Ritbhatmarathi

Search
Close this search box.

राधिका आपल्या सासरी जाऊन जेमतेम १ ते दीड वर्ष झाले असेल…माहेरी घर आई-वडिलांना खायला उठलं….राधिका मात्र आपल्या संसारात एकूणच रमली होती..राधिकाच बोलणं म्हणजे खूपच मोजकं सासरीही राधिका जास्त बोलत नसे..म्हणून सासरी आपलं मत राधिका क्वचित देत असे..सासरकडची मंडळीही भारीच अकडू..नवीन-नवीन आपल्या माहेरची मंडळी आलेली सासूबाईंना आवडत नसे म्हणून राधिका आधीच सांगत असे..’जास्त बोलू नका…फक्त औपचारिक बोलत जा..त्यांना राग येईल असं बोलू नका’…आपल्या लेकीला त्रास होऊ नये म्हणून शंकरराव खूपच जपून वागत..राधिका खरं तर उत्तम अशी कत्थक नृत्यांगना…शिवाय विज्ञान विषयाची पदवीधर…लग्न होऊन सुरुवातीलाच आपल्या नवऱ्याचा आणि सासूचा जाच सहन करणं हे तिला अंगवळणीच पडलं होत म्हणून सतत असलेली भीती राधिकाच्या मनात उभी होत होती…

कावेरीबाई म्हणजे राधिकाच्या सासूबाई…त्याचं वागणं म्हणजे खूपच विचित्र…बाहेरचा कुणी पै-पाहुणा आलं की त्यांचं वागणं बदलत असे…अगदी कामवाली बाई जरी आली तरी त्यांच्या वागण्यात बदल होत असे…कामवाल्या बाई म्हणजे सविता मावशी अत्यंत मनमोकळ्या स्वभावाच्या….आपल्या सुनेनी सविता मावशींबरोबर बोलणंही कावेरीबाईंना खपत नसे…म्हणून सारखी राधिकावर पाळत ठेऊन असत…पाळत ठेवता आली नाही की राधिकाला…सविता मावशी गेल्यानंतरच स्वयंपाकघरात येण्याची मुभा मिळत असे…सततची पाळत…सततचा धाक याला राधिका पुरती कंटाळून गेली होती…उठ म्हंटल की उठायचं…आणि बस म्हंटल की बसायचं…’ याचा राधिकाला वीट आला होता…तरीही आला दिवस ती कसाबसा ढकलत असे…राधिकाचं पाहिलंच रक्षाबंधन…म्हणून माहेरी जाण्यासाठी तेवढी सासूबाईंकडून परवानगी मिळाली…म्हणून शंकरराव आपल्या लेकीला घ्यायला आले…राधिकाचे सासरे दिनकरराव अगदी मनमोकळ्या स्वभावाचे म्हणून शंकररावांच्या आणि सासऱ्यांच्या गप्पा रंगात आल्या होत्या…राधिकाही माहेरी जाण्याच्या ओढीने भरभर आवरून तयार झाली आणि आपल्या वडिलांबरोबर निघायला तयार झाली…माहेरी गेल्यानंतर…सुषमाताईंनी म्हणजे राधिकाच्या आईने आपल्या लेकीवरून भाकर तुकडा ओवाळून टाकला…लेकीमुळे परत घराला घरपण आलं या विचाराने सगळी माहेरची मंडळी भारावून गेली…राधिका माहेरी आली तरीही उदास आणि एकाकी वाटत असे म्हणून आईने आपल्या लेकीला विचारलं—

सुषमाताई – राधे…अगं काय झालं…एवढी शांत आणि उदास का वाटतीय…?

राधिका    – आई…सासूबाईंचा वागणं मला पटत नाही ग…पटत नाही म्हण्यापेक्षा विचित्र वाटत..

सुषमाताई – म्हणजे नेमकं काय झालं ?

इतक्यात राधिकाच्या फोन वाजतो…आपल्या नवरा विभासचा फोन आला म्हणून अचानक आनंदित झाली…पण तो आनंदही क्षणिक होता…

विभास – काय मग…माहेरी गेली…सासरकडच्यांना विसरलीस की काय ?

राधिका- नाही तसं नाहीय…मी कॉल करणारच होते…आत्ताच पोहचलीय…म्हणून बसली होते…

विभास – नक्की आताच पोहचलीस का ?

राधिका – हो…असं का विचारताय तुम्ही..

विभास  – विचारलं सहजच..आणि साधा माझ्या आई-वडिलांना फोनही नाही केलास अजून तू…जरा त्याचंही भान ठेवायचं की…मागेही असंच तुझी बोळवण केली आम्ही तेव्हाही तू साधा मला फोनही केला नाहीस..का इकडे आली की इकडच्यांसारखं वागायचं…तिकडे गेलं की जगाचा विसर पडतो तुला…निदान तिथून निघतानाही फोन करत जा जरा…[राधिका चिडते..आणि म्हणते]

राधिका – तिकडे काय म्हणून येऊ मी…तुमची बायको म्हणून येऊ,आई-वडिलांची सून म्हणून येऊ की मोलकरीण म्हणून येऊ…?

विभास  – राधिका…मला वाटलं इकडचं घर तू आपलं म्हणत असशील…पण तसं काहीच नाही दिसत मला…

राधिका – मी तिकडे आलेच कदाचित तर…सगळ्या प्रश्नांची उत्तर देईल…त्यामुळं मी काही तुम्हाला परत फोन करणार नाही…

सुषमाताई सगळं ऐकत होत्या…मग त्यांनी राधिकाकडून नक्की काय भानगड आहे…? हे जाणून घेतलं…

सुषमाताई – राधा…अगं काय ऐकतेय मी ?

राधिका    – आई…बरोबरच बोलली मी…खूप दिवसांपासून ऐकत आलीय त्यांचं…सासूबाईंच्या वागण्याचं नवल करावं तितकं कमीच…घरी सवितामावशी कामासाठी म्हणून येतात…सासूबाई तिच्याशी खूपच गोडं-गोडं बोलतात तिला चार पैसे जास्त देऊन कामही करून घेतात…मी सगळी कामं करते तेही कुठलाही मोबदला न घेता तरीही त्या मला सतत टॉर्चर करत असतात…कामवालीला खूप चांगली वागणूक मिळते…त्याहीपेक्षा वाईट वागणूक मला मिळते…त्या माझ्याशी गोडं बोलल्या तर चांगलंच वाटणार आहे ना मला..सगळ्यांचं  करूनसुद्धा मला जर अशी वागणूक मिळणार असेल तर…माझं अस्तित्व एक मोलकरीण म्हणूनच राहील ना…यात काही शंका वाटतीय तुला..

सुषमाताई – पण विभासरावाना तू असं बोलायला नको होतं…

राधिका   – अगं…आई तुम्ही कोणी जरी आलात तरीही…सासूबाई मनमोकळेपणाने कुणाशी बोलत नाही…कायम तुम्ही येता म्हणून मला  धारेवर धरतात…तुम्ही येऊच नये का मग मला भेटायला…असं स्पष्ट होतं…नातं माझ्या आई-वडिलांशीही आहे त्याचं…हे विसरतायत त्या…

सुषमाताई – अगं….मोलकरीण म्हणजे काय माहिती आहे का तुला…? कामं करून जी त्याचा मोबदला घेते ती मोलकरीण…पण ते तुझं घर आहे..तुला ते सगळं करावाच लागणार आहे…

राधिका   – आई…माझं कामाबद्दल काहीही म्हणणं नाहीय…ते मी अगदी कर्तव्य म्हणून करेल…फक्त सुसंवाद पाहिजे या नात्यात एवढंच माझं म्हणणं आहेसासूपणाचा हेका असतो पण सुसंवादाची तितकीच गरज आहे..आज सासूबाई बाहेरच्या लोकांशी चांगलं वागतायत…चांगलं बोलतायत..मलाही चांगलंच बोलणं हवंय…चांगल्या शब्दांची मी भुकेली आहे ग…दुसरं काही नकोय मला…

राधिका आपल्या आईशी अगदी मनमोकळेपणाने बोलत होती…ती बोलत होती पण आपला मोबाईल फोन चालूच होता…सगळं बोलणं विभासने ऐकलं…राधिका ला कळू नये म्हणून आपला फोन लगेच विभासने बंद केला… राधिकाला संशयही आला नाही याचा…राखी पौर्णिमा झाली…परत सासरी जाण्याचा दिवस उजाडला…सासुरवाशिणीची खणा-नारळाने ओटी भरली…राधिकाच्या आवडी-निवडी सगळं यथासांग देण्यात आलं…राधिका घरी म्हणजे आपल्या सासरी गेली आपल्या माहेरच्या आठवणींचा खजिना घेऊन…घरी जाताच आपल्याला नेहमी चेहऱ्यावर आढ्या असलेल्या सासूबाई चक्क हसून बोलत होत्या हे दिसून आले…फक्त सासूबाईंचा चेहरा नाही हा…एकूण घरातलं सगळं वातावरण हसून आणि खेळून होत….सगळं पाहून राधिकाला आकाश ठेंगणं वाटू लागलं…

रात्री विभासला बदल कसा झाला याबद्दल विचारते…

राधिका – विभास…बदल कसा काय झाला एवढा…

विभास  – काही नाही…तू नको एवढा विचार करुस…

राधिका – मला मग असंच माहेरी जावं लागेल सारखं-सारखं…म्हणजे आई हसून-खेळून तर राहतील…

विभास  – म्हणजे काय…? तू माहेरी जा आणि जसंच्या तसं आईचा स्वभाव कथन कर..!

राधिका – म्हणजे…असं का म्हणतोस तू..

विभास  – अजूनही कळून न कळल्यासारखं करतेस तू…

राधिका – कोड्यात का बोलतोयस…काय ते स्पष्ट बोल…

विभास  – म्हणजे…मी तुझं त्यादिवशीचं सगळं बोलणं ऐकलं…त्यादिवशी तू फोन कट केलाच नव्हतास…म्हणून मला सगळं बोलणं ऐकू येत होत..

राधिकाला अपराध्यासारखा वाटू लागलं…शरमेनं तिची विभासकडे पाहण्याची हिंमत होत नव्हती…मग विभासशी खूप हिंमत करून बोलू लागली…

राधिका – विभास खरंच माझं चुकलं…पण इकडं मी कुठलीच तक्रार करू शकत नाही…तुम्हीही काही ऐकून घ्यायला तयार नसता…मी फक्त मन आपल्या माणसासमोर मोकळं करू शकते..इथं आपलं असं कुणीच मला नाहीय…अगदी तुम्ही सुद्धा..आणि सगळ्यात महत्वाचं मनमोकळा संवाद असायला पाहिजे एकमेकात तरच नाती फुलतात…संवाद होण्याऐवजी वाद झाले तर वाद विकोपाला जाऊन नाती दुभंगतात…

विभास  – मग तू बोललं पाहिजेस मनमोकळेपणाने…

राधिका – आपल्या घरात एकमेकांना गृहीत धरलं जात…म्हणून विसंवाद होतात गृहीत नकोय धरायला…एकमेकांना गृहीत धरणं नकोय…विसंवादाचे मूळ कारण असत गृहीत धरणं…

विभास  – हम्म…

राधिका – खरं…मला माहिती नव्हतं तू हे सगळं ऐकत होतास ते…तुला जेव्हा कळलं खरं तर माझ्या पायाखालची जमीन हलली…मला वाटलं…मला आता ओरडा बसेल…पण एका दृष्टीने बरं झालं तू सगळं ऐकलं ते…

विभास  – हा…म्हणजे आता प्रत्येक वेळी तू काहींना काही निमित्त काढून माहेरी जाशील…मी नेहमीप्रमाणे कॉल करेल…अन तू आपलं मन मोकळं करशील…असं सारखं-सारखं नाही करता येणार…

राधिका – असं तर आता मी स्वप्नातही नाही करणार….

असे म्हणून दोघेही एकमेकांशी खूप दिवसांनी मनमोकळ्या गप्पा मारत झोपी गेले.

 

तात्पर्य – कुठलाही नातं टिकवायचं असेल…फुलवायचं असेल तर एकमेकात मनमोकळा संवाद हा असायलाच हवा..यात कुठलाही इगो किंवा ऍटिट्यूड   असता काम नये…बऱ्याचदा एकमेकांच्या शैक्षणिक बाबतीत,दिसण्याच्या बाबतीत,बोलण्याच्या पद्धतीवरून इगो किंवा ऍटिट्यूड आडवा येतो मग याची परिणीती म्हणून नाती जुळण्याऐवजी तुटतात..म्हणून राधिका आणि विभास यांच्या नवीन-नवीन लग्नातला एक मासला गोष्टीच्या रूपाने मांडला.