Ritbhatmarathi

Search
Close this search box.

हिवाळ्यात आरोग्याची काळजी कशी घ्याल

हिवाळा हा ऋतु साऱ्यांना आवडतो. छान गुलाबी थंडी, फळांची,भाज्यांची रेलचेल असणारा हा ऋतू नावडणारा विरळाच.

जसजशी थंडी वाढू लागते, तसतशी हातापायांची त्वचा कोरडी होऊ लागते. ज्यांची त्वचा आधीच कोरडी असते त्यांच्या त्वचेवर तर थंडीत नखाने खाजवल्यास ओरखडे उमटतात. अशा गारठवणाऱ्या थंडीपासून आपल्या शरीराचा बचाव करण्यासाठी आपल्या आहारविहारात काही सवयी अंगी बाणवणे पथ्याचे ठरते.

१. योगासने

पहाटे उठल्यावर सूर्यनमस्कार घालावे. योगासने करावी.

२. त्वचेची काळजी

थंडीत जेवढे कढत पाणी अंगावर घेऊ तेवढे बरे वाटते. समोरच्या बादलीतलं गरम पाणी संपूच नयेसं वाटतं. अति गरम पाण्याने अंघोळ केल्यास त्वचेतील नैसर्गिक तैलद्रव्ये कमी होतात व त्वचा अधिकच शुष्क बनते. यासाठी पुरेसं उबदार पाणी स्नानासाठी वापरणं इष्ट. साबणही सौम्य वापरावा. साबणाचा अति वापरही त्वचा कोरडी होण्यास कारण ठरतो. अंघोळीनंतर अंग खसाखसा पुसू नये. जरा हळूवारच पुसावे व हातापायांना खोबरेल तेलाने मसाज करावा,ज्यामुळे त्वचा मऊमुलायम राहील व त्वचेला नैसर्गिक चकाकी मिळेल.

त्वचेवर अतिचिकट क्रीम दिवसभर लावून ठेवणे टाळावे कारण त्यामुळे त्वचेची रंध्रे बंद होऊन त्यात किटाणुंची वाढ होते व मुरमे येतात. ओठांवर तूप,साय अशा नैसर्गिक स्निग्ध पदार्थाचे बोट लावावे. याच काळात टाचेला भेगा पडतात. या भेगा अतिखोल असल्यास फारच दुखतात. टाचेवरील त्वचा खवल्यांसारखी दिसते. हे टाळण्यासाठी, टबात कोमट पाणी घेऊन त्यात  पाच दहा मिनिटे पाय बुडवून ठेवावेत. नंतर मऊ फडक्याने पुसून त्यांना फुटक्रीम किंवा कोकमतेल वितळवून लावावे. रात्री झोपताना पायांत मोजे घालावेत अन्यथा टाचांना चिरा असल्यास अंथरुणाशी घर्षण होऊन त्या अधिकच दुखतात. कोवळ्या उन्हात चालणे फायदेशीर ठरते. आपली त्वचा सुर्यप्रकाश शोषून घेते.

३. ऊबदार वस्त्रे

स्वेटर,मफलर,कानटोपी,हातपायमोजे यांचा विशेषतः लहानग्यांनी व व्रुद्धांनी वापर आवर्जुन करावा. इतरांनीही करावा कारण शरीरास गरम कपड्यांनी पुरेशी उष्णता मिळते व थंडीमुळे सांधेदुखी उद्भवत नाही. जशी बाहेरुन उष्णता मिळावयास हवी तशीच आतील अवयवांना उष्णता मिळणे आवश्यक आहे..यासाठी आहारात स्निग्ध पदार्थांचे सैवन जरुरीचे आहे.

४. हिवाळ्यात घ्यावयाचा विशेष आहार
तूप

रोजच्या आहारात आवर्जून तुपाचा वापर करावा..ज्याने शरीरात स्निग्धता निर्माण होते, चांगले कोलेस्टेरॉल निर्माण होते. मेथी,अळीव यांचे तूप घातलेले लाडू खावेत. आमटी,वरणातही तूप वापरावे.

गुळ

गुळाचे नियमित सेवन हे घसा व फुफ्फुसाच्या संक्रमणापासून आपला बचाव करते. गुळाचा आहारात वापर केल्याने पचनशक्ती सुधारण्यास मदत होते.

तीळ,जवस,कारेळे,शेंगादाणे

या तेलबियांचा, आहारात आवर्जून वापर करावा. कारेळ्याची चटणी जेवणाची लज्जत वाढवते. तीळाची चिक्की,लाडू, शेंगादाण्यांचं कुट, जवसाची चटणी हे पारंपारिक पदार्थ आपल्या शरीरास आवश्यक असे उष्मांक प्रदान करतात. शरीरास आतून गरम ठेवून सर्दीपडसे,कफाला आपल्यापासनं लांब ठेवतात.

ज्वारी,बाजरी,नाचणी

ज्वारी, नाचणी यांत पुरेशा प्रमाणात लोह असते. नाचणी,ज्वारी,बाजरीची भाकरी आलटूनपालटून खाल्ल्याने रुचिपालट होतो. जठराग्नी प्रदिप्त होतो व चयापचय क्रिया सुधारते. लिंबू पिळून ज्वारीचा हुरडा तसंच शेतातली पोपटी हेही आवर्जून खावेत. यातून शरीरास आवश्यक ती उर्जा तर मिळतेच शिवाय हुर्डा पार्टी,पोपटी पार्टी असे एकत्र स्नेहभोजन केल्याने एकमेकांतील स्नेहभाव टिकून रहातो .तोही मोलाचा असतो.

कंदमुळे

रताळे, बीट, करांदे..अशी बरीच कंदमुळे या काळात बाजारात येतात. गाजरं शक्यतो स्वच्छ धुवून कच्ची खावीत मग त्यांचा पुरेपूर फायदा शरीरास मिळतो. रताळी,करांदे उकडून खावे..ही कंदमुळे तंतूमय असल्याने पचनक्रिया सुधारते. बद्धकोष्ठ होत नाही. आतड्यांतील रुक्षता दूर होते.

ओली लसूण,ओली हळद,आले,आवळे

बाजारात ओलीहळद,आवळे घेऊन विक्रेते बसतात. आवर्जून हा रानमेवा खरेदी करावा. ओली हळद ,आले,आवळे चिरुन/किसून लोणचे बनवून ठेवावे. आवळे मीठाच्या पाण्यात घालून फ्रीजमधे ठेवल्यास वर्षभर टिकतात. पित्तावर गुणकारी असतात. आजारपणात जीभेची चव गेल्यास ही लोणची जीभेस चव आणतात. ओल्या लसणाची चटणी करुन खावी. रक्तशुद्धीसाठी ती उपयुक्त आहे.

कडधान्ये

चणे, कुळीथ, हरभरे यांसारख्या कडधान्यांची आमटी हिंवाळ्यात शरीरास उर्जा प्रदान करते. कफदोष कमी करते.. शिवाय या कडधान्ये,डाळींतून आपणास आवश्यक ती प्रथिने मिळतात.

सुकामेवा

काजू, बदाम, अक्रोड हा सुकामेवा योग्य प्रमाणात खाल्ल्यास शरीरास आवश्यक ती स्निग्धता यांतून मिळण्यास मदत होते.

नियमित व्यायाम,पुरेशी झोप,योग्य प्रमाणात पाणी,सकस आहार घेतल्याने हिवाळ्यातल्या थंडीची मज्जा लुटता येईल.

©️®️ सौ. गीता गजानन गरुड.

हेही वाचा

भारतातील व्रत वैकल्ये आणि सण २०२२

घरच्या घरी इम्युनिटी वाढवायची असल्यास हे पदार्थ नक्की ट्राय करा

माता सप्तशृंगीला निवृत्तीनाथांची कुलस्वामीनी का म्हणतात?

==========

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *