हक्क

©️®️ सौ. शिल्पा पराग कुलकर्णी
सकाळपासून मीरा आणि अजयची लगबग चालू होती. बॅगा नीट भरल्या गेल्या आहेत ना शंभरवेळा चेक करत होते. हॉलमध्ये एका बाजूला मीरा, अजय आणि अद्वैत यांचं सामान तर दुसर्या बाजूला नानांचं सामान. शांत होते ते अद्वैत आणि नाना.
‘‘बाबा, आपण नानांना पण आपल्याबरोबर नेऊया ना? नाना तर यंग आहेत. दमत नाहीत.’’ अद्वैतचा हट्ट.
‘‘नाही बेटा त्यांना इतक्या लांबचा प्रवास झेपणार नाही.’’ अजय.
‘‘मग मी राहतो नानांबरोबर, तुम्ही दोघं जाऊन या.’’ अद्वैत
‘‘अद्वैत, आता मार खाशील हा सकाळपासून तुला किती वेळा सांगितलं की, ते शक्य नाहीये. डॉक्टरांची परवानगी नाहीये तशी.’’ मीरा चिडून म्हणाली. नाना उदास चेहर्याने बघत होते.
‘‘नाना आम्ही उद्या सकाळी निघणार आहोत, तुम्हाला आजच संध्याकाळी तिकडे सोडून येतो.’’
‘‘अजय, अरे मी राहीन ना इथे तुम्ही पंधरा दिवस नाही महिनाभर राहून या. मला काही प्रॉब्लेम नाही. इथे स्वयंपाकाला इंदू येतेय घरात सर्व कामाला मावशी येतायत. मला काही अडचण नाही. अगदीच काही नाही तर रमेशकडे जाईन मी.’’ रमेश म्हणजे त्यांचा दूरचा भाचा होता त्याचा नानांवर खूप जीव होता. नानांनी शेवटचा प्रयत्न केला. मीरा रागाने धुसफुसत आत निघून गेली. अजय हताशपणे बघत राहिला.
‘‘नाना, अहो तुमच्या काळजीनेच आम्ही तुम्हाला त्या वृद्धाश्रमात पाठवतोय. आम्ही आलो की, आधी तिकडेच येऊन तुम्हाला घेऊन जाऊ. हल्लीच्या या धावत्या जगात कोणाला त्रास द्यायचा आपण त्यात तुमचं वय आता 80. जरी तुम्ही फीट असलात तरी कधी काय होईल काही सांगता येत नाही. रमेशलाही स्वत:चे आई-वडील सांभाळायचे, परत तुमची जबाबदारी.’’
‘‘ह.. म्म..’’
‘‘तिथे तुमच्या वयाचे लोक आहेत, एक ओळखीचे मित्रही आहेत.’’ अजय त्यांना समजावत होता की, आपलीच समजूत घालत होता त्याचं त्यालाच कळत नव्हतं. शेवटी संध्याकाळी अजय आणि नाना निघाले. दुपार भर आदू नानांना चिकटून होता, मधूनच म्हणत होता,
‘‘नाना, मला तुमच्याबरोबर यायचं. मला यांच्याबरोबर ट्रीपला नाही जायचंय.’’
‘‘अरे आदू तू फॉरेनला जा मजा करून ये. मला मस्त चॉकलेट आण आणि छान छान गिफ्टही आण. मला विमान प्रवास झेपणार नाही रे.’’ नानांनी आपल्या डोळ्यांतले अश्रू लपवत आदित्यची समजूत काढली.
निघताना नाना देवघराजवळ आले, देवांना नमस्कार केला. हॉलमध्ये टांगलेल्या नलिनीच्या फोटोकडे बघून त्यांचे डोळे पाणावले. त्यांना वाटलं आज नलिनी असती तर आपल्यावर ही वेळ आली नसती. कित्येक वेळा नलिनीशी आपण मीरा बरोबर आहे आणि तू चूक आहेस म्हणून वाद घातला होता. बिचारी नलिनी गप्प बसायची. एक दिवस अचानक नलिनी झोपेतच हे जग सोडून गेली, नंतर एक-दोन महिने चांगले गेले आणि मीराने आपले रंग दाखवायला सुरुवात केले. तिला नानांची अडचण होत होती, नलिनी असताना तिला नानांचं काही करावं लागत नव्हतं आता नाही म्हटलं तरी त्यांची जबाबदारी तिच्यावर आली होती, तसं काहीच करावं लागत नव्हतं, पण ती उगीचंच कांगावा करत असे की अद्वैतचं करा, नानांचं करा, नोकरी करा माझा काही जीव आहे की नाही. उलट नाना असल्यामुळे तिला अद्वैतची काळजी नव्हती, पण हे समजवणार कोण तिला?
आता तिच्या डोक्यात फॉरेनला जायचं आलं आणि त्यासाठी नानांना वृद्धाश्रमात ठेवायचा आग्रह तिने अजयला केला. खरंतर अजयला हे मान्य नव्हतं त्याने थोडे दिवस टोलवाटोलवी केली, पण शेवटी स्त्रीहट्ट. आता उद्या ट्रीपला जायचं तर आज नानांना तो वृद्धाश्रमात पाठवत होता. जसजशी त्यांची जायची वेळ जवळ येत होती तसतसं मीरा नाटक करत होती,
‘‘आम्हालाही नको वाटतंय हो, पण काय करणार? ओैषधं घेतलीत ना? कपडे अजून घ्या.’’
‘‘नको काय करायचेत जास्त? पंधरा दिवसांचा तर प्रश्न!’’ नाना म्हणाले.
‘‘तरी असुदेत!’’ म्हणून मीराने अजून चार ड्रेस, शाल सर्व काही नानांच्या बॅगेत भरले.
वृद्धाश्रम आले, अजय आणि नाना उतरले. ज्या खोलीत नानांची सोय केली होती ती खोली तशी चांगली होती. नानांनी आपली बॅग ठेवली तिथे टेबलावर नलिनीचा फोटो आणि अजय, मीरा, अद्वैतचा फोटो ठेवला. अजयला वाईट वाटले.
‘‘येतो नाना.’’ म्हणून त्याने नमस्कार केला.
‘‘किती तारखेला येशील?’’ नानांनी भरल्या आवाजात विचारले.
‘‘पंधरा दिवसांत येतो.’’ अजयने खाली मान घालून सांगितले.
आज नानांना वृद्धाश्रमात येऊन महिना होऊन गेला. ना अजय आला ना अजयचा फोन. मला घरी जाऊदे म्हणून नानांनी कितीतरी वेळा वृद्धाश्रमाच्या व्यवस्थापकाला विनवणी केली, तर त्याने सांगितले. अजून अजयसाहेब आले नाहीत. ते आल्याशिवाय तुम्हाला सोडू नये अशी त्यांची सक्त ताकीद आहे. नानांना काहीच कळत नव्हते. अजय, मीरा कोणाचाच फोन लागत नव्हता. काय करावे काहीच कळत नव्हते.
वृद्धाश्रमातील दामोदर नावाचे गृहस्थ नानांचे जिवलग मित्र बनले होते. तसा वृद्धाश्रम चांगला होता. बरोबरीचे लोक होते, पण तरीही घरी जायची ओढ होती. एकदा दामोदर नानांना म्हणाला,
‘‘नाना, तू आता घरी जाण्याची आशा सोड.’’ दामोदर.
‘‘असं का म्हणतोस?’’ नाना
‘‘अरे तो यशवंत बघितलास ना, त्याच्या मुलाने त्यांना इथे आणून सोडले परत कोणीही त्याला न्यायला आले नाही, इथे यायची वाट सोपी आहे. परत जायची अवघड.’’ दामोदर.
नानांना काहीच समजेना. शेवटी एक दिवस त्याने रमेशला फोन लावला. रमेशने पटकन फोन उचलला.
‘‘हॅलो नाना, कसे आहात? परवा मी घरी गेलो तेव्हा घरी नव्हता तुम्ही.’’ रमेशने विचारले.
‘‘घरी?’’ नानांनी आश्चर्याने विचारले.
‘‘हो परवाच तर जाऊन आलो. वहिनी आणि अजय भेटले, अद्वैत नव्हता. तुम्ही कुठेतरी बाहेर गेला आहात असे सांगितले अजयने.’’ रमेश भडाभडा बोलत होता.
‘‘पण ही मंडळी तर…’’ नानांचं वाक्य तोंडातच विरलं. त्यांना दामोदरचं वाक्य आठवलं.
‘‘इथे येणं सोपं आहे, पण जाणं कठीण.’’
आपण आपल्या लेकाकडून फसवले गेल्याची जाणीव त्यांना झाली.
थोडे अजय, मीरा, अद्वैत बाहेर चालले असताना त्यांना एक माणूस नोटीस देऊन गेला. नोटीस बघून मीरा तर पार चक्रावून गेली.
‘‘महिन्याभरात घर खाली करावं.’’ अशी ती नोटीस होती. खाली नानासाहेबांची सही होती.
नानांनी मोठ्या कष्टानं हे घर उभं केलं होतं आणि आज आपणच त्यांना घराबाहेर काढलं म्हणून त्यांनी हे पाऊल उचललं याची अजयला जाणीव झाली. ते असं काही करतील याची त्या दोघांना कल्पनाच नव्हती.
काही न बोलता अजयने मीराला ती नोटीस दाखवली. मीरा हतबल झाली. पंधरा दिवसांत त्यांना छोट्याशा भाड्याच्या फ्लॅटमध्ये शिफ्ट व्हावं लागलं.
*
आपण फसवले गेल्याची जाणीव होताच त्यांनी रमेशला परत फोन केला. त्याला सर्व परिस्थिती सांगितली. रमेश येऊन नानांना त्याच्या घरी घेऊन गेला, कारण नानांनी त्याला त्याच्या शिक्षणासाठी खूप मदत केली होती. रमेशचा एक मत्र नावाजलेला वकील होता. घर नानांच्या नावावर होते, त्यामुळे त्याच्या मदतीने त्यांनी ती नोटीस तयार केली आणि अजयला पाठवली. खरंतर नानांना हे सर्व नको होते, पण आपल्याच मुलांना धडा शिकवणंही गरजेचे होते.
आता नाना आपल्या घरात मोठ्या मानाने राहात होते, त्यांच्याजवळ पुरेसा पैसा होताच शिवाय घरात पूर्वीपासून असणारे नोकर-चाकर त्यांची काळजी घ्यायला होतेच. रमेशही अधूनमधून येत होता. मीरा, अजयला मात्र घरात परवानगी नव्हती, पण रविवारी अद्वैतला ते दारातून सोडून जात असत. त्याच्यावर मात्र नानांची खूप माया होती. आपल्या मृत्यूपत्रात सारी संपत्ती अद्वैतला मिळावी असे नानांनी लिहून ठेवले होते. आता आठवड्यातून एक दिवस xते वृद्धाश्रमात जात होते, आणि आपला हक्क आपण बजावण्यासाठी काय करता येईल याचे मार्गदर्शन तिथल्या मित्रांना करत होते.
=========================
फोटो साभार – गूगल
तुमच्याकडेही अशाच लघुकथा असतील तर आम्हाला नक्की कळवा.
कथा आवडल्यास आमच्या फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा.
फेसबुक पेज : https://www.facebook.com/ritbhatmarati/