण ते चूक ठरेल..आंधळी माया मुलांच्या प्रगतीआड येते. लोकं म्हणतात,मुलीची आईच मुलीच घर मोडण्यास कारणीभूत ठरते पण तसं नसतं..लेकीने सासरी नांदावं असंच प्रत्येक आईला वाटतं..मलाही.” श्रावणीचं डोकं मांडीवर घेत तिची आई म्हणाली.
“पण मग आता..”
“से सॉरी टू युवर बिलव्ड. सॉरी इज अ मिऱ्याकुलस वर्ड. आय नीड नॉट टेल यू.”पप्पा म्हणाले.
“ओ के पप्पा.” मम्मीपप्पांना गुडनाइट करुन ती आपल्या खोलीत गेली न् अरविंदला व्हिडिओ कॉल लावला.अरविंद स्वेटर घालून,कानाला मफलर लावून बसला होता. बाजूला धर्मामीटर..समिधा वहिनी त्याच्यासाठी टोमॅटो सुप ठेवून गेली. त्याचा म्लान चेहरा पाहून..श्रावणीच्या छातीत चर्र झालं.
“काय होतय तुला. बरं वाटत नाही का?”
“काही नाही गं. ताप आहे थोडा.”
“थोडा म्हणजे किती?”
“१०२”
“ओ डोण्ट टेल मी. मी निघतेय आताच.”
तितक्यात समिधा तिथे आली,आधी जणू काही घडलंच नाही अशा अविर्भावात म्हणाली,”हाय श्रावणी, अगं भाऊजी ना. थोडे तापलेत खरे पण तू यायची घाई करु नकोस. आम्ही सगळी आहोत त्यांच्या दिमतीला. तू सकाळी निघ तिथून. रहायचं असेल तर दोन दिवस रहा. यांचा फ्लू काय उतरेल लवकरच. तू नको काळजी करुस.”
रात्रभर समिधा न् मालनताई..अरविंदच्या उशाशी बसून होत्या. त्याच्या कपाळावर मिठाच्या पाण्याच्या घड्या ठेवत होत्या.
छकुली गुपचूप निजली होती. लहान बाळांवरही घरातल्या वातावरणाचा परिणाम होत असावा. हूं की चूं केलं नाही पठ्ठीने रात्रभर. श्रावणी अधेमधे फोन लावून अरविंदची खुशाली घेत होती.
सकाळी चहासुद्धा न घेता मम्मीपप्पांना टाटा करुन श्रावणी निघाली..तिच्या अरविंदाला भेटायला. जाऊन कधी एकदा त्याला बघते असं तिला झालं होतं..राग वगैरे डोळ्यातल्या अश्रुंत धुवून गेला होता.
घरी जाताच ती हातपाय धुवून अरविंदला भेटायला गेली. त्याच्या कपाळावर हात ठेवत म्हणाली,”आय एम रिअली सॉरी अरविंद. मी फार वाइट्ट मुग्गी आहे. परत नाही असा त्रागा करणार . तू लवकर बरा हो.” अरविंदने मिटून घेतलेले डोळे उघडले नि दोघं एकमेकांच्या बाहुपाशात शिरली. दार उघडंच होतं.
अरविंदला काढा द्यायला आलेल्या मालनताई हसतहसत परतल्या. या गोष्टीला दोन महिने होत आले. समिधाने गोड बोलून श्रावणीला हळूहळू तिच्या हाताखाली ट्रेन केलं. सासुबाई थोड्या तापतात पण तेवढ्यापुरतच..तेव्हा आपण शांत रहावं..नवऱ्याशी मैत्री करावी..असे अगदी मोलाचे कानमंत्र समिधाने श्रावणीला दिले.
छकुली हळूहळू रात्री रडायची बंद झाली. तिच्या हसऱ्या बोळक्याने ती श्रावणीकाकूची लाडकी झाली न् वहिनीच्या तंबीनुसार रात्री बायकोला टाकून छकुलीला घेण्यासाठी येणं अरविंदाने बंद केलं.
म्हणतात ना भांडणानंतर प्रेम अधिकच वाढतं, तावूनसुलाखून निघतं..अरविंद व श्रावूची नव्याने दिलजमाई झाली. गुलाबी थंडीत गादीवर मोगरा फुलू लागला. रात्री गंधाळल्या. श्रावू व अरविंदा..दोघं पुरते एकमेकांत भिनले.
सर्वेशला समिधाचं कौतुक वाटत होतं. तिने आपल्या परीने, निगुतीने घरातलं प्रकरण सांभाळलं होतं. घराचं एकसंधपण अबाधित राखलं.
सोसायटीत ‘जावाजावा’ स्पर्धा होती. त्यात या दोघी सख्ख्या जावांच नाव सर्वेश देऊन आला.
घरात वावरण्यात समिधा हुशार होती पण हे असं स्पर्धा वगैरे..ती म्हणाली, “सॉरी हं मला नाही जमणार, इतक्या जणांसमोर आपली कला सादर करायला.”
श्रावणी म्हणाली,”नक्की जमेल. का नाही जमणार! मी आहे नं तुमच्या जोडीला.”आणि मग दोघी स्पर्धेच्या तयारीला लागल्या. मालनताईंनी किचनचा ताबा घेतला. मनात म्हणाल्या,”माझ्या मुली असत्या तर अशाच बोकाळल्या असत्या, त्यांच्या हौसेसाठी त्यांच्या पाठीशी उभी राहिलीच असते मग सुनांच्या का नाही!”
रांगोळी स्पर्धा, पाकक्रुती स्पर्धा यात समिधाश्रावणीची जोडी अव्वल ठरली. दोघींचा कोळीडान्सही झक्कास झाला. श्रावणी कोळ्याच्या गेटअपमधे क्युट दिसत होती तर समिधाच्या काष्ट्यावरुन सर्वेशची नजर हटत नव्हती.
अंतिम सामन्यात परीक्षकांच्या प्रश्नांना उत्तर द्यायची होती. दोघींचीही पाचापैकी पाचही उत्तरं बरोबर आली.
थोरल्या जावेला परीक्षकाने विचारलं..धाकटीचा कोणता गुण आवडतो तुम्हाला..यावर समिधा म्हणाली..राग येतो आमच्या श्रावणीला..तिचंही चुकतं..पण चूक मान्य करण्याचा..आपल्यात बदल घडविण्याचा मोठेपणा आहे माझ्या धाकट्या जावेत.
आता श्रावणीची पाळी होती. श्रावणी म्हणाली..मीपणा खूप होता माझ्यात..मी माझं सोडून..आपलं,आपल्यासाठी म्हणावं.आपल्या माणसांसाठी जगावं याचा परिपाठ देतात माझ्या थोरल्या जाऊबाई. गुरुस्थानी आहेत मला.
प्रांगणात जमलेल्या उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. मालनताईंना आपल्या गुणी सुनाचं होणारं कौतुक पाहून भरुन आलं.
(समाप्त)
–सौ.गीता गजानन गरुड.
=======================
प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून लेखकांना प्रेरणा मिळेल.
https://www.facebook.com/ritbhatmarati/
तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.
ritbhatmarathi@gmail.com
फोटो साभार – गूगल
आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही.