ग्रँड पेरेन्ट्स डे

©® सौ मधुर सुनील कुलकर्णी
शशीताईंना रोजच्या सारखीच पहाटे पाचला जाग आली.कोकिळेचा रियाज अगदी जोरजोरात सुरू होता.खरं तर त्यानेच जाग यायची.रात्री वयोमानानुसार लवकर झोप लागत नसे, त्यामुळे पहाटे गाढ झोप लागायची.पण झोपही सावध, त्यामुळे पाखरांचा गलबला सुरू झाला की जाग यायचीच. त्यांनी कराग्रे वसती लक्ष्मी…म्हटलं आणि त्यांना एक सुगंधित झुळूक स्पर्शून गेली.हा तर चंदनाच्या उदबत्तीचा वास.पण इतक्या सकाळी कोण पूजा करतंय?ते काम तर माझंच आहे.त्या कॉटवरून उतरल्या.टेबलवर त्यांना चार उदबत्त्या जळताना दिसल्या.
स्वयंपाकघरात आल्यावर त्यांना लाईट दिसला.त्यांना जरा आश्चर्यच वाटलं.मुलगा,सून सहा शिवाय उठत नसत.आणि नातु.. सुमीत, त्याची सकाळ तर आठ शिवाय होत नसे.त्या आत आल्या आणि टेबल वर त्यांना सुमीत दिसला.
“काय रे,आज परिक्षा आहे की काय तुझी? इतक्या पहाटे उठलास ते.” शशीताईंनी सुमीतला विचारलं.
“नाही ग आजी,तु बस.आज स्पेशल दिवस आहे.” सुमीतने आजीला हात धरून खुर्चीत बसवलं.
“आता आज कुठला? तुमचे मेले सारखे कुठले तरी डे सुरूच असतात.”
“आज ‘ग्रँड पेरेन्ट्स डे’ आहे आजी.”
“हा नवीन सुरू झालाय का रे?आत्तापर्यंत कधी ऐकला नाही.” शशीताई हसत म्हणाल्या.
“आजी, ‘ग्रँड पेरेन्ट्स डे’ पण असतो पण त्याला कुणी फारसं महत्व देत नाही.मी मागच्या महिन्यात गुगल वर सर्च केलं तर आजच ‘ग्रँड पेरेन्ट्स डे’ आहे. मग मी ठरवलं,आज तुला आराम आणि आनंद द्यायचा.” सुमीतने त्यांचा हात हातात धरला.
“अरे,मला आरामच आहे.दिशा कुठलंही काम करू देत नाही.आणि तुम्ही तिघेही माझ्या अवतीभवती असता, ह्यापेक्षा दुसरा आनंद कुठला रे?” शशीताई समाधानाने म्हणाल्या.
“पण आजी,आज मी जे सांगेन ते तुला ऐकावंच लागेल.आज मी आणि आई तुझ्या आवडीचा मेनू करणार आहे.पुरी,बासुंदी,उकडलेल्या बटाट्याची भाजी,खमंग काकडी,पापड,कुरडई…”
“अरे बस बस,मला म्हातारीला इतकं सगळं पचणार आहे का?” शशीताई हसत म्हणाल्या.
“आज खावं लागेल तुला आजी.”
“बरं राजा,तू म्हणशील तसं.”शशीताई हसत म्हणाल्या.
त्यांनी सुमीतकडे बघितलं.चांगला उंचापुरा, राजबिंडा दिसत होता.थेट आपल्या आजोबांवर गेला होता.
शशीताईंचे यजमान सुहास असेच देखणे होते.शशीताई आणि त्यांची नाटकाच्या तालमी दरम्यान ओळख झाली.हौस म्हणून त्या कॉलेजच्या एकांकिका स्पर्धेत नाटकात काम करत होत्या.तिथेच सुहास बर्वेची ओळख झाली.
तो देखील एका महत्वाच्या भूमिकेत होता.
———————————————–
सुहासला मोहक शशी आवडली आणि त्याने लग्नाचीच मागणी घातली.दोन्ही कुटुंबातील व्यक्तींनी आनंदाने होकार दिला पण शशीच्या वडिलांची एकच अट होती,मुलगा कमवायला लागल्याशिवाय लग्न करायचं नाही.सुहासने ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि एका छोट्या कंपनीत ज्युनिअर मॅनेजर म्हणून रुजू झाला.त्याला नाटकाचं प्रचंड वेड होतं.तो छंद त्याला नोकरी करून जोपासायचा होता.शशीच्या वडिलांची अट पूर्ण केल्यामुळे त्यांनी विवाहाला संमती दिली.
सुहासच्या नाटकाच्या वेडामुळे सुट्ट्या फार होऊ लागल्या.प्रायव्हेट कंपनीमध्ये सुट्ट्या जास्त मिळत नसल्यामुळे बिनपगारी रजा होऊ लागल्या.सुहासने नोकरी सोडून व्यावसायिक नाटकं सुरू करण्याचा निर्णय घेतला.त्यातून पैसा मिळेल आणि आपली आवड जोपासल्या जाईल, हा त्याचा विचार होता.शशीला हे मुळीच पटलं नव्हतं. त्यावरून दोघांचे वादही झाले पण सुहासने ठरवलंच होतं.
व्यावसायिक नाटकात जम बसायला सुहासला जरा वेळ लागला,पण आता बऱ्यापैकी पैसा मिळू लागला. प्रयागचा जन्म झाला आणि सुहासला खूपच चांगल्या ऑफर्स येऊ लागल्या.सुहासने वन बेडरूमचा फ्लॅट विकत घेतला.मुंबईत नाटकाचे प्रयोग जास्त होत,त्यामुळे त्याच्या सतत पुणे-मुंबई वाऱ्या होऊ लागल्या.
एक दिवस अचानक प्रयोग सुरू असतानाच सुहासला अंधुक दिसायला लागलं. तो प्रयोग त्याने कसाबसा पार पाडला.दुसऱ्या दिवशी लगेच आय स्पेशालिस्टला दाखवलं.स्टेजवर सतत प्रखर दिव्यांमुळे डोळ्यावर परिणाम झाला होता. अशा परिस्थितीत सुहासला नाटकात काम करणं बंदच करावं लागलं.दुसरीकडे नोकरीचे प्रयत्न केले पण आधीचा अनुभव कमी,वय वाढलेलं,शिवाय डोळ्यांचा प्रॉब्लेम होताच.प्रयाग नुकताच हायस्कूलला गेला होता.शशी निराश झाली.जमवलेली पुंजी संपत आली होती.तिचं शिक्षण फक्त ग्रॅज्युएशन.कुठलाही कोर्स तिने केला नव्हता.नोकरीसाठी अथक प्रयत्न करून अपयश येत होतं.
एक दिवस शशीने पेपरमधे जाहिरात वाचली.एका कंपनीत पॅकिंगसाठी महिला हव्यात.प्रत्यक्ष भेटा असं लिहिलं होतं.आज इथे प्रयत्न करून बघू असं तिला वाटलं.ती तयार होऊन निघणार इतक्यात शेजारची शामल आली.आल्याबरोबर तिने रडायलाच सुरवात केली.
“शामल, काय झालं?अशी का रडते आहेस?”शशीने काळजीने विचारलं.
“शशी,बाबांना सिव्हीअर हार्ट अटॅक आलाय,सिरीयस आहेत.मला जायला हवं.तु प्लिज तनयला शाळेतून घेऊन येशील का?आणि तुझ्याचकडेच त्याला ठेव.तिथली परिस्थिती बघून मी तुला फोन करते.तो फार लहान आहे ग.तिकडे नेलं तर तो बावरून जाईल.”
“इतकंच ना?अग, नको काळजी करुस.मी सांभाळेन तनयला.तो माझ्याजवळ छान राहिल.त्याला माझी सवय आहे.आणि प्रयाग आहेच त्याला खेळवायला.तू निश्चिन्तपणे जा.मी आणते त्याला शाळेतून.”
“थँक्स शशी.” शामल धावतच घराकडे वळली.
शाळेतून तनयला शशीने घरी आणलं.खाउपिऊ घातलं.त्याला खेळवलं. रात्री बारा वाजता शामलचा फोन आला.तिचे बाबा आयसीयूमध्ये आहेत पण धोका टळलाय.तासाभरात ती पोहोचतेय.
तनयने दिवसभर अजिबात त्रास दिला.एकदा फक्त आईची आठवण काढून हिरमुसला होता. पण तेवढ्यापुरतं.झोपलाही शांतपणे. त्याच्या झोपलेल्या निरागस चेहऱ्याकडे बघून शशीच्या मनात विचार आला,मी पाळणाघर सुरू केलं तर?
दुसऱ्या दिवशी तिने सुहासजवळ विषय काढला.
“शशी,पाळणाघर चालवणं इतकं सोपं नाहीय.तू अडकून पडशील.आणि प्रत्येक मूल तनयसारखं शांत थोडीच असतं.” सुहासने शंका काढली.
“अहो, पण काहीतरी मार्ग काढायलाच हवा न.माझं शिक्षण पुरेसे नाही.नोकरीसाठी कमी प्रयत्न केले का मी?मला हा मार्ग योग्य वाटतो.आणि पैशांची आपल्याला आता गरज आहे.प्रयागचं शिक्षण,त्याची स्वप्न कोण पूर्ण करणार? आपली वडिलोपार्जित इस्टेटही काही नाही. आता दुसरा पर्याय नाही.”शशीने विषयच संपवला.
शशीने तिच्या सगळ्या मैत्रिणींना सांगितले,ती पाळणाघर सुरू करतेय, तुमच्या माहितीतल्या सर्वांना सांगा.
दुसऱ्याच दिवशी शशीला सौ साखरेंचा फोन आला.त्यांची प्रेग्नन्सी लिव्ह संपली होती आणि त्यांना जॉईन व्हायचं होतं. त्यांच्या तीन महिन्यांच्या मुलाला सांभाळाल का विचारण्यासाठी फोन केला.शशीने ताबडतोब होकार दिला.
बघता बघता मुलांची संख्या वाढत गेली.शशीच्या प्रेमळ स्वभावामुळे मुलं चार दिवसातच पाळणाघरात रुळायची.विस्कटलेली आर्थिक घडी नीट बसली.प्रयाग इंजिनिअर झाला.दिशासारखी सुविद्य,हसतमुख सून घरात आली.ती बॅंकेत जॉब करत होती.
प्रयागने शशीताईंना एक दिवस सांगितलं,”आई,तू खूप कष्ट केले.आता पाळणाघर बंद कर.आता आपल्याजवळ सुखाने राहता येईल इतका पैसा नक्कीच आहे.”
“हो आई,आता तुम्ही आराम करा.हवं तर सगळ्या कामाला बायका ठेवू.” दिशाने प्रयागच्या म्हणण्याला दुजोरा दिला.
“नको ग,मला पण थोडी हालचाल हवीच. काम करत राहिलं की मनाला उभारी येते. ” शशीताई म्हणाल्या.
सुमीतचा जन्म झाला आणि दिशा जॉईन झाल्यावर शशीताईंनीच त्याला सांभाळलं. परक्यांचा मुलांवर मायेची पाखर घातली होती,ही तर दुधावरची साय होती.समाधानात दिवस चालले होते.
सुहासचं डोळ्यांचं आजारपण वाढलं आणि वार्धक्यामुळे त्यांनी या जगाचा निरोप घेतला.
———————————————–
“गुड मॉर्निंग आई,आजचा दिवस तुझा.” प्रयागच्या बोलण्याने शशीताई विचारातून जाग्या झाल्या.
“अरे हो,पण हे काय आता नवीनच खूळ.” शशिताई हसत म्हणाल्या.
“ते खूळ तुमच्या लाडक्या नातवाचं आहे आई.”दिशा शशिताईंजवळ खुर्ची घेऊन बसली.
“गरम गरम चाय.”सुमीतने चार कप टेबलवर ठेवले.
“वा, अप्रतिम झालाय चहा सुमी.कधी शिकलास रे.मला तर कधीच मदत करत नाहीस घरकामात.” दिशाने सुमीतच्या गालावर कौतुकाने थोपटलं.
“आज आजीसाठी खास चहा केलाय म्हणून छान झालाय.”सुमीत हसत म्हणाला.
तिघांनाही हसतं खेळतं बघून शशीताईंना कृतकृत्य झाल्यासारखं वाटलं.आयुष्यात केलेल्या कष्टाचं चीज झाल्यासारखं वाटलं.कितीही मनाला आवरलं, तरी चहाच्या कपात एक अश्रू पडलाच…..
★★समाप्त★★
©®सौ मधुर कुळकर्णी, पुणे
=====================
प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.
https://www.facebook.com/ritbhatmarati/
तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.
ritbhatmarathi@gmail.com
फोटो साभार – गूगल
आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही
=============