Skip to content Skip to sidebar Skip to footer

गुरुदक्षिणा

©® सौ मधुर कुलकर्णी

मुग्धा गाडीतून उतरली.शाळेची इमारत बघून तिचा  ऊर भरून आला. खूप बदल झाला होता.पंचवीस वर्षानंतर ती आज शाळेत येत होती.बाहेर शाळेपाशी नवीन दुकान झाली होती.ओळखू न येण्याइतका बदल.रविवारच्या सुट्टीचे औचित्य साधून,आज काही माजी विद्यार्थ्यांचा सत्कार होणार होता,त्यासाठी खास मुग्धा सगळी कामं बाजूला सारून मुंबईहून आली होती. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती नावाचे छोटेसे गाव,जिथे तिचं शालेय शिक्षण झालं होतं.ती शाळेच्या आवारात आली.ती आल्याची माहिती शाळेतील शिपायाने मुख्याध्यापकांना दिली.मुख्याध्यापक,शाळेतले शिक्षक,सगळेच तिच्या स्वागताला बाहेर आले.

“मुग्धाताई, आपण आमच्या विनंतीला मान देऊन आलात यासाठी आपले मनःपूर्वक आभार.”मुख्याध्यापकांनी पुष्पगुच्छ देऊन तिचे स्वागत केले.

“अहो,आभार कसले मानता. ज्यांनी मला घडवलं,जिथे मी घडले त्या वास्तूत परत येण्याचं भाग्य मला मिळालं,अजून काय हवं.खर तर मीच तुमची ऋणी आहे.तुम्ही मला बोलावून माझा सन्मान केला.

मी एक विनंती करू का?” मुग्धाने विचारलं.

“अहो,आज्ञा करा ताई.तुमच्यासारखी उच्चशिक्षित व्यक्ती आमच्या शाळेची माजी विद्यार्थिनी आहे,हा आमचा अभिमान आहे.”

“मला माझ्या वर्गात थोडा वेळ बसायचं आहे,तुमची हरकत नसेल तर.” मुग्धा भावुक होऊन म्हणाली.

“जरूर ताई,अजून काही निमंत्रित यायचे आहेत.कार्यक्रमाला अवकाश आहे.पांडुरंग तुम्हाला वर्गात घेऊन जाईल.अरे पांडुरंग,ताईंना जरा शाळा बघायची आहे.”

“जी सर,ताई मी वर्गाची चावी घेऊन येतो.”पांडुरंग पळतच ऑफिसच्या दिशेने गेला.

पांडुरंगने वर्गाचं दार उघडलं, “निवांत बसा ताई.कार्यक्रमाची वेळ झाली की तुमास्नी बोलवायला येतो.”

मुग्धाने हळुवार सगळ्या वर्गातून नजर फिरवली.आणि ती बसायची त्या दुसऱ्या बेंचवर येऊन बसली.तिने डेस्क वरून हळूच हात फिरवला.तिचे वाळलेले अश्रू तिथे दिसतात का,उगाच बघू लागली.

——————————————————————-

प्रगती पुस्तक क्लासटिचरने दिलं आणि मुग्धाला रडू आलं.ह्या चाचणीतही गणितात ती नापास झाली होती.आता घरी गेल्यावर आईचा कांगावा,बाबांची बोलणी ह्या सगळ्याला तोंड द्यावं लागणार होतं.गणित हा विषय तिचा शत्रू झाला होता. सातव्या वर्गापर्यंत कशीबशी पास व्हायची पण आता आठवीत तिला तो विषय खूप जड जात होता.शाळा सुटल्याची बेल वाजली आणि एकेक करून मुलं बाहेर जायला लागली.मुग्धा मात्र जागेवरच बसून होती.प्रीती तिच्याजवळ आली, ” मुग्धा,शाळा सुटलीय. चल न घरी.”

“तु पुढे हो,मी येईन नंतर.”मुग्धा तिच्याकडे बघायचं टाळत म्हणाली.

प्रीती गेली आणि मुग्धा डेस्कवर खाली मान घालून रडायला लागली.तिला घरी जावसच वाटेना.शाळा बंद करायची वेळ आली तसा शिपाई वर्गाला कुलूप लावायला आला.त्याला मुग्धा खाली मान घालून बसलेली दिसली.

“ताई,काय झालं ग,बरं नाही वाटत का?”त्याने विचारलं.

 “नाही काका,मी ठीक आहे.” असं म्हणत मुग्धाने दप्तर उचललं आणि वर्गाच्या बाहेर आली.घरचा रस्ता रोजच्यापेक्षा आज खूप लवकर संपला असं तिला वाटलं.

 घरी आल्यावर प्रगती पुस्तकावर सही घ्यायची म्हणून तिने वडिलांना दाखवलं.ते बघितल्यावर त्यांची नेहमीप्रमाणेच मुग्धावर आगपाखड सुरू झाली.

“मंदबुद्धीची मुलगी आहेस तू.गणित विषयात नापास?आत्तापर्यंत काठावर का होईना पास तरी होत होतीस.आता खरी महत्वाची वर्षे आणि तू हे दिवे लावलेस.तुझ्याकडून काय अपेक्षा करणार?” त्यांनी रागारागाने ते प्रगती पुस्तक भिरकावून दिलं.

आईने पण तिच्यावर भरपूर तोंडसुख घेतलं.

“अग, काय हे?अभ्यास करतेस का काय करतेस.तुझ्यामुळे मला ऐकून घ्यावं लागतं.तुझ्याकडे माझं लक्ष नाही,मुलगी आईसारखी निर्बुद्ध आहे,ही वाक्य मला ऐकावी लागतात.जरा तरी लाज बाळग ग.पुढच्या परिक्षेत हे असेच गुण उधळले तर तुझं शिक्षण बंद.”

रडून थकलेली मुग्धा सुजलेल्या डोळ्यांनी आईकडे बघत होती.एका क्षणी तिला वाटलं,खरंच मी परत नापास झाले तर बरंच आहे.मला पुढे शिकायचंच नाही.त्या रात्री न जेवताच ती झोपली.

दुसऱ्या दिवशी प्रगती पुस्तकावर आईची सही घेतली आणि शाळेत निघाली.वर्गात कोण काय शिकवतय,ह्याकडे आज लक्षच नव्हतं.कालच आठवून सारखे डोळे भरून येत होते.संस्कृतचा पिरेड सुरू झाला.मुग्धाच्या आवडीचा विषय.ती जरा खुलली.संस्कृतचे शिक्षक; देशमाने सर वर्गात आले.

त्यांनी एक पेपर काढला आणि म्हणाले,”मुग्धा साने ह्या विद्यार्थिनीचा हा पेपर आहे.पूर्ण गुण मिळवले आहेत.पेपर कसा सोडवावा ह्याचं उत्तम उदाहरण.तुम्ही सर्वांनी हा पेपर एकदा बघावा.”

सरांचं ते बोलणं ऐकून मुग्धा एकदम संकोचली.तिला अशा कौतुकाची सवयच नव्हती.खरंच की,ह्या गणिताच्या नादात मला संस्कृतमधे पैकीच्या पैकी गुण आहेत हे मी विसरलेच. पण आईबाबांना पण हे दिसलं नाही ह्याचं तिला वाईट वाटलं.

“मुग्धा,शाळा सुटल्यावर टीचर्स रुममधे ये, जरा तुझ्याशी बोलायचं आहे.”देशमाने सर म्हणाले.

“सर,आत येऊ का?” मुग्धा टीचर्स रुमच्या बाहेर उभी होती.

“हो ये. तुझं प्रगती पुस्तक दाखव जरा.”सरांनी सांगितलं.

मुग्धाला आता भीती वाटायला लागली.सरांनी गणिताचे मार्क्स बघितले तर त्यांचं माझ्याबद्दल मत वाईट होईल.तिने खोटंच सांगितलं,”सर,मी आज आणलं नाही.घरी विसरले.”

“मुग्धा,मला माहितीय तु गणितात नापास झाली आहेस.माझं तुमच्या क्लास टिचरशी बोलणं झालंय.”

ते ऐकून मुग्धा परत रडायला लागली.

“मुग्धा,रडणं थांबव.रडणं हा कमकुवतपणा आहे.मला सांग,तुला संस्कृत आवडतं न?”

“हो सर,खूप आवडतं “मुग्धा मुसमुसतच बोलली.

“संस्कृत ह्या विषयात तुला खूप शिकायचं असेल,पुढे यायचं असेल तर अजून तीन वर्षे तुला गणितावर लक्ष द्यावं लागेल.दहावीपर्यंत गणित हा विषय कंपलसरी असतो, तुला माहितीय.दहावीनंतर  तु आर्टस् घेऊ शकते.तुला हेच सांगायला मी बोलावलं आहे की तुझा आत्मविश्वास ढळू देऊ नकोस.असतो एखादा विषय कच्चा पण म्हणून तु बुद्धिमान नाहीस असं नाही.माझ्या विषयाची तु एक हुशार विद्यार्थिनी आहेस. मला तुला खूप शिकलेली,संस्कृतची अभ्यासक म्हणून बघायचं आहे.तेव्हा गणिताकडे थोडं लक्ष दे.संस्कृतवर लक्ष द्यायला मी आहेच.कळलं?”

“हो सर,थँक्स,मी जाते.”

मुग्धा टीचर्स रूमच्या बाहेर आली आणि तिला एकदम ओझं उतरल्यासारखच वाटलं.इतक्या सुंदर शब्दात सरांनी समजावलं.तिचा न्यूनगंड कमी झाला.हेच आईबाबा का करू शकले नाहीत?तिने ठरवलं,सरांच्या शब्दाला मान द्यायचा.

मुग्धा नियमित गणिताचा अभ्यास करू लागली.आठवी,नववीत गणितात,खूप नाही तरी निदान पन्नास टक्के गुण तिला मिळाले.संस्कृतचा तर प्रश्नच नव्हता.त्यात पैकीच्या पैकी गुण ठरलेले होते.दहावी आली आणि मुग्धाने गणिताची शिकवणीच लावली.मनापासून अभ्यास करून एकूण नव्वद टक्के गुण मिळवून पास झाली.आणि संस्कृत ह्या विषयात शंभर पैकी शंभर गुण मिळवून शाळेची शान वाढवली.शाळेने तिला बक्षीस देऊन तिचे कौतुक केले.

आईवडिलांनाही प्रथमच मुलीचे कौतुक वाटले.

वडिलांची मुंबईला बदली झाली म्हणून मुग्धाला भद्रावती सोडावं लागणार होतं.निघायच्या आधी ती देशमाने सरांच्या घरी गेली.

“मुग्धा,तु माझी विद्यार्थिनी आहेस ह्याचा मला अभिमान वाटतो.”सर म्हणाले.

मुग्धाला काय वाटलं कुणास ठाऊक,ती एकदम सरांच्या पाया पडून रडायला लागली.सरांनी तिला उठवलं.

“सर,मी पूर्णपणे खचले होते.तुमच्या शब्दांनी मला बळ दिलं.”

“मुग्धा,मला वचन दे,ह्यापुढे तु स्वतःला कमी लेखून रडणार नाहीस.अशा वेळेस मला आठव आणि डोळ्यातलं पाणी परतून लाव.खूप शीक,मोठी हो.तुझा आदर्श सर्वांपुढे ठेव.”सरांनी तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हटलं.

“हो सर,मी नक्की प्रयत्न करेन.तुमचा आशीर्वाद, तुमचे मोलाचे शब्द मला आयुष्यभर प्रेरणा देतील.”तिने वाकून सरांच्या पायावर डोकं ठेवलं.

मुंबईत एका चांगल्या कॉलेजमधे मुग्धाने ऍडमिशन घेऊन आर्टस् घेतलं.शिक्षणाचा एकेक पल्ला गाठत,संस्कृत मधे एम ए,पी एच डी केलं.सगळ्या परीक्षांमधे मुग्धा सर्वात अधिक गुण मिळवून यशस्वी झाली.विद्यापीठात नोकरी लागून थोड्याच दिवसात ती संस्कृतची हेड ऑफ द डिपार्टमेंट झाली.देशमाने सरांशी ती संपर्क ठेऊन होती.कुठलीही अडचण आली की त्यांना फोन करायची.तिच्या बुद्धीची जाणीव त्यांनी तिला करून दिली होती.

काळ पुढे सरकत होता.मुग्धाची चाळीशी उलटली होती.आयुष्य व्यस्त झालं होतं.आणि अचानक एक दिवस शाळेतून फोन आला,माजी विद्यार्थ्यांचा सत्कारासाठी मुग्धाला आमंत्रण आलं.तिने लगेच जायचं ठरवलं.तिला वृद्ध झालेल्या,थकलेल्या सरांना भेटायचं होतं. त्यांचा थरथरता हात डोक्यावर घेण्यासाठी ती आसुसली होती.

——————————————————————-

   पांडुरंग बोलवायला आला तशी मुग्धा आठवणीतून जागी झाली.ती बाहेर आली.निमंत्रित सगळे आले होते.तिची नजर देशमाने सरांना शोधू लागली.आणि तिने सरांना ओळखलं.तिला अगदी भरून आलं.ती झपाट्याने त्यांच्या दिशेने येऊ लागली.त्यांच्या जवळ जाणार इतक्यात मुख्याध्यापक म्हणाले, “मुग्धाताई,देशमाने सरांची वृद्धत्वामुळे दृष्टी अधू झालीय.ते तुम्हाला ओळखणार नाहीत.”

  “मी बघते प्रयत्न करून.”मुग्धा सरांजवळ आली,त्यांच्या पायावर डोकं ठेवलं आणि उभी राहून त्यांचे हात हातात घेतले.

    “मुग्धा” सरांनी हाक मारली आणि मुग्धाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.ती काही न बोलता सरांजवळ उभी होती.

   “मुग्धा,डोळे पूस.मला वचन दिलं होतंस न, रडणार नाहीस म्हणून.”सर म्हणाले.

   “हो सर, पण हे अश्रू तुमच्यासाठी आहेत. ते तसेच वाहू द्या.माझी गुरुदक्षिणा समजा हवं तर” मुग्धा रडतच म्हणाली.

   “तुझं यश,तुझी कीर्ती ऐकली तेव्हाच मला माझी गुरुदक्षिणा मिळाली बाळा.तुला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.”

   मुग्धाने सरांना हात धरून स्टेजवर आणलं. मुख्याध्यापकांना ती विनंती करणार होती की सत्कार तिचा नाही तर तिच्या श्रद्धास्थानाचा करावा,ज्यांच्यामुळे ती आज इथवर पोहोचली होती…….

©® सौ मधुर कुलकर्णी, पुणे.

=================

प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.

https://www.facebook.com/ritbhatmarati/

तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही

=============

हेही वाचा

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

Leave a Comment

error:

Warning

सध्या युट्युब वर कथा चोरी करून वाचून दाखवण्याचे धंदे चालू आहेत लोकांचे. आमच्या वेबसाईट वरची कथा कुठल्याही युट्युब चॅनेलवर बेकायदेशीररित्या आढळल्यास त्या चॅनेलला लगेच रिपोर्ट करण्यात येईल ह्याची कृपया दक्षता घ्यावी. तसेच आपल्या वाचकांपैकी कुणालाही असे बेकायदेशीर चॅनेल्स आढळल्यास आम्हाला ritbhatmarathi@gmail.com ह्या ई-मेल वर त्वरित कळवावे.