तिची_वर्जिनिटी

©️®️सौ.गीता गजानन गरुड.
शिवानी एक सॉफ्टवेअर इंजिनिअर. पुण्यात एका नावाजलेल्या कंपनीत कामाला होती ती. तिच्या कामावर तिचा बॉस रोहन खूप खूष होता. खरंतर रोहन हल्लीच या ऑफिसला जॉईंट झाल्याने त्याला तिच्याबद्दल व ऑफिसातल्या इतर स्टाफबद्दलही फार जुजबी माहिती होती. नेहमीच अपटूडेट रहाणारी,चार्मिंग शिवानी एका सहा वर्षाच्या मुलाची आई आहे व तिचा नवरा दोन वर्षांपूर्वी ब्रेन हेमरेजने गेला होता हे जेव्हा रोहनला शिपायाकडून कळलं तेव्हा तो शॉक झाला.
नेहमी हसतमुख दिसणारी,आधुनिक पोषाखात वावरणारी,करिअररिस्ट लेडी..आणि हिच्या बाबतीत हे असं व्हावं व तसं असलं तरी तिच्या चेहऱ्यावर दु:खाचं नामोनिशाण नाही..कसं शक्य आहे..रोहनने विचारात चारपाच सिगारेट संपवल्या.
इतक्यात शिवानीच केबिनमध्ये आली.
“एस्क्युज मी सर. उद्या मी दोनेक तास लेट येईन. थोडा पर्सनल इश्यू आहे.”
“मिस शिवानी ओके बट टुडे यु हेव टू एकम्पनी मी फॉर लंच.”
“ओके सर. इथे जवळच एक उत्तम रेस्तराँ आहे तिथे जाऊया.”
शिवानी बाईकवर रोहनच्या मागे बसली,जराही न अडखळता,लाजताबुजता. तिने त्याच्या खांद्यावर हात ठेवताच त्याच्या अंगातून एक गोड शिरशिरी गेली. रोहन्या,लेका भोग आपल्या कर्माची फळं..असं स्वतःशी म्हणत त्याने बाईक स्टार्ट केली.
रेस्तराँ खूपच सुरेख होतं. लंच घेत असताना रोहन एका अँगलने शिवानीकडे पहात होता.
“काय फाडू दिसते यार! एक मुल आहे असं वाटत नाही हिच्याकडे बघून.” असं तो स्वतःशीच म्हणाला. इतक्यात शिवानीचं लक्ष त्याच्याकडे गेलं.
“काय म्हणालात सर?”
“कुठे काय. अं हो ते मोरे शिपायाकडून तुझ्याबद्दल समजलं. फार वाईट वाटलं बघ. इतक्या कोवळ्या वयात..आय मीन पुढचं आयुष्य तुला एकटीला काढायचं आहे. तू लग्नाचा विचार वगैरे..”
“कोण करणार माझ्यासारख्या एका मुलाची आई असलेल्या स्त्रीशी लग्न? तुम्ही कराल मि.रोहन?”
रोहनला हा प्रश्न अनपेक्षित होता. रोहनला वाटलं होतं शिवानी रडेलभेकेल. आपली पुर्वकहाणी सांगेल मग आपण तिचं सांत्वन करु. रोहन विस्फारल्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहू लागला.
‘डोन्ट माईंड सर. आय वॉज जस्ट जोकींग.” असं शिवानीने म्हणताच रोहनने एसीतही घामाने डबडबलेला त्याचा चेहरा हातरुमालाने पुसला. निघताना शिवानीने त्याच्या खांद्यावर हात ठेवला पण तो त्याला कितीतरी जड वाटला. दोघंजणं मग न बोलताच ऑफिसला आली.
रात्री बऱ्याच उशिरा शिवानी घरी आली. शुभ होमवर्क आवरुन आजीआजोबांसोबत टिव्ही बघत बसला होता. शिवानीने कढत पाण्याने अंघोळ केली. आज आईने तिच्या आवडीचे भोपळ्याचे घारगे बनवले होते. सोबत लिंबाचं गोड लोणचं. घारगे असले की इतर काही नको असायचं तिला.
आई पान वाढायला उठणार इतक्यात शिवानीने तिला हातांनीच तू बैस,मी घेते म्हणून सांगितले. थोडसं खाल्लं असेल इतक्यात टिव्हीवर गाणं सुरु झालं..
संदेशे आते है हमें तडपाते है
ओ चिठ्ठी आती है वो पुछे जाती है
के तुम कम आओगे के घर कब आओगे
के तुम बिन ये घर सुना है।
शिवानीचा घास तोंडातच फिरत राहिला. ती स्वतःशीच म्हणाली,”ही निदान एकमेकांच्या भेटीची वाट तरी पाहू शकतात.”
शिवानीने घारगे भांड्यात ठेवले. ताट धुतलं व शुभला झोपायला घेऊन गेली. शुभने तिला वर्गात काय काय झालं ते सविस्तर सांगितलं. मग शिवानीने त्याला एक अकबरबिरबलची गोष्ट सांगून झोपवलं. ती बेडरुमच्या टेरेसमधील झुल्यावर बसली. मंद वारा सुटला होता. तिला आठवलं याच टेरेसमधे अगदी मध्यरात्रीपर्यंत ती शशांकच्या कुशीत झोके घेत कॉफी पित बसायची.
रात्र,ती व तिचा शशांक..आता शशांकला ताऱ्यात शोधायचं..छे! हा विचारच तिला करवत नव्हता. राजबिंड रुप..एका नगराध्यक्षाचा मुलगा पण त्या श्रीमंतीची गुर्मी अजिबात नव्हती वागण्याबोलण्यात. गोरापान इतका की शिवानीलाच त्याच्याकडे पाहून तिच्या रंगाचा कॉम्प्लेक्स यायचा. कोरीव दाढी..तिनेच त्याला हट्टाने ठेवायला लावलेली. कॉलेजमध्ये त्यांच अफेअर सगळ्यांना ठाऊक होतं. शशांकचे मित्र तर तिला लग्नाआधीच वहिनी म्हणू लागले होते. तिलाही आवडायचं त्यांच वहिनी म्हणणं.
शशांक व शिवानीच्या लग्नाला शशांकच्या मम्माचा नकार होता. शशांकने तिचं मन वळवायचा भरपूर प्रयत्न केला पण तिला तिच्या स्टेटसला शोभेल अशी मुलगी सून म्हणून हवी होती. शेवटी इंजिनिअर होऊन जॉब लागल्यावर दोघांनी एका देवळात जाऊन लग्न केलं. त्या दिवसापासून शशांकला त्याच्या घराचे दरवाजे बंद झाले. शिवानीच्या माहेराजवळ घर घेतलं त्यांनी, पुढची सोय बघून.
शशांक खूपच भावनाप्रधान होता. त्याला जे जे हवं ते सारं मिळालेलं पण मम्मीपप्पांचं प्रेम मिळालं नव्हतं. मम्मीपप्पा दोघंही रात्री कुठेतरी मोठ्या लोकांच्या पार्टीजना जायचे. शशांक त्याच्या आजीसोबत घरी असायचा. एकेदिवशी आजीही बाप्पाकडे निघून गेली मग त्याला सांभाळायला एक आया ठेवली होती. शिकवण्यासाठी एक टिचर यायच्या. तो मोठ्या घरातला असल्याने इतर मुलं त्याच्यापासून दोनचार हात दूरच रहाणं पसंत करायची.
कॉलेजमध्ये त्याच्या बेंचवर शिवानी बसायला आली तेंव्हापासून तिच्या बोलक्या स्वभावामुळे शशांकही मोकळा होऊ लागला. शिवानीचे फ्रेंण्ड्स ते त्याचे फ्रेंण्डस होऊ लागले. शशांक बाईक चालवायला घाबरायचा. शिवानीच्यामागे बाईकवर बसण्यात त्याला कुठचाही कमीपणा वाटत नसे. दोघे जणू मेड फॉर इच अदर होते. शिवानीला तो आजीच्या कितीतरी गोष्टी सांगायचा. त्याच्या मनातल्या पुस्तकाचं एकेक पान त्याने शिवानीसमोर रितं केलं होतं.
शशांक असा वाऱ्यासारखा सुसाट बोलायला लागला की शिवानी शांतपणे त्याचं बोलणं ऐकून घ्यायची. खूप इच्छा होत्या त्याच्या. त्याला शिवानीला भरपूर सुखात ठेवायचं होतं. आयुष्यात काहीतरी चांगलं काम करायचं होतं. समाजाचं आपण देणं लागतो. या समाजासाठी काहीतरी करणं आपलं कर्तव्य आहे, म्हणायचा. कधी अंधशाळेतून बोलावणं आलं की त्या मुलांचा राईटर बनायचा. म्हाताऱ्या माणसांना जमेल ती मदत करायचा. त्याच्या या वागणुकीने त्याने साऱ्यांना जीव लावला होता.
शशांक व शिवानीच्या संसारवेलीवर शुभ नावाचं गोंडस फुल फुललं तेव्हा त्याने ओळखीच्या सगळ्या मंडळींना बारशाचं आमंत्रण दिलं होतं. स्वतःच्या हाताने आग्रह करुन करुन जेवू घातलं होतं. फक्त त्याचे मम्मापप्पा आले नव्हते बारशाला. त्या रात्रीही शिवानीच्या मांडीवर डोकं ठेवून शशांक रडला होता. शिवानीनेच मग त्याला शांत केलं होतं.
बाळ जसजसं मोठं होऊ लागलं तसा शशांक आईची जास्त ती कामं करत होता. शिवानी रात्री झोपली व बाळ जागं झालं तर स्वतः दूध गरम करुन त्याला वाटीने भरवायचा. त्याच्याशी खेळायचा. त्याला म्हणायचा,”शुभ,मोठा आवाज करायचा नाही हं. हळू बोलायचं. मम्मा झोपली आहे नं आपली.” शुभही त्याच्या म्हणण्याला हुं हुं करुन होकार द्यायचा.
सुट्टीला तिघं मिळून सीबीचवर फिरायला जायचे. वाळूचा किल्ला बनवायचे. पप्पाची व शुभची रेस लागायची. शिवानी शशांकशी भांडायची,म्हणायची,”अगदीच कसा रे हा तुझी कार्बन कॉपी. गोरुला कुठचा! माझं काहीच कसं नाही घेतलं शुभने!” यावर शशांक म्हणायचा,”अगं तो तुझ्यासारखा तडफदार,स्मार्ट होणार बघ.”
शिवानीला शशांकची तीव्रतेने आठवण आली की ती डायरीच्या पानावर पेनाने त्याच्याशी बोलायची. आजही ती शशांकशी लिखाणातून बोलू लागली..
शशांक, ये ना रे परत. आईबाबा दोघे रहातात रे माझ्या व शुभसोबत पण मला तू हवा आहेस रे. तूच हवाऐस मला. कळतय का तुला शशांक! का आलास माझ्या आयुष्यात? का केलंस एवढं प्रेम माझ्यावर? का दाखवलीस मला सोनेरी स्वप्नं? किती जपायचास रे मला!
माझा बेधडकपणा आवडायचा नं तुला. तोच बेधडकपणा लुळा पडला जेव्हा तू मला घातलेलं मंगळसूत्र तुझा निरोप घेताना समाजाने मला काढायला लावलं. आधीच दगड झालेला माझा.. त्यात सौभाग्याचे अलंकार त्यांनी काढून घेऊन त्यादिवशी तुझ्यासोबत माझंही मढं बनवलं होतं. बारा दिवस सवाष्ण बायका माझं तोंड बघत नव्हत्या. पद्धत आहे म्हणे तशी. एखाद्या दु:खी जीवाला अस्पृश्यासारखी वागणूक द्यायची कसली रे पद्धत यांची!
तुझी मम्मा व पप्पा आले होते. मम्मा एकच वाक्य बोलत होती सारखं सारखं,”तरी मी तुला सांगत होते,अशा अनोळखी मुलीशी लग्न करु नकोस. माझ्या शशांकला या बयेने खाल्ला.”
ज्या बाईने सहा वर्ष केवळ आपल्या अहंकारापायी आपल्या मुलाचं तोंड पाहिलं नाही. जिचा पोटचा गोळा रात्रनरात्र तिची आठवण काढून माझ्या मांडीवर रडायचा ती बाई साऱ्या समाजासमोर ओरडून सांगत होती की मी तिच्या मुलाला खाल्लं.
शशांक,तू गेल्यावर काही दिवसांत ठरवलं की शुभसाठी मला चीअरफुल राहिलं पाहिजे. पण ही आजुबाजूची मंडळी,सोसायटी..जरा कुठे छान साडी नेसली,गजरा माळला की संशयाने पाहू लगली. काय त्या नजरा त्यांच्या..शरीराच्या आरपार जाणाऱ्या पण मग मन घट्ट बनवलं. ठरवलं निगरगठ्ठ बनायचं,समाजाला फाट्यावर मारायचं.
या बायका मला सणासमारंभाला बोलवत नाहीत. नाही बोलवू देत. मी छान साड्या नेसते,मेकअप करते हलकासा..अगदी तुला आवडायचा तसा. तुला माझ्या केसांचा स्टेपकट आवडायचा नं तसाच मेंटेन ठेवलाय मी.
कधी पोनीटेल घालून त्यावर तुझ्या आवडीचा मोगऱ्याचा गजरा माळते. जीन्स,थ्रीफोर्थ,पलाझो सगळं काय ते घालते. जातायेताना लोकं आपापसात खुसपुसत असतात. माझ्यासमोर येऊन बोलली तर मी उत्तर देईन त्यांना. पाठून बोलणाऱ्यांना मी भीक नाही घालत.
माझ्या मावशीने काही स्थळं आणलेली माझ्यासाठी. मुलासह स्विकारायला तयार आहेत म्हणे. एकाचं वय पन्नास,दुसऱ्याचं पंचावन्न तर एक आलेला तो बेरोजगार म्हणजे त्याला मी पोसायचं. मावशीला दुरुनच नमस्कार केला.
शशांक,मलाही कळतय रे शुभला बाबाची गरज आहे पण हे असले वडील नको. माझ्यासोबत त्याचं बालपणही कुसकरून टाकतील हे नराधम.
माझी या समाजाकडून एकच अपेक्षा आहे रे ती म्हणजे,मानानं जगू द्या मला. स्त्री विधवा झाली म्हणजे ती अबला नाही होत. मी सबला होती,मी सबला आहे व मी सबलाच राहीन.
मी सांभाळेन शुभला नीट तेवढं कमावते मी हे तुला सांगायला नको पण माझ्या शारिरीक भुकेचं काय रे? ती कशी भागवू? का विधवा झालं की ती भूकही आपोआप मिटते? खूप प्रश्न आहेत शशांक माझ्यासमोर. तू ये रे शशांक
खरंच ये..
हे लिहितालिहिताच शिवानीचा डोळा लागला. डायरीचं पान तिच्या आसवांनी भिजलं होतं.
दुसऱ्या दिवशी अगदी फ्रेश होऊन शिवानी ऑफिसमधे गेली. रोहनसरांनी तिला केबिनमध्ये बोलवलं.
“शिवानी,तझ्या कालच्या बोलण्यावर मी नीट विचार केला. मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे, तू वर्जिन नसतानाही. अट फक्त एकच. आपण शुभला बोर्डिंगमध्ये ठेवू.”
शिवानी चवताळली,”बास सर तुम्ही काय माझ्याशी लग्न करणार? वर्जिनिटीच्या फुटपट्टीवरून स्त्रियांना मोजणारे तुम्ही आणि माझ्या काळजाच्या तुकड्याला बोर्डिंगला ठेव म्हणता!
तुमची नियत कळली मला. अरे पुरुष दोनतीनवेळा लग्न करतात तेव्हा कुठे जाते ही वर्जिनिटी? सगळे नियम स्त्रियांवरच लादता का! असाल तुम्ही उच्चशिक्षित पण ‘सु’ शिक्षित नाही आहात. मी रिजेक्टते तुमचं प्रपोजल आणि तुमच्या हाताखाली कामही करायचं नाही मला. हे घ्या माझं रेझिगनेशन लेटर.”
रोहनच्या तोंडावर रेझिगनेशनचा कागद फेकून शिवानी तेथून मागे वळली खरी पण पाठीमागे कंपनीचे डायरेक्टर प्रथमेश सर येऊन उभे आहेत याची तिला कल्पनाच नव्हती.
“मिस शिवानी,तुमच्या टेलंटची गरज आहे आमच्या फर्मला. रोहनच्या वतीने मी तुमची माफी मागतो. मि.रोहन तुम्ही आजपासून आपलं तळेगावचं युनिट सांभाळायचं. इथल्या हेड म्हणून मी मिस शिवानीला प्रमोट करत आहे.”
शिवानी सरांना थँक्यू म्हणाली. पुढे प्रथमेश सरांनी काही दिवसांनी तिला लग्नाची मागणी घातली तीही रीतसर घरी येऊन व शुभचा बाबा बनायला होकार दिला त्यांनी.
अगदी खाजगी पाहुण्यांना बोलावून शिवानी व प्रथमेशचं लग्न झालं. प्रथमेश शिवानीपेक्षा एका वर्षाने लहान पण वर्जिनिटी वगैरे विचार त्याच्या मनात आले नाहीत.
त्यालाही शशांकप्रमाणे शिवानीचा सच्चेपणा, बेधडकपणा भावला. प्रथमेशच्या घरात रोहिणी दूधात साखर मिसळावी तशी मिसळली. शुभला हक्काचा बाबा मिळाला. शिवानीच्या आईवडिलांना फार बरं वाटलं.
(समाप्त)
——–सौ.गीता गजानन गरुड.
========================
प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून लेखकांना प्रेरणा मिळेल.
https://www.facebook.com/ritbhatmarati/
तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.
ritbhatmarathi@gmail.com
फोटो साभार – गूगल
आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही