Skip to content Skip to sidebar Skip to footer

हुंडा

©️®️सायली

जानकीचे लग्न ठरले आणि साऱ्या देसाई कुटुंबाच्या आनंदाला उधाण आले. बसल्या बैठकीत साखरपुडा ठरला आणि लग्नाचा
मुहूर्तही पक्का झाला. एकत्र कुटुंबातील जानकी चार भावांत एकुलती एक आणि सर्वांची लाडकी मुलगी होती. आता देसाईंच्या घरी लग्नाची जोरदार तयारी सुरू झाली.

इकडे जानकी स्वप्नात हरवली होती. नकळत स्वतः शीच लाजत होती. ‘मोहन..किती राजबिंडे दिसतात ना! भव्य कपाळ, भेदक नजर, धारदार नाक, वागण्या -बोलण्याची एकदम कडक स्टाईल! अगदी असाच नवरा हवा होता मला. पण स्वभावाने कसे असतील हे? असेच उमदे असतील का? ते काही आत्ताच कळायचे नाही. पण सासुबाई थोड्या कडक वाटतात. सासरेबुवा स्वभावाने शांत वाटतात आणि छोटे दिरही आमच्या सारंग दादासारखे वाटतात.. नाही!’

“जानकी..” रजनीताईंच्या, आईच्या हाकेने जानकी भानावर आली. “अगं कधीची हाक मारते आहे मी. किती शोधलं तुला! तुझ्या होणाऱ्या सासुबाईंचा फोन आला होता. साड्या खरेदीला कधी जायचं म्हणून? उद्या की परवा ते ठरवून सांगा म्हणाल्या. तुझ्या सारंग दादाला विचार, कधी जायचं ते. मोठी गाडी काढावी लागेल. वन्स, तुझी मामी आणि शेजारच्या राणूताईंना सोबत न्यावं लागेल, त्याच ‘मध्यस्थ ‘होत्या ना.
चला बोलत काय बसले मी, किती कामं पडली आहेत अजून.” असे म्हणत रजनीताई उठल्या.

“आई..बस ना जरा.” जानकी त्यांना अडवत म्हणाली. तशा रजनीताई पुन्हा जानकी जवळ बसल्या. दोघी एकमेकींकडे मुकेपणाने पाहत राहिल्या बराच वेळ. जणू एकमेकींच्या मनातलं नजरेने सारं बोलत होत्या.

“किती मोठी झाली माझी लेक! इवलीशी होतीस गं. बघता बघता लग्नाला आलीस.” असे म्हणत रजनीताईंनी जानकीच्या डोक्यावरून हात फिरवला.

“आई..” जानकी रजनीताईंच्या कुशीत शिरली.

“झाला का तुमचा रडारडीचा कार्यक्रम सुरू?आई तुमचा निरोप मिळाला मला. आपण उद्याच जायचं आहे खरेदीला आणि जानकीताई तुमच्या होणाऱ्या अहोंना फोन करा बरं.. ते वाट पाहत आहेत तुमच्या फोनची.” सारंगदादा खोलीत येत म्हणाला. तशी जानकी लाजून आपला फोन घेऊन बाहेर पळाली.

दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे सगळे साड्या खरेदीला बाहेर पडले. शहरातल्या मोठ्या दुकानात खरेदी पार पडली. एवढ्या किमतीची खरेदी! जानकीच्या आईला आणि आत्याला थोडे अवघडल्यासारखे झाले. मात्र आता इलाज नव्हता.
सारी खरेदी जानकीच्या सासुबाईंच्या मनाप्रमाणे पार पडली. तिला पसंतीला फारसा वाव मिळाला नाही. यामुळे जानकी थोडी हिरमुसली. पण आनंदाच्या भरात तिने सासुबाईंच्या या वागण्याकडे दुर्लक्ष केले.
मग अंगठी खरेदीही झाली आणि मोहन आणि जानकी घरच्यांच्या परवानगीने बाहेर फिरायला गेले.

पुढच्या आठवड्यात ठरल्याप्रमाणे जानकी आणि मोहनचा साखरपुडा अगदी थाटामाटात पार पडला.

आता दोन्ही घरी लग्नाची जोरदार तयारी सुरू झाली.

पाहुणे मंडळी जमली. बघता बघता लग्नाचा दिवस उजाडला. नवरा -नवरीला हळद लागली. आता विधींची तयारी सुरू झाली. मुहूर्त जवळ येऊ लागला तसे भटजी गडबड करू लागले.

इतक्यात मांडवात एकच गडबड उडाली. जो तो म्हणू लागला, “नवऱ्या मुलीच्या सासुबाई रुसून बसल्या आहेत.”
नखशिखांत सजलेली जानकी हा गोंधळ ऐकून गडबडीने मांडवात आली. पाहते तर, तिच्या सासुबाई खरंच रुसून बसल्या होत्या..हुंड्यासाठी! हे सारं अनपेक्षितच होतं. भरल्या डोळ्यांनी
मोहनकडे आशेने पाहत ती तिथेच बसून राहिली.

“आत्ता दोन लाख रुपये हुंडा द्या, तरच हे लग्न लागेल.” जानकीच्या सासुबाई हट्टाला पेटल्या होत्या.
‘या क्षणाला एवढे पैसे आणायचे कुठून?’ जानकीचे आई, वडील त्यांची समजूत काढत होते. जवळपास देसाईंच्या साऱ्या जवळच्या पाहुण्यांनी त्यांना समजावून पाहिले.
मोहनलाही आईचे हे रूप नवीनच होते. त्यानेही आईची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. जानकीच्या सासुबाई अधिकच इरेला पेटल्या. तशा शेजारच्या मध्यस्थ राणूताईंनी हळूच कलटी मारली.
आता काय करावे हे कोणालाच कळेना. जानकीचे चारही भाऊ ‘ हे लग्न मोडूया ‘असे म्हणत मोहनच्या अंगावर धावून गेले. मंडपात सगळा गदारोळ माजला. लग्न अगदी मोडायच्या बेतात आले.

इतक्यात जानकीच्या आत्या काही सुचून पुढे आल्या. जानकीच्या सासुबाईंना म्हणाल्या, “आम्ही दोन लाख रुपये हुंडा द्यायला तयार आहोत..पण आमच्याही काही अटी आहेत.” हे ऐकून रजनीताईंना भोवळच आली.
तर जानकीचे वडील म्हणाले, “ताई भलते सलते वचन देऊ नको. होता नव्हता तेवढा पैसा खर्च केला. आता कुठून आणणार इतके पैसे?”

“मी आहे ना.. नको काळजी करू.” आत्याने आपल्या भावाला नजरेनेच खुणावले आणि पुढे त्या म्हणाल्या, “पहिली अट म्हणजे, तुम्ही आमच्या जानकीला पोटच्या मुलीप्रमाणे जपले पाहिजे.”

“हो..तर.. जपेन की मी.” जानकीच्या सासुबाई तोऱ्यात म्हणाल्या.

“तिची एखादी चूक झाल्यास तुम्ही तिला प्रेमाने समजवायचे. तिचा रागराग करायचा नाही. आमच्या मुलीला सासरी कुठलाही त्रास होता कामा नये. तिच्या पाठीमागे तिला बोल लावलेले आम्हाला अजिबात चालणार नाहीत. ती माहेरी जशी लाडात वाढली, तशीच सासरीही नांदेल. तिला सासुरवास अजिबात होता कामा नये. तिचा अपमानही होता कामा नये आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सून म्हणून तिचा ‘मान ‘राखला गेलाच पाहिजे. तिची सगळी हौस तुम्ही पुरवली पाहिजे. घरात तिला कुठलेही काम लावायचे नाही आणि सारे काही तिच्या मनाप्रमाणेच व्हायला हवे.” जानकीची आत्या घाईघाईने म्हणाली.

“अहो असे कसे, सून ना आमची ती? मग ती घरी कामं करणार नाही, तर कोण करणार? आणि सारे काही तिच्या मनाप्रमाणे व्हायला ती कोण लागून गेली? जर इतक्या अटी असतील तुमच्या तर ती आणि मोहन वेगळा संसार थाटतील. पाहतील त्यांचे ते. माझा काहीच संबंध नाही या लग्नाशी.”

तशा आत्या हसून म्हणाल्या, “चला म्हणजे हुंडा देणे रद्द…चला आता मुहूर्त टळण्याआधी लग्न पार पडू दे. रुसलेल्या सासूबाईंनी आत्ताच तर मान्य केलं हे की, त्यांचा आणि या लग्नाचा काहीच संबंध नाही म्हणून. पण मोहनच्या आई, या हुंड्याच्या मागणीपायी तुम्ही आपल्याच मुलाचे लग्न मोडायला निघालात? इथे काय घडले हे साऱ्यांनीच पाहिले. आमच्या मुलीचे लग्न मोडले असतेच, पण तुमच्या घराण्याचीही बेईज्जती झाली असती. निदान त्याचा तरी विचार करायचा.
आता हेही लक्षात ठेवा, तुमच्या घरी सून म्हणून येणाऱ्या आमच्या मुलीचा मान राखला गेलाच पाहिजे. नाहीतर गाठ माझ्याशी आहे.” हे ऐकून जानकीच्या सासुबाईंनी मान खाली घातली.

आता भटजीबुवा गडबड करू लागले. तशी जानकी डोळे पुसत बोहोल्यावर चढली. मंगलाष्टका पार पडल्या आणि जानकी आणि मोहनने एकमेकांच्या गळ्यात माळ घातली. तसा साऱ्यांचा जीव भांड्यात पडला.

जानकीच्या सासुबाईंना मात्र चरफडत गप्प बसावे लागले. हुंडा हातचा गेला तो गेलाच. शिवाय पाहुण्यात शोभा झाली ती निराळीच.

साऱ्यांनी आत्याच्या प्रसंगावधानाचे कौतुक केले. तर जानकीच्या पाठवणी वेळी मात्र मोहनने देसाई मंडळींना वचन दिले, “आमच्या घरी जानकीला कोणताही त्रास होणार नाही. झालाच तर प्रसंगी वेगळे राहू म्हणून..”आणि देसाई कुटुंबाने भरल्या डोळ्यांनी जानकीला निरोप दिला.

==============================

नमस्कार वाचकहो🙏🙏,

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आवड असूनही आपले छंद आपल्याला जोपासता येत नाही. आवड असूनही पुस्तकं वाचता येत नाही. त्यामुळे वेळेअभावी आपल्यासारखे खूप सारे वाचक वाचनापासून वंचित राहतात. आणि म्हणूनच वाचकांना कुठेही सहज वाचता येतील असा कथासंग्रह आम्ही रीतभातमराठी ह्या डिजिटल व्यासपीठावर घेऊन आलो आहोत.

उत्कृष्ट लेखकांनी लिहिलेल्या marathi katha, marathi moral story, marathi stories, marathi short stories, bodh katha marathi मध्ये आपल्याला रीतभातमराठीवर वाचायला मिळतील.

Leave a Comment

error: