Ritbhatmarathi

Search
Close this search box.

शिवजयंती नुकतीच  साजरी  झाली.  त्याविषयी  काही  लिहावंसं वाटतंय.

खरंच  शिवजयंतीच्या दिवशी तरुणांचा  उत्साह  हा  प्रचंड होता, यांच्यामधली  ऊर्जा  धडपड याचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे.

शिवजयंतीच्या दिवशी सगळा रस्ता भगवा झाला होता. प्रत्येकाच्या गादीवर, रिक्षावर भगवा वाऱ्याच्या प्रवाहात फडफडत होता. भगव्यावरचे छत्रपती शिवाजी महाराज जणू वेगवेगळ्या ठिकाणांहून प्रवास करत होते, असो महाराज त्यादिवशी सगळ्यांनी डोक्यावर घेतले होते, आज खरंच त्या तरुणांना विचारावंस वाटतं, महाराजांना तुम्ही इतकं डोक्यावर घेतलंय?

आज पण महाराज डोक्यात गेले आहेत का???? त्यांनी जे शिकवलंय ते खरंच समजलंय का या तरुण वर्गाला?

महाराजांच्या जयंतीला DJ लावून सगळेजण बेमालूमपणे नाचत होते, जयंती साजरी करायची हि कोणती पद्दत? आपण इतर राज्यांसमोर काय आदर्श ठेवला? स्वराज्यासाठी असंख्य मावळे, शिवराय, शंभू राजे आणि आदराने मस्तक झुकावं.. अशा आऊसाहेब यांनी जे योगदान दिले ते याच दिवसासाठी का?

महाराजांनी स्त्रियांसाठी, त्यांच्या संरक्षणासाठी तलवार हातात घेतली, आणि आज आमची मुले महाराजांचा भगवा घेऊन गादीवर मोठे मोठे हॉर्न देऊन मुलींना छेडून रस्त्यावरून फिरत होती, हा महाराजांचा अपमान नाही का?

महाराजांनी कोणतीच डिग्री घेतली नाही पण त्यांचं Management , Research , Analysis हे शिकण्यासारखं आहे. महाराजांना जर जयंती म्हणून काही भेट द्यायची असेल तर त्यांनी निर्माण केलेल्या स्वराज्यात आपण त्यांनी घालून दिलेल्या आदर्शना धरून जगायला हवं.

बारा बलुतेदार,पगड जाती आणि इतर वर्ग मिळून महाराजांनी स्वराज्य उभे केले, जातीवाद त्यांनी केला नाही. मग आज आपण या विळख्यात का सापडलोय हा प्रश्न सगळ्यांनी विचारायला हवा. महाराज हि कोना एका समाजाची मालमत्ता नाही. ती प्रत्येक मराठी बांधवांची, मराठी भाषिकांची, आदराची प्रेमळ जागा आहे. महाराजांनी आरक्षण आणलं नाही ते राजकारणातून आलंय, मग आपण कोणाला मानायचं हा विचार प्रत्येकानं करायला हवा.

तरुण वर्ग जितका या जाती व्यवस्थेमुळे भरकटत चाललाय, त्यासाठी आज महाराजांचा इतिहास पुन्हा पुन्हा सगळ्यांनी वाचायला हवा.

बारा हत्तीचं बळ, कमालीची बुद्धिमत्ता असलेला हा तरुण वर्ग आज वाट चुकू लागलाय. कालचे मावळे आजचे दुश्मन झालेत. आपल्याच लेकी बाळीने मग न्याय कोणाला मागायचा? असेच दिवस चालत राहिले तर महाराजांच्या जयंतीला फक्त DJ  आणि तमाशे होत राहणार. जिजाऊंनी बघितलेला महाराष्ट्र हा विद्रुप आणि विक्षिप्त रूप  घेणार आहे. प्रत्येकाचं माणसाने महाराज डोक्यावर घेऊन नाचायला नाही तर वाचायला हवे. त्यांना समजून घ्यायला हवं. आचरणात आणायला हवं…. तर आणि तरच महाराजांची जयंती साजरी झाली असं म्हणता येईल.

अन्यथा महाराष्ट्र फक्त जयंतीचा आणि सोहळ्याचा प्रतीक होऊन जाईल. फक्त जयंतीचा रंग बदलेल कधी भगवा कधी निळा….. आणि ज्यांनी यासाठी आदर्श घालून दिले त्याची मात्र होळी होऊन जाईल. रंगाचं राजकारण करणाऱ्यांना अद्दल घडवायची असेलच तर जयंती कोणाचीही असो ती आपण त्यांनी दिलेल्या शिकवणीतून, त्यांच्या योगदातून, दिलेल्या संस्कारातून तयार केलेल्या या जगाला आदर्शाने वागून साजरी केली पाहिजे. रोजच त्यांचे आदर्श घेऊन तसे वागलो तर रोजच जयंती साजरी केल्यासारखी होईल. प्रत्येक स्त्रीची अब्रू जेव्हा आज सुरक्षित होईल तेव्हाच जयंतीचं खरं स्वरूप समाजाला समजलं असं मी म्हणेन.

प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.

https://www.facebook.com/ritbhatmarati/

तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही

=============

हेही वाचा

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories