हळदीकुंकू

©️®️ गीता गजानन गरुड.
वासुअण्णा व सिंधुताई सोसायटीतलं जुनंजाणतं,पापभिरु जोडपं. कधी कुठे लग्नाला,वास्तुशांतीला बोलावणं आलं की वासुअण्णा व सिंधुताई जोड्याने जायचे.
वासुअण्णा सेवानिवृत्त झाल्यापासनं,अगदी बाजारात फळं,भाजी घ्यायला जातानाही दोघं मिळून जायचे. इतर नवराबायकोंप्रमाणे, त्यांच्यातही हमरीतुमरी व्हायची. नाही असं नाही पण ती जेवणात तोंडी लावण्याच्या लोणच्यासारखी.
सिंधुताई, वासुअण्णांच्या गमती स्वभावामुळे फार वेळ त्यांच्यावर राग धरु शकत नव्हत्या. काहीतरी विनोद करुन वासुअण्णा सिंधुताईंना हसवायचेच.
नटण्याथटण्याची कित्ती आवड होती सिंधूताईंना!
चेहऱ्याला सुगंधी पाऊडर लावून कपाळाला मोठं गोल कुंकू लावायच्या. किती शोभायचं त्यांना! वेणीचा शेपटा,त्यात जाई,जुई,अबोली किंवा मोगऱ्याचा गजरा तर कधी चाफ्याचं फूल,कधी फुललेला हसरा गुलाब.
विमलची बारीक फुलाफलांची साडी,मेचिंग ब्लाऊज,छान छान पर्सेस, नेलपेंट,मेंदी सारं सारं आवडायचं सिंधुताईंना. वासुअण्णाही बायकोच्या साऱ्या हौशी पुरवायचे. कधी नाटकाला घेऊन जायचे तर कधी बागेत फिरायला. त्यांना मुलबाळ नव्हतं,पण सोसायटीतल्या साऱ्या कच्च्याबच्च्यांवर ते माया करायचे.
अगदी ध्यानीमनी नसताना, सिंधुताईंच्या जीवनात आक्रीत घडलं. बाहेर बुळबुळीत आहे, फुलं काढायला जाऊ नका असं सतरांदा सांगुनही वासुअण्णा ठीक सहा वाजता पिशवी घेऊन बाहेर पडायचे. इमारतीच्या आवारातला अनंता,तगर फुलांनी बहरलेला असायचा. त्या हारवाल्याकडच्या फुलपुडीपेक्षा वासुअण्णांना ही टवटवीत फुलं देवाला वहायला फार आवडायची. तासभर तरी त्यांची देवपूजा चाले.
असेच एकदा वासुअण्णा फुलं काढायला म्हणून निघाले. जिन्यात कुत्र्यांनी, लोकांनी बाहेर ठेवलेली केराची टोपली उपडी केली होती. कचरेवाला ती सगळी घाण साफ करुन गेला होता तरी पायरीवर तेलाची चिकटण झाली होती.
वासुअण्णा त्या चिकट्यावरुन घसरले ते तिथेच बसले. त्यांना जोर लावूनही उठता येईना.सकाळीच जीमला जाणाऱ्या योगेशने वासुअण्णा पडलेले पाहून त्यांना उठवायचा प्रयत्न केला, पण त्याला एकट्याने जमेना. बाजुच्यांची बेल दाबली. शेजारी जमा झाले. सिंधुताईंना बोलावलं. शेजाऱ्यांनी वासुअण्णांना हॉस्पिटलमध्ये भरती केलं. वासुअण्णांच्या मणक्याची नस निकामी झाली. त्यांना उठताबसता येईना.
एकटीला वासुअण्णांची उठबस करायला झेपायचं नाही म्हणून सिंधूताईंनी मदतनीस ठेवला. दोघं मिळून वासुअण्णांची देखभाल करत पण वासुअण्णा या अपघाताने मनातून खचले ते खचलेच. अशातच एके रात्री वासुअण्णांना देवाज्ञा झाली.
वासुअण्णांच्या निधनानंतर, काही दिवस सिंधुताईंचा भाऊ येऊन त्यांच्यासोबत राहिला. म्रुत्युदाखला,बँकेतले सोपस्कार यात भावाने त्यांना मदत केली. सगळे व्यवहार समजावून दिले नं तो त्याच्या घरी गेला.
चार महिने होत आले या गोष्टीला पण सिंधुताईंनी जणू स्वतःला मिटूनच घेतलं होतं. कोणाशी बोलणं नाही, चालणं नाही. अगदी क्वचित बाहेर पडत. लागतील त्या वस्तू वाण्याकडून मागवून घेत.
एकेक सण आला की सणाच्या दिवशी सिंधूताईंना अगदी भरुन येई. कधी न्हाऊन आल्या की नकळत त्यांचा हात पिंजरीच्या डबीकडे जाई. मग त्या एकट्याच रडत बसायच्या.
वासुअण्णांनी टेरेसमधे लावलेला जाईचा वेल, अलिकडे छान फोफावला. कळ्याफुलांनी बहरला. बरीच फुलं मिळू लागली. सिंधूताई काही फुलं देवाला वहात पण त्यांनाही वाटे आपणही गजरा करुन माळावा पण मग वैधव्याची आठव होऊन त्या अधिकच केविलवाण्या व्हायच्या. वासुअण्णांच्या आठवणीने कातर व्हायच्या.
मार्गशीर्षातल्या व्रताचं उद्यापन होतं. सिंधुताईंच्या समोरच्या ब्लॉकमधली वीणा सकाळीच जाऊन फुलं,फळं,वेणी,गजरे घेऊन आली. दुपारी नवरा व मुलगी आपापल्या कामांना गेल्यावर फुरसतीने तिने पूजा मांडायला घेतली.
पाट मांडला. पाटाच्या सभोवताली रांगोळी रेखाटली.पाटावर तांदूळ ठेवले. कलशात पाणी भरुन घेतले. त्यात सुपारी,एक रुपयाचं नाणं घातलं, पण नेमकं दुर्वा आणायला विसरली. मग तिच्या लक्षात आलं की सिंधुताईंच्या कुंडीत दुर्वा आहेत. ती लगोलग सिंधुताईंकडे गेली.
“काकू, जरा दुर्वा हव्या होत्या.”
“वीणा,अगं बाहेर का उभी. आत ये.”
सिंधुताईंनी, कुंडीतल्या दुर्वा,नुकतीच उमललेली गावठी गुलाबं,पांढरीशुभ्र जाईची फुलं एका परडीत काढली व ती परडी वीणाला दिली. वीणाने त्यांनाही पोथीवाचनासाठी यायचा आग्रह केला तशा त्या दाराला कडी घालून वीणाकडे गेल्या.
वीणाने कलशाच्या अष्टदिशांनी हळदकुंकवाची बोटं उमटवली. कलशात पाच फांद्या ठेवल्या. श्रीफळ ठेवलं. त्यावर देवीचा मुखवटा बसवला. देवीला नथ,गंठन,ठुशी अशा मोजक्या दागिन्यांनी सजवलं.
पिवळ्याधम्म शेवंतीची वेणी कलशावर माळली व पाटावर ठेवलेल्या तांदूळाच्या गोलावर देवीची स्थापना केली. मग तिने देवीला दुर्वांनी स्नान घातलं. देवीला दिपाने ओवाळलं. अगरबत्ती,धूप,कापूर लावला व फळं,दूध अर्पण केलं. देवीच्या पाया पडली व पोथीवाचन करु लागली.
महालक्ष्मीचं ते चैतन्यमय रूप पाहून सिंधुताईंना फार बरं वाटलं. त्या पोथी ऐकत बसल्या. पोथी वाचून झाल्यावर वीणा सिंधुताईंच्या पाया पडली,पण त्यांना हळदीकुंकू लावण्याबाबत संभ्रमित झाली. सिंधूताई थोडावेळ गप्पा मारत बसल्या व नंतर त्यांच्या घरी निघून गेल्या.
वीणाचा नवरा अमोल त्यादिवशी, लवकरच घरी आला. वीणाला असं गप्प गप्प पाहून त्याने विचारलं,”वीणा, बरं वाटत नाहीय का तुला? आल्यापासनं बघतोय..आपल्याच विचारात आहेस.”
“दुपारी पोथीवाचनासाठी सिंधूताईंना बोलावलेलं.” वीणा म्हणाली.
“छानच केलंस. एकट्याच असतात. मुल न् बाळ. बोलवत जा त्यांना.”
” हो रे पण ऐकना. मी दरवर्षी त्यांना हळदीकुंकू लावायचे..यावर्षी वासुअण्णांचं तसं झाल्यामुळे माझा हातच झाला नाही त्यांना कुंकू लावायला. अमोल,मला मनापासून अपराधी वाटतय रे माझ्या वागण्याचं.”
अमोलच्या लक्षात सारा प्रकार आला. त्याने वीणाला सांगितलं की तिने सिंधुताईंना खरंच हळदीकुंकू लावलं पाहिजे होतं. तो त्यांचा मान होता.
मग तर वीणा अजूनच नाराज झाली. अमोलने तिला म्हंटलं,”अशी नाराज नको होऊस. अगं काही जुन्या रीतींचा पगडा असतो आपल्या मनावर त्यामुळे होतं तसं. पण,तू तुझी चूक सुधार. आज संध्याकाळी इतर महिलांबरोबरच सिंधूताईंना आग्रहाने उद्यापनाला बोलाव.
हे ऐकताच वीणाची कळी खुलली. ती, मुलीला सोबत घेऊन शेजारणींना आमंत्रण द्यायला गेली. सिंधुताईंना आग्रहाचे आमंत्रण दिले तिने. तोवर अमोलने मस्त मसालादूध बनवलं.
वीणा दिवाळसणाला घेतलेली नारिंगी पैठणी नेसली. साऱ्या शैजारणी एकेक करुन येत होत्या पण सिंधुताई येत नव्हत्या. मग वीणा परत गेली त्यांना बोलवायला. तिने बळेबळेच सिंधूताईंना त्यांची आवडती लाल रंगाची साडी नेसायला लावली व तिच्या घरी त्यांना हाताला धरुन घेऊन आली.
वीणाने इतर बायांसोबत सिंधूताईंना हळदकुंकू लावलं. त्यांच्या वेणीत गजरा माळला. फळ दिलं. मसालादूध दिलं. दोघांनी जोडीने त्यांना नमस्कार केला.
इतर बायांनाही वीणाचं वागणं फार आवडलं. साऱ्यांनी सिंधुताईंना मग आपापल्या घरी हळदीकुंकूला बोलावलं व असंच नेहमी छान हसतखेळत रहाण्याचा आग्रह केला.
दुसऱ्यादिवशी वीणा कपडे वाळत घालायला टेरेसमध्ये गेली. अमोल तिथेच खुर्चीवर पुस्तक वाचत बसला होता. वीणाचं लक्ष सिंधुताईंच्या टेरेसकडे गेलं.
सिंधूताईंनी आज पुर्वीप्रमाणे ठसठशीत कुंकू लावलं होतं. छान वेणी घालून त्यात गजरा माळला होता व कॉफी पित जुना अलबम चाळत होत्या. अमोलचंही तिकडे लक्ष गेलं.
अमोल वीणाला म्हणाला,”बघ वीणा,काल आपण उचललेल्या एक धीराच्या पाऊलाने सिंधूताईंत किती बदल झाला आहे.
त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान बघ. हेच तर मी माझ्या आईच्या चेहऱ्यावर शोधायचा प्रयत्न करत असे कारण माझे वडील माझ्या लहानपणी गेले. तेंव्हापासून आजूबाजूचे तिला हळदीकुंकवाला, डोहाळजेवणाला..मुद्दामहून वगळत असतं.
आईच्या चेहऱ्यावरचं त्यावेळचं ते दु:ख,तिला वाटणारा एकाकीपणा टोचायचा मला.
आई हळूहळू मिटत गेली.. दु:खाच्या खोल खोल डोहात. तुला नंतर तिला झालेला अल्झायमर ठाऊकच आहे. माझ्या आईला जर समाजाने मानाने वागवलं असतं तर कदाचित ती आज आपल्यात असली असती.”
वीणाने अमोलच्या खांद्यावर हात ठेवला व म्हणाली,”आपण सिंधूताईंसारख्या इतर स्त्रियांना मानाने जगायला शिकवूया. हे तर आपण नक्कीच करु शकतो नं.”
——–गीता गजानन गरुड.
=====================
प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.
https://www.facebook.com/ritbhatmarati/
तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.
ritbhatmarathi@gmail.com
फोटो साभार – गूगल
आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही