Skip to content Skip to sidebar Skip to footer

झुकतं माप नेमकं कुणाला द्यावं ?

पल्लवी एकदम साध्या पण सुशिक्षित घरातली लग्न होऊन आपल्या सासरी आलेली मुलगी. घरातल्या जबाबदाऱ्या अगदी नेटानं पेलणारी…आपलं राहणीमान साधं असणारी,कुठलीही गोष्ट साध्य करण्यासाठी कष्ट घेणारी. लग्न झाल्यावरही आपल्या नवऱ्याला सासू-सासऱ्यांपासून वेगळं नाही राहायचं हा शब्द पल्लवीने अमितला आधीच दिला होता…तसंच सासू-सासऱ्यांची काळजी घेण्याचंही आश्वासन पल्लवीने अमितला दिल होत…लग्नानंतरचे काही दिवस नव्या सुनेची दृष्ट काढण्यात,पहिल्या-पहिल्या सणावारात कसं गेलं हे पल्लवीला कळलंच नाही…वर्षभरानंतर सुरुवात झाली ती नव्या संसाराला…सासू-सासऱ्यांची काळजी घेण्यात,नवऱ्याचे लाड पुरवण्यात…आलेल्या पै-पाहुण्यांचं करण्यात पल्लीवीचा वेळ कसा जाई हे तिलाच कळत नसे…त्यातल्या-त्यात लाडक्या नणंदबाईंचं घर अगदी टप्प्यात असल्याने भाचेमंडळींचा राबता कायम मामाच्या घरी असे…नव्याची नवलाई किती दिवस टिकते असं म्हणतात…याचा प्रत्यय पल्लवीला वर्षभरातच आला…घर म्हटलं कि भांड्याला-भांड लागणारच….

असेच…दिवसा मागून दिवस सरत होते…ज्याप्रमाणे सासू-सुनेचा संवाद व्हायला हवा तसा संवाद होत नव्हता…याला कारण दुसरंच काहीतरी होत..याचा अनुभव पल्लवीला आलाच…पल्लवी नेहमीप्रमाणे सकाळी उठून सडा संमार्जन करत असे…अमितला ऑफिस असल्याने सकाळीच सगळा स्वयंपाक पल्लवी करत असे. त्याचबरोबर सासू-सासऱ्यांना नाश्ताही द्यावा लागे, तीही तयारी आद्ल्यादिवशीच करावी लागत असे..अमित ऑफिसला गेला की…जेवण उरकून कपडे-भांडी, लादी पुसणं हि सगळी कामं पल्लवीला करावी लागत असे…मोलकरीण ठेवण्याइतकी पल्लवीच्या सासरची परिस्थिती नव्हती..म्हणून खूप काटकसरीनं निर्णय घ्यावे लागत होते…निर्णयही पल्लवी कधी परस्पर घेत नसे…सासूबाई आणि आपल्या नंदेचा म्हणजे शर्वरीचा विचार प्रामुख्याने घ्यावा लागत असे…हीच गोष्ट पल्लवीला खूप खटकत असे…जर निर्णय घेण्याचा विचार सासू-सुना करू शकत नसतील तर सासू-सुनेमधील नातं फुलण्याऐवजी कोमेजून का नाही जाणार..? पल्लवीला या गोष्टीची जास्त सल टोचत होती..एक दिवस तर कहरच झाला…

नेहमीप्रमाणे शर्वरी आपल्या माहेरी आली होती. तेही दोन्ही मुलांना घेऊन…अमितची सुट्टी असल्याने दोघेही भाऊ-बहीण गप्पा मारत बसले होते….पल्लवी आपल्या सासूबाईंसोबत स्वयंपाकघरात चहा करण्यासाठी म्हणून आली…रीतीप्रमाणे नणंदबाईना पाणी देऊन शर्वरीच्या पायाही पडली..मग थोड्या वेळाने शर्वरीला आवडतो तसा अद्रकवाला चहा घेऊन पल्लवी आली… पल्लवी घरातच असल्याने रोजच्या दिनचर्येतलाच ड्रेस घातला होता. तेवढ्यात नवरोबांनी एक टोमणा ऐकवला…

अमित  – काय एकेकाचे….कपडे असतात…बुजगावण्यालाहि  छान दिसतील हे असले कपडे…

शर्वरी   – नाहीतर काय…अरे दादा…ते बुजगावणंही छान दिसत…हे काय विचित्र ध्यान आणलंय…

पल्लवी सगळं आतून ऐकत होती आणि मनातल्या मनात रडत होती..टोमण्याचं वाईट नाही वाटलं…आपल्याला कपडे सैल झालेत म्हणून आपण खंगून गेल्यासारखं दिसतोय..कारण लग्नाआधी खूपच हेल्थी अशी तब्बेत आपली होती म्हणून हे कपडे सहज बसत होते आणि व्यवस्थित दिसत होते आता नवीन कपडे घ्यायचेत पण तेही आपल्याला विचारून घेतंय कुणी ? विशेष म्हणजे आपल्या आवडीला यात प्राधान्य नाहीय ही गोष्ट पल्लवीला कुठेतरी खटकत होती…जास्त विचार न करता पल्लवी संध्याकाळच्या जेवणाची तयारी करू लागली…संध्याकाळी मस्त पुऱ्या, पनीर-मसाला, कोशिंबीर, जीरा राईस आणि मँगो बर्फी असा बेत पल्लवीने आखला…सगळ्यांना खाऊ घालून अगदी तृप्त केलं…अमितने सकाळी जे काही टोमणे दिले…त्याच किंचितही दुःख वाटून न घेता आपली कामं भर-भर आवरली व अमितचा ऑफिसचा शर्ट प्रेस करण्यासाठी घेतला…प्रेस करता-करता पल्लवीला खूपच रडू कोसळले…लॅपटॉप घ्यायचं निमित्त करून अमित आपल्या बेडरूम मध्ये आला …पल्लवीला याचा अंदाज आला तसे तिने आपले डोळे ओढणीने टिपून घेतले…अमितालाही हे पटकन कळले की…आपली बायको का रडते आहे…म्हणून थोडंसं रागावून अमितने पल्लवीला विचारले…

अमित   – काय झालंय…पल्लवी..?

पल्लवी  – काही नाही…ते एक कुसळ उडालं डोळ्यात…

अमित   – ओह्ह…खोटं कधीपासून बोलायला लागलीस माझ्याशी…? आणि पटण्यासारखं तरी खोटं बोल…इथं कुसळ उडण्यासारखं आहे तरी काय…

पल्लवी  – अमित…तुम्ही जाऊद्यात…मी कशाला तुम्हा बहीण-भावात भांडण लावू…तसा स्वभाव नाही हो माझा…

अमित   – मला माहिती नाही तुझा स्वभाव कसा आहे ते..! दोन वर्ष होतील आता आपल्या लग्नाला…मला नाही मग कुणाला माहिती असणारे तुझा स्वभाव…नीट आणि सविस्तर सांग…

पल्लवी – मला या घरात निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य कधी मिळणार आहे..? माझ्या आवडी-निवडी कशा जोपासणारेय…मला माझी काही मतं नाहीत का ?….सकाळी बुजगावण्याचं तुम्हा बहीण-भावांचं बोलणं ऐकू आलं मला…

अमित  – ओह्ह्ह…म्हणून वाईट वाटलं तुला…मग बरोबर आहे…तुला पाहुण्यांसमोर चांगले कपडे घालता येत नाहीत का ?…कशी दिसतेस तू…हाड दिसतात फक्त तुझी..

पल्लवी  – दिसणारच…अमित…माझी अवस्था घाण्याला जुंपलेल्या बैलासारखी झालीय…चारा-वैरण..पाणी..सगळं मालक आणून देतो…तेही मुकाट्याने आवडत नसलं तरी खावं लागत…कारण कामं बिनबोभाट करावीच लागतात ना…

अमित   – पल्लवी…अजूनही तू स्पष्ट बोलत नाहीयेस…लवकर बोल काय होतंय तुला ते…

पल्लवी  –  सगळ्या गोष्टीत आई…शर्वरीवंसंच मत लक्षात घेतात…माझं कधी मत विचारात घेतलंय त्यांनी..? मला माझ्या सासूबाईंशी संवाद वाढवायचाय…माझ्या आवडी-निवडी काय-काय आहेत हे कधी जाणून घेण्याचा विचार केलाय त्यांनी…फक्त स्वतःची मतं माझ्यावर लादणं एवढंच फक्त त्यांचं ध्येय…बाकी काहीही नाही..

अमित  – अगं…शर्वरीचा फक्त आणि फक्त सल्ला घेते ती…दुसरं काहीही नाही…

पल्लवी  – सल्ला घेईनात का..? पण मला माझं मत आहे या घरात…तुम्ही सुद्धा तसंच वागलात आज…ड्रेस मला आणायचेत, मला घालायचेत…तुम्ही मला विचारा ना…तिथेही नेहमी झुकतं माप शर्वरी ताई लाच…शॉपिंग बद्दल तुम्हाला माझ्याशी नाही बोलावंसं वाटलं…? बाहेर परिस्थिती किती बदलली माहिती नाही तुम्हाला…मुली इतकंच सुनेलाही महत्त्व देतात…मला ठाऊक आहे आई आणि मुलीचं नातं रक्ताचं असत ते सहजासहजी संपणं अशक्य आहे..मग सुनेलाही तेच स्थान द्या ना… कुठला सणवार असो व काही निमित्त सासूबाई आणि तुम्ही सुद्धा नेहमी शर्वरीताईंनाच विचारता कि हे कसं आहे….ते कसं आहे? माझ्या साड्या….कपडे घेतानाही तेच …माझा लग्नाचा बस्ता तुमच्याकडे होता त्यामुळे लग्नातली एक साडी सुद्धा मला विचारून पसंत नाही केली कुणी. शर्वरीताईंचा प्रत्येक बाबतीत हस्तक्षेप असतो….ते मी आत्तापर्यंत दुर्लक्षित केलं पण मग निदान तुम्ही सगळ्यांसमोर तरी आपल्या बायकोला   बुजगावणं संबोधू नका.सुनेचं मत का डावललं जात…अशानं घरात कलहाचे वातावरण होत…समजतंय का तुला अमित…

अमित  – हम्म…आणखी काही…तुझ्या भावाचं उद्या लग्न होईल मग…तू काय करशील..?

पल्लवी  – मी…. माझी वहिनी आणि आई दोघींचा संवाद जास्त कसा होईल याकडे लक्ष देईल..मी त्यांच्या मतांमध्ये ढवळा-ढवळ करणार नाही…एकमेकांमध्ये मनमोकळा संवाद असेल तरच नाती फुलतात…मी मात्र माझ्या आईला नेहमी सांगेन झुकतं माप वहिनीलाच असू देत…मुलगी म्हणून मला नको..

अमित  – [पल्लवीचे डोळे पुसतो] ठीक आहे…जाऊयात उद्या आपण शॉपिंगला.. उद्याचा दिवस तुझाच….तसाही आपल्या लग्नाचा वाढदिवस येतोय….उद्या तुला तुझ्या पसंतीची शॉपिंग करून देतो.?

पल्लवी  – शर्वरी वन्संच काय…?

अमित   – ती…होय…एखादा मस्त सूट देतो तिला आणि गप्प करतो…मग झालं..

पल्लवी  – त्या चिडणार तर नाही ना…?

अमित   – चिडेल…पण तुझ्याइतकी नाही चिडणार…

पल्लवी  – यु….सिली…मी काय चिडलीय का..एवढे दिवसांपासून सांगेन-सांगेन म्हणत होते…शेवटी आज बोलले..

दुसऱ्या दिवशीच ऑफिसवरून येताना अमित पल्लवीला तयार व्हायला सांगतो..मस्त शॉपर्स स्टॉप मध्ये शॉपिंग साठी जाऊ असं पल्लवीला सुचवतो….पल्लवीही मस्त पिंक कलरची साडी घालून तयार होते…अमित आल्यावर दोघेही मस्त शॉप्पिंगसाठी जातात…

                   

===============

प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.

https://www.facebook.com/ritbhatmarati/

तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही

=============

हेही वाचा

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

1 Comment

  • Monika Mankar
    Posted Feb 10, 2022 at 1:52 pm

    Khup sunder Katha aahe… Congratulations on following your inner calling. Good you could pursue it sooner in your life

    Best wishes and good luck.

    Reply

Leave a Comment

error:

Warning

सध्या युट्युब वर कथा चोरी करून वाचून दाखवण्याचे धंदे चालू आहेत लोकांचे. आमच्या वेबसाईट वरची कथा कुठल्याही युट्युब चॅनेलवर बेकायदेशीररित्या आढळल्यास त्या चॅनेलला लगेच रिपोर्ट करण्यात येईल ह्याची कृपया दक्षता घ्यावी. तसेच आपल्या वाचकांपैकी कुणालाही असे बेकायदेशीर चॅनेल्स आढळल्यास आम्हाला ritbhatmarathi@gmail.com ह्या ई-मेल वर त्वरित कळवावे.