Skip to content Skip to sidebar Skip to footer

होम मिनिस्टर

©® गीता गरुड.

पहाटे पाचला अंथरुणातून उठल्यापासनं तिची एकच धावपळ. कामं का थोडी! सुका, ओला कचरा वारांनुसार घंटागाडीवाल्याकडं देणं, दूध घेऊन येणं. ते तापत ठेवून घरातला पारोसा केर काढणं. कुणाला बिनसाखरेचा तर कुणाला साखरेचा चहा, कुणाला कॉफी.

त्यात मधेच मुलांना हाकारणं, डब्बे तयार करून देणं. कसलं आलंय मॉर्निंग वॉक वगैरे. हॉल ते किचन नं किचन ते बेडरूम या धावपळीत थकून जायची बिचारी.

बरं मदतीला बाई ठेवेल तर घरातल्यांच्या नाना परी. बाई तरी किती म्हणून कामी येणार! शिवाय मध्यमवर्गीय प्रपंच व स्वतः नोकरी न करत असल्याची..कमवत नसल्याची बोच म्हणून मग होता होईल तो नवऱ्याच्या कमाईतनं बचत करण्याचा मार्ग तिचा तिनेच स्वीकारलेला.

या बचतीतूनच मग छोट्यांच्या आगंतुक मागण्या ती पुरी करायची. नवऱ्याच्या वाढदिवसासाठी आठवणीने एखादी भेटवस्तू आणायची पण तरीही सगळी तिला गृहितच धरत. जणू, सगळ्यांसाठी सगळं करणं हे तिचं आद्यकर्तव्यच.

वयोपरत्वे तिचीही शक्ती कमी होत चालली होती. शरीरातील संप्रेरकांच्या बदलामुळे चिडचिड होऊ लागली होती, तिची. कधी ग्यासवर दूध गरम होण्यासाठी ठेवायची नं अगदी ठार विसरून जायची तर कधी ग्यास सुरू राहिलेलाही लक्षात रहायचा नाही तिच्या.

आताशा तिलाही वाटायचं, एखाद दिवस तरी मोकळा मिळावा, घरातल्या प्रत्येकाने तिला समजून घ्यावं, थोडबहुत काम करावं पण प्रत्येकजण आपल्याच जगात वावरत होता.

एकदा रात्री भांडी घासताना विचारांची तंद्री एवढी लागली की चाकू उभा धरून घासत असताना तो सरळ तिच्या तळहातात घुसला, रक्ताची चिळकांडी उडाली.

नवरा अजून यायचा होता. मुलं आपापल्या कामात. रक्त बघून घाबरणारी ती क्षणात बेशुद्ध पडली. मुलगी आतून ओरडत होती,”आई, भूक लागली. जेवायला वाढ . माझ्यासाठी पापड तळ, पण आईचा आवाज ऐकू येईना म्हणून ती किचनमधे आली.

बेल वाजवूनही कोण उघडत नाही म्हणून जराशा त्राग्यानेच दार उघडत तो घरात शिरला.

“पप्पा, आई..रक्त,चाकू..”इतकंच मुलगी बोलत होती. तो तसाच बुट न काढता किचनमधे गेला. आतलं द्रुश्य पाहून घाबरला. ताबडतोब डॉक्टरांना फोन लावला.

डॉक्टरांनी तिची जखम धुवून औषधपट्टी बांधली,इंजेक्शन दिलं. “आता महिनाभरतरी हात पाण्यात घालायचा नाही.”डॉक्टरांनी तिला बजावलं.

आज रात्रीचं सारं काम त्याने व मुलांनी केलं. अगदी जेवणही तिला मुलीने भरवलं.

“दुखतय का गं फार,”त्याने विचारलं.

“आई, चाकू वाईट असतो ना,”मुलाने तिच्या जवळ येत म्हंटलं. ती मात्र स्वत:शीच हसत म्हणाली,”छे रे चाकू चांगलाच असतो. आपली माणसं जवळ आणतो.”

तिचं हे बोलणं मुलांना कळलं नाही पण नवऱ्याच्या आतपर्यंत गेलं. आता तो तिला असं गृहित धरणार नव्हता, निदान असं ठरवत तरी होता.

===================

नमस्कार वाचकहो🙏🙏,

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आवड असूनही आपले छंद आपल्याला जोपासता येत नाही. आवड असूनही पुस्तकं वाचता येत नाही. त्यामुळे वेळेअभावी आपल्यासारखे खूप सारे वाचक वाचनापासून वंचित राहतात. आणि म्हणूनच वाचकांना कुठेही सहज वाचता येतील असा कथासंग्रह आम्ही रीतभातमराठी ह्या डिजिटल व्यासपीठावर घेऊन आलो आहोत.

उत्कृष्ट लेखकांनी लिहिलेल्या marathi katha, marathi moral story, marathi stories, marathi short stories, bodh katha marathi मध्ये आपल्याला रीतभातमराठीवर वाचायला मिळतील.

Leave a Comment

error: