घुसमट


मानसी तशी खूप लाडाकोडात वाढलेली मुलगी. उच्चशिक्षित आणि कॉर्पोरेट सेक्टर मध्ये नुकतीच रुजू झाली होती. नोकरी लागल्या लागल्या मानसीच्या बाबांनी तिच्या लग्नाचा बार उडवून टाकला . मानसी आणि अमितचं लग्न फार थाटामाटामध्ये पार पडलं. अमितदेखील एका बँकेत नोकरीला होता. घरात कसली कमी नव्हती. अमित आपल्या आईचा फार लाडका.
मानसी मोजकंच बोलणारी मुलगी आणि कामाचा उरक खूप सावकाश पण सर्व काम आपल्या जबाबदारीने करायची. लग्नानंतर नोकरी सांभाळता सांभाळता तिला बरीच अडचण आली पण तरी तिने सगळं निभावून आणलं. थोड्याच दिवसात मानसी नोकरी आणि घर छान म्हणजे करायला लागली होती. पण अमितने आपल्या आईचं ऐकून मानसीला बजावून सांगितलं कि तिला नोकरी करायची काही गरज नाही. मानसी आधीच गप्प बसणारी …नवऱ्याच्या पुढे तिचं काही चाललं नाही आणि अमितच्या निर्णयाला तिने सहमती दर्शिवली.
नोकरी सोडून मानसी आता घरच्या कामांमध्ये बिझी राहू लागली. सासू तिला १ मिनिटही मोकळीक द्यायची नाही. त्यात तिची नणंदही जवळच राहत असल्याने तिचीही येजा चालूच राहायची. एक दिवस नणंदेच्या मुलाचा वाढदिवस होता तर मानसीच्या सासरीच वाढदिवस साजरा करायचं ठरलं. वाढदिवसाचं निमित्त साधून जवळपास २०-२५ माणसं जेवायला येणार होती. त्या दिवशी मानसीच्या अंगात थोडी कणकणीच होती पण तिचा स्वभाव मुळीच मोजकं बोलणारा असल्याने मानसी सासरच्या माणसांसोबत अजूनही फार काही मोकळी झाली नव्हती. त्यामुळे अंगात ताप असल्याचं तिने कुणाला सांगितलं नाही. कुठे काही कमी पडू नये म्हणून घरीच तिने पॅरासिटेमॉल खाल्ली आणि ती सकाळी लवकरच उठून कामाला लागली.
सासू येणंजाणंऱ्यामध्ये बिझी होत्या आणि नणंद नटून थटून संध्याकाळी आली. मानसी मात्र सकाळपासून बसली नव्हती. बिचारी एकटीच सगळं करत होती आणि तिला फिकीरही नव्हती. ती फक्त ह्याच गोष्टीचा विचार करत होती कि वाढदिवसामध्ये कुणी नावं ठेवता कामं नाही. तिला कसं सगळं परफेक्ट हवं होतं. शेवटी संध्याकाळी वाढदिवस होऊन गेला आणि सगळे पाहुणेराहुळे देखील आपल्या घरी खाऊन पिऊन गेले. सासू आणि नणंद सोडलं तर सगळ्यांनीच मानसीच्या जेवणाची तारीफ केली होती.
दुसऱ्या दिवशीही मानसी रोजच्या नियमाप्रमाणे सकाळी लवकर उठली आणि अमितला जेवणाचा डब्बा दिला. सगळी कामं उरकून मानसीला दुपारी थोडा निवांत वेळ मिळाला होता म्हणून तिने आपल्या आईला फोन लावला. आईशी ती दबक्या आवाजातच बोलत होती कारण अमित जरी घरी नसला तरी सासू सासरे घरीच होते. आईशी बोलता बोलता तिच्या अश्रूंचा बांध कोसळला आणि ती आईला सांगायला लागली,
“आई मला इथे नाही करमत, माझी फार घुसमट होतेय….मी खूप मिसळायचा प्रयत्न करतेय पण काय करू होतंच नाही माझ्याकडून आणि दिवसभर मला खूप कामं पडतात पण कुणीहि समजून घेत नाही गं इथे..”
मानसीच्या आईनेही तिला समजून न घेता तिलाच समजून सांगू लागली ,
दोघांचं संभाषण बाहेर मानसीच्या सासू सगळं ऐकत होत्या. संध्याकाळी अमित आल्यावर लगेच त्यांनी मानसीची चुगली करायला सुरुवात केली. अमितनेही मानसीला एक शब्द बोलण्याची संधी दिली नाही आणि तिला सरळ कडक शब्दामध्ये खडसावून सांगितलं ,
“हे बघ मानसी आज झालं ते पुढे कधी होता काम नये…माझ्या घरच्यांबद्दल काहीही बोललेलं मी खपून नाही घेणार नाही.”
“आणि तुला कामाचा एवढाच त्रास होतो तर सांगायचं होतं….तुझ्यामुळे आम्ही काय आमच्या नातेवाईकांना विसरून जायचं का?”
“आता तर घरीच आहेस ना मग आईला थोडीफार मदत केली तर कुठे बिघडलं गं.”
अमित मानसीला सुनावत होता आणि मानसी गेले अर्धा तास झाला तिची नजर शून्यात होती. तिला नक्की काय होतंय हे ती मनमोकळेपणाने आपल्या नवऱ्यालाही सांगू शकत नव्हती. कदाचित अमितचा नेहमीच चढलेला आवाज, त्याच्या आईचा चुगलीपणा आणि रोजची ती भांडणं ह्याची धास्ती बसली होती तिच्या मनात. रात्री झोपताना अमितला त्याने कारण नसताना मानसीला तो जास्तचं बोलला ह्याची जाणीव झाली आणि त्याने मानसीला पाणी आणून दिलं. मानसी पाणी प्यायली आणि घाबरत्या स्वरातच अमितशी बोलू लागली.
“मला माफ करा…संध्याकाळी तुम्ही मला बोलायची काहीच संधी नाही दिली पण मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं.”
“मी खूप दिवसापासून प्रयत्न करतेय पण हिम्मत नाही करू शकले.”
“खरं सांगायचं झालं तर माझी इथे फार घुसमट होतेय….मला नक्की काय होतंय हे मी कुणाला नाही सांगू शकत….आणि आई सुद्धा मला कुठेच बाहेर नाही पडू देत.”
“घरात फार कोंडमारा होतोय…लग्नाआधीही मला तशी फार मोकळीक नव्हती पण मी माझे निर्णय मी स्वतः घ्यायची आणि नोकरीनिमित्ताने थोडी बाहेर पडायची.”
“मला दिवसभर घरात खूप एकटं एकटं वाटतं….मी अशाने मानसिक रुग्ण होईल अमित!!”
अमितलाही मानसीची होणारी घुसमट कळाली होती. लॉकडाऊन मध्ये तोही घरीच होता तर तो समजू शकत होता कि दिवसभर फक्त चार भिंतीच्या आड राहणं किती मुश्किल आहे. दुसऱ्याच दिवशी अमितने आपल्या आई वडिलांना मानसी परत नोकरीवर रुजू होणार असल्याचं सांगितलं. आमच्या आईने आधी विरोध केला पण अमितने त्यांना विश्वास दिला कि मानसी नोकरी सांभाळून घरही उत्तम सांभाळेल आणि मानसीच्या सासूनेही पाहिलंच होतं कि मानसी नोकरी करत होती तेव्हा आनंदी राहायची आणि घर व नोकरी छान मॅनेज करायची.
मानसीला मनोमनी खूप आनंद झाला. नवऱ्याचा पाठिंब्यानेच मूठभर मांस चढलं होतं तिच्या अंगावर. मानसी जशी नोकरीवर रुजू झाली तशी तिची घुसमट दूर झाली.
© RitBhatमराठी
================
प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.
https://www.facebook.com/ritbhatmarati/
तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.
ritbhatmarathi@gmail.com
फोटो साभार – गूगल
आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही
=============