जरी – काठ

निमाला काठा- पदराची साडी घ्यायची होती कितीतरी दिवसापासून. दहा बाय दहाच्या खोलीत कोपऱ्यात एक बोचकं बांधून ठेवलेल्या तिच्या साऱ्या साड्या अगदी साध्या होत्या, मालकीणबाईंनी दिलेल्या, नको असणाऱ्या जुन्या साड्या..खरं तर मालकीणबाईंचं कपड्याचं दुकान, पण गेल्या पाच-सहा वर्षात त्यांना “एकदाही वाटलं नसेल का, आपल्याकडे दिवस- रात्र राबणाऱ्या निमाला एखादी तरी नवी कोरी साडी द्यावी? किती खडूस आहेत या?” असे निमा म्हणायची, अर्थात मनातल्या मनात.
त्या दुकानातल्या झुळझुळीत साड्या पाहून निमा पार हरखून जायची.
मालकीणबाई तशा चांगल्या होत्या. निमाला पगार तर दर महिन्याला देत होत्या, अगदी वेळच्या वेळी..आणि सुट्टीही हवी तेव्हा मिळत होती. कुठे तक्रारीला जागाच नव्हती. पण निमाचा जीव जरी -काठाच्या साडीत अडकला होता.
बरं,एखादी साडी स्वतः घ्यावी म्हंटल, तर तिचे धाडस होत नव्हते. एका साडीवर हजार भर रुपये खर्च करणं तिच्या हिशोबात बसत नव्हतं आणि नवऱ्याकडे मागावी तर नवरा कधी चिडेल सांगता येत नव्हतं. त्यामुळे ती गप्प होती.
अचानक एक दिवस निमाची तब्येत बिघडली. पोटात काही ठरेना. उलट्यांनी बेजार झाली ती म्हणून शंकेने दवाखान्यात गेली. डॉक्टरबाई म्हणाल्या, “गूड न्यूज आहे!” हे ऐकून तिचा आनंद गगनात मावेनासा झाला.
लग्नानंतर पाच -सहा वर्ष वाट पाहिल्यानंतर ही बातमी ऐकून निमाचा नवरा खूपच खुश झाला. तिची जास्तच काळजी घेऊ लागला. पण आता काम सोडावं लागणार या भीतीने निमा धास्तावली.
ती घाबरतच आपल्या मालकीणबाईंकडे गेली. पण ही बातमी ऐकून मालकीणबाईही खुश झाल्या. म्हंटल्या, “तुझ्या कलाकलाने काम कर. पण काम सोडू नको.” कोण आनंद झाला निमाला!
दिवस सरत होते, तब्येत छान सुधारली तिची. हळूहळू निमा पहिल्यासारखी कामं करू लागली. मग सहावा महिना सरला, तसे निमाला डोहाळ जेवणाचे वेध लागले.
तिची आई आणि म्हातारी सासू गावाकडून शहरात आली. डोहाळ जेवणाची तारीख ठरली आणि निमा सुट्टी मागायला पुन्हा मालकीणबाईंकडे गेली.
तशा त्या म्हंटल्या, “तुझे डोहाळ जेवण आमच्या बंगल्यातच होणार आणि ते मीच करणार.” निमाला मनातुन आनंद झाला खरा, पण अवघडल्या सारखंही वाटलं. अखेर सासूबाईंनी होकार दिला आणि निमाच डोहाळ जेवण मालकीणबाईंच्या बंगल्यात होणार हे पक्क ठरलं.
डोहाळ जेवणात किती थाट केला होता मालकीण बाईंनी! निमाला नेसायला जरी -काठाची सुंदर साडी, खाण्यासाठी वेगवेगळे पदार्थ, फोटोसाठी मोठा कॅमेरावाला खास माणूस, सजावट तर इतकी सुंदर होती की, निमाला हे क्षण संपूच नयेत असे वाटतं होते.
खूप खुश होती निमा. स्वप्नात असल्यासारखी तरंगत होती.
निमाची आई आणि सासुबाई दोघीही खुश होत्या, मालकीणबाईंची माया पाहून. तिचा नवराही हे सारं पाहत होता समाधानाने.
ओटी भरताचं निमा मालकीणबाईंच्या पाया पडली. त्यांनी तिला प्रेमाने आपल्या गळ्याशी धरलं आणि नको म्हणत असताना आणखी एक काठा -पदराची सुंदरशी साडी भेट म्हणून दिली.
मालकीणबाईंच्या चेहेऱ्यावरचा आनंद पाहून निमाच्या मनात आलं..”कधी कधी समोरच्या व्यक्तीला ओळखण्यात चूक होते आपली.
आपण उगीचच नावं ठेवत होतो, मालकीणबाईंना. आजच्या या जमान्यात इतकं सारं कोण करत एका परक्या माणसासाठी?”
तिच्या उजळ रंगाला साजेशी ती सुंदरशी साडी पाहून निमाचे डोळे काठोकाठ भरून आले, ती समाधानाने त्या साडीवरून हात फिरवत राहिली..कितीतरी वेळ.
=================
प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.
https://www.facebook.com/ritbhatmarati/
तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.
ritbhatmarathi@gmail.com
फोटो साभार – गूगल
आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही.
=============