हमसफर मेरे हमसफर

मनोजच्या आईवडिलांनी त्याला संयुक्त कुटुंबपद्धतीत वाढवलं होतं.
काका,काकू,त्यांची दोन मुलं, मनोजची बहीण,आईबाबा व आजीआजोबा असं भलं मोठं कुटुंब गावच्या घरी एकत्र नांदायचं. आजीआजोबा कालौघात देवाकडे निघून गेले.
काकाच्या मुलाचं लग्न झालं. त्याची पत्नी शुभदा मनमिळाऊ होती. तिला सासूसासरे जवळ हवे होते. ती अगदी बाबापुता करून काकाकाकूंना आपल्या नवीन घरी घेऊन गेली.
शुभदा नोकरी करत होती. घरातल्या कामांसाठी तिने बाई लावली होती. मनोज अधनंमधनं काकाकाकूंना भेटायला जायचा तेंव्हा काकू नि शुभदावहिनी त्याला सासूसून कमी नि मायलेकीच जास्त वाटायच्या.एकमेकींशी वादविवादही करायच्या पण ते वाद त्या त्यांच्यात्यांच्यातच मिटवत होत्या.
कधी मनोजचे आईवडीलही शुभदाच्या आग्रहाखातर तिकडे नाशिकला साताठ दिवस रहायला जायचे. दोघे भाऊ नि जावाजावा मग नाटकाला जायचे, फिरायला जायचे,धमाल करायचे.
घराला आता मनोजच्या लग्नाचे वेध लागले होते. मनोज नुकताच नोकरीत परमनंट झाला होता. त्याने शहरात स्वतःचा वनबीएचकेचा ब्लॉक घेतला होता. तिथे त्याने काही जुजबी भांडी आणून संसार थाटला होता. आताशा मनोजलाही लग्न करावसं वाटू लागलं होतं. ऑफीसातली रोझी आपल्यावर जीव टाकते, आपल्यासाठीच नट्टापट्टा करून येते हे तो जाणून होता पण त्याला रोझी नकोच होती.
त्याला हवी होती त्याच्या शुभदा वहिनीची प्रतिक्रुती..नवऱ्याला समजून घेणारी, रुसणारी,हसणारी जीवनसाथी..अशी जीवनसाथी जी त्याच्या आईवडीलांनाही यथोचित मान देईल. कोण बरं मिळेल आपल्याला शुभदा वहिनीसारखं या विचारात तो नाशिकला जाणाऱ्या बसमध्ये बसला.
एक तरुणी बसमधे चढली. तिने फ्लोरल शर्ट व जीन्स घातली होती. केस फुलाफुलांच्या रुमालाने बांधले होते. काही बटा बाहेर आल्या होत्या त्या ती आपल्या लांबसडक बोटांनी कानामागे घ्यायचा प्रयत्न करत होती पण त्या खट्याळ बटा पुन्हा तिच्या गुलमोहरी गालांवर रुळू पहायच्या. मनोज ते गुलाबी गाल, ते पिंगट डोळे पहातच राहिला.
“ओ दादा, जरा माझी ब्याग ठेवता का वरती,प्लीज.” म्हणताच मनोजने तिची ब्याग वरती ठेवली.
“प्लीज, मला खिडकीजवळ बसू द्याल का..मला खिडकीतनं बाहेर बघायला खूप आवडतं.”
मनोज बाजुला झाला नं ती खिडकीलगतच्या सीटवर बसली.
दोघांनी एकमेकांना नावं विचारली मग ती कानात बड्स घालून गाणी ऐकू लागली, ओठांची हालचाल करू लागली.
तिच्या बटा आता अक्षरश: वाऱ्याशी स्पर्धा करत होत्या. काही बटा मनोजच्या शर्टाला खांद्याजवळ स्पर्श करत होत्या पण तिला त्याचं भानं नव्हतं. खिडकीबाहेरचं आकाश संध्याकाळच्या रेशीम रंगांनी दाटलं होतं.पक्षी घरट्याकडे परतत होते. सांजेचा गार वारा अंगाला स्पर्शून जात होता. काय बरं तिचं नाव..हं मेधा..मेधा पेंगुळली होती. तिचं डोकं मनोजच्या खांद्यावर रेलत होतं. दोनदा ते लक्षात येताच ती सॉरी म्हणत सावध झाली होती. .पण मनोजला वाटत होतं, तिने हक्काने डोकं टेकावं त्याच्या खांद्यावर.
गाडी थोडी पुढे जाताच मेधा गाढ झोपली. आता एखाद्या लहान मुलीसारखं तिचं डोकं त्याच्या खांद्यावर रेललं होतं ते हळूहळू तिच्याही नकळत त्याच्या मांडीवर आलं.
मनोजला गुलाबी संवेदना होत होत्या. हा असा स्त्रीस्पर्श तो प्रथमच अनुभवत होता. गाडी चहापाण्यासाठी थांबली. गाडीतले पेसेंजर, चालक..उतरले पण मनोज जराही हलला नाही. त्याने मेधाला उठवायचा प्रयत्न केला नाही.
किती निरागस दिसत होती ती झोपेत! त्याने तिच्या बटा अलगद तिच्या कानामागे सारल्या. आता तो दिव्यांच्या पिवळ्या प्रकाशात तिला नीट निरखू शकत होता. उभट कपाळ,आखीवरेखीव दाट भुवया, धारदार नाक, नाजूक जीवणी आणि नाकातली खड्याची चमकी..एखादी परीच जणू अवतरली होती. ही रात्र नि हा प्रवास संपुच नयेसं वाटत होतं मनोजला.
जेवणासाठी गाडी थांबली तेंव्हा मेधाला जाग आली. तिला फार गिल्टी फील झालं. “सॉरी मनोज,ते आज सकाळपासनं दगदग खूप झाली त्याने जरा डोळा लागला. तुमची मांडी दुखली असेल नं खरंच सॉरी.”
“अहो सॉरी काय म्हणताय..उलट मांडी खूष झाली माझी..इतकं गुलाबी हलकं ओझं जे होतं तिच्यावर.”
“काय म्हणालात?”
“कुठे काय काहीच नाही. येताय नं कँटीनला. काहीतरी खाऊन घेऊ चला.”
“हो.” म्हणत मेधा मनोजच्या मागून उतरली. दोघं फ्रेश होऊन आली. समोरासमोर बसली.
“तुम्ही काय घेणार?” मनोजने विचारलं.
“इथली व्हेज बिरयानी फेमस आहे. मला आवडते.”
“बरं ..वेटर,दोन व्हेज बिरयानी आणि..”
“आणि लस्सी..छान असते.”एखाद्या लहान मुलीसारखी मेधा बोलत होती.
“ओ के वेटर दो लस्सी.”
“अहो पण मनोज तुम्ही तुमच्या आवडीचं काहीच नाही मागवलत..”
“माझ्या आवडीचं पुढच्या वेळी.” यावर मेधा गोड हसली.तिच्या गालावरची खळी अधिकच खुलली.”मनोज आपण केवळ सहप्रवासी आहोत. पुढच्यावेळी थोडेच भेटणार!”
“बघू. त्याची इच्छा असेल तर..” मनोज वरती बघत बोलला.
इतक्यात लस्सी, बिरयानी घेऊन वेटर आला. दोन्हीही पदार्थ छान होते.
आता पुढच्या प्रवासात डोकं खाली येऊ द्यायचं नाही असा निश्चय केला असुनही गार वारा अंगाशी खेळताच मेधा पुन्हा मनोजच्या खांद्यावरनं मांडीवर निजती झाली. बाहेर रात्रीने चांदणं पांघरलं होतं. गाडी संथ गतीने धावत होती. बाहेरची जुनीजाणती झाडं मागे पडत होती नि मनोजला मात्र ही रात्र संपुच नये असं वाटत होतं.
चांदण्यात न्हालेला मेधाचा चेहरा बघताबघताच तो निद्रादेवीच्या अधिन झाला. स्वप्नात तो समुद्राच्या किनाऱ्याजवळ उभा होता नं त्याला मागून येऊन मेधाने गच्च मिठी मारली होती. तिचे मोकळे केस खाऱ्या वाऱ्यासंगे खेळत होते. दोघांनी बोटांत बोटंं गुंफली नि फेसाळत्या लाटांचे मोती झेलीत वाळुतून चालत होती. जंगलातून कोल्हेकुई आली नि मेधा मनोजला अधिकच बिलगली.
“घाबरलीस?”
“ऊं हूं. तू असताना कशाची भिती!” ती मिस्कीलपणे हसत म्हणाली नि समुद्रात धावत गेली..आत आत..थांब थांब मेधा थांब आय लव्ह यू मेधा..आय लव्ह यू..तो एवढ्या जोरात बेंबीच्या देठापासून ओरडला की मेधाच काय गाडीतले सहप्रवासी सगळे जागे झाले. पुढचे ,बाजुचे सगळे या दोघांकडे पाहू लागले.
मनोजला कुठे चेहरा लपवू असं झालं. त्याच्या डोळ्यांवरचा हात काढत मेधा म्हणाली,”आय टू लव्ह यू मनोज. देवाने ठरवूनच जणू आपली भेट घडवून आणलेय.” तिने त्याचा हात हातात घेत त्यावर आपले ओठ टेकवले. सहप्रवाशांनी टाळ्या वाजवल्या.
गाडी थांबताच सगळे प्रवाशी पांगले. या दोघा प्रेमपाखरांना मात्र विरहाची हुरहूर जाणवत होती. दोघांनी व्हॉट्स्प नंबर एक्सेंज केले. समोरच्या क्याफेत फ्रेश होऊन कॉफी घेतली. दोघं कितीतरी वेळ एकमेकांच्या डोळ्यात बघत होती.
मनोजने मग तिला भावाकडे चार दिवस रहायला म्हणजे मुलगी बघायला आलो होतो म्हणून सांगितलं. मेधाही शहरात जॉब करत होती व इकडे आईबाबा,दादावहिनींच्या आग्रहाखातर मुलगा बघण्यासाठी आली आहे असं तिने सांगितलं. मेसेजेसच्या आणाभाका घेतल्या नं दोघं आपापल्या वाटांवरून निघाले.
मेधा घरी येताच तिच्या आईची घाई सुरू झाली.,”मेघा लवकर तयार हो. ती मंडळी येतीलच इतक्यात. जाई, नाश्त्याचं मी बघते. तू तुझ्या लाडक्या नणंदबाईला सजव जा बघू. “
“अहो आई आपली मेधा आहेच चंद्रकोर. तो बघायला येणारा आमच्या ह्यांच्या साहेबांचा मेहुणा, घायाळ होईल आमची मेधा पाहून. साडीत तर म्याडम अगदीच ग्रेसफुल दिसतात.”
“”ए वहिनी पुरे गं तुझं.”
पप्पा पुढे होत म्हणाले,”बेटा पुरे कसं. नशीब लागतं असं कौतुक करुन घ्यायला. एवढी मायाळू वहिनी मिळालेय तुला. सासरीही अशीच प्रेमळ माणसं आहेत तुझ्या. तुला बघायला येणारा मुलगा, तुझ्या दादाच्या साहेबांचा मेहुणा आहे. मुलगा त्यांच्या नजरेखालील आहे आणि नाव ठेवायला जागा नाही असा आहे. दिल्लीला आहे कामाला. आता लांब जाणार बाळा तू. विचार करूनच शीण येतो बघ.”
“पण पप्पा माझं ऐका नं जरा..” मेधा असं बोलते न् बोलतो इतक्यात बेल वाजली.
“मेधाची आई म्हणाली,”अगं.बाई आली वाटतं. मुलाकडची मंडळी. मेधा,जाई चला पळा. लवकर आवरा तोवर मी पोहे टाकते फोडणीला.”
मेधाला साडी नेसवताना जाईने विचारलंच,”का गं अशी गप्प तू. तुला तो मुलगा पसंत नसेल तर पप्पा थोडीच तुझ्यावर बळजबरी करणार आहेत! ही सोयरीक जुळली तर तू याच गावात येशील रहायला! तुझ्या दादाचं रखडलेलं प्रमोशनही करून देणार आहेत म्हणे.. मग आपण थोडं मोठं घर घेऊ. ओसरीवर झोपाळा, बाहेर हिरवंगार लॉन, मेंदीचा ताटवा, फुलांचा बगिचा.”
जाई, मेधाची वेशभूषा, केशभूषा करता करता स्वप्नरंजनात रमून गेली होती तोच दारावर टकटक. जाईने दार उघडलं. दारात आई उभी होती.”काय गं बाई उशीर..आवरा पटापट. लग्नाला जाताय की काय!” जाईने मेधाच्या वेणीत मोगऱ्याचे गजरे माळले. मेधा किचनमधून चहाचा ट्रे घेऊन बाहेर गेली. बघते तर काय समोर दोघे तरुण ..त्यातला एक तिचा प्रियकर मनोज. इतकी खूष झाली मेधा! तिने सर्वांना चहा दिला. वाकून नमस्कार केला. सासूसासऱ्यांनी तिला पेढ्याचा पुडा दिला व आत जायला सांगितलं.
मेधाने आत येऊन जाईला पकडलं व गोल गिरक्या घेतल्या. तिचा आनंद बघून तिचे पप्पा, दादा खूष झाले. “आई गं,मला आवडला तो. माझा होकार कळव.”
“देव पावला गं बाई. ऐकलात नं. मंडळींना होकार कळवा आपल्याकडून.” मुलानेही पसंती दर्शवली. मंडळी गेल्यावर दादाने सर्वांसाठी आईसक्रीम आणलं. दादा,वहिनी सगळ्यांनी मेधाची थट्टा करायला सुरूवात केली.
मेधाच्या गालाची खळी अधिकच गुलाबी झाली.
तिने मेसेज केला.
हेलो मनोज मी मेधा.
मनोज, आज मी खूप खूष आहे. आता आपलं लग्न होणार. तुम्ही खूष अहात ना, मग मला फोन का नाही केलात? कट्टी.
मेधा माझं ऐकशील का जरा. मी नवऱ्यामुलासोबत आलो होतो तुमच्याकडे. नवरामुलगा आशिष हा माझ्या शुभदावहिनीचा भाऊ आहे व माझा चा़गंला मित्र. खरं सांगतो मेधा मला ठाऊक नव्हतं तुझं स्थळ आहे हे व तू मला त्या वेशात दिसशील..खूप मोठा घोळ झालाय मेधु.
तू मी समजून आशिषला होकार दिलाहेस. हे कोडं आता कसं सोडवायचं. तो आशिष तर ग्रुप्सवर तुझा फोटो भावी जोडीदार म्हणून शेअर करतोय. किती खूष आहे तो.”
मनोज, त्याच्या खुषीसाठी मी हे लग्न करू! नि माझ्या खुषीचं काय..का म्हणून मी हा त्याग करू तेही एका परक्या माणसाकरता..तू ना तू बोलूच नको माझ्याशी.”
मेधा मेधा ऐक ना गं माझं. मेधा मोबाइल एका बाजुला टाकून उशीत डोकं खुपसून रडत बसली. इकडे मनोजचेही डोळे रडून रडून सुजले. जेवायलाही बाहेर गेला नाही तो. दुसऱ्या दिवशी तो अंघोळीला गेला असता शुभदा त्याच्या खोलीत केर काढत होती.मनोजचा मोबाइल सारखा वाजत होता म्हणून तिने उचलला.
ती हेलो म्हणायच्या आधीच..
“मनोज ऐक ना रे माझं. मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. तुझ्या जागी दुसऱ्या कुणाची कल्पना नाही करू शकत मी. तू तुझ्या वहिनीला सांग ना की तिच्या भावासाठी जी मुलगी बघितली ती तुझी मेधा आहे. मेधा तुझ्यावर प्रेम करते मनु. कोणा आशिषवर नाही करत. ऐकतोयस ना मनू..”
इतक्यात मनोज अंघोळ करून आला. रडून बटबटीत झालेले त्याचे डोळे पाहून शुभदाला हसूच आलं. ती फोनवर बोलू लागली,”मेधा, ऐक मी शुभदावहिनीच बोलतेय. माझा दिरपण तुझ्या प्रेमात वेडा झालेला दिसतोय. दोघेही चक्क रडलात! वेडे कुठले. एकमेकांच्या घरच्यांना तुमचं प्रेम समजवून सांगा. तुम्ही सांगितलच नाही तर आम्हांला कळणार कसं! आमच्या घरच्यांना मी समजावीन. मेधा तुला तझ्या आईपप्पांशी शांतपणे बोलावं लागेल. ती मंडळी ऐकली नाहीच तर मी मदत करेन तुम्हाला पळून जाऊन लग्न करायला.”
“वहिनी थँक्स.. थँक्स.. थँक्स.” मनोज नं मेधा अलिकडून पलिकडून एका सुरात ओरडले.
मेधाने घरी तिच्या मनोजवरील प्रेमाविषयी सांगितलं.
मेधाच्या वडिलांनी मेधाच्या पसंतीला आधी थोडी नाराजी दर्शवली कारण त्यांच्या मुलाच्या बढतीचा प्रश्न होता पण मेधाच्या भावाने मेधाला जवळ घेत म्हंटलं, “माझ्या बहिणीच्या सुखापेक्षा बढती मोठी नाही मला.
मला बढती द्यायचीच असली तर ती माझं काम बघून देतील.” मेधाला रडूच आलं.
वहिनीने तिला जवळ घेत तिचे डोळे पुसले व म्हणाली,”वेडाबाई कुठली. आमच्या काळजाचा तुकडा आहेस तू. तू आनंदी नसशील तर आम्हला कशी बरं चैन पडेल! मेधाच्या वडिलांनी लेकीच्या पसंतीवर शिक्कामोर्तब केलं.
एका शुभमुहूर्तावर मनोज व मेधाचं लग्न धुमधडाक्यात पार पडलं. जाई वहिनी व शुभदा वहिनी दोघीही लग्नात ठुमकल्या. शुभदाचा भाऊ आशिष याने तर मनोज व मेधाला हनिमुन प्याकेजची तिकिट्स भेट म्हणून दिली. मेधाच्या भावालाही बढती मिळाली व त्यांच्या नवीन घराची पायाभरणी झाली.
हनिमुनला जाण्याठी मनोज व मेधा दोघं ट्रेनमधे चढले. ट्रेन सुरु झाली. मेधाने मनोजचा हात हातात घेतला व गुणगुणू लागलीे..
हमसफ़र, मेरे हमसफ़र
पंख तुम, परवाज़ हम
ज़िंदगी का साज़ हो तुम
साज़ की आवाज़ हम…
समाप्त
==================
प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.
https://www.facebook.com/ritbhatmarati/
तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.
फोटो साभार – गूगल
आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही
=============