गुढी..समाधानाची

©️®️सायली
क्षिती आणि आशिषने आपल्या नव्या घरी गुढी पाडवा साजरा करायचे ठरवले. नव्या फ्लॅटची किल्ली नुकतीच त्यांच्या हातात आली होती. पाडव्याला अजून महिना बाकी होता. ‘तोपर्यंत फ्लॅटची उरलेली बारीक -सारीक कामे होऊन जातील आणि आपण सामानाची बांधाबांध करून निवांत शिफ्ट होऊ’ असा विचार करून दोघांनी गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर गृहप्रवेश करण्याचे ठरवले.
मात्र आशिष आणि क्षितीचा हा निर्णय ऐकून मालती काकू आणि दामोदरपंतांना म्हणजेच आशिषच्या आई -वडिलांना धक्का बसला आणि ते नाराज झाले.
ही नाराजी चेहेऱ्यावर न दाखवता त्यांच्या कृतीत दिसून आली. आता क्षितिशी असणारी त्यांची वागणूक कमालीची सुधारली. एरवी क्षितीला उठसूठ टोमणे मारणाऱ्या मालतीकाकू गप्प गप्प राहू लागल्या आणि आपल्या सुनेला किंमत न देणारे पंत तिला आपल्या मुलीचा मान देऊ लागले.
हे सारे पाहून क्षिती आणि आशिष दोघांनाही आश्चर्य वाटले खरे, पण वेगळे राहण्याचा आपला निर्णय त्यांनी अजिबात बदलाला नाही. ‘न जाणो मालती काकू आणि पंत पुन्हा पहिल्यासारखे वागले तर?’
क्षिती लग्न होऊन जोगांच्या घरी आली, पण मालतीकाकूंना तिचे वागणे -बोलणे काही रुचत नव्हते. “मी म्हणेन तेच खरे” असा स्वभाव असणाऱ्या मालतीकाकू नव्या सुनेच्या आगमनाने अस्वस्थ झाल्या. तिचे होणारे कौतुक पाहून तिच्यावर नाराज होऊ लागल्या. ती काम करायला उभी राहिली की, तिच्या कामात सारख्या चुका काढत होत्या.
“आमच्याकडे हे असे चालत नाही बाई, तुमचे तुम्हाला काय हवे ते करा.” असे सतत म्हणू लागल्या. हे पाहून पंतांचा असा समज झाला की आपली सून आगाऊ आहे! मग ते ही क्षितीशी अंतर ठेऊन वागू लागले.
वारंवार टोचून बोलण्याने क्षिती हैराण झाली, हिरमुसली. यामुळे दुखावलेल्या क्षितीने आशिषकडे वेगळं राहण्याचा हट्ट धरला.
आशिषनेही आई- वडिलांची बदललेली वागणूक अनुभवली होती. एक शेवटचा प्रयत्न म्हणून त्याने दोघांना समजावूनही पाहिले. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. त्यामुळे तो ही वेगळे राहण्यासाठी तयार झाला.
क्षिती आणि आशिष दोघांच्याही नोकऱ्या चांगल्या असल्याने काही दिवसांतच लोन काढून राहत्या घरापासून जवळच असलेल्या अपार्टमेंटमध्ये त्यांनी फ्लॅट खरेदी केला. जेव्हा फ्लॅटचे काम पूर्ण होत आले, तेव्हा ही गोष्ट आशिषने आई -वडिलांच्या कानावर घातली.
हे ऐकून मालती काकू आणि पंत नाराज झाले, मुले आपल्याला सोडून जाणार म्हणून. त्यांना आता आपल्या वागणुकीचा पश्च्याताप होऊ लागला. एरवी मोजकेच बोलणाऱ्या काकू आता क्षितीला विचारात घेऊन घरच्या साऱ्या गोष्टी करू लागल्या. तिला मान देऊ लागल्या.
क्षिती आणि आशिषला हे जाणवत होते पण आता क्षितीची इच्छा नव्हती, इथे राहण्याची.
ठरल्याप्रमाणे यंदाची गुढी नव्या घरी उभारण्यात आली. क्षिती आपल्या हक्काच्या घरात सहजपणे, आत्मविश्वासाने वावरत होती. आलेल्या पाहुण्यांना काय हवे, काय नको हे जातीने पाहत होती. किती खुश दिसत होती ती! मालतीकाकू क्षितीला न्याहाळत होत्या तर पंत एका कोपऱ्यात बसून शांतपणे सारे काही पाहत होते.
“चुकलंच आपलं. आपली सून लाखात एक आहे. आपण तिच्यावर ना कधी विश्वास ठेवला, ना कसले अधिकार दिले तिला. हे घरही किती छान सजवले आहे तिने! अगदी मोजकेच सामान, पण किती नीटनेटके लावले आहे आणि दहा -बारा माणसांचा स्वयंपाक तिने एकटीने पहाटे उठून बनवला. आपल्याकडून मदतीची अपेक्षा न ठेवता.
पण आता ही पोरं नाहीत घरात म्हंटल्यावर आपलं घर खायला उठेल. या विचाराने मालतीकाकूंच्या अंगावर काटा आला. इतके दिवस गृहीत धरले आपण सुनेला. वाटलं आपल्या मनाप्रमाणे वागेल ती. पण तिलाही मन आहे हे विसरूनच गेले मी. पण आता आपले मार्ग निराळे झाले.” या विचाराने मालतीकाकूंच्या डोळ्यात पाणी आले.
जेवणं झाली. पाहुणे मंडळी गेली. तशा मालती काकू आणि पंतही आपल्या घरी जायला निघाले. भरल्या डोळ्यांनी मालतीकाकुंनी सारं घर पाहून घेतलं आणि दाराबाहेर पाऊल टाकणार इतक्यात क्षितीच्या आवाजाने त्या दारातच थांबल्या.
“आई.. निरोप न घेताच निघालात! तुमच्या मनातील चलबिचल तुमच्या मुलाला आणि सुनेला समजणार नाही काय? आणि आम्हालाही करमणार नाही हो तुमच्याशिवाय इथे.
झालं गेलं विसरून जावू आणि सोबतीने राहू.
तुम्ही दोघेही आमच्यासोबत राहायला येताय इथे,अगदी आजच. हे ही घर तुमचेच आहे. आमचा जितका हक्क तितकाच तुमचाही या घरावर आहे आई.” क्षिती मालतीकाकूंच्या जवळ जात म्हणाली.
“बाबा. घरी जाऊन जरुरी पुरते सामान बांधून ठेवा. इथली आवरा-आवर झाली की, मी न्यायला येईन संध्याकाळी. आशिष पंतांना म्हणाला.”
“हे इतके म्हणालात त्याहून नव्या वर्षांची भेट आणखी काय असू शकते? माझ्या मनावरचे दडपण उतरले गं. अगं कष्टानं तुम्ही दोघांनी हे घर उभारले. आमची काडीचीही मदत नाही झाली तुम्हाला. तुम्ही दोघेच इथे आनंदाने रहा.
तुमच्या नव्या संसारात आता आमची लुडबुड नको. आम्ही येत जाऊ अधून -मधून इथे राहायला आणि तुम्हीही हक्काने आपल्या जुन्या घरी येत जा नेहेमी.
खरचं माफ कर क्षिती, सुनेला माया द्यायची सोडून आम्ही अविश्वास दाखवला तुझ्यावर. ना कधी तुला समजून घेतले, ना कधी विश्वास ठेवला तुझ्यावर.”
इतके बोलून मालतीकाकुंच्या डोळ्यातून अश्रू ओघळले.
“आई झाले गेले विसरून पुन्हा नव्याने सुरुवात करू.” क्षितीही आपले डोळे पुसत म्हणाली.
तसे पंत क्षितीच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवत म्हणाले, “तुम्ही पोरं वेगळी राहणार असा विचारच कधी केला नाही आम्ही. आम्हाला हवे तसे वागत गेलो, आमच्या अपेक्षा तुमच्यावर लादत गेलो. आता आम्ही अजून धडधाकट आहोत, तोवर मस्त एन्जॉय करा. आम्ही थकलो म्हणजे तुमच्यावरच सारी जबाबदारी आहे.
ते काय म्हणतात आजच्या काळात? स..स्पेस.. ती देऊ एकमेकांना. काय? हे आधीच कळायला हवे होते आम्हाला, आता तुम्ही दूर गेल्यावर उपरती होऊन काय उपयोग?”
पंत मालतीकाकुंकडे पाहत म्हणाले.
तसा आशिष पंतांच्या मिठीत शिरला.
“बाबा”..
आता आमची काळजी करू नका. अरे नवा संसार मस्त एंज्योय करा आणि काही लागलं तर आम्ही दोघे आहोतच की. कधीही हक्काने या, जे हवे ते मागा. इतके बोलून मालती काकू आणि दामोदरपंत दोघेही उभारलेल्या गुढीला मनोभावे नमस्कार करून तेथून आनंदी मनाने बाहेर पडले. आता समाधानाची गुढी सर्वांच्याच मनात उभी राहिली होती, अगदी कायमची.
================