आपल्याला ज्ञान देणाऱ्या, जगण्याची नैतिक मूल्ये शिकवणाऱ्या गुरूंना मानवंदना देणाऱ्या या दिवसाचे महत्त्व जाणून घेऊया …..

guru purnima in marathi:
प्रत्येकाने आपापल्या आयुष्यात काहीना काहीतरी ज्ञान मिळवलेले असते. तसे पाहिले तर आपल्या प्रत्येकाची पहिली गुरू ही आपली आईच असते. कारण कळायला लागल्यापासून कसे बोलावे, कसे वागावे, मोठ्यांचा मान ठेवावा, शुभंकरोती असे पायाभूत संस्कार आईच आपल्या मुलांना देत असते. नंतर दुसरे गुरूचे स्थान मिळते ते आपल्या शिक्षकांना. शिक्षक विद्यार्थांना शैक्षणिक ज्ञान देतात त्यामुळे ते आपले दुसरे गुरू.
पण आयुष्य जगण्यासाठी केवळ शैक्षणिक ज्ञान असून चालत नाही. आपल्याला भौतिक, व्यावहारिक, तसेच जगण्यासाठी आवश्यक असलेले नैतिक मूल्ये पण शिकून घ्यावी लागतात आणि त्याप्रमाणे वागावे लागते. सगळ्याच गोष्टी शिकून घेताना आयुष्यात अनेक लोक भेटतात आणि काही लोक हे खऱ्या अर्थाने गुरू ठरतात.
आपल्याला कधी कोणती गोष्ट कोणाकडून शिकायला मिळेल सांगता येत नाही. छोटे मोठे रुसवे फुगवे सोडून देऊन पुढे कसे जायचे हे लहान मुलांकडे पाहिले की लक्षात येते. त्यामुळे ते पण आपल्याला काहीना काही शिकवून जातात. म्हणूनच आयुष्यात शिकवण देणारा प्रत्येक व्यक्ती हा आपला गुरु असतो.
ही गुरू शिष्य परंपरा परमेश्वराला ही चुकली नाही. इतकेच काय तर जगतगुरू म्हणून ओळखले जाणारे भगवान श्रीकृष्ण पण सांदीपनी ऋषींचे शिष्य राहिले आहेत. तशी ही परंपरा खूप जुनी आहे. पूर्वीच्या काळी जेंव्हा शिष्य शिक्षा प्राप्त करून घेत असत तेंव्हा त्या बदल्यात गुरूंना गुरुदक्षिणा .. देत असत.
गुरू शिष्याची ही परंपरा रामायण, महाभारतपासून चालत आलेली आहे. गुरू द्रोणाचार्य – एकलव्य, कृष्ण- अर्जुन, सांदिपनी ऋषी आणि भगवान कृष्ण, परशुराम – कर्ण अशा अनेक गुरू शिष्याच्या जोड्या आपल्याला पाहायला मिळतील. गुरू शिष्य परंपरा तेंव्हापासून आजपर्यंत तशीच चालू आहे. आताच्या काळातपण आपण आपल्या गुरूंना एखादी भेट देऊन त्यांचे आशीर्वाद घेतो आणि त्यांनी दिलेल्या ज्ञानाबद्दल आभार व्यक्त करतो. तो दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा.
गुरुपौर्णिमा हा हिंदू धर्मासाठी एका सणाप्रमाणे, उत्सवाप्रमाणे साजरा केला जातो. केवळ हिंदू धर्मात नाही तर जैन आणि बौध्द धर्मात पण आजकाल हे पर्व उत्सवाप्रमाणे साजरे होताना दिसून येत आहे. त्यामुळे हे आपल्यासाठी एक महत्त्वाचे पर्व आहे असे म्हणायला हरकत नाही. ही गुरुपौर्णिमा आषाढ शुध्द पौर्णिमेला साजरी केली जाते. यालाच व्यासपौर्णिमा असेही म्हणतात.
हेही वाचा
जाणून घ्या साई बाबा नेहमी पांढरेच कपडे का घालत?
पंचमहाभुतांचा तेजःपुंज अवतार असलेला कोल्हापूरचा ज्योतिबा माहिती आणि कथा
पण आपण गुरूपौर्णिमा का साजरी करतो ?? कोणत्या गुरुंमुळे याची सुरुवात झाली ?? आणि ते कोण होते ?? तर महाभारत सारखा धर्म, नीती,मानस आणि व्यवहारशास्त्र पूर्ण असलेला ग्रंथ लिहिणारे, पुराणे लीहणाऱ्या, ज्यांच्या इतके श्रेष्ठ गुरुजी आचार्य आजवर झाले नाहीत, ज्या आचार्यांना देवाप्रमाणे मानावे असे शास्त्रात सांगितले आहे, भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मुलाधार तसेच ज्ञानेश्वरी लिहणाऱ्या ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला ” व्यासांचा मागोवा घेतू” अशी केली आहे त्या ऋषींना म्हणजेच महर्षी “व्यास” याना हा दिवस वंदन करण्यासाठी साजरा केला जातो.
जाणून घेऊया कथा गुरुपौर्णिमेची
योगिक संस्कृतीमध्ये भगवान शंकराकडे देवता म्हणून नव्हे, तर आदियोगी म्हणून पाहिले जात होते. ही गोष्ट तशी हजारो वर्षे जुनी आहे. पंधरा हजार वर्षांहून अधिक काळापूर्वी एक योगी हिमालयातल्या उच्च प्रदेशांमध्ये अवतरला. त्याचे उगमस्थान किंवा त्याचा पूर्वेतिहास याविषयी कोणालाच कल्पना नव्हती. शिवाय, त्याने स्वतःची ओळखही करुन न दिल्याने त्याचे नावही अज्ञात राहिले. परिणामी त्याचा उल्लेख आदियोगी किंवा प्रथम योगी असा केला जातो.
त्याचं आगमन झालं, तो आसनस्थ झाला… तो शून्यावस्थेतच होता. त्याच्या डोळ्या मधून वाहणारे आनंदाचे अश्रू हीच त्याच्या जीवनाची एकमात्र खूण होती. याव्यतिरिक्त काहीच जाणवत नव्हतं, अगदी त्याचं श्वसन सुरू आहे की नाही, हेसुद्धा समजत नव्हतं. तो काही गूढ अनुभूती घेत असल्याचं तिथल्या लोकांना जाणवलं, ज्याची ते कल्पनाही करू शकत नव्हते. सगळंच अगम्य होतं. तेथे काही लोक आले, काही वेळ त्यांनी वाट पाहिली आणि शेवटी निघून गेले. कारण गूढ अनुभूतीत हरवलेल्या त्या योग्याला भोवतालाचे भान उरले नव्हते.
पण फक्त सात माणसे तेथे थांबली. या आदियोगीकडून ज्ञान ग्रहण करण्यासाठी ती सात माणसे हट्ट करत होती. पण आदियोगींनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. त्या सात जणांनी प्रार्थना केली, ”जे गुह्य ज्ञान आपल्याला प्राप्त झाले आहे, ते आम्हालाही प्राप्त करण्याची इच्छा आहे.” असे ते म्हणाले. त्यांची विनवणी धुडकावून लावत आदियोगी गरजले, ”मूढमतींनो, तुम्ही आज ज्या अवस्थेत आहात त्यावरून हे स्पष्ट होतं की लाखो वर्षांमध्येही तुम्हाला ज्ञानप्राप्ती अशक्य आहे. हे प्राप्त करण्यासाठी तुम्हाला कठोर तपस्या करण्याची आवश्यकता आहे. हा काही पोरखेळ किंवा मनोरंजन नव्हे.”
पण त्या सात जणांचा अट्टाहास इतका तीव्र होता की, आदियोगीने त्यांना काही पूर्वतयारीचे टप्पे सांगितले. दिवसांमागून दिवस गेले, महिन्यांमागून महिने सरले, वर्षांमागून वर्षे गेली… तरीही या सात जणांची तपस्या सुरूच होती. आदियोगींनी मात्र त्यांच्याकडे पाहिलेसुद्धा नाही. असं म्हणतात की, सात जणांची साधना जवळपास ८४ वर्षे अखंड सुरू होती.
८४ वर्षांनंतर एका पौर्णिमेच्या दिवशी सूर्य जेव्हा उत्तरेकडून दक्षिणेकडे भ्रमण करता होता, त्या दक्षिणायनाच्या आरंभी आदियोगींची कृपादृष्टी त्या सात साधकांवर पडली. आता ते आत्मज्ञानप्राप्तीसाठी पात्र झाले होते. या पात्रतेच्या तेजाने ते तळपत होते. आता ते खरंच पात्र बनले होते. आदियोगी आता त्यांच्याकडे दुर्लक्ष करूच शकत नव्हते.
आदियोगीने त्या सातही जणांना जवळून न्याहाळले आणि जेव्हा आकाशात पूर्ण चंद्र दिसला, त्या वेळी त्याने गुरूच्या भूमिकेत जायचे ठरवले. ती पूर्ण चंद्राची पौर्णिमा ‘गुरुपौर्णिमा’ म्हणून ओळखली जाते. पहिल्या योग्याचे रूपांतर आदिगुरूत होण्याची पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा. तो आदिगुरू दक्षिण दिशेला वळला आणि त्याने आपल्या सात शिष्यांना योगशास्त्राचे ज्ञान दिले. म्हणूनच तो ‘दक्षिणमूर्ती’ म्हणून प्रसिद्ध आहे. हीच ती दक्षिणायनातील पहिली पौर्णिमा… हीच ती गुरुपौर्णिमा, ज्या पौर्णिमेला आदिगुरूचा म्हणजेच ब्रह्माण्डातल्या प्रथम गुरूचा जन्म झाला.
या दिवशी ओम नमोस्तुते व्यास विशाल बुध्दे अशी प्रार्थना करून वंदन करण्याची पद्धत आहे. गुरुपौर्णिमा म्हणजे सद्गुरूंची पौर्णिमा मानली जाते. पौर्णिमा म्हणजे प्रकाश. गुरू शिष्याला ज्ञान देऊन प्रकाश देतात, त्यांचे जीवन योग्य मार्गावर आणतात. म्हणून ज्यांच्याकडून विद्या मिळवतो, ज्ञान मिळवतो त्यांना मान देण्याचा हा दिवस. हाच ज्ञानाचा प्रकाश आपल्यापर्यंत सदैव कोणत्या ना कोणत्या रूपात पोहाचावा म्हणून गुरूंची प्रार्थना करतो आपण या दिवशी.
तर तुम्हीही तुमच्या गुरूंना मानवंदना देऊन त्यांचे आभार मानत आशिर्वाद घ्या. त्यांचा आदर करा, मान ठेवा. तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!!
==========