Ritbhatmarathi

Search
Close this search box.

दाणी काका आणि काकू आज बऱ्याच दिवसातून लेकीकडे पुण्याला आले होते. श्रुती नुकतीच पुण्याच्या नामांकित कंपनी मध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून रुजू झाली होती. पुण्यात तिने छोटासा फ्लॅट भाड्याने घेतला होता. श्रुतीचं आई वर भलतं प्रेम….त्यामुळे आयुष्यभर कष्ट करणाऱ्या त्या माऊलीला थोडी मोकळीक मिळावी आणि तिलाही आई सोबत निवांत थोडा वेळ घालवता येईल ह्या कारणाने तिने तो फ्लॅट कुणासोबत शेयरिंग मध्ये नव्हता घेतला. तिला वाटलं होतं कि अधून मधून आई येत जात राहील. पण दाणी काका भलतेच कडक….त्यांनी कधीच दाणी काकूंना मोकळीक दिली नव्हती….निवांतपणा, फिरणं, आयुष्यात सूख अनुभवणं हे दाणी काकूंना माहीतच नव्हतं….

ह्या आधी मुलं लहान ह्या नावाखाली आणि आता तू  म्हातारी झाली एकटी कुठं जातेस ह्या नावाखाली दाणी काकूंना कधी मोकळीक मिळाली नव्हती. २ मुलं , नवरा ….आणि आता मुलाचं लग्न झालं …मुलगी नोकरीला लागली म्हणजे आता सगळं सेटलच झालं असंच वाटतं सगळ्यांना….पण दाणी काकूंच्या मनात सतत एक विचार कायम चालू असायचा कि “सगळं सेटल झालं पण मी सेटल कधी झाले होते….पण मी कधी सेटल झाले? मला तर माझ्यासाठी कधीच जगता नाही आलं…. “

 

“आशा सगळं घेतलंस ना गं नीट….नाहीतर परत पुण्याला गेल्यावर म्हणशील कि लेकीसाठी हे घ्यायचं राहिलं….ते घ्यायचं राहिलं….तसं आजकाल तू खूप विसरभोळे पणा करतेस….आणि काय तर मला म्हणाली होती कि मी एकटीच जाते म्हणून पुण्याला….पुण्याला समजून कुठं दुसऱ्या ठिकाणांचीच गाडी पकडली असतीस… तुझा काय भरवसा????….मग आम्ही सगळीकडे शोधत बसलो असतो तुला…   ” दाणी काका घराच्या पायऱ्या उतरत बोलत होते.

दाणी काकू – “हो सगळं घेतलंय मी आठवणीने….तुम्ही काय घेतलं ते सांगा लेकीसाठी….”

दाणी काका त…त…प..प करत – “मी काय घेणार….आंब्याचं लोणचं….गोडांबा….मठरी….चिवडा….शेंगदाण्याच्या पोळ्या… एवढं सगळं तू घेतलं असताना मी मग अजून काय घेऊ “

दाणी काकू – “हम्म्म्म्म !! निघा लवकर नाहीतर गाडी निघून जाईन…. सोहम येतो रे बाबा…. केरळला जपून जा आणि फोटोज पाठवा हं ….आम्ही तर कधी गेलो नाही….फोटो मधेच केरळ बघून समाधान मिळवावं..  ” दाणी काकू काकांना एक टोमणा मारून कॅब मध्ये बसल्या.

४-५ तासांनी दोघेही लेकीच्या घरी पोहचले ….श्रुती वाटच बघत होती…. आल्या आल्या दोघी जणी गप्पांमध्ये रमून गेल्या होत्या….

दाणी काकू – “हे बघ तुला गोडांबा आवडतो ना म्हणून खास तुझ्यासाठी म्हणून बाजारातून कैऱ्या मागवल्या बघ”

श्रुती – “आई तू पण ना….ह्याची काय गरज होती…उगाच तुला त्रास …. “

तेवढ्यात दाणी काका फ्रेश होऊन येतात – “अगं बसलीस काय….जरा चहाचं बघ….”

तशा दाणी काकू उठून किचन मध्ये गेल्या….

श्रुती – “थांब आई मी पण येते तुझ्या सोबत…. तुला काही माहित नसेल कुठे काय ठेवलं आहे….”

दोघी माय लेकी किचन मध्ये जातात…

श्रुती – “आई तू एकटीच येणार होतीस ना…आपलं ठरलं होतं ना कि आपण दोघीच सोबत व्हॅकेशन एन्जॉय करणार आहोत म्हणून…बाबा माहित आहे ना तुला स्वतःही कुठे जाणार नाही आणि दुसऱ्यांनाही जाऊ नाही देणार”

दाणी काकू – “हो बाळा… पण हे मला एकटीला कुठे सोडतील तर “

तेवढ्यात दाणी काका – “बरं आशा उद्या आपल्याला नंदा कडे(दाणी काकांची बहीण) जायचं आहे बरं का “

दाणी काकू – “अहो उद्या लगेच….पण मला सारसबागेत आणि तुळशीबागेत जायचं होतं”

दाणी काका जरा चढूनच – “अगं तुझं सारसबाग आणि तुळशीबाग कुठे पळून जाणार आहे का…? जात येईल नंतर….नंदाला काय वाटेल त्याचा विचार कर जरा…. बस पुढचा मागचा जराही विचार न करता नुसता आपलं तोंड वाजवायचं”

दाणी काकू – “हम्म नंतर म्हणजे मला माहित आहे तो दिवस कधी उजाडणारच नाही”

श्रुती दोघांनाही शांत करत – “बरं बरं ….थांबा जरा…. आई उद्या आपण नंदा आत्याकडे जाऊ या आणि मग जाऊ केव्हातरी सारसबागेत”

रात्री सगळे झोपले होते तेवढ्यात श्रुतीला जाग आली…. तर दाणी काकू कुठे दिसल्या नाही म्हणून श्रुती आईला शोधत घराच्या व्हरांड्यात आली तर दाणी काकू रडत होत्या….

श्रुती – “आई तू इथे काय करतेस आणि तू रडतेस का? काय झालं रडायला “

दाणी काकू – “श्रुती बेटा मला तुझ्या बाबांसोबत नाही राहायचं….मी इथेच राहिली तर चालेल का…”

श्रुती – “म्हणजे…काय बडबडतेस आई हे….आई तू आता लहान बाळासारखा हट्टीपणा करतेस…. तुला बाबांनी सारसबागेत आणि तुळशीबागेत न्यायला मनाई केली म्हणून तू आता रडत बसणार का ? काय हे आई एवढ्याशा गोष्टीवरून चिडतेस तू… “

दाणी काकूंनी स्वतःला सावरलं , “हो बेटा तू बरोबरच बोलतेय….थोडी जास्तच भावनिक झाले होते मी….चल झोपायला उद्या नंदा आत्याकडे जायचं आहे..”

दाणी काकूंनी स्वतःच्या इच्छा आकांक्षाना तिथेच दाबून टाकलं….आजपर्यंत त्या तेच तर करत आल्या होत्या….

सकाळ होताच तिघेही सदाशिव पेठेत राहणाऱ्या नंदा ताईंकडे निघाले…. वाटेत तुळशीबाग लागली….तुळशीबागेतील बाजारपेठ बघून दाणी काकूंचा आनंद गगनात मावेनासा झाला….

दाणी काका चालता चालता, “काय इथे दोन्ही बाजुंना तेवढी दुकानच बघून घ्या बाकी काहीच नाहीये इथं…. “

दाणी काकूंना वाटेत आर्टिफिशिअल बांगड्यांचं दुकान लागलं….दुकानातील आकर्षक कडे आणि बांगड्या ह्यांनी दाणी काकूंचे लक्ष वेधले….त्या २ मिनिटे दुकानासमोर थांबल्या आणि बांगड्यांचे भाव करायला लागल्या…. “हि कडे कितीला दिले रे ? “

दुकानदार – “४०० रुपयांना २ कड्यांचा सेट काकू…. “

दाणी काकू – “४०० रुपये २ कड्यांसाठी खूप जास्त आहेत….२०० लाव मग घेते”

तेवढ्यात दाणी काका चालता चालता पुढे निघून गेले होते ते मागे फिरले , “अगं काय हे…तुला वेळ काळ समजतो का…दुकान दिसलं कि झालं सुरु..ठेव ते आधी.. उशीर होतोय आपल्याला “

दाणी काकूंनी आपल्या स्वप्नांप्रमाणेच ती कडी सुद्धा दुकानदाराकडे गहाण ठेवली आणि पुढे आपला नाईच्छुक प्रवास नेहमीप्रमाणेच चालू ठेवला.

नंदा ताईकडे सर्व जण गेले….

गप्पांमध्ये नंदा आत्या खडसावून – “किती दिवस झाले श्रुतीला पुण्यात येऊन…आज टाइम मिळाला यायला”

दाणी काकू – “खूप मेहनत करते हो पोरगी….मला तर साधा चेक नाही लिहिता यायचा….”

दाणी काका खेचून  – “चेक लिहायला तू काय मोठी बॅरिस्टर लागून केली का गं”

सगळ्यांसमोर केलेली चेष्ठा दाणी काकूंना मात्र ठेच देऊन गेली.

नंदा काकूंनी सर्वांना राहायचा आग्रह केला.

तेवढ्यात श्रुती – “आत्या आज नको आज आईला तुळशीबागेत शॉपिंग करायची होती”

दाणी काका – “अगं तू पण आईमध्ये सामिल झालीस का….तू आईचं काय एवढं मनावर घेतेस गं….ती काय थोड्याच वेळात विसरून जाईल बघ..आज अक्का राहा म्हणतेय तर इथेच राहू या”

२-३ दिवस सगळेजणं नंदा ताईंकडेच राहिले…३ दिवसानंतर रात्री तिघेही आपल्या घरी परतले…दुसऱ्या दिवशीची दाणी काका काकूंची ट्रेन होती….

दुसऱ्या दिवशी सकाळी दाणी काका, “श्रुती चहा ठेव बेटा थोड्या वेळात निघायचं आहे आम्हाला, तुझी आई अजून बाथरूम मधेच आहे वाटतं”

श्रुतीला बाथरूम मधून काही आवाज नाही आला म्हणून तिने बाथरूम चा दरवाजा थोडा ढकलला तर दरवाजा उघडाच होता….

श्रुती चिंताग्रस्त होते, “बाबा!!!! आई बाथरूम मध्ये नाहीये”

दाणी काका – “अगं असेल इथेच कुठंतरी….ती कुठे जाणार? आयुष्यात कुठे एकटी गेली आहे का ती”

दाणी काका आपलं बडबडत असताना श्रुती आईला फोन लावते….

“बाबा आई फोन पण नाही उचलतेय….फक्त रिंग जातेय पण ती फोन नाही उचलत”

आता दाणी काका पुरतेच शुद्धीवर आले होते….दोघांनी मिळून दाणी काकूंना खूप शोधलं पण त्या कुठेच नाही भेटल्या.

थोड्या वेळात दाणी काकूंचा श्रुतीला फोन येतो ….फोन उचलताच

“आई तू कुठे आहेस…  १ तास झाला बाबा आणि मी तुला शोधतोय…. कुठे आहेस तू सांग मी आताच येते “

दाणी काका – “दे तो फोन इकडे मी बघतोच तिला”

श्रुती – “बाबा बस्स आता…आईला तुमच्याशी बोलायचं असतं तर तिने तुम्हाला फोन केला असता “

दाणी काकू फोन वरून – “श्रुती बेटा मी इथे तुळशीबागेत आहे…काल आपण पाहिलेल्या बांगड्या खरेदी केल्या मी…अजून बरीच शॉपिंग करायची आहे ..तू ये लवकर आवरून “

आज दाणी काकू खूप खुश होत्या ….अगदी त्यांच्यातलं लहान मुलं जागं झालं होतं….त्या एकट्याच आपल्या तुळशीबागेत मस्त एन्जॉय करत होत्या जणू आयुष्यातली कित्येक वर्षांपासूनची कमी आज त्यांनी पूर्ण केली….आज पहिल्यांदा त्या मोकळ्याने फिरल्या आणि आज पहिल्यांदा त्या आपलं आयुष्य एकटीच्या जोरावर जगल्या….

श्रुती थोड्याच वेळात बाजारात पोहोचली आणि पुढे जाऊन सारसबाग, शनिवार वाडा , लक्ष्मीरोड ह्या सगळ्या ठिकाणी माय लेकींनी भेट दिली आणि दिवसभर मस्त एकमेकींसोबत कुठल्याही प्रकारची टोकाटाकि सहन न करता दिवस घालवला.

इकडे श्रुतीने दाणी काकांना समजावून सांगितलं होतं….तसं दाणी काकांनाही समजलं आणि त्यांनी दाणी काकूंना श्रुतीकडेच काही दिवस राहायची मोकळीक दिली…

=============

प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.

https://www.facebook.com/ritbhatmarati/

तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही

=============

हेही वाचा

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories