Ritbhatmarathi

Search
Close this search box.
 

कपाळावर मोठी टिकली गळ्यात मस्त काळ्या मन्यातलं मंगळसूत्र आणि त्या पोतेला मस्त शोभणारं पदक,अंगावर मस्त इस्त्री केलेली कडक कॉटनची साडी,केसांचा अंबाडा त्यावर मोगऱ्याचा गजरा गुंफलेला त्यामुळे स्वातीताईंचं व्यक्तिमत्त्व तितकंच आकर्षक आणि आदरयुक्त वाटत होत…नुकतंच आपला लाडका मुलगा सतीश याच लग्न लावून आपल्या संसाराचा सगळा भार सुनेवर टाकून निश्चिन्त आयुष्य त्या जगत होत्या अगदी कुणालाही हेवा वाटेल असं त्यांचं आयुष्य…सूनही तितकीच जबाबदारीचं भान असलेली होती…मीरा सतीश रत्नपारखी असं आपल्या सासरचं नाव अगदी सार्थकी लावणारी होती…आपल्या माहेरी सगळयांची लाडकी अशी मीरा सासरीही तितकीच सासूबाईंची लाडकी असं लेबल तिच्यासोबत लागलं जात होत…स्वातीताई संसारदक्ष तर होत्याच तशा अगदी शिस्तप्रियही होत्या…मीरा एका बँकेत लोन डिपार्टमेंटमध्ये काम करत असल्याने आपल्या संसाराचा गाडा अगदी आरामात चालवत होती…आता घरातली काम पाहून नोकरी करणं ही तारेवरची कसरत असल्याने स्वातीताईही थोडीफार मदत करत असायच्या…त्यातल्या त्यात सण-वार आलं की सगळं कसं ठेपशीर व्हायला पाहिजे असं त्यांना वाटत असे…मीराही कुठलीही तक्रार न करता सगळी काम करू लागत असे…

मीराचे सासरे अशोकराव हे एका वृत्तपत्राचे संपादक असल्याने घरात सगळ्यांनाच वाचनाची आवडही होती…वेगवेगळ्या कादंबऱ्या,लेख,आत्मचरित्र इ. अशा पुस्तकांनी घराचा एका कोपरा कसा खचून भरलेला असायचा…सतीश एका नामांकित कंपनीत उच्च पदावर असल्याने घरात एकूण आर्थिकदृष्ट्याही चणचण भासत नव्हती तरीही मीराला नोकरी करण्याची आवड असल्याने घरही आणि नोकरीही दोन्ही जबाबदाऱ्या मीराने निभावण्याचा निर्णय घेतला म्हणून सासऱ्यांना तिचे विशेष असे कौतुक असे…तरीही घरातल्या अगदी सगळ्याच जबाबदाऱ्या एकटी मीरा पेलवू शकत नव्हती म्हणून आपल्या सासूबाईंचा असा आधार मीराला वाटत होता…नातेवाईक,स्वयंपाक,रोजची पूजा-अर्चा,साफ-सफाई,बाजार-हाट हे सगळं मीरा आपल्या सासूबाई स्वातीताईंच्या मदतीने करत असे…तरीही मीरा आल्यापासून घरातली काम मीरा आणि बाहेरची काम स्वातीताई करत असे…नोकरी करत असल्यामुळे बाहेरच्या कामाबद्दल मीराला तेवढी माहिती नव्हती..एक दिवस प्रमिलाबाई म्हणजे सासूबाईंची सक्खी बहीण अचानक काहीही न कळवता घरी आल्या…

प्रमिलाबाई – काय ग स्वाती…येऊ का गं घरी…

स्वातीताई – अगं..येऊ का कसं विचारतेस…ये की तुझंच घर आहे…

प्रमिलाबाई – नाही गं…सून आलीय ना म्हणून परवानगी घेऊनच आले…येऊ का असं विचारून आलेलं बरं…

स्वातीताई  – [मस्करी करत] आणि…तशीही तू न कळवताच आलीय…मीरा ये इकडं तुझ्या सासूच्या पाया पड…मग चहा ठेवायला जा…[मीरा प्रमिलाबाईंच्या पाया पडते डोक्यावरची ओढणी सावरत सासूबाईंना म्हणते]

मीरा – आई….साखर संपली आहे…आज लिस्ट किराणावाल्याकडं दिलीय…संध्याकाळपर्यंत येईलच साखर…

प्रमिलाबाई – अगं बाई….आता इथून सुरुवात का ? चहासाठी संध्याकाळपर्यंत वाट पाहावी लागणार का मला…?

स्वातीताई – मीरा…अगं अशी कशी गं तू वेंधळी…चहाचं जाऊदेत…घरात कांदे-बटाटे तर आहेत ना..की तेही संपलेत…?

मीरा  – आई…तेही संपलेत…पण कांदे आहेत आपण तोपर्यंत कांदे-पोहे करूयात मावशींसाठी..

स्वातीताई – ठीक आहे कर…पण एकदा फोन करून विचार लवकर सामान पाठवून द्या म्हणावं…

मीरा – हो आई…

प्रमिलाबाई – काय गं…स्वाती अजूनही तूच पाहतेस की काय सगळं…हिला कधी कळणार आहे…घरात काय संपलंय…काय शिल्लक आहे…काय संपायचंय…

स्वातीताई – जाऊ देत गं…शिकेल हळू-हळू..असे निर्णय घेता यायला हवेत गं…नवीन आहे तोवर आपलंच काम असत सांभाळून घेण्याचं…

दोघी बहिणींच्या मस्त गप्पा रंगात आलेल्या असतात इकडे स्वयंपाकघरात मस्त पोह्यांच्या फोडणीचा वास दरवळत असतो…मीरा आपली मावशीचं बोलणं मनाला लावून बसलेली असते…दोघींनाही  पोहे देऊन मीरा राहिलेलं काम करायला जाते पण डोक्यात मात्र तेच विचार असतात…’मी आईंच्या हातातून जेवढं काम आपल्या हातात घायचा प्रयत्न करतीय तेवढं कमी वाटतंय का…मलाही त्यांना त्रास होऊ नये असंच वाटत…पण त्या पूर्णपणे निर्णय मला घेऊ देत नाहीत यात नक्कीच माझी चूक नाहीय..’ मीराच्या मनात असेच विचार चालू राहतात…त्या विचारातच रात्रीच जेवण,यथोचित असा पाहुणचार मीरा करून ठेवते…त्याचबरोबर आलेलं किराणामालाचं सामानही मीरा भरून ठेवते…आपला नवरा सतीश ला फोन करून कांदे आणि बटाटे आणायला सांगते..यावरूनही आता नवरेबुवांचं बोलणं खावं लागणार असल्याने…मीरा आधीच सावध असते..म्हणून मनातून घाबरी-घुबरी झालेली अशी तिची अवस्था असते…अशोकराव एकटे असे घरात असतात ते प्रत्येक सिचुएशन सांभाळून घेत असतात…त्याच रात्री सगळेजण जेवणासाठी बसलेले असतात…मीरा सर्वांना वाढण्याचे काम करत असती…प्रमिलामावशी तर घरच्यांसारखी असल्याने सतीशही मीराला लगेच म्हणाला..

सतीश – मीरा…आज तू मला कांदे आणि बटाटे आणायला सांगितलेस…आईने तर याआधी कधीच मला ऑफिसवरून येताना असली काम सांगितली नाहीत…तुला सगळं एकटीला जमायला हवंय…

मीरा  – मी कधीही विसरत नाही…पण यावेळेस झालं असं…त्याबद्दल सॉरी…

सतीश – कांदे-बटाट्याचं सोड…भाजीही आईच करते…तुला कधी जमणार करायला…?

स्वातीताई – सतीश…तसं नाहीय ती नेहमी करण्यासाठी तयार असते…मीच तिला करू नको असं म्हणते…

सतीश – आई…का बरं …तिला जमायला नको का…की तू आयुष्यभर पुरणारेस मला…!

स्वातीताई – तिला अजून बारीक-सारीक निर्णय घेता येत नाहीय…कारण तेल जास्त टाकण्याची सवय आहे तिला भाजीत म्हणून मलाच ती भाजी करावी लागते..हा फक्त फोडणी मी करते…बाकीचं सगळं तीच करते…म्हणजे वाटणं बारीक करून देणं…कांदा चिरुन देणं…

अशोकराव – [इतका वेळ शांत बसलेले अशोकराव बोलू लागतात ] अरे…सतीश आता वेळ काय…जेव ना…निदान जेवताना तरी असलं काही बोलू नकोस…आत्ताचा स्वयंपाकही मीराने एकटीनं केलाय तेही स्वाती तुझी मदत न घेता…आणि मीराला स्वतः सगळी काम करायला आवडतात हो ना मीरा…

मीरा – हो पप्पा…

अशोकराव – अगं स्वाती परवाच तू मीराला सक्त ताकीद दिलीस ना की मला न विचारता कुठलीच काम करू नकोस म्हणून‘…मग निर्णय ती तुला न विचारता कसा घेईल..? कारण तुझी अशी भीती आहे की हा संसार आपल्या हातातून दुसऱ्या कुणाच्या तरी हातात जातोय…अन ते तुला स्वाती नकोय…म्हणून मीरा जास्त लक्ष देत नाहीय…कारण तिनं घेतलेले निर्णय पूर्ण चुकीचे आहेत असं तुला वाटत…मीरा शिकलेली आहे समंजस आहे..तिला निर्णय घेण्याचं सुचतं…

स्वातीताई – मी निर्णय घेण्याचं नाही बोलत आहे…घरात काय संपलंय…काय आणायचं हेही तिला कळत नाही..

अशोकराव – तिला कळत नाही ‘….’ ती बळकट नाही ‘….’ ती ला हिशोब जमत नाही ‘….ही नकारघंटा पहिली बंद करावीस तू…तू जर आत्तापासूनच जबाबदारी मीरावर टाकली नाहीस तर…ती एकटी असेल तेव्हा मीरा नक्कीच भांबावून जाईल…आणि मीरा जर आपलं मत मांडायला लागली तर तुला काय कळतं?’…’ तुला बोलायलाच हवं का…?’  ‘ हे तुझं काम नाही …किंवा मग आम्ही पाहून घेऊ ‘…असं म्हणणं चुकीचं आहे …तिला तुम्ही मग जाणून-बुजून हॅमरिंग करतायत असं वाटेल…वाटेल नाही तर मला वाटतंय तसं…कारण आताच मी पाहिलंय तुम्ही तिच्याशी कसं बोलताय यावरून …यानं मीराचा आत्मविश्वास कमी होईल दुसरं काहीही होणार नाही…

प्रमिलाबाई – दाजींचा पत्रकार जागा झाला बाई…[हसून म्हणतात ]

अशोकराव – अगं…प्रमिला पत्रकार म्हणून नाही सांगत मी…खरी गोष्ट आहे ही…कुठलीही जबाबदारी एकटीनं घेण्याइतकी धमक प्रत्येक स्त्रीमध्ये असतेच असते…पण नवरा,भाऊ,वडील यांचे खांदे बाईला मिळत जातात…स्वतःच्या जबाबदारीने निर्णय घेऊन तो पूर्णत्वास नेणं प्रत्येका बाईला आवडतं…आणि त्यातच ती बाई आपला आनंद मानत असते…आता त्यात जर कुणी मुलगा,नवरा,सासूबाई मदत करत असतील तर ते त्या बाईला नको असत..फक्त ते स्वतः पूर्णत्वास नेणं हाच भाबडा अट्टाहास असतो बाईचा दुसरं काहीच नाही…आता उदाहरण मीराचं देईल तुम्हाला…मगच मी काय म्हणतो हे तुम्हाला कळेल…मीरा..सांग एखाद उदाहरण…

मीरा  – पप्पा…उदाहरण देण्यापूर्वी…मी कुठलीच चहाडी करतीय असा गैरसमज नकोय…हे आधी सांगतेय मी…

अशोकराव – अगं…तू बिनधास्त बोल…सगळी आपलीच माणसं आहेत…

मीरा  – परवा दिवशी चिकन कर असं आईनी मला सांगितलं…मला तर चिकन करता येत..तरीही मसाले भाजून घेऊन…त्याच वाटणं वाटून घेऊन मी तयार केलं…नेमकं फोडणी द्यायला आई तुम्ही पुढे झाल्या…ही गोष्ट मला खटकली…कारण जर मी एका प्रमाणात सगळं वाटणं वाटू शकते पण फोडणी देताना का बरं हलगर्जीपणा करेल आई…? का ? कारण….मला तेल किती घालायचं याचा अंदाज बांधता येत नाहीय…म्हणजेच निर्णय घेण्यात मी कमी पडतेय हे सुचवून देताय तुम्ही सगळ्यांना…हे चुकीचं आहे…

अशोकराव – मीरा…अगदी बरोबर…प्रसंगाला तोंड देण्याची धमक एका निर्णयावर अवलंबून असते…आता आपण अजूनही पाहतो…आपल्या मराठी संस्कृतीत मुलींना किंवा महिलांना निर्णय घेणायच स्वातंत्र्य नाहीय..मुळात स्वातंत्र्य हे कुणी कुणाला देण्याची गोष्ट नाहीय…जन्माला येतानाच माणूस एकटाच येत असतो…पुढे त्याला किंवा तिला एकटीलाच मार्गक्रमण करावं लागतं….पहिल्यापेक्षा आता काळ सुधारलाय…आपणही सुधरुयात..

प्रमिलाबाई – हो ना…दाजी भारीच कौतुक आहे तुम्हाला मीरेचं…

अशोकराव – मग…कौतुक कारण्यासारहीच आहे मीरा…तुम्हालाही उद्या सून येईल…मग आधीपासूनच निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य द्या…मगच सुनबाईंचं मन रमेल…

प्रमिलाबाई – दाजी…अहो…निर्णयही चांगलेच असावेत सुनेचे…उद्या काहीही निर्णय घेईल ती…मग काय आम्ही समर्थन करायचं की काय तीच…

अशोकराव – तीचम्हणजे…अजिंक्यने पाहून ठेवली की काय कुठे…

आपल्या नवऱ्याचं हे वाक्य ऐकून स्वातीताई…प्रमिलाताईंकडे पाहतात…मग प्रमिलाताईही नजर चोरून दुसरीकडे पाहू लागतात…आता आपल्या बहिणीच्या मनातलं स्वातीताई बरोबर ओळखतात आणि म्हणतात…

स्वातीताई – बघ गं बाई…निर्णय घेणं यालाच म्हणतात…

प्रमिलाताईंचं बिंग फुटलं म्हणून…सगळेजण मनसोक्त हसून घेतात…म्हणून सगळ्यांना अजून चार घास जास्त जातात…

================

प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.

https://www.facebook.com/ritbhatmarati/

तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही

=============

हेही वाचा

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories