ह्रदयात वाजे समथिंग…..!

ह्रदयात वाजे समथिंग…..!
©️®️राधिका कुलकर्णी.
” आता जर का पुन्हा कोणी चिऊच्या वाटेला गेलं नाऽ तर हातपाय तोडीन लक्षात ठेवा…! “
” शाळेतल्या मुलींची छेड काढता होय
रे?? निर्लज्ज कुठले..!!! “
” चलऽऽ गंऽऽ चिऊ. पुन्हा डोळे वर करून बघणार नाहीत तुझ्याकडे हे !!! “
दमदाटी करतच तावातावाने मिथिला
चिऊचा हात धरून तिकडुन निघाली.
शेजारी राहणाऱ्या १४ वर्षाच्या चिऊची चौकातील मुलं रोजच छेड काढत. आज मिथिलाने बांबूचा फोक घेऊन भर रस्त्यावर सगळ्यांना चोपून काढलं.
मिथिला, एक अजब रसायन. कुशाग्र बुद्धी, दिसायला तरतरीत, स्मार्ट पण चुकीच्या गोष्टींचा प्रचंड तिटकारा. चूक सहनच होत नसे मग त्या कोणीही करोत.
मिथिलाचे वडील हेमंत अभ्यंकरांनी तिला लहानपणापासुनच आत्मसंरक्षणात तरबेज केलं पण त्याचा जास्त उपयोग इतरांनाच होई.आजही तेच झाले.
————————–
२० वर्षांपूर्वी मि.अभ्यंकरांनी एक शाळा स्थापन केली ज्यात कमी फीसमध्ये सर्वसाधारण परिस्थितीतील मुलांना उत्तम शिक्षण मिळावे ही त्यांची भावना होती. ती त्यांनी आजवर कायम ठेवली आणि आता मिथिलासुद्धा तोच वसा पूढे चालवत होती. एम.बी.ए. झाल्यावर नामांकित कंपनीचे जॉब ऑफर्स सोडून मिथिलाने शाळेच्या कामात स्वतःला झोकून दिले आणि बरेच अमुलाग्र बदलही केले. कोडिंग,ऑल्टरनेटीव्ह एज्युकेशन, बाहेरच्या विख्यात शिक्षकांचे ऑनलाईन सेशन्स, मुलामुलींना आत्मरक्षा प्रशिक्षण, विविध छोट्या-मोठ्या उद्योगांची माहिती इ. बरेच उपक्रम ती राबवत असे.
तिची आई रोहिणी अभ्यंकर बचत गटातील बायकांना घेऊन छोटे कुटीर उद्योग करत असे.
रोहिणी – ” हंंऽऽ आल्या काss झाशीच्या राणीबाई लोकांचे हात-पाय मोडून !!! जेऊन घ्या आताऽऽ. पुन्हा जायचं असेलच नाऽऽ लष्कराच्या भाकऱ्या भाजायला….! “
आईचा उपरोधिक स्वर.
चिऊ – काकूऽऽ काय फायटींग केली आज ताईने. सगळ्या मुलांना पार धुवूनच काढलं. मला पण ताईसारखेच फायटर व्हायचंय …
रोहिणी – हो का ! होशील हं बाळं नक्की.
तुझी ताई फायटींगचे क्लास घेते नाऽ, तूही जात जा तिकडे… “
पुन्हा मिथिलाकडे विषय वळवत आई म्हणाली…
” पण किती दिवस अशी निस्वार्थ सेवा करणार…?
थोड स्वतःच्या भविष्याकडेही लक्ष द्यावं की नाही..? “
मिथिला – ह्म्म्म..! आता कोणतं नवीन स्थळ आलंय ?? “
बाबा – नवीन नाहीs.. जुनंच स्थळ पुन्हा नव्याने आलंय. तिसऱ्यांदा. त्या
सानेकाकूंच्या ओळखीने.
मिथिला – काय हो बाबाऽऽ, मी किती वेळा सांगितले ह्या मुलाशी नाही करायचेय मला लग्न…! “
मिथिलासाठी आलेलं हे स्थळ ती सतत नाकारत होती. मुलगा सॉफ्टवेअरमध्ये होता. तिला असं बंदिस्त आणि एकसूरी आयुष्य जगायचं नव्हतं. तिच्याचसारखा तडफदार,समाजसेवी आणि आपल्या कर्तबगारीची छाप सोडणारा कोणीतरी अफलातून व्यक्ति तिला जोडीदार म्हणून हवा होता.
आई – अगंऽऽ एकदा त्याचा बायोडाटा उघडून तर बघ. भेटून तर घे. कदाचित आवडेलही. न बघता असा नकार देणं बर नाही. सानेकाकू खूप विश्वासाने सांगताहेत त्याच्याबद्दल.
मिथिला – नको आईsss.. मला असे स्वतःभोवती जगणारे लोक आवडत नाहीत. जॉब,फ्लॅट,गाडी,मुलं,एखादी
फॅमिली वर्ल्ड-टूर बस्सऽऽऽ एवढीच काय ती ह्यांची धेय्यं आयुष्यातली. मला असे चाकोरीबद्ध आयुष्य जगणे शक्य नाही, तूला माहितीय नांऽऽ…??
तिच्या पसंतीचे स्थळ शोधणं आई-वडिलांसाठी दिवसेंदिवस कठीण होऊन बसले होते.
—————————-
एक दिवस मिथिला मुलांचा सेल्फ डिफेन्स क्लास घेत होती.
मिथिला (मूलांना) – आत्मरक्षा सर्वांसाठी अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. कोणती वेळ कोणावर कशी येईल सांगु शकत नाही. आपण कुठल्याही परिस्थितीसाठी सज्ज असायला हवं.
दोघेजण समोर या. एक अटॅक करणार आणि दूसरा डिफेन्स.
” पायातील अंतर वाढवा. कणा ताठ सरळ. नाहीतर समोरच्याचा पाय तुमच्या तोंडावर बसलाच समजा. “
ती मूलांशी बोलत असतानाच मागून एक आवाज आला.
सर्वजण तिकडे बघू लागले. एक हँडसम
तरूण सोसायटीत शिरत होता..
मिथिला – तुम्ही कोण ??? कराटे क्लास जॉईन करताय..?
” ओह्ऽऽ नोऽऽ..! “
” मी समीर पंत. अशातच इकडे शिफ्ट झालोय. “
” मार्शल आर्ट्स काॅम्पिटिशन्समध्ये बरेचदा भाग घेतलाय मी.अगदी ब्लॅक बेल्ट वगैरे नाही पण छंद म्हणून
खेळतो. “
मिथिला – ओह् नाइस…! इकडे कसे? “
” आमचं एक छोटंसं स्टार्टअप् ऑफिस आहे इथे जवळच. म्हणुन इकडे शिफ्ट केले घर.. अँड यू …? “
मिथिला – मीऽ.. मिथिला. मिथिला अभ्यंकर. माझ्या बाबांची शाळा आहे. मी तिथेच मदत करते आणि फावल्या वेळात ह्या अशा उचापत्या.
समीर – ओहsss! दॅट्स रिअली ग्रेट…! फार छान उचापत्या करता तुम्ही.
नाइस टू मीट यू. पुन्हा भेटू.
मिथिला – सेम हिअर. बाय.
———————————
एके रविवारी मिथिला आणि तिचा रोजचा उत्साही ग्रुप असेच मॉर्निंग वॉकला निघतात तर समोरून बुलेटवर समीर आणि त्याच्या मागे ट्रक भरून छोटी मोठी विविध प्रकारची झाडं,रोपटी. सोसायटीतील लोक गॅलरीत येऊन आश्चर्याने बघत होते. मिथिलाने कुतूहलाने समीरकडे पाहिले. समीर बुलेटवर अडकवलेली रोपं खाली ठेऊन सर्वांसमोर उभा राहीला. मिथिलाकडे बघून एक भुवई उंचावत त्याने मस्तशी स्माईल दिली. हायऽऽ! त्याची ती मार डाला किलर स्माईल बघुन मिथिलाच्या हृदयाच्या तारा अचानक छेडल्या गेल्या.ती गालातच खुदकन हसली.
समीर (सर्वांना उद्देशुन) – नमस्कार. मी समीर. नवीनच राहायला आलोय इथे. ह्या परिसरात मागे आलो होतो तेव्हा इकडे भरपूर झाडं होती पण आता परिस्थिती उलट झालीये ज्याचे परिणाम आपण सर्व भोगतच आहोत आणि ते सांगून मी तुम्हाला बोअर करणार नाही.
तर मी आणि माझे काही मित्र मिळून “जाऊ तिथे झाडे लाऊ” ह्या ब्रीदवाक्याने काम करतो. ह्यामध्ये तुम्हां सगळ्यांची साथ मिळाली तर लवकरच आपण इथे एक सुंदर हरित-विश्व तयार करू….. काय मग करणार ना मदत?
समीरच्या बोलण्याने सगळेच चार्ज झाले. नवीन उत्साहात बरेच लोक त्याला जोडले गेले. मिथिलाचा समीरकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलू लागला. हाही आपल्यासारखाच वेगळ्या वाटेवरचा प्रवासी आहे हे जाणवू लागले तिला. लोकांना मदत करण्याखेरीज निसर्गाकडेही लक्ष देणे आपले कर्तव्य आहे हे तिला त्याच्याकडे बघून जाणवले. सगळ्यांनी वृक्षारोपण खुप एन्जॉय केले. समीरने त्यांना १५ दिवसांनंतर टेकडीवर वृक्षारोपणासाठीचे आमंत्रण दिले.
सगळेजण उत्साहात तयार झाले. त्याचवेळी समीरने निसर्गवेडा ह्या त्याच्या वेबसाईटचीही थोडी माहिती सगळ्यांना दिली.
मिथिलाचे बाबा कौतुकाने समीरला म्हणाले ,
” वाह्! खूप छान काम करतोएस हं तू. आमच्या मिथिलासारखाच कोणीतरी अतरंगी बघून बर वाटलं. आज ह्या विचारांची फार गरज आहे समाजाला.
समीर – थॅंक्यू काका ! तसं खूप जणांना असं काही करावं वाटतं पण पुढाकार घेण्याएवढा वेळ नसतो. आम्ही फक्त ती संधी मिळवून देण्याचा प्रयत्न करतो.
आपल्या रोजच्या चौकटीतून थोडसं बाहेर डोकावलं की त्यांनाही बर वाटतं.
मिथिला – वॉव्ह..! ग्रेट थॉट समीर…! आणि बाबाऽऽऽ, हा मार्शल आर्ट्सची प्रॅक्टिसही करताे हंऽऽऽ. “
बाबा – अरे वाह..! छानच..! बेटा तुम्हा सगळयांना वेळ असेल तेव्हा आमच्या शाळेत येऊन वृक्षारोपण आणि
निसर्गसंवर्धनाबाबत आमच्या मुलांनाही थोडी माहिती सांगा ना.
समीर – हो नक्कीच काका. लवकरच भेटू आपण. चला, निघतो आता. बायऽऽ मिथिला !
पण मिथिलाचे कुठे लक्ष होते… ती तर भान हरवून फक्त समीरकडेच बघत होती.
बाबा – अगं बेटाऽऽ, बाऽऽय बोलतोय तो.
मिथिला – हा ssss…! ओह बायऽऽ.. समीर..! “
———————-
मिथिला – बाबा ऽऽ मी राजश्रीकडे जातेय.आमची कॉलेज गॅंग येणार आहे सगळी.,आता ऊद्या दुपारीच परत येईन.
मिथिला राजश्रीच्या घरी पोहचली.खूप दिवसांनी त्यांची गर्ल्स-गॅंग जमल्यावर सगळ्या आपापल्या गमतीजमती, काम, घरच्या कुरबुरी सांगू लागल्या पण मिथिलाचं कुणाकडेच लक्ष नव्हत. ती आपल्यातच हरवलेली पाहून राजश्रीने मिश्किलपणे विचारले…
राजश्री – ओये मिठ्ठू कहा खोयी हो..?
मिथिला – काय सांगू राजूsss तुला.. !!
गॉगल लावून भुवई उंचावत अशी किलर
स्माइल देतो ना तोऽऽ…, तेव्हा हृदयात समथिंग वाजते यारऽऽऽ !
हसला की गालाला पडणाऱ्या खळ्या उफ्ऽऽऽऽ ! ॲम गोईंग मॅड फॉर हिम..!
मानसी – ओ होss..! क्या यहीऽ प्याऽऽर तो नहीऽऽ…!!
राजश्री – कसलं प्यार-व्यार…! टेंपररी क्रश असेल..! कॉलेजला असतानाचा तो मेकॅनिकल इंजिनिअर आठवतो ना..? वेगवेगळ्या मशीन्स बनवायचा. ही अशीच इम्प्रेस झाली होती तेव्हा. नंतर त्याने असला पकवला सगळ्यांना. तसाच निघेल हा झाडे लावा झाडे जगवा वाला. ..”
मिथिला – नहीऽऽ रेऽऽ ! ही ईज समथींग डिफरंट…!
अशाच मस्करी छेडछाडीच्या गप्पा उरकुन दुपारी सगळ्या आपापल्या घरी परतल्या.
—————————
इकडे काही दिवसांनी शाळेमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम ठरला. समीरच सगळ्यांना वृक्षारोपणाचे महत्त्व सांगणार होता पण त्याला यायला बराच उशीर झाला तोवर त्याचे मित्र सर्वांना सूचना देऊन काम सुरू करतात. मिथिलाच लक्ष मात्र समीरच्या येण्याकडेच लागलेलं असतं. थोड्या वेळात तो येतो.
मिथिला (लटक्या रागाने) – काय हे किती उशीर..! गेस्ट आहेस म्हणुन भाव खातोस होय रे.. !!
समीर – अरे ssss! ॲम सोऽ सॉरीऽऽ! बट यू नो नाऽऽ, मुली किती उशीर करतात !! शर्लीमुळे नेहमी लेट होतो मला. रात्रभरऽऽ झोपु देत नाही आणि सकाळी पटकन आवरत नाही. अक्षरश: हाताने खाऊ घालुन आलोय. म्हणुन एवढा वेळ झाला.
शर्ली नाव ऐकताच मिथिलाच्या चेहऱ्याचा रंगच उडाला.
कपाळावर प्रश्नार्थक अढि उमटली.
” शर्लीऽऽ? छोटी बहिण !! “
समीर – छेssss…! वेडी आहेस का…! शी इज माय डार्लिंग…!
खुप नखरेल आहेत हंऽऽ मॅडम. “
बरऽऽ चला ऑलरेडी लेट झालाय.अजुन लेट नको,काम सुरु करूया…
समीर सर्व स्टाफ व मुलांना निसर्ग संवर्धनाबद्दल खुप छान माहिती देतो व शाळेच्या रचनेनुसार झाडे लावुन घेतो. मिथिलाचं लक्ष मात्र पूर्णपणे उडालेलं असतं. तिची सुई शर्लीवरच अटकलेली.
घरी गेल्यावरसुद्धा तिच्या मनात तेच विचार घोळत राहतात.
” नक्की कोण ही शर्ली ? गर्लफ्रेंड की बायको..? मैत्रीणही असु शकते…? पण कोणी मैत्रिणीचे एवढे नखरे का बरं सहन करेल..?
जाऊ देत. मी का त्याचा एवढा विचार करतेय ??
बासऽऽ. आता शक्यतोवर त्याच्यापासून लांब राहायचं. उगाच गुंतणे नको.”
दुसऱ्या दिवशी सकाळी दोघंही लकिली एकाच वेळी मॉर्निंग वॉकला समोरासमोर आले. जिम कॉस्च्युममधून दिसणारे त्याचे पिळदार दंड बघून मिथिलाच्या काळजात कळ उठली पण निग्रहपुर्वक त्याकडे दुर्लक्ष करत ती घरी परतली. काही दिवस समीरला टाळुनच तिने आपले रूटीन पार पाडले.
————————
एके रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे सोसायटीमधील बरेच लोक समीरच्या सांगण्यानूसार टेकडीवर वृक्षारोपणासाठी निघाले. मिथिलाचीही खुप इच्छा होती जायची. तिलाही या कामात इंटरेस्ट निर्माण झाला होता पण समीरला टाळण्यासाठी तिने न जाण्याचे ठरवले.
त्याच्याबद्दल मनात निर्माण झालेले आकर्षण संपले तरच पूढे त्याच्याशी मित्रासारखे वागता येईल ह्या विचारानेच तिने हा दूरावा राखायचा ठरवला…
समीर मात्र तिच्या घराखाली जीपचा हॉर्न वाजवून तिला बोलावू लागला.
रेड कलरच्या ओपन जिप्सीमध्ये समीर एकदम मारूऽ दिसत होता. त्याला टाळणे मिथिलाला खूप जड जात होते. खिन्न मनाने मिथिला खाली येऊन तिचा मूड नाही सांगून परतू लागली. पण ऐकेल तो समीर कसला..!
समीर – अगंsss घरात बसून मुड कसा ठिक होणार !! चल तिकडे डोंगरावर. बघ कसा मूड बदलतो ते…!!
अँड वन मोर सरप्राईज इज देअर फॉर यु… !!
शर्लीला आणलयं मी, खास तुला भेटवायला..!
कधीची तुझी वाट बघतेय ती…
समीर जबरदस्तीने तिला सोबत घेऊन गेला. मिथिला रस्ताभर विचार करत राहिली. कशी असेल शर्ली..?
तोपर्यंत ते टेकडीवर पोहोचले. मिथिलाने प्रश्नार्थक नजरेने समीरकडे पाहिले.
त्याने एक मोठी शिट्टी वाजवली तशी समोरून एक लॅब्रेडॉर धावत आली. समीर तिला पटकन मिठीत घेत मिथिलाकडे बघुन म्हणाला…
समीर – लूक माय डार्लिंग शर्लीऽऽ…!
मिथिलासाठी हा खूप मोठ्ठा सुखद धक्का होता.
मिथिला – ही आहे तुझी डार्लिंग शर्लीऽऽऽ…??
समीर मिश्किलपणे डोळे मिचकावुन विचारला..
” मगऽऽ, तुला काय वाटले…? “
” नाही.. कुठे कायऽऽ.. ! ”
मिथिलाने आपली नजर चोरली.
तिच्या चेहऱ्यावरचे भाव नजरेने टिपत जरा जवळ जात समीर म्हणाला…
समीर – मगऽऽ,कसे होते सरप्राईज ! झाला नं मूड ठीक…. की अजून काही करू..!
त्यावर खालमानेनेच मिथिलाने नकार दिला..पण मनात मात्र आनंदाची कारंजी फुलत होती..
समीर पूढे बोलू लागला….
४महिन्यांपूर्वी रोडवर ही जखमी अवस्थेत सापडली. मग मीच तिला घरी घेऊन आलो. तेव्हापासून माझ्याकडेच असते ही. इथे माणसांनाच माणसांची पर्वा नाही तर ह्या मुक्या प्राण्यांकडे कोण बघणार…?
मग आम्ही निसर्गवेडेच ह्यांच्यासाठी शक्य तेवढी मदत करतो.
मिथिलाला आतून एकाचवेळी समीरबद्दल एक आदर आणि प्रेम जागृत होऊ लागले.
पुढे अश्याच निमित्ताने दोघांच्या भेटी वाढू लागल्या.
एकदा जवळच्याच जंगलात सर्व टीम पिकनिकसाठी गेली.
संध्याकाळी हलक्याशा थंडीत बॉनफायर सोबत अंताक्षरी सुरू झाली. रात्रीची वेळ, बोचरा गारठा, समीरची साथ, हवेहवेसे ओझरते स्पर्श अन् गोड शिरशीरीऽऽ.
मिथिला न्हाऊन निघत होती त्याच्या सहवासात.
समीर संधी मिळताच मिथिलाकडे बघून रोमँटिक गाणे गायला लागला.
“ओल्या सांजवेळी.. ,
ऊन्हे सावलीस बिलगावी…
तशीऽ तुऽऽ ,
जवऽळी येऽ जराऽऽ….”
मिथिला लाजून चूरचूर होत होती.
एव्हाना सगळ्यांनाच दोघांचे गोड गुपीत समजले होते. प्रेमवेडे म्हणून सगळे चिडवायलाही लागले होते.
मिथिलाच्या घरीही ह्याची हलकीशी कल्पना आलेली होतीच.
——————————-
एक दिवस समीर मिथिलाच्या घरी आला. टेबलाखाली रद्दीमध्ये पडलेला एक बायोडाटा हातात घेऊन त्याने विचारले..
” लग्नासाठी बघणं चालूय वाटते.. !! “
मिथिला – पण तो रिजेक्टेड आहे.
असे साचेबद्ध, स्वतःपुरते जगणारे लोक नकोएत मला.
समीर – अच्छा..! मग माझ्याबद्दल काय विचार आहे…?
म्हणजे मी घरच्यांनाही घेऊन येईन रीतसर. जर तुझी संमती असेल तर. …! “
समीरचा डायरेक्ट सिक्सर.
मिथिलाने आश्चर्याने आईवडीलांकडे पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावरही स्मित उमटले.
मिथिलाने लाजून मान खाली घातली.
त्याने पून्हा विचारले…,
” मगऽऽ होकार नक्की नाऽ. !
” बघ बरंऽऽ.. नाहीतर पुन्हा रीजेक्ट करशील मला. “
खजील होऊन समीरकडे पहात मिथिला
म्हणाली…
” पण तू तर आज पहिल्यांद्याच विचारत आहेस, मी का रिजेक्ट करेन तुला ? “
समीर रद्दीतील स्वतःचा बायोडेटा काढून म्हणाला ,
” हे कायsss…! ३वेळा तर रिजेक्ट केलेस मला. “
सर्वांनी आश्चर्याने समीरकडे पाहिले.
” आऽऽऽ !
म्हणजे ? हे नाटक होते सगळे ? “
समीर – मग मी काय करणारऽऽ…?
सानेकाकूंकडून हिचे काम, वेगळं काही करण्याची जिद्द हे सगळे ऐकुन पार वेडा झालो होतो. मलाही अशीच वेडी आयुष्यात हवी होती.,पण ही साधं भेटायलाही तयार नव्हती. मग शेवटी
काकूंना हा प्लॅन सांगितला.
त्यांच्याकडून हिची सर्व माहिती मिळवली. हिला इम्प्रेस करण्याकरता मार्शल-आर्ट्सही शिकलो.
” किती मार खाल्ला माहितीय त्या ट्रेनरचा…!
आता पूर्ण तयारीनिशी आलोय. एकदा तरी भेटून नकाराचं कारण आणि
नक्की काय हवंय हिला हिच्या जोडीदाराकडून हे जाणून घेण्यासाठी इकडे शिफ्ट झालो…”
मिथिला अजुनही धक्क्यातच…..
मिथिला (विस्फारल्या नजरेने) – ” पण तू तर सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेस
नाऽऽ. ? “
” हो आहेच मी सॉफ्टवेअर इंजिनिअर. भेटणं सोड निदान एकदा माझी फाईल उघडून तर बघायचीस… !
मी नक्की काय करतो हे कळले असते मग….! “
” आम्ही काही मित्रांनी मिळून सायबर सिक्युरिटीचा स्टार्ट-अप बिझनेस सूरू केलाय.
आणि निसर्ग / प्राणी जपणे ही आमची आवड. “
” मग ssss !!! आता तरी साथ देशील ना.. !!
मिथिला लाजत हळूच त्याच्या जिप्सीची चावी घेऊन बाहेर पडते.
मंद पावसात ओपन जिप्सीमध्ये दोघेच लॉंग ड्राइव्हला निघतात……त्याचवेऴी
एफएम रेडीओवर बॅकग्राऊंड म्युझिक वाजत असते…..
” ह्दयात वाजे समथिंग.,
सारे जग वाटे हॅपनिंग,
असतो आता मी सदा
ड्रिमिंग ड्रिमिंग….!! “
————–(समाप्त)—————–
©️®️राधिका कुलकर्णी.
नमस्कार मंडळी..
कशी वाटली ही कथा??
कमेंट्समधे नक्की सांगा.
धन्यवाद.