जमेल मलाही

©️®️सायली
“बघ अनिता, तुला काही जमणार आहे का? तुझी मजल फक्त घर ते भाजी मंडई पर्यंत. तेही चालत जातेस. रिक्षा, बस किंवा गाडीने जाणे तुला कधीच जमणार नाही. आधीच केवढ ट्रॅफिक असतं! साधा रस्ता क्रॉस करायचा म्हंटलं तरी तुझा जीव घाबरतो.”
अनिताचा नवरा, अखिलेश ऑफिसला जायच्या गडबडीत होता.
“अहो, सकाळची कामे झाली की दिवसभर कंटाळा येतो. नुसते बसून तरी काय करायचे? आई कुठे ना कुठे जात असतात. मला एकटीला घर अगदी खायला उठते. म्हणून म्हंटल छोटीशी का होईना नोकरी करू. तेवढेच चार पैसे हाती असले की बरे असते.” अनिता आपल्या नवऱ्याला म्हणाली.
“पण तुला जमणार आहे का नोकरी? घर सांभाळण्या इतपत सोपं नसतं ते. शिवाय नोकरी करून घर सांभाळणे देखील कठीण असते. नंतर तुलाच धावपळ करण्याचा कंटाळा येईल आणि पगार असा कितीसा मिळेल? माझ्या एवढा तर मिळणार नाही ना?” अखिलेश बेफिकिरीने म्हणाला.
“घर सांभाळणे देखील वाटते तितके सोपे नाही हं. पण मला नोकरीही करावीशी वाटते. करू दे ना अखिलेश. नंतर जमली नाही तर सोडून देईन. मात्र आधीच जमणार नाही असे का म्हणता तुम्ही?” अनिता वैतागून म्हणाली.
“खरंच गरज आहे का नोकरीची? मी कमावतो तेवढं पुष्कळ आहे ना? ते काही नाही, तू कुठेही जाणार नाहीस. तू…फक्त घर सांभाळ. तेच खूप होईल. आई आणि मुलांना तुझी गरज आहे. नोकरीची नाटकं नकोतच ती.” असे म्हणत अखिलेश कामावर निघून गेला.
मुलाचा आणि सुनेचा संवाद ऐकणाऱ्या छायाताईंनी आपल्या खोलीतून अनिताला हाक मारली.
“अगं, त्याला पसंत नाही ना? मग कशाला नोकरी करतेस?”
“पण आई, हल्ली साऱ्या बायका घर सांभाळून नोकरी करतात. छान कमावतात आणि नोकरीमुळे माझी स्वतंत्र ओळख निर्माण होईल. जगात वावरण्याचा आत्मविश्वास येईल. सारखे पैसेही मागावे लागणार नाहीत यांच्याकडे आणि मुलंही तितकी लहान राहिली नाहीत आता. त्यांना बरीच समज आली आहे.”
“तेही खरचं आहे. अनिता, नोकरी करायची मुभा नव्हती मला. पण छंद, आवडी -निवडी बऱ्याच होत्या. त्या मागे पडल्या साऱ्या. यांच्या स्वभावामुळे घरातून बाहेर पडण्याची देखील मुभा नव्हती. माझ्या सासुबाईही स्वभावाने कडक होत्या. त्यांच्यापुढे बोलायची देखील हिंमत नव्हती माझी. मग छंद जोपासायचे तर दूरच राहिले. आता खूप वाटते गं, काहीतरी करावे. पण शरीर पहिल्यासारखे साथ देत नाही. मग भजन, कीर्तन, योगा, यात मन रमावते.
तुझे तसे नको व्हायला. तुला जे वाटते, जे आवडते ते कर. अगदी नोकरीच करायला हवी असे काही नाही. मन रमेल, ज्याची आवड आहे तेच कर. म्हणजे मन लावून काम करता येते. मी बोलते अखिलेश सोबत. तू नको काळजी करू.”
आपल्या सासुबाईंचे बोलणे ऐकून अनिताला बरं वाटलं.
संध्याकाळी अखिलेश उशीरा घरी आला. जेवता जेवता त्यानेच विषय काढला,” मग नोकरीच खूळ डोक्यातुन गेले की नाही?”
तशा छायाताई म्हणाल्या, “अखिलेश, तुझ्या ऑफिसमध्ये सगळे पुरुषच काम करतात का रे?”
“नाही तर. मोजून तीस जणांचा स्टाफ आहे, पैकी बारा जणी लेडीज आहेत.”
“बरं..मग त्या साऱ्या लग्न झालेल्या असतील ना? त्याही घर सांभाळूनच काम करत असतील ना?”
“हो. पण का?” अखिलेशला कळेना आईला नक्की काय विचारायचे आहे?
“अगं आई, साऱ्या जणींची छान, मनमोकळी ओळख आहे आमच्याशी. या सगळ्या बायका आपापले घर सांभाळूनच नोकरी करतात.
तू हे सारं अनिताची बाजू घेऊन तर विचारत नाहीस ना?” अखिलेश आईला म्हणाला.
“हो. हे बघ अखिलेश, तिच्या आनंदासाठी नोकरी करायची आहे तिला. तिला जे हवे आहे ते करू दे. मलाही आवड होती साऱ्याची. पण घरच्या जबाबदारीमुळे काहीच करता आले नाही. त्यात तुझ्या वडिलांचा स्वभाव कडक. घरातून बाहेर पडण्यापूर्वी त्यांची परवानगी घ्यावी लागायची.
पण आताचा काळ तसा नाही. स्त्री आणि पुरूष दोघेही नोकरी करतात, कमावतात.”
“बरोबर. पण तिला जमणार आहे का आई? इतकी वर्षे तिने केवळ घर सांभाळले आहे. बाहेरच्या जगाशी फारशी ओळख नाही तिची. शिवाय माझा पगार उत्तम आहे. तिने कमवायची काहीच गरज नाही.” अखिलेश.
“अहो, पण पाण्यात पडल्याशिवाय पोहता कसे येईल? मी शिकेन सारं. काही अडचण आलीच तर तुम्ही आहातच की.” अनिता अखिलेशला म्हणाली.
“हेच नको आहे मला. तुला अडचण आली तर मी माझे काम सोडून तुझी अडचण सोडवत बसू का?” अखिलेश चिडून म्हणाला.
“असे का म्हणतोस? नवरा आहेस ना तिचा? तिला पुढे जाण्यासाठी मदत करायची सोडून असं मागे काय खेचतो आहेस?” छायाताई रागावून म्हणाल्या.
“आई, बायकांनी या नोकरीच्या फंदात पडूच नये. आपल्याला जे जमत तेच करावं.” अखिलेश.
“मग जमेल तिला. काहीतरी करून पाहण्याआधी ते जमणार नाही असे म्हणू नये. तू फक्त पाठिंबा देण्याचं काम कर. मी घरातले अडले -नडले मी पाहीन. अरे तिने तुला परवानगी विचारली. हे काही कमी नाही आणि तिचे निर्णय घेण्याचा हक्क तिलाही आहेच की. ” छायाताई.
“आई, तुमचा पाठिंबा आहे ना? मग मला काळजी नाही. आम्हा बायकांना फक्त धीराचे दोन शब्द हवे असतात. मी आहे , तू पुढे हो. इतकं म्हंटल तरी बस् झालं. घर आणि ऑफिस दोन्हींचा मेळ साधायचा प्रयत्न करेन मी. अगदीच जमत नाही असे वाटले तर सोडून देईन नोकरी.” अनिता आपल्या सासुबाईंना म्हणाली.
“तुमचं दोघींचं ठरलंच आहे, तर मला विचारण्याची तसदी तरी कशाला घेता? काय करायचे ते करा. मला नका विचारू.” अखिलेश गडबडीने जेवण करून उठला.
अगदी दुसऱ्या दिवसापासून अनिताने नोकरी पाहायला सुरुवात केली. काही दिवसांतच तिला नोकरीही मिळाली. पहिल्यांदा थोडी ओढाताण झाली. नंतर अनिता रुळली, तसे रूटीन व्यवस्थित बसले.
आता तिची धडपड पाहून अखिलेशही नकळत घरात मदत करू लागला. त्याला वाटले, ‘अनिताला नोकरी करण्यासाठी आपण उगीचच विरोध करत होतो. खरंतर या आधीच तिने नोकरी करायला हवी होती. आजकाल किती आनंदात असते ती! घरचं सारं तितक्याच उत्साहाने, ताकदीने करते. एक स्त्री किती आघाड्यांवर काम करू शकते! तिला कमी लेखू नये हेच खरं.’ अखिलेशने मनापासून अनिताची माफी मागितली.
आपला पहिला पगार हाती आला तसा अनिताला खूप आनंद झाला. तिने तो आपल्या सासुबाईंच्या हातावर ठेवला. “आई, तुमच्यामुळे हे सारं शक्य झालं. पहिल्या पगाराचा मान तुमचा. यातून तुम्हाला जे हवं ते घ्या.”
“अगं, मी काय घेणार यातून? तुझ्या नवऱ्याच्या हातावर ठेव हा पगार आणि त्याला अभिमानाने सांग, एक स्त्री मनात असेल तर काहीही करू शकते आणि तू समाधानी आहेस ना? याहून जास्त मला काय हवं? अशीच हसत -खेळत राहा. स्वतःची ओळख निर्माण कर. मुलांनी आपला आदर्श घ्यावा असेच वागणे ठेव.”
छायाताईंच्या या बोलण्याने अनिताला खूप छान वाटलं. तिने नजरेनेच अखिलेशला विचारले, ‘मला हे जमले ना?’ आणि अखिलेशच्या डोळ्यात तिला पहिल्यांदाच स्वतःसाठी ‘स्पेशल भाव’ दिसले.
अनिता आज खूप आनंदात होती आणि ‘आपणही हे करू शकतो’ याचा आनंद तिच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता.
समाप्त.
=====================
प्रिय वाचकहो, उत्तम बोधकथा/moral stories in marathi, प्रेम कथा, रहस्य कथा, कथामालिका, भारतातील संस्कृतीचे विविध पैलू, पर्यटन, खाद्यसंस्कृती, फॅशन, पॅरेंटिंग, लाईफस्टाईल ब्लॉग्स वाचायचे असतील तर रीतभातमराठीला नक्की भेट द्या.
1 Comment
Hello World! https://apel.top/go/gu4winrshe5dgoju?hs=2653f9d4e8354b987d282a2511ff45a5&
pumpte