गुढीपाडवा सणाची संपूर्ण माहिती आणि महत्व | Gudi Padwa Information in Marathi

१. गुढीपाडवा सणाची माहिती आणि महत्व
Gudi Padwa Information in Marathi : आपली भारतीय संस्कृती अनेक सण, समारंभ आणि उत्सावांनी भरलेली आहे. नुकताच हिवाळा संपला आहे वसंत ऋतूचे आगमन होणार आहे. हा येणारा वसंत ऋतू नवे सण घेऊन येतो. थोड्याच दिवसात होळी सुरू होईल. होळी म्हणजे रंगांची उधळण, प्रेमाचा वर्षाव आणि खूप दंगा मस्ती, धांडगधिंगा घालणारा सण. हा सण संपतो ना संपतो तोच चैत्र महिना येतो आहे. या महिन्यात चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा करण्यात येणारा मराठी माणसांच्या नववर्षाचा सण म्हणजेच “गुढी पाडवा” येत आहे.
१.१. गुढीपाडवा सणाचे महत्व
गुढी पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त असणारा सण आहे. त्यामुळेच त्याचे खूप महत्त्व आहे. आपल्या भारतीय संस्कृतीतील अतिशय महत्त्वाचे मानल्या जाणाऱ्या सणापैकी असणारा तो एक सण आहे. तसे तर सगळेच सण उत्सव खूप महत्त्वाचे आहेत आणि त्यामागे काही खास कारणे सुद्धा आहेत. पण त्यातही ज्या सणाना खूप उच्च दर्जाचे स्थान मिळाले त्यातील एक सण म्हणजे गुढी पाडवा.
दसरा, गुढीपाडवा, अक्षयतृतीया हे तीन मुहूर्त आणि दिवाळीच्या पाडव्याचा म्हणजेच कार्तिक शुद्ध प्रतिपदाचा पाडवा हा अर्धा मुहूर्त असे साडेतीन मुहूर्त आहेत. यांनाच साडेतीन मुहूर्त का मानले गेले आहे, तर त्याचे कारण असे की कोणत्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात या दिवशी करण्यात येते. आणि अनेक दांतकथे नुसार या दिवशी वाईटातून चांगले निष्पन्न झाले. वाईटचा शेवट, असत्त्याची हार तर सत्याचा विजय झाला आणि जगण्याची नवी सकारात्मक ऊर्जा या दिवशी मिळाली म्हणून आपण कोणतेही उत्तम काम जे आपल्या आयुष्याला नवी दिशा देते, वळण देते त्या सगळ्या गोष्टींची सुरुवात या मुहूर्तावर करतो. म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीत या दिवसांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
पाडवा म्हणजे मांगल्याचा,चैतन्याचा उत्साहाचा सण. पाडवा म्हणजे मराठी नववर्षाचा पहिला दिवस. चैत्र महिन्या पासूनच शेतात धान्य पिकायला सुरुवात होते. म्हणूनच हा शेतकऱ्यांचा सण आहे असे मानले जाते.
१.२. गुढीपाडवा का साजरा करतात
१. कुरुक्षेत्रवर पांडव कौरवांचा पराभव करून युद्ध जिंकून आले तेंव्हा हस्तीनापुरात गुढ्या उभारुन पांडवांचे स्वागत केले.
२. छत्रपती शिवाजी महाराज जेंव्हा उत्तरेकडील रायगडावर गगभट्टाच्या उपस्थितीत शिवराज्याभिषेक करून राजसिंहासनावर आरूढ झाले होते तेंव्हा जनतेने शिवाजी महाराजांच्या स्वागतासाठी गुढ्या उभारुन, तोरणे बांधून सोहळा साजरा केला होता.
३. शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शकांचा पराभव करण्यासाठी सहा हजार मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले आणि त्यात प्राण घालून त्यांच्या साहाय्याने शकाचा पराभव केला तो दिवस होता चैत्र शुद्ध प्रतिपदा. अशी आख्यायिका आहे आणि यांच्याच नावाने कॅलेंडरमध्ये शालिवाहन शक चालू झाला.
तर आजकालच्या युगात सुद्धा अनेक अशी कारणे आहेत ज्यामुळे आपण गुढी पाडवा साजरा करतो.
४. आपल्या भारत देशात दीडशे वर्षे राज्य करणारे इंग्रज जेंव्हा आपला भारत देश सोडून गेले आणि आपल्या देशाला मुक्ती मिळाली त्यावेळीही संपूर्ण देशात फटाक्यांच्या रोषणाईने, वाद्यांच्या गजरात आणि दाराला गुढी उभारून, तोरणे बांधून जल्लोष साजरा करण्यात आला.
५. गावातील सुधारणा व्हावी, गाव स्वच्छ असावे म्हणून शासनाने ग्राम स्वच्छता, आदर्श गावाच्या संकल्पना रूजवल्या आहेत अशावेळी प्रशासन गावाची पाहणी करायला येतात, तेंव्हाही त्याचे स्वागत करण्यासाठी अतिथी देवो भव ही संस्कृती जपण्यासाठी दारात गुढ्या उभारुन त्यांचे स्वागत केले जाते.
६. इतकेच नव्हे तर मुलांना शाळेत घालण्यासाठी हाच पाडव्याचा मुहूर्त निवडला जातो.
७. ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती याच दिवशी केली.
असे एक ना अनेक कारणे आहेत गुढी पाडवा साजरा करण्यामागे. ही सगळी करणे बघून एक गोष्ट लक्षात येते आणि ती म्हणजे जेंव्हा जेंव्हा वाईटातून चांगले निर्माण झाले, असत्यावर सत्याचा विजय झाला तो साजरा होणारा दिवस म्हणजे गुढी पाडवा.
म्हणूनच आपण सगळ्याच चांगल्या कामाची सुरुवात या मुहूर्तावर करण्याचा प्रयत्न करतो. जसे की एखादे नवीन वाहन घेणे, व्यवसायाची सुरुवात, सोने खरेदी, चांगल्या संकल्पाची किंवा उपक्रमाची सुरुवात. असे कोणतेही विशेष महत्त्व असणारे काम आपण याच दिवशी करतो. त्यामुळेच गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. याच दिवसापासून राम जन्मोत्सव सुरू होतो.
१.३. गुढीपाडवा पूजा विधी
गुढी पाडवा हा हिंदू दिनदर्शिकप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो. हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस. तर वेदांग जोतिष ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक आहे.
गुढी कशी सजवतात :
या दिवशी गुढीची विधिवत पूजा केली जाते. महाभारताच्या आदी पर्वात उपरीचर राजाने स्वर्गदेव इंद्र राजाने त्याला दिलेली कळकाची काठी इंद्रदेवच्या आदरार्थ जमिनीत रोवली आणि त्याच्या दिवशी म्हणजेच नववर्ष प्रारंभीच्या दिवशी त्याची पूजा केली. म्हणूनच पाडव्या दिवशी गुढीची पूजा केली जाते. गुढी या शब्दाचा अर्थ तेलगू भाषेत लाकूड किंवा काठी तसेच तोरण असाही आहे.
या दिवशी सकाळी ब्रह्म मुहूर्तावर वेळूची काठी स्वच्छ धुतली जाते. एखादे नवे वस्त्र काठीच्या टोकाला अडकवून, साखरेचा हार ( घाटी) , फुलांचा हार आणि कडुनिंबाची डहाळी हे सर्व एकत्र बांधून त्यावर तांब्याचे भांडे उलटे ठेवले जाते. ही मांगल्याची गुढी घराच्या प्रवेश द्वारावर किंवा खिडकीत किंवा गॅलरीत सर्वांना दिसेल अशा दृष्टीने उभी केली जाते. नंतर घरातील सुवासिनी बायका गंध, फुल, अक्षता, हळदी, कुंकू लावून धूप, दीप दाखवून आरती करतात. गुढीच्या पाया पडून सुख आणि मांगल्याचा आशीर्वाद घेतला जातो. दारात सजावटीसाठी फुलांचे तोरण बांधले जाते.
या दिवशी कडुनिंबाचा पाला, हरभऱ्याची डाळ आणि गूळ एकत्र करून घरातील सर्वच मोठी मंडळी खातात. चांगले आरोग्य लाभो आणि उन्हाळ्यातील रोगापासून मुक्ती मिळो हा यामागील मुख्य हेतू असतो.
हेही वाचा
अक्षय तृतीया बद्दल माहिती आणि महत्व
भारतातील काही व्रत वैकल्पे आणि सण २०२२ यादी
१.४. भारतात इतर राज्यात गुढीपाडवा कसा साजरा करतात
हा दिवस कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात गौतमी पुत्राची सत्ता असलेल्या राज्यात स्वातंत्र्य प्राप्तीचा आनंद झाल्याने विजयदिन म्हणून संवत्सर पाडवा किंवा उगादीं अशा नावांनी साजरा केला जातो. सिंधी लोक चेटीचांड नावाने ओळखतात.
१.५. २०२२ गुढीपाडवा तारीख आणि मुहूर्त
येत्या २०२२ मध्ये पाडवा शनिवार दि. २ एप्रिलला साजरा करण्यात येणार आहे. चला तर मग तयारी करा आणि आनंदाने गुढी उभी करा. तुम्हा सर्वांना पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा!!!
===================