Skip to content Skip to sidebar Skip to footer

जाणून घ्या हरतालिका व्रत कुणी व कसे करावे?

Hartalika puja in marathi:

हिंदू धर्मांतील अनेक व्रतांपैकी हरितालिका हे महत्त्वाचे व्रत आहे. यास हरतालका किंवा हरितालिका या दोन्ही नावांनी संबोधतात कारण ही दोन्ही नावे ग्रंथात आढळतात.

वर्षाऋतुत स्रुष्टी हिरव्या रंगांनी नटलेली असते. विविधरंगी फुले सड्यावर डोलत असतात. मनीमानसी चैतन्य दाटलेले असते. निसर्ग आपणास अमाप देत असतो. आपणही त्याचे देणे लागतो. निसर्गातील विविध झाडांची,पानांची ओळख आपणास असावी या हेतुने वटपौर्णिमा, हरितालिका या सणांची पुर्वजांनी आखणी केली आहे.

भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतियेला हरितालिकेची पूजा केली जाते. या पुजनासाठी सोळा झाडांची पाने लागतात, त्यायोगे त्या झाडांचे, रोपांचे महत्त्वही स्त्रिया जाणून घेतात. यातील आघाडा,दुर्वा,कण्हेर,या सर्वच वनस्पती या आयुर्वेदिकद्रुष्ट्या अनमोल आहेत. यांची माहिती असणे व या झाडांची लागवड करणे, जोपासना करणे आपल्या हिताचे आहे.

हरितालिका व्रत हे विवाहित,अविवाहित स्त्रिया करतात. हरितालिका व्रत केल्यास विवाहित महिलांच्या सर्व इच्छा पुर्ण होतात आणि त्यांच्या पतींना दीर्घायुष्य लाभते. संसारातील सारी विघ्ने दूर होतात. तर अविवाहित मुलींना योग्य जीवनसाथी मिळतो अशी मान्यता आहे.

हरितालिकेचे व्रत हे सगळयात आधी देवी पार्वतीने महादेवांसाठी केले होते म्हणून हे व्रत अत्यंत खास व्रत मानले जाते. जी स्त्री हे व्रत करत असते तिच्यावर शंकर पार्वतीची विशेष कृपा दृष्टी असते, असे देखील ह्या व्रताबद्दल सांगितले जाते.

हे व्रत करत असताना स्वत: देवी पार्वतीने अन्न आणि पाण्याचा त्याग केला होता म्हणून सर्व स्त्रिया देखील हे व्रत निर्जळी करतात. हे व्रत करणाऱ्या स्त्रियांच्या मनोकामना हरितालिकेच्या क्रुपाशिर्वादाने पुर्ण होतात अशी मान्यता आहे.

हतर म्हणजे हरण करणे व अलिका म्हणजे सखी. पार्वतीस शिवशंभू पती म्हणून हवे होते. पार्वतीच्या सखीने तिची इच्छा जाणली व तिला दूर अरण्यात घेऊन गेली.

तिथे पार्वतीने कठोर तप केले, शंकराची मनोभावे आराधना केली व तिला भोलेनाथ प्रसन्न झाले मग तिने भोलेनाथांकडे जन्मोजन्मी तेच पती म्हणून लाभावेत असे वरदान मागितले व भोलेनाथांनी तिला जन्मोजन्मी पत्नी म्हणून स्वीकारले.

सखीच्या मदतीने पार्वतीचे मनोरथ पुर्ण झाले म्हणून या व्रतास हरतालका व्रत म्हणतात.

हरतालिकेच्या पूजेसाठी वाळू, बेल पत्र, शमी पत्र, आंब्याची पानं, पांढरी फुलं, वस्त्र, तसंच सोळा झाडांची प्रत्येकी १६ पानं पुजेसाठी फुलं, तसंच सौभाग्याचं साहित्य म्हणजेच बांगड्या, काजळ, कुंकू,  चंदन, तूप, तेल, कापूर, साखर, दुध, मध, दही म्हणजेच पंचामृत इत्यादी.

चौरंग, रांगोळी, तांदूळ, पाण्याचा कलश, ताम्हण, पळी, पंचपात्र, तसराळ, आसन, निरांजन, शंख, घंटा, समई, कापूरारती, हळदकुंकू, अष्टगंध, गुलाल, बुक्का, चंदन, अक्षता, उदबत्ती, कापूर, तुपाच्या व तेलाच्या वाती, अत्तरफाया, विड्याची पाने, सुपार्‍या, बदाम, खारका, नारळ, फळे, खडीसाखर, गूळखोबरे, पंचामृत, कापसाचे वस्त्र, कोरे वस्त्र, तसेच फणी,आरसा इत्यादी.

हरतालिकेच्या पूजेत बेल, आघाडा, मधुमालती, दूर्वा, चाफा, कण्हेर, बोर, रुई, तुळस, आंबा, डाळिंब, धोतरा, जाई, मरवा, बकुळ, अशोकाची पाने या पद्धतीने पत्री वाहतात.

● हरितालिकेदिवशी स्त्रिया डोक्यावरून न्हातात. नवीन वस्त्र परिधान करतात. पुजा जिथे करावयाचे ती जमीन सारवतात.

● फरशी असल्यास ती ओल्या फडक्याने पुसतात. तिथे चौरंग ठेवतात. चौरंगाभोवती रांगोळी काढतात.

● चौरंगाच्या चारी कोनांना केळीचे खांब बांधतात.  चौरंगावर स्वच्छ कापड अंथरतात त्यावर वाळूपासून बनवलेले शिवलिंग व सखीसह पार्वतीची मुर्ती ठेवतात.

● डावीकडे थोड्या अक्षतांवर गणेशाचे प्रतिक म्हणून सुपारी ठेवतात.

● चौरंगावर देवीसमोर दोन पानांचा एक विडा असे पाच विडे ठेवतात. प्रत्येक विड्यात बदाम, अक्रोड,हळकुंड,सुकं खोबरं,नाणं ठेवतात. 

नारळी पौर्णिमेबद्दल थोडक्यात माहिती

जाणून घ्या श्रावणात सोमवारच्या दिवशी शंकराच्या पूजेला एवढं महत्व का आहे?

श्रावणी शुक्रवारचे महत्व, जिवतीचा कागद म्हणजे काय? जिवतीची कथा आणि पूजा विधी

● सर्वप्रथम स्वतःला हळदकुंकू लावून घ्यावे.

● निरांजनास हळदीकुंकू, अक्षता,फुल वाहून त्याचे पूजन करावे.

● गणेशाचे प्रतिक म्हणून ठेवलेली सुपारी ताम्हणात ठेवावी. तिला पाण्याने स्नान घालावे  मग पंचाम्रुताने व पुन्हा पाण्याने अभिषेक करावा. हळद,कुंकू व फुलांच्या पाकळ्यांनी स्नान घालावे. परत पाण्याने स्नान घालून ती सुपारी अक्षतांवर होती तशी ठेवावी.

● सर्वप्रथम गणेशाचे प्रतिक म्हणून ठेवलेल्या या सुपारीचे पूजन करावे. त्यासाठी सुपारीला अष्टगंध लावावे.अक्षता वहाव्यात, जानवे घालावे, वस्त्र, फुल,दुर्वा,आघाडा वहावे. गणपतीसमोर दोन पानाचा विडा ठेवावा. त्यावर बदाम,अक्रोड,सुकं खोबरं,नाणं,हळकुंड ठेवावं. विड्यास हळदकुंकू ,फुल वहावे. गणपतीस गुळखोबऱ्याचा नैवद्य अर्पण करावा. निरांजनाने श्रीगणेशास ओवाळावे व नमस्कार करावा.

● गौरी व तिच्या सखीच्या डोईवर गजरे माळावेत, कापसाची वस्त्रे, फुले वहावीत, आघाडा वहावा.. दिव्याने देवींना ओवाळावे. नमस्कार करावा. देवीसमोर सौभाग्यवाण ठेवावे, त्यावर हळदकुंकू वहावे.

● शिवलिंगाची पूजा करावी. शिवलिंगास पाण्याचा अभिषेक करावा तद्नंतर पंचाम्रुताचा अभिषेक करावा. पिंडीवर गुलाल व बुक्का वहावयाचा. कापसाचं वस्त्र, अक्षता व बेलपत्र वहावे. श्वेतपुष्प वहावे. सोळा प्रकारच्या पत्री पिंडीवर वहाव्या व पिंडीला दिपाने ओवाळावे. धुप लावावा.

● पुढे मांडलेल्या पाचही विड्यांवर हळदकुंकू, अक्षता वहाव्यात, फुलं वहावीत.

● हरितालिकेस फळं, पंचामृत व खडीसाखर यांचा नैवेद्य दाखवावा.
हरितालिकेची कथा वाचावी.कथा वाचून झाल्यावर हरितालिकेची आरती म्हणावी व हरितालिकेस मनोभावे प्रार्थना करावी.

● यानंतर दिवसभर उपवास केला जातो. फलाहार करतात.  दुसऱ्या दिवशी स्नानादी कर्मे उरकून हरितालिकेची हळदकुंकू,फुले,अक्षता वाहून उत्तरपूजा करतात व त्यानंतर मुर्तीचे विसर्जन करतात.

हरितालिकेकडे विवाहित स्त्रिया पतीला दिर्घायुष्य मिळावे, अखंड सौभाग्य लाभावे व हाच पती जन्मोजन्मी मिळावा अशी प्रार्थना करतात तर कुमारिका मनाजोगता वर प्राप्त होवो अशी हरितालिकेकडे प्रार्थना करतात. हरितालिका व्रत नवरा हयात नसलेल्या स्त्रियाही करतात.

हरितालिकेचा उपवास निर्जली करतात. पाणीदेखील पीत नाहीत तर काहीजणी फलाहार करतात. आगीवर शिजवलेला कोणताही पदार्थ या उपवासाला खात नाहीत. विविध खेळ खेळत,गाण्याच्या भेंड्या लावत देवीसमोर जागरण करतात, देवीची कथा वाचतात, आरती करतात व रात्री बारानंतर रुईच्या पानास दही लावून ते चाटतात.
दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी उठून स्नानादी कर्मे उरकून हरितालिकेची उत्तरपूजा करतात व मुर्तीचे विसर्जन करतात.

एके दिवशी शंकरपार्वती कैलास पर्वतावर बसली होती. पार्वतीनं शंकराला विचारलं, महाराज सर्व व्रतात चांगलं असं व्रत कोणते? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असलं तर मला सांगा.

मी कोणत्या पुण्याईनं आपले पदरी पडले हेही मला सांगा. तेव्हा शंकर म्हणाले, जसा नक्षत्रांत चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवात विष्णू श्रेष्ठ, नद्यांत गंगा श्रेष्ठ त्याप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्वांत श्रेष्ठ आहे. ते तुला सांगतो. तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस, ते व्रत ऐक.
 
हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं. ते पूर्वी तू कसं केलंस ते मी तुला आता सांगतो. तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस. चौसष्ट वर्षं तर झाडाची पिकली पानं खाऊन होतीस. थंडी, पाऊस, ऊन ही तिन्ही दु:ख सहन केलीस. हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दु:ख झालं व अशी कन्या कोणाला द्यावी? अशी ‍त्याला चिंता पडली.

इतक्यात तिथं नारदमुनी आले. हिमालयानं त्यांची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं. तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहेत ती विष्णूला द्यावी, तो तिचा योग्य नवरा आहे. त्यांनीच मला तुजकडे मागणी करण्यास पाठविलं आहे म्हणून इथं मी आलो आहे. हिमालयाला मोठा आनंद झाला. त्यांने ही गोष्ट कबूल केली.

नंतर नारद तेथून विष्णूकडे गेले. नारद गेल्यावर तुझ्या बापानं ही गोष्ट तुला सांगितली, ती गोष्ट तुला रुचली नाही. तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागावण्याचं कारण विचारलं, तेव्हा तू सांगितलंस, महादेवावाचून मला दुसरा पती करायचा नाही, असा माझा निश्चय आहे, असं असून माझ्या बापानं मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे, ह्याला काय उपाय करावा?

मग तुला तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेलं. तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली. जवळच एक गुहा आढळली. त्या गुहेत जाऊन तू उपास केलास. तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापिलस. त्याची पूजा केलीस.

तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतिये चा होता. रात्री जागरण केलंस. त्या पुण्यानं इथलं माझं आसन हाललं. नंतर मी तिथं आलो, तुला दर्शन दिलं. आणि वर मागण्यास सांगितलं तू म्हणाली, तुम्ही माझे पती व्हावं, याशिवाय दुसरी इच्छा नाही! नंतर ती गोष्ट मी मान्य केली. मी गुप्त झालो.

पुढे दुसर्‍या दिवशी ती व्रतपूजा विसर्जन केलीस. मैत्रिणीसह त्याचं पारणं केलंस. इतक्यात तुझा बाप तिथं आला: त्यांन तुला इकडं पळून येण्याचं कारण विचारलं. मग तू सर्व हकीकत सांगितलीस.

पुढं त्यानं तुला मलाच देण्याचं वचन दिलं. तुला घेऊन घरी गेला. मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केली. अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली. याला हरतालिका व्रत असं म्हणतात. याचा विधी असा आहे.

ज्या ठिकाणी हे व्रत करावयाचं असेल, त्या ठिकाणी तोरण बांधावं, केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं. पुढं रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं. षोडशोपचारांनी त्याची पूजा करावी, मनोभावे त्याची प्रार्थना करावी. नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावं. या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो. साता जन्मांचं पातक नाहीसं होतं. राज्य मिळतं. स्त्रियांचं सौभाग्य वाढतं ह्या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर सात जन्म वंध्या होतात. दळिद्रं येतं व पुत्रशोक होतो. कहाणी ऐकल्यावर सुवासिनींना यथाशक्ति वाण द्यावं. दुसरे दिवशी उत्तरपूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं. ही साठ उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवाब्राह्मणांचे द्वारी, गाईचे गोठी, पिंपळाचे पारी सुफळ संपूर्ण.

पार्वतीस विष्णूचे स्थळ आले होते परंतू तिने मनोमन वरले होते सांबसदाशिवास, ज्याच्याजवळ भौतिक सुख,ऐश्वर्य नव्हते तरी ती भोलेनाथांच्या गुणांवर भाळली तशीच हल्लीच्या नवीन पिढीतील मुलींनी नवरा निवडताना त्याच्याकडील पैसा,ऐश्वर्य पहाण्यापेक्षा त्याच्या अंगी असलेले गुण, त्याचे स्वत:चे कर्तुत्व, जिद्द ,चिकाटी पहावी असा संदेशच जणू देवी हरितालिका देते.

–©® गीता गरुड.

=============

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

Leave a Comment

error: