Skip to content Skip to sidebar Skip to footer

नातं आणि विचार

मुग्धा आपल्या ४ भावांमध्ये एकटीच मुलगी असल्याने सगळ्यांची लाडकी आणि सगळ्या भावंडात पदवीपर्यंत शिक्षण झालेली ती एकटीच..मुग्धाचे वडील आणि आजी आजोबा जुन्या विचारांचे होते.  फक्त मुग्धा आणि तिची आई नवीन विचारसरणीच्या पण तरीही मुग्धाच्या आईला मुग्धाच्या वडिलांपुढे कायम नमते घ्यावं लागायचं. म्हणून मुग्धाला चांगले वळण लागावे यासाठी त्या आटोकाट प्रयत्न करीत असे आणि मुग्धाही उलट उत्तर न देता निमूटपणे चांगल्या गोष्टी आत्मसात करायचा प्रयत्न करत असे… 

पण जबाबदारी वाढत होती, मुग्धाही मोठी होऊ लागली आणि लहान भावंडेही मोठी होऊ लागली.  घरात मुग्धाचे वडील आणि आजी आजोबा नेहमीच मुग्धाच्या आईला घालून पाडून बोलायचे. मग समोर मुलं जरी असतील तरीही मागचा पुढचा विचार न करता मुग्धाच्या आईला रागवायचे. झालं तर मग जेव्हा घरचे मोठेच आईचा अनादर करायचे तर त्यांच्यापासून लहानही काय शिक्षा घेणार….अगदी सर्रासपणे मुग्धाच्या भावांनी देखील आईला उलट बोलायला सुरुवात केली. 

पण त्यांना कुणीही सांगत नव्हतं याला कारण जुनी विचारसरणी…. कारण कित्येकदा स्वयंपकात मीठ कमी, वस्तू सापडली नाही, जेवताना ठसका लागला की पाणी न पिता सर्वस्वी आईलाच जबाबदार ठरवायचं हे ठरलेलंच असायचं…. चूक नसताना मुग्धाच्या आईलादेखील मुकाटपणे सहन करावे लागे. हे सगळं मुग्धाने जवळून पाहिले असल्याने मुग्धा कधीही आईला कमी लेखत नसे उलट आईला मदतच करत असे..पण मुग्धाची आई सगळी जबाबदारी एकटी समर्थपणे पार पाडत होती..आणि जबाबदारी कशी पार पाडायची हे आपल्या लेकीला समजावत होती… 

हळू-हळू मुग्धाचं लग्नाचं वय होत आलं…मुग्धा पदवीधर असल्याने एका कॉम्पुटर इन्स्टिटयूट मध्ये ट्रैनिंग द्यायचं काम ती करत असे…त्याचे तिला फक्त १५००/- रुपये मिळायचे. त्या पैशातून ती स्वतःच्या आणि आपल्या आईच्या आवडी-निवडी जपण्याचा पुरेपूर प्रयत्न करायची.  थोडी रक्कम बँकेत जमा करायची  जेणेंकरून तिच्या लग्नात उपयोगी पडेल ती जमापुंजी. 

जुनी विचारसरणी असल्याने वडील मुग्धाला पूर्ण वेळ नोकरी करू देत नव्हते.  म्हणून मुग्धाने पार्ट टाइम जॉब निवडला होता. थोड्याच दिवसात आजोबांच्या ओळखीतलं एक स्थळ मुग्धाला चालून आलं…मुलगा कस्टम अधिकारी आणि गावाकडेही २० एकर जमिनीचा मालक होता शिवाय मनानेही अगदी नवोमतवादी होता.  त्याच्या आई-वडिलांचा शिक्षकी पेशा असल्याने खूपच समजूतदार असं घर मुग्धाला चालून आलं होतं… 

मुग्धाच्या आईला तर खूपच आनंद झाला कारण सरकारी नोकरदार जावई मिळाला म्हणून आपली मुलगी सुखात राहील असं मनोमनी आईला वाटत होतं.. ..पण तरीही आईचं काळीज ते….तिला मुग्धाचीही काळजी लागून राहिली….मुग्धाच्या आईने आयुष्यात खूप काही सहन केलं होतं….सगळ्यांसाठी एवढं करूनही नेहमीच तिला सगळ्यांच्या तिरस्काराचा सामना करावा लागायचा….म्हणून मुग्धाच्या बाबतीत असं होऊ नये म्हणून ४ गोष्टी मुग्धाला समजून सांगायला लागली. 

मुग्धा…आता तू काही दिवसांनी सासरी जाणार आहेस…तेव्हा खूप समंजसपणाने तुला वागावं लागेल..जावईबापूशी नीट वाग…आणि हो कुठलंही काम करण्याची तयारी दाखव…तरच निभावून नेशील गं पोरी..तू चांगली वागलीस तरच आमचं नाव निघेल गं…इकडं सगळेजण खूप धारेवर धरतात मला… अगदी सासऱ्यांपासून ते लहानग्या मिहीर पर्यंत…तू तरी तिकडे जाऊन माझं नाव काढशील…” 

मुग्धा – “आई….अगं तू ऐकून का घेतेस गं…आजोबांचं ठीक आहे गं किती दिवसांचे आहेत ते त्यांना बोलू देत पण निदान माझ्या भावाने तुला उलट बोलायचा अधिकार कुणी दिला त्याला….तू ऐकून घेतेस म्हणून…त्याला एक कानशिलात वाजवण्याचा अधिकार आहे तुला…मग दाखव तो अधिकार..” 

आई  – “जाऊं दे गं…मुग्धे…उगाच शब्दाला शब्द वाढतो आणि वाद होतात आणि यांच्यापर्यंत वाद गेला की दुसऱ्या कुणाची चूक माझ्या माथी टाकून मोकळे होतात…त्यापेक्षा आपण शांत राहिलेलं बरं..” 

मुग्धा – “आता…तुला बोलावं लागेल आई कारण अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा गुन्हेगार असतो हे लक्षात ठेव…आणि आता शब्दांना आपल शस्त्र बनव…शब्दात इतकी धार पाहिजे की…समोरच्याने बोलताना हजारवेळा विचार केला पाहिजे आपला…” 

आई  – “हो…हो आजीबाई आता तूच राहिली बाई सांगायची…”[हसत-हसत]  

मुग्धा  – “मी आहे आता इथे म्हणून…. उद्या मी सारखी नाही राहणार इथे तुला धीर द्यायला..” 

मुग्धा भावनिक झाली आणि आईच्या कुशीत जाऊन रडायला लागली…लेकराला रडताना पाहून त्या माऊलीच्याही अश्रूंचा बांध कोसळला होता. 

पुढच्या काही महिन्यातच मुग्धाचे लग्न थाटामाटात झालं. सासरी सगळेजण सुनेचं कौतुक करतात…सासूबाई तर कुठं ठेऊ कुठं नको असं करतात..लग्नाच्या दिवशी मुग्धा खूप थकून जाते आणि हि गोष्ट सासूबाई पटकन हेरतात म्हणून मुग्धाला आपल्या मुलीपाशी म्हणजे रीनापाशी अंथरून घालून देतात, 

सासूबाई  – “मुग्धा…ए…मुग्धा…हे बघ इथे झोपायला अंथरून घालून दिलंय तुला…दमली असशील ना…फ्रेश हो आणि झोपून घे पटकन..उद्या पूजा आहे..”

 सासूबाईंचं ऐकून मुग्धा पटकन फ्रेश होऊन येते आणि साधी साडी नेसूनच बाहेर येते हे पाहून सासूबाई चकित होतात आणि हसून म्हणतात… 

सासूबाई  – “अगं…मुग्धा तू तर कमालीचीच आहेस की…” 

मुग्धा      – “काय झालं???? माझं काही चुकलं का..?” 

सासूबाई – “नाही गं…अगं साडी नेसायची काहीच गरज नव्हती…ड्रेस घातला असतास तरी चाललं असतं की..!” 

मुग्धा      – “मी तर ड्रेस आणलाच नाही की..आईने सांगितलं आता तिकडं साडीच नेसायचीस म्हणून..” 

सासूबाई – “बरं…मग आता साडी काढून टाक…रीनाचा ड्रेस देते मी तुला..तो घालून झोप तेवढच तुला मोकळं आणि सुटसुटीत वाटेल…!” 

मुग्धा – “आई?????” असं म्हणून ती बुचकळ्यात पडते. 

मी तुम्हाला आई म्हटलं तर चालेन का..?” 

सासूबाई – “अगं…विचारतेस काय…म्हणं की…आणि आता आईच आहे तुझी मी…” 

सासूबाईंचा मनमोकळेपणा पाहून मुग्धाला खूप आधार आणि दिलासा वाटला… सत्यनारायणाची पूजा आटोपल्यानंतर…चार दिवस माहेरपणाला मुग्धाला पाठवायचं ठरलेलं असतं.  सत्यनारायणाच्या कथेनंतर सासूबाई मुग्धाला ४-५ भरझरीचे ड्रेस देतात. 

मुग्धा बेटा….हे घे तुझ्यासाठी….जा तू तयार होऊन ये….आपल्याला निघायचं आहे थोड्यावेळात” 

मुग्धा – “आई हे काय? ह्याची काय गरज होती….मी साड्या आणल्या आहेत कि..आणि माहेरी मी साडी घालून नाही गेले तर तिकडे सगळे जण आईलाच बोलतील” 

सासूबाई – “का गं? त्याची काळजी तू नको करुस….अगं एवढ्या लांबचा प्रवास..लग्नाच्या दिवशी पाहिलं मी…घरी परतताना किती अवघडून गेली होतीस तू संपूर्ण प्रवासात….आणि मी आहे ना तुझ्या सोबत तू काही काळजी करू नको “ 

मुग्धा तयार होऊन येते आणि सगळेजण सासरची पाटी घेऊन मुग्धाच्या माहेराला निघतात. 

माहेरी पोहोचताच मुग्धाला पाहून आईचे डोळे भरून येतात. रीतीप्रमाणे मुग्धाचे आणि तिच्या नवऱ्याचे औक्षण करतात, भाकर-तुकडा ओवाळून टाकतात आणि घरात यायला सांगतात..तसं स्वागत मस्त होतं …पुढे काय वाढवून ठेवलंय हे मुग्धाला आणि तिच्या सासूबाईंना काय माहिती..? मुग्धाला तिची आई स्वयंपाकघरात बोलावते आणि चांगली खडसावते. 

मुग्धा…अगं काय सांगितलं होत तुला मी..विसरलीस का..? साडी नेसता आली नाही का तुला..ही कसली गं पद्धत तुझी…चांगले गुण उधळले गं पोरी…माझ्या संस्कारांचं तर मातेरं केलंस..आता काय म्हणतील सासरकडची लोकं ..घरंदाजपणाचा एकही गुण नाही तिच्यात असंच म्हणतील…एव्हाना म्हणतहीअसतील..कळतंय का..? 

 मुग्धाच्या डोळ्यात पाणी येत…पण मुग्धा शांतपणे सगळं ऐकून घेत असते…आणि बाहेर मुग्धाच्या आईच सगळं बोलणं सासूबाईंना ऐकू येतं..पण या परिस्थितीतून  कसा मार्ग काढायचा याचा विचार त्या करत असतात…मुग्धा स्वयंपाकघराच्या बाहेर येते आणि सगळ्या पाहुण्यांना वाकून नमस्कार करते…मग पाहुणे मंडळी आप-आपसात कुजबुजू लागतात की, ‘आपल्या आईने तर खूपच संस्कार केलेत लेकीवर…पहा..चक्क ड्रेसमध्ये आपली लेक ते पण सासरच्यांसमोर..इतक्यात हे शब्द सासूबाईंच्या कानावर पडतात आणि..त्याला अपवाद मुग्धाचे वडील आणि आजी आजोबा पण नसतात….आजी पण आत मध्ये जाते आणि आईला घालून पडून बोलायला लागते. 

सासूबाई सगळा प्रकार पाहतच असतात 

सासूबाई  – “आहेच माझी लेक हुशार आणि संस्कारी…पहा सगळ्यांच्या कशी वाकून पाया पडली..मुग्धा ये इकडं बस..आणि मीच तर सांगितलं माझ्या लेकीला ड्रेस घालायला…खूप लांबचा प्रवास होता की..आणि अवघडली असती बिचारी…” 

आई      –  “अहो…विहीणबाई हे बरं दिसत का…चारचौघात…असा कार्यक्रम, सुरुवातीला तरी नवीन-नवीन साडीत राहायचं ना तिने…एवढच म्हणायचंय हो मला….” 

सासूबाई   – “काही नाही होत हो….तुम्ही अगदी निश्चिन्त राहा…आपण एवढ्या साडी नेसण्यात सराईत बायका तरीही साडी नेसून चालणं जमत नाही हो कित्येकदा…आणि विशेष म्हणजे आपल्याला सराव आहे साडी नेसून वावरण्याचा…त्या लेकराने…पहिल्यांदाच साडी नेसलीय…आणि त्यातही तिची फरपट…पाहवली नसती हो मला…शिवाय तासाभराच्यावर थोडी तिने साडी कधी नेसलीय..मग एवढ्यात आपण कशा काय अपेक्षा ठेऊ शकतो तिच्याकडून…साडीबरोबर स्वतःची फरपट करायची…” 

आई      – “विहीणबाई…अहो फरपटीच काय एवढं…सवय होईल की सावकाश…” 

सासूबाई – “सावकाश होऊ देत सवय…कुठे एवढी घाई आहे…संपूर्ण आयुष्य पडलय की…आणि हो…मला नाही खपायच हो माझ्या लेकीला असं बोललेलं…संस्कारांचं झालं…तर..विहीणबाई….तुमचे संस्कार अगदी उत्तमच आहेत हो…नावच काढलंय हो लेकीने…” 

सासूबाईंचा मुग्धाला असलेला सपोर्ट पाहून मुग्धाच्या आईला अगदी भरून पावल्यासारखं वाटलं आणि माहेरची बाकीची मंडळी मात्र तोंडावर पडली. 

आपल्या सासूबाईंच्या अशा बोलण्याने मुग्धा खूपच हरखून गेली…मनोमनी खूपच सुखावली होती…पाहुणचार झाल्यावर मुग्धाच्या सासरची मंडळी परत निघाली. 

सासूबाई – “मुग्धा बाळ येतो आम्ही….काळजी घे..नीरजला ४ दिवसांनी पाठवते तुला घ्यायला” 

मुग्धा – “आई मी तुमच्यासोबत येऊ का?” 

सासूबाई फार प्रेमाने – “बाळ असं लगेच नाही येत येणार तुला…पाठ्वणीसाठी आली आहेस तर १ दिवस तरी राहायची पद्धत आहे….तुला हवं असेल तर उद्याच नीरजला पाठवते….मग तर झालं” 

मुग्धाने सहमती दर्शवली आणि तिच्या सासरच्यांनी सगळ्यांचा निरोप घेतला. 

पण हे सगळं पाहून मुग्धाची आई भारावून गेली आणि मनातल्या मनात देवाकडे प्रार्थना केली कि लेकीला माहेरपणा पेक्षा सासरची ओढ लागलीये ह्यापेक्षा सुख अजून काय असू शकतं. नशीब काढलं लेकीने.

================

प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.

https://www.facebook.com/ritbhatmarati/

तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही

=============

हेही वाचा

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

1 Comment

  • Vijayalaxmi Maramwar
    Posted May 28, 2021 at 3:55 pm

    Khup chan katha next kay zale te wachayala awadel.

    Reply

Leave a Comment

error:

Warning

सध्या युट्युब वर कथा चोरी करून वाचून दाखवण्याचे धंदे चालू आहेत लोकांचे. आमच्या वेबसाईट वरची कथा कुठल्याही युट्युब चॅनेलवर बेकायदेशीररित्या आढळल्यास त्या चॅनेलला लगेच रिपोर्ट करण्यात येईल ह्याची कृपया दक्षता घ्यावी. तसेच आपल्या वाचकांपैकी कुणालाही असे बेकायदेशीर चॅनेल्स आढळल्यास आम्हाला ritbhatmarathi@gmail.com ह्या ई-मेल वर त्वरित कळवावे.