Skip to content Skip to sidebar Skip to footer

गृहिणीचे स्वप्न

संध्याकाळचे साडेपाच वाजले होते. दारावरची बेल वाजली. आरशासमोर उभ्या असलेल्या मंजूने एकवार स्वतःकडे नीट पाहिले. सुशांत यायच्या वेळेला ती रोज तयार होऊन त्याच्या समोर उभी असे. लग्न झाल्यानंतर तिच्या आईने तिला सांगितले होते,

” नवरा कामावरून आला की बायकोचं देखणं आणि प्रसन्न रूप दिसायला हवं. दिवसभराचा त्याचा ताण जरा कमी होतो.” लग्नाच्या पाच वर्षानंतरही मंजू न चुकता हे करत होती. तिने दार उघडले. मंजूच्या हातात बॅग देत सुशांत म्हणाला,” चहा टाक. मी आलो फ्रेश होऊन.” जिना चढत चढत त्याने विचारले,” जुई कुठे आहे”.

” ती ट्युशनला गेली आहे.” आणि ती त्याच्या एका नजरेसाठी तिथेच खिळून राहिली काही क्षण. पण तो केव्हाच खोलीत गेला होता. हे असं रोज व्हायचं. पण मंजू मात्र तशीच तयार व्हायची. मंजुने बॅग सोफ्यावर ठेवली आणि किचन मध्ये चहा बनवायला गेली.

पातेल्यात कपभर पाण्यात चहापावडर आणि चमचाभर साखर टाकून, खिसलेले आलं टाकून ती पाण्याला उकळी यायची वाट बघत उभी होती. दुपारी वाचता वाचता तसेच किचनच्या खिडकीत विसरलेल्या पुस्तकाकडे तिचे लक्ष गेले. ती दुरूनच त्या पुस्तकाकडे बघत होती.

” मंजू, तुझा आवाज किती गोड आहे ग. तू कविता वाचतेस तेव्हा ऐकतच राहावं वाटत.”

ती लाजली. ” सुशांत, लग्नानंतर मी रेडिओवर कार्यक्रम करेन असा विचार करतेय.” जरा दबक्या आवाजात ती म्हणाली.
” बिनदास्त कर. कोणतीही कला बंद ठेऊ नये मंजू. अजून एक कविता वाचून दाखव ना.” सुशांत लडिवाळपणे म्हणाला.
मंजूने डायरीचं पान उलटले आणि वाचू लागली,

” एक छोटंसं स्वप्न,
मनाच्या एका कुपीत बंद आहे
वहीच्या कागदावर मौन आहे
या स्वप्नवेडीला सख्या, तुझा आधार आहे
तुझ्या स्वप्नांत मावेल ना रे, माझं
एक छोटंसं स्वप्न…”

” मंजू, अग मंजू.” हॉलमधून सुशांत तिला आवाज देत होता. पण कानांवर बाहेरचे आवाज पडावेत, यासाठी बाह्यजगात असावे लागते. ती तर अंतर्मनात सलणाऱ्या भूतकाळाच्या आठवणीत गेली होती. ती सल तिला अजूनही टोचत होती. मंद आचेवर ठेवलेला चहा आटून गेला होता. करपलेल्या पातेल्याचा करपट वास झर्कन तिच्या नाकात गेला आणि ती भानावर आली. दुखरी सल मनात वर्षानुवर्षे असली की खऱ्या आयुष्यातही ते अदृश्य दुःख घेऊन वावरावे लागते, नाईलाजाने, मौन पांघरूण.

मंजूने चहाचे दुसरे पातेले गॅसवर चढवले. सुशांतच्या हाकेला ओ देत मंजू म्हणाली, ” पाच मिनिट, आणते चहा.”

” लक्ष कुठे असते ग तुझे. कितीवेळ झालं आवाज देतोय तुला. दिवसभर घरात बसून तुझं डोकं चालेना वाटत. जरा भानावर राहत जा.” सुशांत बडबड करत असताना मंजू चहा घेऊन आली. चहाचा एक घोट घेत सुशांत शांत झाला.

” तुझ्यासारखा चहा कुणी बनवूच शकत नाही.”

मंजू औपचारिकतेने हसली. आणि चहाचा एक घोट घेत दिवसभर वाचून चुरगळलेल्या पेपरची घडी करू लागली.
त्या पेपरच्या कोपऱ्यातल्या रिकाम्या जागेवर मंजूने लिहिलेल्या कवितेवर सुशांतचे लक्ष गेले.

” मंजू, अजूनही तू लिहितेस?”
एकाच घरात राहून आपल्याच नवऱ्याला आपल्याबद्दल काही माहीत नाही म्हणून तिला वाईट वाटले होते.

” कधीतरी, सुचले की लिहिते.” तिने उदासीनतेने उत्तर दिले.

” पूर्वीसारखं आता लिहिता येत नसेल ना. तेव्हा तुझं वय आयुष्याच्या एका छान वळवणाचा अनुभव घेत होते. आता संसार म्हटलं की विचारांना तितकीशी गती नसेल भेटत.” सुशांतच्या या बोलण्यावर मंजू कुत्सितपणे हसली.

” काल्पनिक लिखाणाच्या प्रेमात पडणं सोपं असते. खरे बोल टोचतात, सुशांत.” डोळ्यांत आलेलं पाणी त्याच्या नकळत पुसत मंजू पुढे म्हणाली,

” मघाशी म्हणाला होतास ना , ” तुझं लक्ष कुठं असतं. सुशांत, माझं लक्ष या संसारातच आहे. पण खरं तर, तुझं लक्ष कुठेच नसते. या पेपरवरच्या चारोळ्या बघून तुला माझं लिखाण आठवलं. तू हे विसरलास हेच माझ्यासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे.”

तेवढ्यात जुई बाहेर चप्पल काढत आनंदात” आई, आई” म्हणत त्यांच्याजवळ आली.

” आई, तू लिहिलेली कविता सरांना खूपच आवडली.” सातवीत शिकणारी जुई आनंदाने आईच्या कुशीत शिरत म्हणाली.
” बाबा, तुम्हाला वाचून दाखवू आईने लिहिलेली कविता?.” दप्तरातून वही काढत जुई म्हणाली. सुशांतने होकारार्थी मान हलवली आणि मंजू वाचू लागली.

” एक छोटंसं स्वप्न…
लग्नानंतर सुखी संसाराच स्वप्न
उरी घेऊन जगताना, बळ एकवटाव लागतं…
नवरा, मुलं, नातीगोती साऱ्यांनाच
सोबत घेऊन जगावं लागत…
काही कमी जास्त झाले की
मौन धरून बोल ऐकावे लागतात…
या सगळ्यातून मिळाला जरी क्षणभर वेळ
स्वतःच्या स्वप्नांना मनातच जगावं लागतं…
अवघड होतं सारं, जेव्हा एक छोटंसं स्वप्न
आपल्याच घरात मावेनासं होतं…
तरी मी जपत राहते,
मनाच्या एका बंद कोपऱ्यात
गृहिणीचे एक छोटंसं स्वप्न….”

” बाबा, या आधीच्या आईच्या कविता सगळ्यांना खूप आवडल्या. आणि माहितेय का, आज सर काय म्हणाले.

” काय म्हणाले जुई.” सुशांतने विचारले.

म्हणाले की,” तुझ्या आईला रेडिओवर काम करायला आवडेल का? आई तू हो म्हण. म्हणजे सगळ्यांना कळेल की माझी आई खूप छान कविता करते. किती छान ना बाबा.” जुई बोलत होती आणि सुशांत मंजूकडे अपराधी पण तितक्याच आनंदाच्या नजरेने बघत होता.


– डॉ अश्विनी राऊत

=====================

तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही.

=============

नमस्कार वाचकहो🙏🙏,

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आवड असूनही आपले छंद आपल्याला जोपासता येत नाही. आवड असूनही पुस्तकं वाचता येत नाही. त्यामुळे वेळेअभावी आपल्यासारखे खूप सारे वाचक वाचनापासून वंचित राहतात. आणि म्हणूनच वाचकांना कुठेही सहज वाचता येतील असा कथासंग्रह आम्ही रीतभातमराठी ह्या डिजिटल व्यासपीठावर घेऊन आलो आहोत.

उत्कृष्ट लेखकांनी लिहिलेल्या marathi katha, marathi moral story, marathi stories, marathi short stories, bodh katha marathi मध्ये आपल्याला रीतभातमराठीवर वाचायला मिळतील.

Leave a Comment

error: